राशिभविष्य (२० डिसेंबर २०२० ते २६ डिसेंबर २०२०)

weekly horoscope
weekly horoscope

नका जपू विचित्र पुनरावृत्तीची घराणी !
चराचराविषयी विचार करणारा माणूस मूर्त आणि अमूर्त, तसेच व्यक्त आणि अव्यक्त भावनांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत असतो. व्यक्त जगापेक्षा अव्यक्त जग हे अफाट आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चतुःष्टय आपापल्या पद्धतीत व्यक्त होत असतात, किंवा ते अव्यक्त स्वरूपातही कार्य करत असतात. उदा. माणसाविषयीचं प्रेम, माणसाविषयीची शत्रुत्वभावना, माणसाविषयीचा तिरस्कार, माणसाची दहशत या सर्व तऱ्हेच्या भावना व्यक्तही होत असतात आणि या भावना हृदयात अव्यक्तपणे नांदत असतात म्हणा किंवा घर करून असतात म्हणा!

हे चराचर विश्‍व सुर, नर, सिद्ध, किन्नर, यक्ष, राक्षस किंवा पिशाच्च आदींना घेऊन व्यक्त तरी होत असतं किंवा त्यांच्या अदृश्‍य प्रभावात नांदत तरी असतं. अर्थातच हे विश्‍व अनेक भावभावनांना पकडून पुन्हा पुन्हा पुनरावृत्त होतं. अर्थातच मन बुद्धी अहंकाराची पुनरावृत्तीची घराणी जपत अनेकांना प्रसवतही असते. ज्योतिषशास्त्रात गुरू आणि शनी हे ग्रह आपली एक प्रकारची घराणीच जपत असतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मित्रहो, अनेक शतकानंतर या वर्षी २१ डिसेंबरला, म्हणजे उद्या (सोमवारी) उत्तरायणाच्या प्रारंभदिनी गुरू-शनी युतीयोग होत आहे आणि तोसुद्धा शनीच्या मकर राशीत होत आहे. माणूस ही एक व्यक्त आणि अव्यक्त यांच्या सीमेवरील एक अद्‌भुत जाणीव आहे. त्यामुळेच ती वरखाली पसरलेल्या अश्‍वत्थ वृक्षाच्या मध्यभागी कार्यरत असते. अश्‍वत्थ वृक्षाच्या खालची पुनरावृत्तीची घराणी मनुष्य जन्मापासूनच खालच्या हलक्या तळाच्या योनींपर्यंत पसरत असतात!

माणूस आमची पिढी, आमची पिढी म्हणत चालू पिढीतील माणसांचा आडोसा किंवा आधार घेत पतवंडे झाल्यावर सोन्याची फुलं उधळून घेत असतो! माणूस किंवा मनुष्यजन्म ही एक अशी गती आहे, की जी गती मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या पुनरावृत्तीच्या घराण्यांचा विचित्र संस्कार झुगारून देत चित्ताचं चैतन्य करत पुनरावृत्तीचं रिटर्न तिकीट काढत नाही. हे गुरुतत्त्व समजणारा माणूसच यंदाच्या उत्तरायणाचा खरा सूर्योदय पाहील !

नोकरीची पत्रे मिळतील
मेष :
सप्ताहाचा सूर्योदय नावीन्यपूर्ण राहील. अश्‍विनी नक्षत्राच्या तरुणांना गुरू-शनी सहयोग आणि रवी-बुध युतियोग नोकरीचे कॉल देणारा. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट भाग्य घेऊन येणारा. भरणी नक्षत्रास ता. २५ ची गीताजयंती मोठे व्यावसायिक यश देणारी. राशीला आलेला मंगळ कलाकारांचा उत्तरोत्तर भाग्योदय करणारा.

व्यावसायिकांची कर्जवसुली होईल
वृषभ :
योगताऱ्याजवळचे शुक्रभ्रमण रोहिणी नक्षत्रास प्रकाशात आणणारे. नवपरिणितांना जीवनात जान आणणारा सप्ताह. व्यावसायिकांना उत्सव प्रदर्शनांतून लाभ. कृत्तिका नक्षत्रास सोमवारचे उत्तरायण जीवनात मार्गस्थ करणारे. तरुणांना नोकऱ्या. परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय. व्यावसायिकांची कर्जवसुली. गुरुकृपा होईल.

कायदेशीर कटकटी संपतील
मिथुन :
सप्ताहातील सूर्योदय सतत नवकल्पना देतील. कलाकारांना व बुद्धिजीवी मंडळींना २१ डिसेंबरचे उत्तरायण नवी क्षितिजे प्रकाशमान करेल. मृग नक्षत्राच्या कायदेशीर कटकटी संपतील. आर्द्रा नक्षत्र व्यक्तींची व्यावसायिक कर्जवसुली होईल. ता. २५ चा शुक्रवार धनवर्षावाचा. नोकरीतील हितशत्रुपीडा संपेल.

शुभग्रहांच्या सेनेचा पाठिंबा
कर्क :
शुभग्रहांची सेना आपल्या पाठीशी राहीलच. व्यावसायिक कामगारप्रश्‍न सुटतील. शुक्रभ्रमणाची वैभवी वाटचाल राहील. पुत्रचिंता जातील. पुष्य नक्षत्राचा नोकरी, व्यावसायिक राज्याभिषेक होईल. मात्र आगामी काळात घरी वा दारी राजकारणी व्यक्तींचा संपर्क टाळा. पुनर्वसू नक्षत्रास नोकरीच्या उत्तम संधी. आश्‍लेषा व्यक्तींनी प्रवासात जपावे.

परदेश व्यापाराच्या संधी
सिंह :
ता. २४ रोजी होणारे मंगळाचे राश्‍यांतर मघा नक्षत्रास तत्काळ फलदायी होणारे. सिंहानो, संधीवर दबा धरून बसाच. पूर्वा नक्षत्रास शुक्राचे योगताऱ्याजवळचे भ्रमण ता. २४ ते ता. २६ डिसेंबर २० या दिवसांत खरा नाताळ साजरा करेल. व्यावसायिकांना मोठे लाभ. परदेशी व्यापाराच्या संधी. तरुणांना परदेशी व्हिसा मिळेल.

जोरदार धनलाभाची शक्यता
कन्या :
सप्ताहारंभी होणारा गुरू-शनी युतियोग अलौकिकच म्हणावा लागेल. गीताजयंतीच्या या सप्ताहात प्रल्हादासारख्या भक्तांना प्रचिती देणारे ग्रहमान! उत्तरा नक्षत्रव्यक्ती गुरुकृपांकित होतील. तरुणांना उत्तम पॅकेजची नोकरी मिळेल. हस्त नक्षत्राच्या मंडळींना ता. २१ ते ता. २३ डिसेंबर या दिवसांत मोठे धनवर्षाव. सखीचा प्रेमळ सहवास. मात्र नखांचे नकळत ओरखडे जपा.

व्यावसायिक मंदी हटेल
तूळ :
रवी-बुध युतियोग आणि शुक्रभ्रमणाची विशिष्ट स्थिती आणि मंगळाचे राश्‍यांतर चित्रा नक्षत्रास जबरदस्त क्‍लिक होईल. आपले स्वतःचे उत्तम मार्केटिंग करा. यशस्वी व्हालच. ता. २४ ते ता. २६ डिसेंबर २० हे दिवस व्यावसायिक मंदी घालवणारेच. स्वाती नक्षत्रास विशिष्ट भेटवस्तूंतून लाभ. विशिष्ट कौतुक समारंभ होईल.

नोकरीत चांगली वाटचाल
वृश्‍चिक :
सप्ताहात राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये मानांकन घेणारी रास. सप्ताहात शुभग्रहांची सेना उत्तम फिल्डिंग लावून आपणास लाभ करून देईल. अनुराधा व्यक्ती शुक्रभ्रमणातून वलयांकित होणार आहेत. ता. २१ चे उत्तरायण भाग्योदयाची चाहुल देणारे. विशाखा नक्षत्राची नोकरीतील उत्तम वाटचाल सुरू होईल. ज्येष्ठा नक्षत्राची व्यावसायिक वसुली.

ज्ञानपर्वाची सुरुवात
धनू :
राशीतील रवी-बुध युतियोग उत्तरायणाचा सूर्योदय खऱ्या अर्थाने साजरा करणारा. सप्ताहातील मंगळाचे राश्‍यांतरही एक प्रकारचा उत्तम ट्रॅक पकडून देईल. मूळ नक्षत्रव्यक्तींना २४ ते २६ डिसेंबर हा कालखंड संचितातील ठेवी वसूल करून देणारे! तरुणांचं एक ज्ञानपर्व सुरू होईल. स्पर्धात्मक यश. पूर्वाषाढास सप्ताह स्त्रीच्या रुसव्याफुगव्याचा! सावध!

ख्रिसमस सुवार्ता व मजेचा
मकर :
सप्ताहात कोणतीही शारीरिक मस्ती नको. वृद्धांनी उसनं अवसानं टाळावं. प्रवासात काळजी घ्या. धनिष्ठा नक्षत्रव्यक्तींनी सार्वजनिक जीवनातून आचारसंहिता पाळावी. उत्तराषाढा व्यक्तींनी शनिवारी तिन्हीसांज समयी जपावं. वाद नकोत. श्रवण नक्षत्रास  २५ चा ख्रिसमस नोकरीतील सुवार्तांतून मोठ्या मौजमजेचा.

प्रवासात काळजी घ्या
कुंभ :
मंगळाचे राश्‍यांतर तरुणांना नाताळच्या दिवसात जबरदस्त क्‍लिक होईल. ता. २४ ते ता. २६ डिसेंबर २० हे दिवस अतिशय प्रवाही राहतील. शततारका नक्षत्रास शुक्राचे स्थिरताऱ्याजवळील भ्रमण बोनस शेअर देणारे. धनिष्ठा व्यक्तींचे प्रेमप्रकरण रंगात येईल! पूर्वाभाद्रपदास उद्याचा सोमवार गूढ चोरीचा. प्रवास सांभाळा.

वास्तुविषयक व्यवहारांना गती
मीन :
शुभग्रहांची सेना आपल्या बाबतीत कार्यरत राहील. उत्तराभाद्रपदा व्यक्तींना नोकरीत मोठ्या भाग्योदयाची चाहुल लागेल. पुत्र -पौत्रांची मंगलकार्ये ठरतील. उद्याचा सोमवार मोठ्या सुवार्तांचा. वास्तुविषयक व्यवहारांतून गती मिळेल. रेवती नक्षत्रव्यक्तींना ता. २३ चा बुधवार नातेवाइकांशी विसंवाद घडवणारा. गैरसमज होतील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com