esakal | साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै २०२१ ते ३१ जुलै २०२१)
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope

साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै २०२१ ते ३१ जुलै २०२१)

sakal_logo
By
श्रीराम भट saptrang@esakal.com

असं आहे गुरू आणि शनीचं संविधान !

देहाच्या बंदिशाळेत पूर्वजन्मातील कर्मांच्या वज्रगाठींचा फास सोडवत माणूस मृत्यूपर्यंत एक ठराविक मुदतीची जन्मठेपच भोगत असतो, असं म्हणावं लागेल! जन्मठेप हा शब्द काळाशी संबंधित आहे. काळाचं भान असलेला माणूस रात्र-दिवसांचा हिशेब ठेवत चालू जन्माच्या मुदत ठेवीवरचं सेकंदांचं, मिनिटांचं, दिवसांचं, महिन्यांचं किंवा वर्षांचं व्याजच उपभोगत असतो! अशी ही जन्माची मुदत ठेव नामरूप धारण करून देहअहंकाराच्या सहीनिशी यमराजांकडं एकप्रकारे गहाणच ठेवलेली असते!

माणूस हा परिस्थितीचा गुलाम आहे, याचा नेमका अर्थ काय हो? तर तो हाच, की परिस्थिती आणि काळ हे एकमेकांना आधार आहेत आणि हा आधार म्हणजेच एक गहाणवट आहे. असा हा गहाणवट केलेला, अर्थातच परिस्थितीचा गुलाम असलेला माणूस भविष्य बघतो, भविष्य वर्तवतो आणि भविष्य घडवतो म्हणे !

परमेश्‍वराच्या महदाकाशातील हा माणूस नावाचा काळमेघ किंवा अज्ञानाचा एक काळाकुट्ट मेघ विश्‍वेश्‍वराच्या या महदाकाशात आपलं ऐश्‍वर्य किंवा दिमाख दाखवत मोठा आवाज काढत गडगडत असतो. काळाचं भान ठेवणारं ज्योतिष हे एक अध्यात्माचा गर्भ आहे आणि हे गर्भनिदान करणारं ज्योतिष पृथ्वीतत्त्वाचा आधार घेत आकाशाला गवसणी घालत कैवल्याचा स्पर्श अनुभवण्याचा प्रयत्न करतं! आणि शेवटी वेदांग असलेलं ज्योतिष वेदांप्रमाणे आपली पोपटपंची बंद करून मौनात जातं! अर्थातच नेति, नेति म्हणत.

मित्र हो, सध्या शनी पृथ्वीतत्त्वाच्या मकर राशीत आहे आणि या शनीच्याच वायुतत्त्वाच्या कुंभ राशीत गुरू आहे. गुरू हे आकाशतत्त्व आहे. शनी वायुतत्त्वाचा आधार घेत पृथ्वीवर काठी टेकत चालत असतो. आकाश हे कैवल्याला स्पर्श करत कालातीत बनून राहतं, त्यामुळंच गुरूला गगनसदृश म्हणतात! असा हा कैवल्याचा अधिकारी असलेला गुरू शनीच्या बरोबर सल्लामसलत करून मोक्षाची सोडीबांधी करत असतो, असंच ज्ञानदेवांनी एका ठिकाणी म्हटलं आहे!

विवाहाचे उत्तम प्रस्ताव येतील

मेष : सप्ताह गुरुभ्रमणातून ता. २६ व २७ या दिवसांतून बोलणारा. नोकरीचे कॉल येतील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम विवाह प्रस्ताव येतील. ज्योतिष बाजूला ठेवा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २९ व ३० हे दिवस वादग्रस्त ठरतील. नोकरीत वरिष्ठांना सांभाळा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रचिंता सतावेल. जागरणाचे प्रसंग येतील.

दैवी कृपेचा काळ, नोकरी लागेल

वृषभ : सप्ताहात शुक्रभ्रमण घरातील तरुणांचा भाग्योदय करणारं. ता. २६ ते २८ हे दिवस आत्यंतिक प्रवाही. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा कराच. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींवर दैवी कृपा होईल. नोकरीचा प्रश्‍न सुटेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मातृपितृचिंतेचा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अंगारकीचा मंगळवार गैरसमजातून त्रासाचा ठरेल.

शिक्षण, नोकरी, विवाह क्षेत्रात यश

मिथुन : मंगळ-शुक्राची भ्रमणं भाग्यातील गुरूच्या प्रभावात उत्तम बोलतील. मात्र, कायदेशीर गोष्टी जपा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २६ व २७ हे दिवस शिक्षण, नोकरी व विवाह या त्रिघटकांतून क्लिक होणारे. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार वादात ओढणारा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी परदेशात नोकरीचा योग.

वादग्रस्त येणं वसूल होईल

कर्क : मंगळ-गुरू यांची प्रतियुती संमिश्र स्वरूपाची फळं देईल. तारुण्यातील उन्माद टाळा. प्रेमप्रकरणं सांभाळा. बाकी सप्ताह पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २८ व २९ हे दिवस वादग्रस्त येणं वसूल करून देणारे. पुत्रचिंता जाईल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाचा आरंभ आणि शेवट संसर्गातून जपावा. मास्क वापराच.

नोकरीत अनपेक्षित बढतीचा योग

सिंह : मघा नक्षत्राच्या तरुणांना ता. २६ व २७ हे दिवस मोठी भाग्यबीजं पेरणारे. काहींची नोकरीत अनपेक्षित बढती. सप्ताह भागीदारीचे प्रश्‍न निर्माण करू शकतो. कोर्ट प्रकरणं उद्‌भवू देऊ नका. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात परदेशी व्यापारातून लाभ. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार स्त्रीचिंतेचा. विचित्र खर्च उद्‌भवतील.

वाद टाळा, संशयाला वाव देऊ नका

कन्या : सप्ताहात घरी वा दारी वाद टाळा. संशयाला वाव देऊ नका. नवपरिणितांनी जपावं. सप्ताहातील मंगळ-गुरूची प्रतियुती कुपथ्यातून भोवणारी. घरातील व्रात्य मुलं सांभाळा. बाकी हस्त नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २८ चा बुधवार मौजमजेचा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी मिळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार गुप्तचिंतेतून जागरणाचा.

मोठे चमत्कार घडतील, प्रसिद्धी मिळेल

तूळ : सप्ताहात मोठा हुरूप राहील. ता. २६ व २७ हे दिवस मोठे चमत्कार घडवतील. नोकरीच्या अंतिम मुलाखती यशस्वी होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती वलयांकित होतील. काहींची पुत्रचिंता जाईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी व्यावसायिक शुभारंभ होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचा शनिवार स्त्रीशी वादाचा.

व्यावसायिकांना उत्साहाचा कालखंड

वृश्‍चिक : मंगळ-शुक्राचं फिल्ड व्यावसायिकांना मोठं धार्जिणं. विशिष्ट शुभारंभ होतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक मरगळ जाईल. सप्ताहाची सुरुवात नोकरीत मोठा आशावाद निर्माण करेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील बदलीतून लाभ. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार राजकीय लोकापवादाचा.

न्यायालयीन खटल्यात यश

धनू : सप्ताहात आपलं महत्त्व वाढणार आहे. ता. २६ ते २८ हे दिवस सतत वैयक्तिक सुवार्तांचा भर ठेवतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्ट प्रकरणात यश. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी भाग्योदय. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी आजच्या रविवारी गर्दी टाळावी आणि शनिवारी चोरी-नुकसानीपासून जपावं.

मध्यस्थीच्या व्यवहारांतून लाभ

मकर : सप्ताहात नाकासमोरच चालावं. बाकी सप्ताह व्यावसायिकांना सप्ताहाच्या सुरुवातीस प्राप्तीत वाढ करेल. ता. २६ व २७ हे दिवस वसुलीचे. मध्यस्थीच्या व्यवहारांतून लाभ होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळ भ्रमणातून जुनाट व्याधींतून त्रास. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार मातृपितृविरोधाचा. विवाह प्रकरणातून त्रास.

नव्या व्यावसायिक संधी मिळतील

कुंभ : राशीचं गुरुभ्रमण तारकच राहील. मात्र मंगळभ्रमण आचारसंहिता पाळायला लावेल. विचित्र चर्चेत याल. नोकरीत सांभाळा. बाकी शुक्रभ्रमणाचे गुप्त संकेत सुखावतील. सोमवार तरुणांना छानच. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी व्यावसायिक पर्याय क्लिक होतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार भाग्यसूचक ! परदेशी व्हिसा मिळेल.

भाजण्या - कापण्यापासून सावधान

मीन : ग्रहांचं फिल्ड मोठं काटेकोर राहील. फक्त जीवनाच्या फिल्डवर टिकून राहा. नका काढू चोरट्या धावा. सप्ताहातील मंगळ भ्रमणाची स्थिती चिडचिड करणारी. भाजण्या - कापण्यापासून सावध राहा. सप्ताहाचा शेवट उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना कर्जवसुली करवून देणारा. राजकीय व्यक्तीकडून लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना आरोग्यविषयक दिलासा.

loading image
go to top