esakal | साप्ताहिक राशिभविष्य १२ सप्टेंबर २०२१ ते १८ सप्टेंबर २०२१
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope

साप्ताहिक राशिभविष्य १२ सप्टेंबर २०२१ ते १८ सप्टेंबर २०२१

sakal_logo
By
श्रीराम भट saptrang@esakal.com

सिद्धिविनायकाचा प्रसाद घेऊ या !

शिवशक्तींच्या मीलनातून प्रकटलेले श्रीगणेश हे विश्‍वाचे सौंदर्यच होत. त्रिमात्रांना आणि त्रिगुणांना धरून ठेवणारी धरित्री ही कृपेची धात्रीच आहे. असे हे कृपाछत्र मूर्तीरूपात ज्या वेळी अवतरतं त्या वेळी हे मूर्तिध्यानच प्रसन्नतेतून प्रसाद देते आणि तेच हे श्रीगणेशांचे दर्शन होय!

श्रीगणेश हे पराप्रासाद मंत्राचा उद्‌घोष करणारे एक प्राणस्पंदनच होय! आणि हे प्राणस्पंदन जगन्माऊलीचा हुंकारच आहे आणि हा हुंकारच जिवाचा शुद्ध संकल्प सिद्धीस नेत असतो आणि हीच गणेशविद्या!

ज्योतिष हे परावाणीशी संबंधित आहे. माणसाचा संकल्प आदिसंकल्पाशीच अनुसंधान साधणारा असला पाहिजे. सत्यसंकल्पाचा दाता नारायण म्हटलं आहे. माणसाचा संकल्प जर शुद्ध नसेल, तर हाच संकल्प माणसाचे वाईट प्रारब्ध घडवतो. जिवाचे प्राणस्पंदन ज्या वेळी ईश्‍वरीभावात नांदू लागतो त्या वेळीच त्याच्या स्पंदनाकडे म्हणा किंवा त्यांच्या संकल्पाकडे भगवंताचे सतत लक्ष राहत असते! आणि त्यामुळेच त्याचा संकल्प भगवंत तात्काळ सिद्धीस नेत असतो ! माणूस हा लबाड आहे. त्यामुळेच त्याच्या मनात दैवी संकल्प आणि राक्षसी संकल्प यांचे घोळ होऊन विकल्प निर्माण होऊन अशुद्ध संकल्पांची स्पंदनं निर्माण होऊन माणूस भरकटत जातो आणि मग त्याची शुद्ध आदिसंकल्पाशी जडलेली नाळ तुटते आणि त्याच्या जीवनात प्रारब्धाचाच वाटेकरी असा ज्योतिषी अवतरतो !

मित्रहो, आपलं प्राणस्पंदन हे भगवंताच्या आदिसंकल्पाच्या अर्थातच श्रीगणेशांच्या स्मरणात नांदू लागलं, की आपला संकल्प शुद्ध संकल्प होत जातो आणि हाच संकल्प श्रीगणेशांच्या परावाणीशी स्पर्धा करत तात्काळ सिद्ध होतो! अशा या सिद्धिविनायकाचे शिवपार्वती कौतुकानं लालनपालन करत असतात हे विशेष! सध्या गुरू आणि शनी हे ग्रह एका विशिष्ट अवस्थेतून जात आहेत. विश्‍वप्रारब्ध आणि व्यक्तिप्रारब्ध हे श्रीगणेशच बदलू शकतात. त्यामुळेच श्रीगणेशांच्या प्रसादातून आपण आपल्या जीवनाची प्राणशुद्धी करून घेऊन सत्यसंकल्पाचे धनी होऊ या!

नोकरीत सुवार्ता तसेच धनलाभ होईल

मेष : सप्ताह संमिश्र स्वरूपाची फळे देणारा. आरोग्यविषयक पथ्ये पाळा. बाकी अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १५ हे दिवस शुक्रभ्रमणाच्या अखत्यारीतून बोलतील. नोकरीत सुवार्ता. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा शनिवार वैयक्तिक सुवार्तेचा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ होईल.

सरकारी कामांमध्ये यश मिळेल

वृषभ : गुरू वक्री स्थितीत भाग्यात येत आहे. ता. १६ ते १८ हे दिवस नावीन्यपूर्ण शुभ फळे देतील. नोकरीचे प्रस्ताव येतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांतून यश. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींचा परदेशी भाग्योदय. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारी सूर्योदयी मोठ्या सुवार्ता. बॅंकेची कामे होतील.

मोठे चमत्कार घडतील

मिथुन : बुध आणि शुक्र या ग्रहांची उत्तम साथ राहील. सकारात्मक विचार ठेवा. तरुणांच्या नोकरीच्या अंतिम मुलाखती यशस्वी होतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १५ हे दिवस अतिशय प्रवाही. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा कराच. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात ता. १५ चा बुधवार मोठे चमत्कार घडवेल.

ओळखी-मध्यस्थीतून कामे मार्गी लागतील

कर्क : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात मोठी यशस्वी राहील. ओळखी - मध्यस्थीतून मोठी कामे शक्य. घरातील स्त्रीचा उत्कर्ष होईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १६ हे दिवस व्यावसायिक प्रदर्शनांतून लाभदायी. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा शनिवार विशिष्ट संकटनिवारण करणारा.

मोठ्या व्यावसायिक उलाढाली होतील

सिंह : पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मोठे बॅटिंग फिल्ड राहील. मोठ्या व्यावसायिक उलाढाली. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १५ हे दिवस अतिशय प्रवाही. काहींना पुत्रोत्कर्षातून धन्यता. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार वादग्रस्त प्रकरण मिटवणारा. राजकीय व्यक्तींकडून लाभ. पत्नीचा उत्कर्ष.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

कन्या : सप्ताहात अतिशय सुंदर ग्रहमान राहील. शुभ ग्रहांची लॉबी आणखी बळकट होईल. ता. १४ ते १६ हे दिवस घरगुती वातावरण प्रसन्न ठेवतील. घरात कार्ये ठरतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून लाभ. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सरकारी कनेक्‍टिव्हिटीचा.

परदेशगमनाचा योग, कॅम्पसमध्ये नोकरी

तूळ : सप्ताहात शुक्रभ्रमणाची संवेदनशीलता राहील. ता. १४ ते १६ हे दिवस मोठे नावीन्यपूर्ण. कलाकारांचे भाग्योदय. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी परदेशगमनाचे योग. व्यावसायिकांना परदेशी लिंक मिळेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी कॅम्पसमधून नोकरी. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार दैवी प्रचितीचा.

विशिष्ट गुप्तचिंता जातील

वृश्‍चिक : अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचा सप्ताह. प्रलोभन टाळा. अर्थातच संशयास्पद व्यवहार टाळा. बाकी ता. १६ व १७ हे दिवस भाग्यसूचक. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट गुप्तचिंता जाईल. शनिवारी मोठी दैवी प्रचिती. तरुणांना स्पर्धात्मक यश. नोकरीचा लाभ.

शुभ ग्रहांच्या लॉबीची पूर्ण साथ

धनु : सप्ताहात गुरूचे वक्री स्थितीत धनस्थानात आगमन होईल. विशिष्ट कौटुंबिक प्रश्‍न मार्गी लागतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभ ग्रहांच्या लॉबीकडून पूर्ण लाभ होतील. ता. १४ व १५ हे दिवस मोठ्या उलाढालींचे. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत पदोन्नती. शनिवार सूर्योदयी सुवार्ताचा.

व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील

मकर : सप्ताह अतिशय गतिमान असा राहील. व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ. ता. १६ ते १८ हे दिवस अतिशय हाय कनेक्‍टिव्हिटीचे. अर्थातच मोठ्या उलाढाली. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींसाठी नोकरीच्या उत्तम संधी. शनिवार मोठ्या दैवी प्रचितीचा. नैराश्‍य जाईल.

महत्त्वाच्या निर्णयात सावधानता बाळगा

कुंभ : सप्ताह वैचारिक गोंधळ करू शकतो. सप्ताहात महत्त्वाचे निर्णय घेताना सावध. बाकी सप्ताहात व्यावसायिक आवकजावक उत्तमच राहील. ता. १५ व १६ हे दिवस शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी वैयक्तिक सुवार्तांचेच. कलाकारांचा उत्कर्ष. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १४ व १५ हे दिवस परदेशात भाग्योदय करतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती.

चिंतामुक्त करणारा कालखंड

मीन : रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात संमिश्र स्वरूपाचे ग्रहमान. सप्ताहात उधार-उसनवारीतून अडचणीत याल. वैद्यकीय तपासणीतून गुप्तचिंता वाढेल. मात्र सप्ताहाचा शेवट चिंतामुक्त करणारा. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तीस ता. १५ व १६ हे दिवस नोकरीतील घडामोडींतून शुभसूचक. बढतीची चाहूल. विलंबीत कर्जवसुली होईल.

loading image
go to top