esakal | साप्ताहिक राशिभविष्य (१८ जुलै २०२१ ते २४ जुलै २०२१)
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope

साप्ताहिक राशिभविष्य (१८ जुलै २०२१ ते २४ जुलै २०२१)

sakal_logo
By
श्रीराम भट saptrang@esakal.com

सतत दत्तगुरूंचं स्मरण ठेवा!

ज्योतिषशास्त्रात चंद्रबळाला आणि गुरुबळाला फार महत्त्व दिलं जातं. शनीची दृष्टी आणि गुरूची दृष्टी यांचा ताळमेळ घालत माणसाच्या जीवनाचा शक्तिस्रोत आजमावला जात असतो. माणसाचं जीवन म्हणजे एक दृष्टी आहे. माणसाची आंतरदृष्टी आणि बाह्यदृष्टी माणसाच्या जीवनाचा एक खेळ साजरा करत असते, असंच म्हणावं लागेल.

माणूस हा एक तेज आहे आणि त्याबरोबरच तो एक शक्तिप्रवाह आहे. डोक्‍यात प्रकाश पडतो असं म्हणतात आणि पायांत ताकद आली असं म्हणतात. या दोन वाक्‍यांतच माणसाच्या जीवनाचं मोठं तत्त्वज्ञान दडलं आहे. चंद्र-सूर्याकडून तेज घेऊन पृथ्वीवर माणूस नावाचा एक कोष म्हणा, गर्भ म्हणा जगत असतो. या कोषात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांची सरमिसळ होऊन एक आवरण शक्तिरूपानं हातपाय झाडत असतं. माणसाच्या जीवनात सत्य हे ज्ञानप्रकाशात नांदत असतं आणि ही तेजसंपदा होय. ‘गुरू’ हा सत्यज्ञानानंदस्वरूप आहे. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र हा एक परमानंदाचं स्वरूप आहे. ज्ञान हे सत्याचं बालक आहे आणि या बाळाची आनंद ही भावना आहे आणि या आनंदाची भावना चंद्र जपत असतो. त्यामुळंच बालसुलभ भावना या देवासमान असतात. म्हणूनच अनसूयेनं ब्रह्मा, विष्णू, महेशांना आपल्या ज्ञानदृष्टीनं बाळं केली. त्यामुळंच गुरुपौर्णिमा आणि दत्तपौर्णिमा या ज्ञानदृष्टी देणाऱ्या जगन्माउलीसारख्या आहेत.

मित्र हो, यंदाची गुरुपौर्णिमा ‘गुरू'' ज्ञानदृष्टी देणाऱ्या कुंभ राशीत असताना होत आहे. गुरुपौर्णिमेचा धनू राशीशी संबंध आहे. माणसाचं जीवन हे सत्य, ज्ञान आणि आनंद यांच्या प्रकाशात नांदलं पाहिजे. त्यामुळंच दत्तभक्त आणि गुरुभक्त अनसूयेच्या पौर्णिमेची वाट पाहत असतात!

मोठे चमत्कार घडतील

मेष : पौर्णिमेच्या सप्ताहात आपल्या राशीस मोठं आश्‍वासक ग्रहमान राहील. कलाकारांचा उत्साह वाढेल. मंगळाचं राश्‍यंतर अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश देणारं. ता. २१ व २२ हे दिवस अतिशय प्रवाही. ओळखी - मध्यस्थींतून लाभ. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनात मोठे चमत्कार घडवेल.

परदेशात व नोकरीत भाग्योदय

वृषभ : गुरू आणि शुक्र या ग्रहांचं उत्तम फिल्ड राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक गॉडफादर भेटेल. व्यावसायिकांना सरकारी ध्येयधोरणांतून लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र परदेशात भाग्योदय करेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० ची आषाढी एकादशी पुत्रपौत्रांच्या भाग्योदयाची. नोकरीत भाग्योदय.

आर्थिक ओघ मोठा असेल

मिथुन : सप्ताहात राशीतील बुधाची स्थिती मोठी संवेदनशील राहील. व्यावसायिकांना मोठा आर्थिक ओघ राहील. ता. २१ ते २३ हे दिवस चंद्रबळातून मोठे लाभ देतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विवाहयोग. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बढतीची चाहूल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात मानसन्मानाची. कलाकारांचे भाग्योदय.

मंदीचं सावट जाईल, पतप्रतिष्ठा लाभेल

कर्क : सप्ताहाचा आरंभ आणि शेवट चंद्रबळातून संवेदनशीलच राहील. व्यावसायिक मंदीचं सावट जाईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पतप्रतिष्ठेचा लाभ. पुष्य नक्षत्रास पौर्णिमेजवळ सरकारी कामांतून यश. आश्‍लेषा नक्षत्रास शनिवारची संध्याकाळ विचित्र चोरी-नुकसानीची. गर्दीची ठिकाणं सांभाळा.

खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील

सिंह : राशीतील मंगळ-शुक्राचं आगमन पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात उत्तम बोलेल. स्वतंत्र व्यावसायिकांना ता. २१ ते २३ हे दिवस सुवार्तांचा भर ठेवतील. व्यावसायिक मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्रबळातून मोठा लाभ. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० ची एकादशी नोकरीत शुभ. उत्तरा नक्षत्रास शुक्रवार मोठ्या भाग्याचा.

नोकरीच्या मुलाखतीत यश

कन्या : सप्ताहाची सुरुवात गतिमान बुधाची, मनाजोगती कामं. घरात पाहुण्यांच्या वर्दळीतून लॉकडाउन उठेल. घरात तरुणांची कार्यं ठरतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतींतून यश. ता. २२ चा गुरुवार घरात जल्लोषाचा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार मानसन्मानाचा. व्यावसायिक वसुली.

व्यावसायिक उपक्रमात यश

तूळ : मंगळ-शुक्राची राश्‍यंतरं पौर्णिमेच्या सप्ताहात व्यावसायिक उपक्रम यशस्वी करतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील विशिष्ट पद मिळेल. आजचा रविवार मोठा शुभलक्षणी. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी कर्जमंजुरी शक्य. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्रबळ प्रचंड राहील. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र कलावंतांना छानच. राजाश्रय मिळेल.

अचानक गाठीभेटींतून लाभ

वृश्‍चिक : विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं चंद्रबळ राहील. विवाहयोग आहेत. ता. २१ ते २३ हे दिवस आपल्या राशीस चढत्या क्रमानं शुभच आहेत. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना खरेदी-विक्रीतून लाभ. पती वा पत्नीला नोकरी मिळेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ अचानक गाठीभेटींतून लाभ. कायदेशीर यश. परदेशी भाग्योदय.

विशिष्ट करारमदारांतून लाभ

धनू : चंद्रबळातून लाभ घेणारी सप्ताहातील रास. पौर्णिमेजवळ महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा कराच. मंगळ-शुक्राची राश्‍यंतरं चंद्रबळाचा लाभ उठवतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुपौर्णिमेची पर्वणी राहील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट करारमदारांतून विलक्षण लाभ होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा मोठा सन्मान होईल.

नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य मिळेल

मकर : सप्ताहात कायदेशीर बाबी पाळाच. काहींना सप्ताहात भाऊबंदकीतून त्रास. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ विशिष्ट प्रलोभनाचा धोका. बाकी श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट सरकारी लाभ होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत वरिष्ठांचा अनुग्रह. मात्र, शनिवारी घरात कोणाच्या आजार वा शस्त्रक्रियेतून जागरण.

स्पर्धात्मक पातळीवर यश

कुंभ : सप्ताहात होणारी गुरू-शुक्र प्रतियुती पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात उत्तम बोलेल. तरुणांनो, संधींवर दबा धरून बसाच. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ ते २३ जुलै हे दिवस गुरुकृपेचेच. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या सप्ताहातील गतिमान बुध आरंभी आणि शेवटी मोठं स्पर्धात्मक यश देईल. नोकरीच्या अंतिम मुलाखती.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

मीन : सप्ताह कायदेशीर गोष्टींचं गांभीर्य वाढवणारा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेजवळ कायदेशीर गोष्टींचं भान ठेवावं. काहींना उधार - उसनवारीतून त्रास देणारं ग्रहमान. पौर्णिमा गर्भवतींना संवेदनशील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट पुत्रचिंता शक्‍य. बाकी रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना छान नोकरीच्या संधी. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल.

loading image