साप्ताहिक राशिभविष्य (१४ नोव्हेंबर २०२१ ते २० नोव्हेंबर २०२१)

सृष्टीच्या आरंभापासूनचा, अर्थातच अनंत जन्मांपासूनच्या कर्मसंगतीचा हिसाबकिताब पूर्ण करण्यासाठी मनुष्यजन्माला यावं लागतं.
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal

नका आणू आव!

सृष्टीच्या आरंभापासूनचा, अर्थातच अनंत जन्मांपासूनच्या कर्मसंगतीचा हिसाबकिताब पूर्ण करण्यासाठी मनुष्यजन्माला यावं लागतं. मनुष्यजन्म हे एक असं प्रवासाचं स्थान आहे, की या जंक्‍शनवरूनच स्वर्ग, नरक किंवा इतर नीच योनींमध्ये जाण्यासाठी किंवा अर्थातच जन्म-मरणाच्या बिकट प्रवासाची परतीची तिकिटं मिळत असतात!

माणसाच्या शरीराच्या पोतडीमध्ये मन, बुद्धी आणि अहंकार यांच्यावर जन्मजन्मांतरीच्या वहिवाटीतून झालेल्या विशिष्ट संस्कारांचं रसायन प्रकृतीकडून कोंबलं जातं. उदा. स्वर्गातील इंद्र पांडवांच्या रूपात अवतरला आणि इंद्राणी द्रौपदी झाली! माणसाची श्रद्धा ही त्रिगुणात्मक आहे, असंच गीतेत सांगितलं आहे आणि या त्रिगुणात्मक श्रद्धेचा आवच किंवा आवेगच देव, मनुष्य आणि राक्षस या रूपांत आविष्कारित होत असतो. कलियुगातील माणूस हे निव्वळ एक ढोंग आहे, असाच बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे! माणूस हे एक भावबंधन असलं पाहिजे. आव हा भाव कधीच होत नाही! भाव हा निसर्गाचा स्थायीभाव किंवा स्वभाव आहे. या निसर्गाच्या स्थायीभावाशी जवळीक साधणारा माणूसच किंवा तो जीवात्माच परमात्म्याशी संधान बांधू शकतो. भाव ज्या वेळी व्यवहार होतो, त्या वेळीच तो आव होतो आणि या आवेशाचंच शेवटी शाप, शपथ आणि वरदानात रूपांतर होतं; आणि मग हे शाप, शपथ आणि वरदान यांचं देणं-घेणं अनंत अशा जन्म-मृत्यूच्या चक्रात ऋणमुक्ततेची वाट पहात राहतं.

मित्र हो, १८ नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा आहे. त्रिपुरारी पौर्णिमेचा संबंध वरदानाशी आहे. ब्रह्मदेवाचं वरदान लाभलेल्या त्रिपुरासुराचा शंकरानं त्रिपुरारी पौर्णिमेला वध केला. याचा बोध कलियुगातील माणसानं तर घेतलाच पाहिजे. वरदानासाठी केलेली साधना, किंवा या साधनेतून मिळालेलं वरदान कालौघात किंवा कर्मभ्रष्टतेतून शापासारखंच ठरत असतं. सत्त्वगुणी भीष्मानंसुद्धा आवेशात घेतलेली शपथ त्याला चांगलीच भोवली (?) म्हणूनच जीवनात कोणताही आव आणू नका. भक्तजीवनाविषयी भाव ठेवत, पंचमहाभूतांना दैवत मानत परमेश्‍वराला पंचारती ओवाळू या!

नोकरीमध्ये वाद टाळा

मेष : राशीचा हर्षल पौर्णिमेच्या सप्ताहात ग्रहांचा पट पूर्ण ताब्यात घेईल. घरात स्वस्थ बसा, एकांतात रहा, नो गॉसिपिंग. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांची टाइट फिल्डिंग सहन करावी लागेल. ता. १७ व १८ हे दिवस अनेक बाबतींत प्रक्षोभक आणि नाट्यमय होऊ शकतात. नोकरीत वाद टाळा. कृत्तिका नक्षत्रास गुरूची प्रचिती!

चकित करणारे चमत्कार होतील

वृषभ : सप्ताह अपवादात्मक घटना पार्श्‍वभूमींतून त्रस्त करेल. न दिसणाऱ्या चंद्रग्रहणाचं प्रभावक्षेत्र जपाच. एखादी वेदनायुक्त व्याधी सतावेल. ता. १७ चा दिवस जागरणाचा. बाकी सप्ताहारंभी आणि शेवटी गुरुभ्रमणाची विशिष्ट स्थिती उत्तम साथ देईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे चमत्कार चकित करतील. रोहिणी नक्षत्राच्या गृहिणींनी संशयपिशाच्चापासून सावध.

मानसिक संतुलन राखावं

मिथुन : द्वाड, संतापी किंवा अतिरेकी व्यक्तींना सप्ताहातील ग्रहमान आणि चंद्रग्रहण प्रमाद करवू शकतं, सावधान. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. १७ व १८ या दिवसांत मानसिक संतुलन राखावं. बाकी सप्ताहाची सुरुवात एकूणच आपल्या राशीस छानच. अनेकांना शुक्रकलांचा उत्तम लाभ. कलाकारांचे भाग्योदय.

थोरामोठ्यांच्या आशीर्वादातून नोकरीचा लाभ

कर्क : मोठ्या ग्रहांची लष्करी राजवट राहीलच. दीपावलीची सांगता भांडणानं होऊ देऊ नका. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस ग्रहमानातून मोठे व्हायरसचे! वाहनं जपा. पैशाचं पाकीट जपा. ता. १५ व १६ हे दिवस सद्‌भक्तांना दैवी प्रचितीचे. तरुणांना थोरामोठ्यांच्या आशीर्वादातून नोकरीचा लाभ.

भागीदाराबरोबरचे गैरसमज टाळा

सिंह : सप्ताह गृहिणींना अनेक प्रकारांतून सासुरवास देणारा. उद्धटपणा सर्व प्रकारांतून टाळाच. व्यावसायिकांनी भागीदारीतील हितसंबंध जपाच. अकारण गैरसमज टाळा. बाकी पौर्णिमेजवळचा शुक्र - हर्षल योग पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अप्रतिमरीत्या बोलेल. थोरामोठ्यांकडून लाभ. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार भाग्याचा.

सुवार्ता आणि बलवत्तर विवाहयोग

कन्या : सप्ताह न दिसणाऱ्या चंद्रग्रहणाचा; परंतु या ग्रहणाचे परिणाम दिसतीलच. सप्ताहात कुसंगत टाळाच. गिर्यारोहकांनी जपावं. ओव्हरटेक टाळाच. बाकी सप्ताहारंभ छान शुक्रकलांचा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सुवार्तांतून लक्ष वेधेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना बलवत्तर विवाहयोग. शैक्षणिक प्रगती.

नोकरीत आचारसंहिता पाळा

तूळ : सप्ताहात कार्तिकी पौर्णिमेजवळ हर्षलचं साम्राज्य राहील, त्यात मंगळाच्या अतिरेकी कारावायांतून त्रास होऊ शकतात. सप्ताहात घरात स्वस्थ बसणंच योग्य! नोकरदारांनी ता. १७ व १८ हे दिवस नोकरीत आचारसंहिता पाळण्याचे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवार मोठ्या सुवार्तांचा. मात्र, घरगुती राजकारण टाळा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी परदेशी लाभ.

सर्व बाबींची काळजी घेणं योग्य

वृश्‍चिक : न दिसणाऱ्या चंद्रग्रहणातून टार्गेट होणारी रास. ज्येष्ठा नक्षत्रव्यक्तींना ग्रहणाजवळचे कुयोग अपवादात्मक पार्श्‍वभूमीवर त्रास देणारे. बाकी ता. १४ ते १६ हे दिवस शुभग्रहांच्या अखत्यारीतले. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा दिवस अतिशय बॅड डे. सर्व प्रकारांतून सावधान.

बढतीची शक्यता

धनू : ग्रहांच्या लष्करी राजवटीतही उत्तम लाभ घेणारी एकमेव रास! अर्थातच, राशीतील शुक्रभ्रमणाची सूक्ष्म स्पंदनं खेचून घेतली तरच. अर्थातच मानसिक प्रक्षेपणं चांगली ठेवा. वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर हा सप्ताह शेवटी विचित्र पैलू दाखवू शकतो. बाकी पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती शुक्र-हर्षल योगातून कार्तिकी पौर्णिमा गाजवतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना बढती शक्य.

नोकरी - व्यवसायात काळजी घ्या

मकर : नोकरी, व्यावसायिक पार्श्‍वभूमीवर सप्ताह विचित्र पैलू दाखवू शकतो. बदलीचं सावट सतावेल. बाकी धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी राशीतील गुरूचा शेवटचा टप्पा सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी उत्तम बोलेल. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १७ व १८ हे दिवस मोठे व्हायरसचे. गाठी-भेटी जपा.

तरुणांचा मोठा भाग्योदय

कुंभ : सप्ताहाच्या शेवटी गुरू आपल्या राशीत प्रवेश करेल. सप्ताहाच्या आरंभी शुक्रभ्रमणातून शततारका नक्षत्राच्या व्यक्ती उत्तम लाभ उठवतील. तरुणांचे मोठे भाग्योदय. ता. १९ चा शुक्रवार मोठ्या सुवार्तांची पार्श्‍वभूमी ठेवेल. मात्र, ता. १७ व १८ चंद्रग्रहणाचं प्रभावक्षेत्र मानसिक अशांतता ठेवेल. मित्रांकडून त्रास. पूर्वाभाद्रपदा आणि धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार प्रसिद्धी योगाचा.

अद्‌भुत लाभ होतील

मीन : सप्ताह शुभग्रहांच्या अखत्यारीतलाच राहील. मात्र, मंगळ-हर्षल प्रतियुतीच्या उच्च दाबाचा एक केंद्रबिंदू क्रियाशील राहील. एखादी मानवी दहशत सतावेल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. १७ व १८ या दिवसांत वरील उच्चदाबाचं भान ठेवावं. बाकी रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट अद्‌भुत लाभांचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com