esakal | राशीभविष्य : (१५ ते २१ नोव्हेंबर २०२०)
sakal

बोलून बातमी शोधा

राशीभविष्य : (१५ ते २१ नोव्हेंबर २०२०)

विश्र्व हा शक्तींचा खेळ आहे. आपली ग्रहमाला गुरुत्वाकर्षणानं बांधली गेलेली आहे. आकर्षण कुणाचं कुणाला होतं हे सांगणं फार अवघड आहे. आकर्षणच आकर्षित होत असतं असंही म्हटलं तर वावगं नाही!

राशीभविष्य : (१५ ते २१ नोव्हेंबर २०२०)

sakal_logo
By
श्रीराम भट

आकाशाशी जडलं नातं! 
विश्र्व हा शक्तींचा खेळ आहे. आपली ग्रहमाला गुरुत्वाकर्षणानं बांधली गेलेली आहे. आकर्षण कुणाचं कुणाला होतं हे सांगणं फार अवघड आहे. आकर्षणच आकर्षित होत असतं असंही म्हटलं तर वावगं नाही! एकमात्र खरं की आकर्षण होणं आणि आकर्षित केलं जाणं हाही एक शक्तींचाच खेळ आहे, म्हणूनच आकर्षण हे एक सत्ताकेंद्र आहे आणि या सत्तेची बांधून ठेवण्याची एक शक्ती आहे! शक्ती कमी पडलेलं सत्ताकेंद्र दुसऱ्या आकर्षणाकडं आकर्षित होतं. असा हा शक्तींचा आकर्षण-विकर्षणाचा खेळ अनंत आकाशात सतत चालत असतो आणि या खेळालाच ग्रहबंधनाचं स्वरूप येतं! 

बंधन आणि बद्धता यांत फरक आहे. बंधन हे स्पंदन आहे. बद्धता ही दगडासारखी स्पंदनहीन असते, म्हणूनच प्रेमबंधन हे स्पंदनशील असतं! पृथ्वी ही बद्धता आहे आणि वायू हे आकाशाचं स्पंदन आहे. अशी ही आकर्षण-विकर्षणाची स्पंदनं आकाशात सतत उठत असतात. माणसाचं मन हे वायुरूप आहे. मन हे भावबंधनाच्या स्वरूपात स्पंदनशील असेल तर एक वेगळं बंधन आहे; परंतु क्तिहीन मन दगडासारखं बद्ध होऊन जडत्वातून पृथ्वीतत्त्वाला घट्ट चिकटून राहत एक ग्रह होतं आणि मग ग्रहपीडा अनुभवतं! 

आकाशात ग्रहांचा खेळ चालतो. सर्वांना सामावून घेणारं हे आकाशतत्त्व सर्व प्रकारच्या गुरुत्वाकर्षणांना पेलून धरतं किंवा त्या गुरुत्वाकर्षणांचा साक्षीभाव धरतं! असं हे अनंत अवकाशांना धरून राहिलेलं अनंत आकाश गुरुत्वाला धरून राहिलंय! या गुरुत्वाला धरून राहिलेल्या आकाशाशी नातं जोडल्यावर माणसाला ग्रहपीडा होऊच शकत नाही! हा आकाशाशी नातं जोडणारा माणूस आकाशातल्या आकर्षण-विकर्षणाच्या खेळात बद्ध न होता अर्थातच या ग्रहसंसाराच्या जाळ्यात न अडकता हंस पक्षी होऊन अनंत आकाशात झेपावतो आणि कैवल्याचं कैलास गाठतो! 

मित्र हो, ता. २० नोव्हेंबर रोजी गुरू पृथ्वीतत्वाच्या मकर राशीत प्रवेश करत आहे. हा गुरू सध्याच्या स्वतःच्या मकर राशीत आलेल्या शनीचा पाहुणचार घेणार आहे. गुरू हे आकाशतत्त्व आहे. अशी ही आकाश आणि पृथ्वी यांच्या भेटीची पर्वणी या सप्ताहात सुरू होईल. ही पर्वणी साधत आपण ता. २१ डिसेंबरच्या उत्तरायणारंभाच्या दिवशी हंस पक्ष्यासारखं आकाशाशी नातं जुळवत आपल्या शनीच्या कर्मप्रासादात गुरूला आलिंगन देत कैलासाचं स्मरण करू या! 

पतप्रतिष्ठा लाभेल
मेष :
अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्राचं सप्तमस्थानातलं आगमन अतिशय शुभसूचक. शिक्षण, नोकरी व विवाह या त्रिघटकांबाबत तरुणांना मोठा दिलासा. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १९ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. पतप्रतिष्ठा लाभेल. 

हितशत्रुपीडा संपेल
वृषभ :
मार्गी झालेला मंगळ मृग  नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणी मार्ग दाखवेल. हितशत्रुपीडा संपेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना बलिप्रतिपदा शुक्रकलांतून मोठी भावरम्य. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना खरेदी-विक्रीबाबत काळजी घ्यावी. फसगतीची शक्यता.  

व्यावसायिकांना लाभ
मिथुन :
दीपावलीचा हा सप्ताह अलौकिकच. व्यावसायिकांना मोठा लाभ. घरातल्या तरुणांचा भाग्योदय. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा कलाक्षेत्रात सुंदर प्रवास सुरू होईल. ता. १९ ची पांडवपंचमी एकूणच भन्नाट.  मृग नक्षत्राच्या व्यक्तींना घबाड मिळेल. 

सुगंधित दिवाळी!
कर्क :
या सप्ताहात गुरू आणि शनी हे सत्ताधीश ग्रह  तुमच्या भेटीसाठी सरसावतील. शिवाय, सप्ताहातल्या शुक्रकला या भेटीच्या स्वागताला तयार राहतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींचा राज्याभिषेक होईल! पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ही दिवाळी अतिशय सुगंधित. पत्नीचा वा पतीचा भाग्योदय!  

नोकरीत भाग्योदय
सिंह :
हा सप्ताह हर्षलच्या ताब्यातला राहील. अर्थातच, तरुणांचा परदेशी भाग्योदय. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींच्या जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीतल्या विशिष्ट पार्श्वभूमीमुळे भाग्योदय. ता. १७ ते १९ या दिवशी अनेक सुवार्ता कळतील. मघा नक्षत्राच्या प्रेमिकांना लाभ. 

वरिष्ठांची मर्जी बसेल
कन्या :
या सप्ताहात मानांकन घेणारी रास. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा लाभ होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी बसेल. मात्र, राजकीय व्यक्तींशी जपून राहा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना बलिप्रतिपदा व्यावसायिक शुभारंभाची. गुरुवार घरातल्या तरुणांच्या उत्कर्षाचा. 

लढाऊ व्हाल!
तूळ :
या सप्ताहात ग्रहांची व्यूहरचना मजेदार होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती जीवनातली धावसंख्या वाढवतील, चौकार-षटकार ठोकतील. ता. १८ ते २० या कालावधीत तरुणांचे प्युअर सिक्वेन्स लागतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती कधी नव्हे एवढ्या लढाऊ होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मानांकन. 

घरात मान वाढेल
वृश्र्चिक :
दिवाळीत काही न बोलता मजा लुटा! गुरू-शनीच्या महासत्ता तुम्हाला गुप्तपणे सहकार्य करतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना बलिप्रतिपदेला प्रतिष्ठा प्राप्त होईल. घरात मान वाढेल. व्यवसायातलं मोठं येणं वसूल होईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनात एक सुंदर पर्व सुरू होईल. 

उत्कर्षाचा काळ
धनू :
तुमची रास अग्नितत्त्वाची असून, राश्‍याधिपती गुरू हा शनीच्या भेटीसाठी सरसावणार आहे. हा योग ऐतिहासिकच होय. विवेकी माणसांचा साडेसातीतही उत्कर्ष होत असतो, म्हणूनच तुम्ही जीवनसमृद्ध  व्हाल हे निश्र्चित! मूळ आणि पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची समृद्धीकडं वाटचाल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींवर गुरुकृपा. 

वर्तमानात जगा!
मकर :
गुरू-शुक्राची राश्यंतरं अलौकिकरीत्या फलद्रूप होतील. भविष्याचा विचार करूच नका. वर्तमानात जगा. छान आनंद घ्याल! अतिशय शुभदायी सप्ताह. सोमवारची बलिप्रतिपदा उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना लाभसंपन्न करेल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ व २० हे दिवस सहकुटुंब आनंदाचे! 

नोकरीत मोठं यश
कुंभ :
या सप्ताहात गुरू बारावा होत आहे. अर्थात्‌, हा गुरू शनीच्या भेटीला जात आहे. उलटपक्षी, साडेसातीत तो संरक्षकच राहील. शुक्राच्या राश्यंतराच्या पार्श्वभूमीवर सोमवारची बलिप्रतिपदा उत्तमरीत्या साजरी होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मोठं यश. शततारका नक्षत्राच्या तरुणांचा भाग्योदय.

व्यावसायिक उत्कर्ष
मीन :
या सप्ताहात मार्गी झालेला मंगळ शुभलक्षणी राहील. गुरू-शुक्राची विशिष्ट स्थिती आणि त्यांची होणारी राश्‍यंतरं क्‍लिक होतील! रेवती नक्षत्राच्या व्यक्तींचा व्यावसायिक उत्कर्ष. ता. १९ व २० हे दिवस  निर्णायकरीत्या शुभ राहतील. नोकरीत वरिष्ठांचा मर्जी!