राशिभविष्य (ता. १३ डिसेंबर ते १९ डिसेंबर)

weekly horoscope
weekly horoscope

देवदीपावलीचं दिव्य कर्म!
प्राणमय कोषात पंचभौतिक शरीराची एक मोट बांधली जात असते. मन, प्राण आणि शरीर हे एकमेकांचा आधार घेत शक्तींचा खेळ साजरा करत असतात आणि या शक्तींचं विशिष्ट मॉडेल असलेलं जीवधातुशरीर या विश्र्वात प्रदर्शित होत असतं.  माणसाचं जगणं म्हणजे नेमकं काय हो, असा मोठा प्रश्र्नच पडतो. गंमत अशी आहे की शरीरात प्राण नांदतो; पण या प्राणाला शरीर पकडून ठेवू शकत नाही, तसंच मन शरीराच्या ताब्यात नसतं आणि त्यातही पुन्हा गंमत अशी आहे की मन शरीराला न जुमानता, ते झोपलेलं असतानाही, त्याला नकळताही त्याच्या पंचेंद्रियांचा भोग घेत असतं, अर्थात्, स्वप्नात शरीराला जागवून त्याचा भोग घेतं. अशा प्रकारे मन, प्राण आणि शरीर यांचं संतुलन किंवा समन्वय नसल्यानं जिवाला कधीच स्वस्थता नसते. कायिक, वाचिक आणि मानसिक यांचं संतुलन राखण्यासाठी जिवाला विशिष्ट श्रद्धावस्तूचा अंगीकार करावा लागतो आणि ही श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी देवत्व दैव होऊन पृथ्वीतत्त्वाच्या शरीरात अवतरावं लागतं. परमेश्र्वराचं तेज घेऊनच माया पृथ्वीवर पंचभौतिक जीवधातुशरीराचा प्रपंच मांडते किंवा साजरा करते. ता. १४ रोजी सोमवती अमावास्या ज्येष्ठा नक्षत्रात होत आहे. या ज्येष्ठा नक्षत्राची इंद्र ही देवता आहे. इंद्र हे पंचेंद्रियांचं एक भोगशरीरच म्हटलं पाहिजे. या पंचेंद्रियांच्या भोगाला श्रद्धावस्तूचा स्पर्श असेल तरच हा भोग देवांचा नैवेद्य होत असतो! 

मित्र हो, देवाचं दैव हेच मुळी जगाचं जग म्हणून जगणं आहे! जग ही अनेक विभूतींना जन्म देणारी ‘दैविकी’ इच्छाच होय! त्यामुळेच भगवंतांनी गीतेत ‘मासानाम्‌ मार्गशीर्षोस्मि’ असं म्हटलं आहे. कार्तिकी अमावास्येनंतर मूळ नक्षत्राचा धनुर्मासारंभ सुरू होतो. अर्थातच देवदीपावलीचा मार्गशीर्ष महिना सुरू होतो. ज्येष्ठा आणि मूळ यांच्या संधीवर एक परावाणी नांदते. देवाचं अवतरणं हे जीवरूपी शरीर धारण करून झालेलं आहे. कायिक, वाचिक आणि मानसिक यांच्या समन्वयातून दिव्य कर्म कसं प्रकट होतं हे सांगण्यासाठीच श्रीकृष्णावतार झाला. ज्येष्ठा आणि मूळ नक्षत्राच्या संधीवरील परावाणीचा प्रणवाशी संबंध आहे. ही परावाणी ही सत्यवस्तूशी संबंधित आहे. परावाणीचा उच्चार करणारं मानवी शरीरच दिव्यत्वाचा मार्ग अनुसरत ब्रह्म अनुभवत असतं किंवा वेदमंत्रांचा घोष करत असतं. असा हा मूळ ध्वनी देवदीपावलीत परावाचेचं जागरण करत असतो!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यवसायात उत्तम वसुली
मेष :
 या सप्ताहात नैसर्गिक पाठबळ मिळणार नाही. वेळ पाळा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना न दिसणाऱ्या सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर घरातील प्रिय व्यक्तींचा त्रास किंवा त्यांच्या विषयीच्या चिंता. बाकी, अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार गुरुकृपेचा. नोकरीतील भाग्योदयानं प्रसन्न व्हाल. व्यवसायातली वसुली उत्तमरीत्या होईल. 

प्रेमात पडण्याचे दिवस
वृषभ :
 ता. १४ डिसेंबरचं न दिसणारं सूर्यग्रहण परिणाम करणारंच आहे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी ग्रहणाच्या आसपासच्या काळात आपली मानसिक, शारीरिक आणि आर्थिक सुरक्षाव्यवस्था घट्ट ठेवावी. ता. १७ व १८ हे दिवस रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रेमात पडण्याचे. मनाचे अँटिने स्वच्छ असू द्या व ते रोखून ठेवा. व्यवसायात मोठी प्राप्ती. 

संशयग्रस्त होऊ नका 
मिथुन :
 या सप्ताहात विचित्र मानसिक व्हायरस ग्रासू शकतो. संशयपिशाच्च मानगुटीवर अकारण बसवून घेऊ नका. ता. १४ च्या अमावास्येच्या आसपासच्या काळात कुत्र्यांपासून सावध. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस व्यावसायिक तेजीचे. महत्त्वाच्या गाठी-भेटी होतील. वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील. 

घबाडसदृश फळ मिळेल!
कर्क :
 सप्ताहातील ग्रहमान अपवादात्मक स्वरूपाचंच. सोमवती अमावास्या काहींना घबाडसदृश फळं देईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शनीचं कॅबिनेट गुप्त सहकार्य करेल. ता. १७ व १८ हे दिवस अतिशय प्रवाही. महत्त्वाच्या कामांचं नियोजन कराच. आश्लेषा नक्षत्राच्या नवपरिणितांनी सासूचा अहंकार तोषवावा! 

येणं वसूल होईल
सिंह :
 ता. १४ ची सोमवती अमावास्या हे एक अवघड वळण आहे. ग्रहांचे सिग्नल पाळा! बाकी, मघा नक्षत्राच्या व्यक्तींना देवदीपावलीच्या प्रारंभी (ता. १५) सुवार्ता कळतील. पुत्रचिंता दूर होईल. व्यवसायातलं एखादं वादग्रस्त येणं येईल. तरुणांच्या नोकरीसाठीच्या मुलाखती यशस्वी होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. 

वास्तूचा व्यवहार होईल
कन्या :
 अमावास्येनंतरचा ग्रहांचा ट्रॅक उत्तमच. देवदीपावलीचा प्रारंभ नक्षत्रलोकांतून लाभ देणारा! उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती फॉर्मात येतील. ता. १७ व १८ हे दिवस तुमच्या राशीला एकूणच ‘चांदणं शिंपीत जा’चा अनुभव देणारे! तरुणांनो, लाभ घ्याच. वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना अपत्यलाभ. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती प्रेमात पडतील! 

नोकरीत बढतीची चाहूल!
तूळ :
 आर्थिक पातळीवर तुमचा शेअर वधारलेलाच राहील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस अतिशय लाभदायी. ओळखी-मध्यस्थी फलद्रूप होतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बढतीची चाहूल! पतीचा वा पत्नीचा भाग्योदय. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणात यश. 

मनावर ताबा ठेवावा 
वृश्र्चिक :
 राशीतील ग्रहणयुक्त अमावास्येच्या आसपासच्या काळात कौटुंबिक कलह होऊ शकतात. नवपरिणितांनी काळजी घ्यावी. मनावर ताबा ठेवावा. बाकी, ता. १५ चा देवदीपावलीचा प्रारंभ अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या आर्थिक लाभाचा. प्रसन्नतेचा. ज्येष्ठा नक्षत्राच्या तरुणांना विशिष्ट स्पर्धात्मक यश. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय. शुक्रवार मान-सन्मानाचा. 

व्यवसायात ग्रीन सिग्नल!
धनू :
 हा सप्ताह ग्रहांच्या अवघड प्रश्र्नपत्रिकेचा! विचित्र काल्पनिक भय-भीती सतावेल. स्त्री-पुरुषसंबंधांतून वादळं उठू शकतात. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी उद्याच्या सोमवती अमावास्येला नामजप करत राहावा. बाकी, मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस व्यवसायात ग्रीन सिग्नल देणारे. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टात यश. 

तरुणांना नोकरी लागेल
मकर :
सोमवती अमावास्येच्या आसपासच्या काळात धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींची गाठ-भेट नको त्या माणसांशी पडेल. नवपरिणितांना अमावास्येच्या आसपासच्या काळात विचित्र मानसिक व्यथेतून त्रास. बाकी, श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती ता. १७ व १८ रोजी विजयोत्सव साजरा करतील. तरुणांना नोकरीचं बोलावणं येईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यवसायात तेजी राहील. 

संकट दूर होईल
कुंभ :
 राशीचा नेपच्यून आणि राशीच्या दशमस्थानातील सोमवती अमावास्या एक आवर्त निर्माण करू शकते. तात्कालिक विशिष्ट भय-भीतीचा पगडा राहू शकतो. काहींना अप्रतिष्ठेचं भय! धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस संकटविमोचनाचेच. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक खरेदी-विक्रींतून लाभ. 

तरुणांना विशिष्ट क्षेत्रात यश
मीन :
 या सप्ताहात गुरू-शनीचं ‘कॅबिनेट’ कार्य करेलच! अर्थातच त्यांच्या विशिष्ट वटहुकमाद्वारे तुम्हाला लाभ होतील. सोमवती अमावास्या काहींना घबाडयोगाची. तरुणांना विशिष्ट क्षेत्रात यश. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती फॉर्मात येतील! रेवती नक्षत्राच्या व्यक्तींबाबत शुक्रवारी देवदीपावलीत दैवी चमत्कार घडतील! पुत्रोत्कर्ष होईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com