esakal | साप्ताहिक राशिभविष्य (ता. १४ फेब्रुवारी २०२१ ते २० फेब्रुवारी २०२१)
sakal

बोलून बातमी शोधा

weekly horoscope

रथसप्तमीचा ज्ञानोदय! 
माणूस ही एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा सूर्याचीच असते. पृथ्वीवर पृथकपणे वावरणारी, प्राकृतिक ऊर्जा अर्थात सूर्याचीच असते. तेजाला आकृतिबद्ध करणारी ऊर्जा ही ओघानं सूर्याचीच असते आणि मृगजळाचा भास निर्माण करणाऱ्या शशिकिरणांची ऊर्जा ही सूर्याचीच असते!

साप्ताहिक राशिभविष्य (ता. १४ फेब्रुवारी २०२१ ते २० फेब्रुवारी २०२१)

sakal_logo
By
श्रीराम भट saptrang@esakal.com

रथसप्तमीचा ज्ञानोदय! 
माणूस ही एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा सूर्याचीच असते. पृथ्वीवर पृथकपणे वावरणारी, प्राकृतिक ऊर्जा अर्थात सूर्याचीच असते. तेजाला आकृतिबद्ध करणारी ऊर्जा ही ओघानं सूर्याचीच असते आणि मृगजळाचा भास निर्माण करणाऱ्या शशिकिरणांची ऊर्जा ही सूर्याचीच असते! चंद्राला प्रकाशात आणणारी ऊर्जा ही सूर्याचीच असते आणि सर्वांत शेवटी चंद्रबळाचा विचार करणाऱ्या ज्योतिषाला ऊर्जा देणारा सूर्यच आहे! एवंच, व्यक्त होणारं जगत आणि व्यक्त होणारी व्यक्ती सूर्यप्रकाशात लाईम लाईटमध्ये येते असेच म्हणाना! 

व्यक्त आणि अव्यक्त यांचा सांधा पंचमहाभूतात्मक धाग्यांतून विणला जातो आणि हेच वस्त्र लपेटून प्रकृतीचा खेळ सूर्यप्रकाशात नांदतो असेच म्हणावे लागेल. व्यक्ती प्रकाशात येते म्हणजे नेमके काय हो ! शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांचा अनुभव घेणारी ऊर्जाच व्यक्तीचा व्यक्तिप्रपंच मांडत असते! 

'ध्येयः सदा सवितृ मण्डलमध्यवर्ती'' असेच उपनिषदे सांगत आली आहेत. त्यांच्या मते आत्मा हा रथी, शरीर हे रथ, बुद्धी हा सारथी व मन हे लगाम म्हटले आहे! बुद्धी ही मनाला घेऊन आत्मप्रकाशात नांदली पाहिजे असेच गीतेत सांगितले आहे. सूर्य हा आत्मप्रकाशच आहे. हा आत्मप्रकाश बुद्धी, मन आणि पंचमहाभूतांची ऊर्जा होत बंधरहित अवस्थेत सतत नित्य किंवा सदोदित प्रकाशात असतो किंवा भोगून अभोक्ता असतो! असा हा रथसप्तमीचा सूर्योदय भीष्माचार्यांना गीताबोध आठवून देत अष्टमीच्या योगसमाधीकडे घेऊन गेला! मित्रहो, शब्दब्रह्माच्या व्यक्तिप्रपंचाचा संसाररथ आत्मवंचित होऊन भरकटत जाऊ नये म्हणून रथसप्तमी साजरी करतात! यंदाचा रथसप्तमीचा सूर्योदय बुध-गुरू सहयोगातून आणि श्रीगणेशाच्या आशीर्वादातून ज्ञानप्रकाशातून पाहूया! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुवार्तांचा कालखंड 
मेष :
सप्ताह अनेक प्रकारांतून श्रीगणेशा करणाराच! १६ च्या वसंत पंचमीची संध्याकाळ मोठ्या सुवार्तांची. भरणी नक्षत्रास ग्रहांचे योगदान. अश्‍विनी नक्षत्रास परदेशगमनाच्या संधी. कृत्तिका नक्षत्रास रथसप्तमीची सूर्यकिरणे नवी दिशा देणारी. शनिवार धनवर्षावाचा. 

गणेशजयंती अलौकिक असेल 
वृषभ :
सप्ताह मंगलमयीच राहणार आहे. सूर्यदर्शन घेऊन कामाला लागा. रोहिणी नक्षत्रास सप्ताहाचा आरंभ आणि शेवट सर्वार्थानं मस्तच. बॅटरी चार्ज करून ठेवा. मृग नक्षत्रास सोमवारची श्रीगणेश जयंती मोठी अलौकिक राहील. नोकरीतून भाग्योदय. 

व्यावसायिक येणी मिळतील 
मिथुन :
बुध-गुरू शुभ योगातून गुंतवणुकींतून लाभ. व्यावसायिक येणी येतील. आर्द्रा नक्षत्रास वास्तुविषयक खरेदी-विक्रींतून लाभ. १८ चा गुरुवार गाठीभेटी यशस्वी करणारा. पुनर्वसू नक्षत्रास वसंत पंचमीचा मंगळवार मोठ्या सुवार्तांचा. नोकरीत लाभ. 

घरात मंगलकार्ये ठरतील 
कर्क :
घरात भक्तिसुगंध दरवळेल. अर्थात घरात देवतांचा वावर राहील. घरातील प्रिय व्यक्तींची मंगलकार्ये ठरतील. आश्‍लेषा नक्षत्रास रथसप्तमीचा सूर्योदय भाग्य घेऊन येणारा. पुष्य नक्षत्रास सप्ताहाची सुरुवात मानसन्मानाची. पुनर्वसू नक्षत्रास अपत्ययोग. 
 
शत्रुत्व मिटेल 
सिंह :
मघा नक्षत्रास सप्ताहाचा शेवट नोकरीत भाग्योदयाची चाहूल देईल. विवाहयोग आहेतच. १९ ची रथसप्तमी पूर्वा नक्षत्रास वैवाहिक जीवनातून आनंदोत्सवातून दीपप्रज्वलन करणारी. उत्तरा नक्षत्रास १६ ची वसंत पंचमी शत्रुत्व मिटवणारी. 

रथसप्तमी धनवर्षावाची 
कन्या :
बुध-गुरू शुभ योगातून श्रीगणेश जयंतीचे मांगल्य वाढेलच. घरातील तरुणांचे भाग्य उलगडेल. हस्त नक्षत्रास वास्तुयोग. उत्तरा नक्षत्रास रथसप्तमीचा शुक्रवार नोकरीत शुभलक्षणी. एखादं सावट जाईल. चित्रा नक्षत्रास रथसप्तमी धनवर्षावाची. पती वा पत्नीला भाग्योदय. 

नोकरीत लाभ होईल 
तूळ :
सप्ताह ग्रहयोगांतून घरात मांगल्याचा. घरात मंगलकार्ये ठरतील. १८ चा गुरुवार चित्रा नक्षत्रास नोकरीतील नव्या जडणघडणींतून लाभ देणारा. विशाखा नक्षत्रास कोर्टप्रकरणातून सामोपचाराचा मार्ग मिळेल. शनिवार स्वाती नक्षत्राची पुत्रचिंता घालवेल. भाजण्यापासून जपा. 

तरुणांना आश्‍वासक काळ 
वृश्‍चिक :
सप्ताह आपल्या राशीस एकूणच निर्धोक. तरुणांना मोठा आश्‍वासक! सोमवारची श्रीगणेश जयंती दैवी प्रचितीचीच. विशिष्ट संकल्पपूर्तीचा आनंद मिळेल. सप्ताहाचा शेवट मोठ्या गोड बातम्या देणारा. ज्येष्ठा नक्षत्रास ता. २० चा शनिवार जीवनाला दिशा देणारा. अनुराधाचा विवाह! 

विशिष्ट नोकरीचा लाभ 
धनू :
गुरूची आपली रास सप्ताहात ता. १५ व १६ या दिवसांत श्रीगणेशांची कृपा प्राप्त करेल. मूळ नक्षत्रव्यक्ती रथसप्तमीचा मुहूर्त साधत प्रकाशात येतील. विशिष्ट नोकरीचा लाभ होईल. पूर्वाषाढा नक्षत्रास सप्ताहाची सुरुवात शैक्षणिक भाग्योदयाची. परिचयोत्तर विवाहयोग. 

नोकरीत बढतीची शक्यता 
मकर :
सप्ताहात जणू त्रिवेणी संगमावर स्नान कराल. ता. १५ व १६ हे दिवस पावन करणारे. श्रवण नक्षत्रास हृद्य प्रसंगातून नेणारे. व्यावसायिकांना लक्ष्मीच्या प्रसादातून धन्यता! धनिष्ठा नक्षत्रास १९ चा रथसप्तमीचा दिवस व्यावसायिक उलाढालींचा. नोकरीत बदलीतून बढती. मात्र प्रवासात जपा. 

शैक्षणिक प्रश्‍न सुटतील 
कुंभ :
सप्ताहातील बुध-गुरू युतीयोग शैक्षणिक प्रश्‍न सोडवणारा. परदेशस्थ तरुणांना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट रथसप्तमीच्या सप्ताहात ऊर्जा देणारा. ओळखी-मध्यस्थीतून लाभ. शततारका नक्षत्रास देवदर्शन. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास धनयोग. व्यावसायिक वसुली. 

रथसप्तमी ग्लॅमर देईल 
मीन :
गुरू-बुध युती योगाचे श्रीगणेश जयंतीजवळ अधिष्ठान राहील. सप्ताहात शुभ संकल्प कराच. विवाहस्थळांकडे लक्ष द्या! १६ च्या वसंत पंचमीचा मुहूर्त कराच. उत्तराभाद्रपदा व्यक्तींना ग्लॅमर देणारी रथसप्तमी! रेवती नक्षत्रास कॅम्पसमधून नोकरी. दिलखुलास मुलाखती द्या

Edited By - Prashant Patil