साप्ताहिक राशिभविष्य (ता. २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी)

weekly horoscope
weekly horoscope

कर्मशुद्धी साधू या! 
कर्म ज्या वेळी साधना बनतं त्या वेळी ते व्रत होत असतं. आपल्या संस्कृतीत व्रतांना खूप महत्त्व आहे. अनेक तीर्थांचा व्रतांशी संबंध आहे. अर्थातच अनेक पौराणिक कथांच्या पार्श्वभूमीवर तिथींचा व्रतांशी संबंध जोडला गेला. अनेक व्रतं ही शाप, शपथ आणि वरदानांची पार्श्वभूमी विचारात घेऊन जोपासली जातात. 

पश्र्चात्तापातून उपरती झालेली माणसं व्रतस्थ होतानासुद्धा आपण पाहतो. माणूस आणि माणसाची जन्मपरंपरा काल, कर्म आणि कारण या त्रिघटकांचा आधार घेत एक विशिष्ट कालौघ पकडत प्रवाहित होत असते. माणसाचा जन्म गतजन्मातील साधनेची पूर्तता तरी करत असतो किंवा तो शाप, शपथ आणि वरदानातून प्राप्त होणारे विशिष्ट कर्मभोग तरी भोगत असतो. थोडक्यात, साधनासिद्धी आणि कर्मभोग या दोन तटांमधून माणसाचा जीवनप्रवाह गतिमान असतो. 

मित्रहो, भीष्म हे कर्मसिद्धान्त सांगणारे किंवा तो सिद्ध करणारे विश्र्वाचे आदिगुरूच होत! त्यामुळेच भीष्माचार्य ही तथाकथित पदवी अस्तित्वात आली. मित्रहो, माघ महिना ही एक पर्वणीच सांगितली आहे. भीष्माष्टमी, जया एकादशी, भीष्मद्वादशी आणि सर्वात शेवटी माघी पौर्णिमेचं माघस्नान असा हा एक व्रताचा प्रवास आहे आणि हे व्रत माघस्नानाचं तीर्थस्नान घडवून माणसाची कर्मशुद्धी करून माणसाला सुस्नात करत असतं. काया-वाचा-मने केलेली व्रतं माणसाचा श्र्वास शुद्ध करत असतात. श्र्वासाचा चित्ताशी, चित्ताचा चिंतनाशी आणि चिंतनाचा व्रताशी संबंध आहे आणि या व्रताचं पावित्र्य पतिव्रतेसारखं सुवासिनी बनत असतं. ,मित्रहो गुरू, शनी हे श्रवण नक्षत्रात असताना आपण जया एकादशीचं ध्यान लावत भीष्मद्वादशीचं व्रत अंगीकारत श्रीकृष्णमय होत माघी पौर्णिमेच्या शनिवारी माघस्नानातून कर्मशुद्धी करून सुस्नात होऊ या!

वसुली उत्तमरीत्या होईल
मेष :
राशींच्या दशमस्थानातील गुरूचं अधिष्ठान राहीलच. ता. २५ चा गुरुपुष्यामृतयोग तरुणांना शुभारंभाचा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शैक्षणिक यश. अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२ व २३ या दिवशी व्यावसायिक गाठी-भेटींतून लाभ. वसुली उत्तमरीत्या होईल. शनिवारची पौर्णिमा प्रसिद्धीची. 

नोकरीतील स्थिती लाभदायक
वृषभ :
काल झालेलं शुक्राचं राश्‍यंतर कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या सप्ताहात जबरदस्त क्‍लिक होईल. नोकरीतील विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीतून लाभ होतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या आसपासच्या काळात अतिशय प्रसन्न राहतील. पुत्रोत्कर्षातून धन्यता अनुभवाल. 

नका अडकू प्रेमप्रकरणात!
मिथुन :
सप्ताहातील चंद्रबळाचा मोठा लाभ अपेक्षित आहे. मात्र, भावनाविवश होऊ नका. प्रेमप्रकरणात अडकू नका. बाकी, मृग नक्षत्राच्या व्यक्तींना कला-छंद आदी उपक्रमांद्वारे मोठी प्रसिद्धी मिळेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ व २५ हे दिवस मोठ्या आर्थिक व्यवहारांचे. वादग्रस्त येणी येतील. पौर्णिमेला मनोरंजन होईल. 

शक्तिसंपन्न व्हाल
कर्क :
या सप्ताहात चंद्रबळ वाढतं राहील आणि या वाढत्या चंद्रबळात गुरूची आधिसत्ता राहील. विवेकवंतांनी याचा लाभ घेतला पाहिजे. ता. २४ व २५ हे दिवस भाग्यसंचितातून लाभदायक. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्ती शक्तिसंपन्न होतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना भूखंड मिळेल. 

कलागुण बहरून येतील
सिंह :
काल झालेल्या शुक्राच्या राश्यंतरातून पौर्णिमेच्या या सप्ताहात तुमच्यातले कलागुण बहरून येतील! मघा नक्षत्राच्या व्यक्ती कात टाकतील. अर्थात्‌, नवीन जीवनदृष्टी देणारा सप्ताह. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट तरुणांना छानच. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ चा गुरुपुष्यामृतयोग नैतिक विजय मिळवून देईल. 

नोकरीत उत्तम घडामोडी
कन्या :
चंद्रबळातून शुभग्रहांची स्पंदनं अतिशय प्रभावी राहतील. उद्याचा सोमवार नोकरीत उत्तम घडामोडींचा. प्रशंसेस पात्र व्हाल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्त चिंता जाईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ व २५ या दिवशी मानसिक- शारीरिक जीवनसत्त्वांचा उत्तम पुरवठा होईल. प्रकाशात याल. कोर्टात यश मिळेल. 

मोठी भेट मिळेल!
तूळ :
या सप्ताहात शुभग्रहांचं चंद्रबळातून अधिष्ठान राहील. ता. २५ च्या गुरुपुष्यामृतयोगामुळे एक मोठी भेट मिळेल! स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना नूतन वास्तूचा योग. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासच्या काळात वैयक्तिक सुवार्ता मिळतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय लाभ. 

आसपास प्रसन्न वातावरण 
वृश्र्चिक :
शुक्राचं चतुर्थ स्थानातील स्पंदन छानच राहील. आजूबाजूस प्रेमाच्या उबदार झुळका तुम्हाला प्रसन्न ठेवतील! एकूण, पौर्णिमेनं समारोप होणारा हा सप्ताह अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना लाभदायीच. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ व २५ हे दिवस गुरुकृपेचे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी मिळेल. 

फ्लॅश न्यूजमध्ये येत राहाल
धनू :
सप्ताह शुभग्रहांच्या अंगणातच खेळणारा! पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती चंद्रबळाचा उत्तम लाभ उठवतील. ता. २२ व २३ हे दिवस अतिशय प्रवाही राहतील. सतत ग्रीन सिग्नल मिळेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या आसपासच्या काळात सुवार्तांमुळे फ्लॅशन्यूजमध्ये येतील. 

तरुणांचं नैराश्‍य जाईल
मकर :
सप्ताहाची सुरुवात उत्तम चंद्रबळातून होईल. आजचा रविवार अतिशय लाभदायी. सूर्योदयी सुवार्ता मिळेल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ व २५ रोजी मोठं यश मिळेल. तरुणांचं नैराश्‍य जाईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात स्त्रीवर्गाशी वाद घालू नका. 

नका करू स्वप्नरंजन!
कुंभ :
मंगळाचं राश्‍यंतर आणि राशीतील शुक्राचं आगमन यामुळे तरुणांच्या संदर्भातून संमिश्र परिस्थिती राहील. कुसंगती टाळा. नका करू स्वप्नरंजन! अर्थात् भावनाविवश होऊ नका. बाकी, पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र धनिष्ठा आणि शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायात लाभदायक. राजकीय भानगडी मात्र टाळा. 

न बोलता कार्यरत राहा!
मीन :
चंद्रबळातून शुभग्रहांशी कनेक्‍टिव्हिटी राहीलच! न बोलता कार्यरत राहा. ता. २४ व २५ हे दिवस उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय शुभदायी. तरुणांना विशेष लाभ होईल. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात काही गैरसमज उद्भवू शकतात. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना विचित्र हितशत्रुपीडा. प्रेमवीरांनो, काळजी घ्या! 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com