राशिभविष्य : (२७ डिसेंबर २०२० ते ०२ जानेवारी २०२१)

श्रीराम भट
Sunday, 27 December 2020

आगळा-वेगळा गुरुपुष्यामृत योग! 
माणसाचा भोग आणि भाग्याशी संबंधित असलेले शनी आणि गुरू सध्या मकर राशीत आले आहेत. अर्थातच शनीचा पाहुणचार घेण्यासाठी गुरू हा मकर राशीत आला आहे. भोग आणि भाग्य यांचा माणसाच्या जीवनाशी अगदी घट्ट संबंध आहे. सरोवरात एखादा खाद्यपदार्थ टाकला की जसे त्या पदार्थावर झडप घालण्यासाठी अनेक मत्स्य गोळा होतात, अगदी तसेच माणसाचा जन्म ज्या वेळी या जगात होतो त्या वेळीच या मानवरूपी शरीराला चांगले-वाईट भोग देणारे अनेक मत्स्य, उदाहरणार्थ : भाऊ, बहीण, पत्नी, शेजारी, मित्र-मैत्रिणी, शत्रू, कुत्री-मांजरं, किडामुंगी, अगदी डास आणि चिलटंसुद्धा जन्माला घातली जातात आणि हे सर्व मग प्रसंगानुसार माणसाला चावत असतात.

आगळा-वेगळा गुरुपुष्यामृत योग! 
माणसाचा भोग आणि भाग्याशी संबंधित असलेले शनी आणि गुरू सध्या मकर राशीत आले आहेत. अर्थातच शनीचा पाहुणचार घेण्यासाठी गुरू हा मकर राशीत आला आहे. भोग आणि भाग्य यांचा माणसाच्या जीवनाशी अगदी घट्ट संबंध आहे. सरोवरात एखादा खाद्यपदार्थ टाकला की जसे त्या पदार्थावर झडप घालण्यासाठी अनेक मत्स्य गोळा होतात, अगदी तसेच माणसाचा जन्म ज्या वेळी या जगात होतो त्या वेळीच या मानवरूपी शरीराला चांगले-वाईट भोग देणारे अनेक मत्स्य, उदाहरणार्थ : भाऊ, बहीण, पत्नी, शेजारी, मित्र-मैत्रिणी, शत्रू, कुत्री-मांजरं, किडामुंगी, अगदी डास आणि चिलटंसुद्धा जन्माला घातली जातात आणि हे सर्व मग प्रसंगानुसार माणसाला चावत असतात, डसत असतात, ओरखडे काढत असतात, त्याच्यावर झडप घालत असतात किंवा त्या माणसाला बरोबर घेऊन मौज-मजाही करत असतात. असा हा सगळा माणसाच्या जीवनाचा भोग आहे! 

माणूस हा निव्वळ भोग नव्हेच नव्हे. माणसाचा जन्म हे एक भाग्य समजलं जातं. गुरू हा भाग्याचा कारक ग्रह आहे. त्यामुळेच गुरुकृपा माणसाच्या जीवनाचं सार्थक घडवत असते. सध्या माणूस हा आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक अशा त्रिविध तापांनी अक्षरशः पोळला जात आहे. माणूस हे एक असं संक्रमण आहे, की जे मनाला मागं टाकून आत्मबुद्धीशी एकनिष्ठ होत, आत्मतेजात संक्रमित होत गुरूचं भाग्य अनुभवतं! असं हे भाग्य म्हणजेच गुरुपुष्यामृतयोग होय! यंदाचा ता. ३१ डिसेंबर २०२० चा गुरुपुष्यामृतयोग गुरूच्या कृपादृष्टीत होत असून, तोसुद्धा नववर्षाच्या पूर्वसंध्येला! असा हा भाग्याचा गुरुपुष्यामृतयोग शनी आपल्या कर्मप्रासादात गुरूबरोबर साजरा करणार आहे. हे अलौकिकच म्हणावं लागेल! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यवसायात अकल्पित लाभ
मेष : राशीचा मंगळ अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना दशमस्थानातील गुरूच्या वरदहस्ते काही मोठ्या संधी देईल. ता. ३१ डिसेंबरचा गुरुपुष्यामृतयोग दुर्मिळ लाभाचा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ व ३० हे पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र व्यवसायात अकल्पित लाभाचं! सरकारी कामं मार्गी लागतील. ओळखी-मध्यस्थीतून लाभ होतील. पुत्रोत्कर्ष होईल. 

विवाहप्रस्तावांकडे लक्ष द्या
वृषभ :
कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती संचितातील ट्रॅव्हलर ई-चेक या सप्ताहात वटवून घेतील. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र अतिशय प्रभावी व फलद्रूप होणारं. विवाहप्रस्तावांकडे लक्ष द्याच! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक कला, छंद वा इतर उपक्रमांद्वारे यश-प्रसिद्धी मिळेल. भावा-बहिणींचा उत्कर्ष. काहींना उत्तम प्रवासाचा योग. 

नोकरीतील विरोध मावळेल
मिथुन :
पौर्णिमेच्या आसपासच्या काळात आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट सुवार्तांनी धन्य होतील. नोकरीतील विरोध मावळेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट वास्तुविषयक खरेदी-विक्रींतून लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात नोकरीच्या मुलाखतींना यश. शनिवार मोठ्या मौजमजेचा. 

कोर्टप्रकरणं मार्गी लागतील
कर्क :
सप्ताहाची सुरुवात व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणारी. उत्सवप्रदर्शनांतून लाभ. ता. ३१ चा गुरुपुष्यामृतयोग हा तुमच्यासाठी एक उत्तम मुहूर्त राहील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचा मानसन्मान. काहींना राजकीय लाभ होतील. कोर्टप्रकरणं मार्गी लागतील. आश्र्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या संकटविमोचनाचा. अर्थात्, सुखनिद्रा घ्याल. 

नोकरीत सुखद घटना
सिंह :
पौर्णिमेच्या आसपासच्या काळात बाजी मारणारी रास! पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचा नव्या वास्तूत प्रवेश होईल. काहींना नोकरीतील घटनांचा सुखद धक्का. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट ऑनलाइन क्‍लिक होणारा! विशिष्ट स्पर्धापरीक्षांमध्ये यश मिळेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती शनिवारी  पुत्रोत्कर्ष अनुभवतील. 

नोकरीत वट वाढेल!
कन्या :
सप्ताहात राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये मानांकन घेणारी रास! अर्थातच शुभ घटनांद्वारे सतत फ्लॅशन्यूजमध्ये याल. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात हस्त नक्षत्राच्या व्यक्तींचा शेअर चांगलाच वधारेल. नोकरीतला वट वाढेल! पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचं मार्केटिंग यशस्वी होईल. अर्थातच जनसंपर्कातून लाभ! 

नोकरीत लाभदायी वातावरण 
तूळ :
पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र तुम्हाला भन्नाट शुभ फळं देणार आहे. तरुणांच्या मुलाखती कमालीच्या यशस्वी होतील. नोकरीतील नव्या जडणघडणींतून लाभ. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत उत्तमरीत्‍या स्थिरावतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींवर ता. ३१ च्या गुरुपुष्यामृत योगामुळे शुभ ग्रहांच्या मंत्रालयातून वर्षाव होईल! 

सुवार्तांचा ओघ राहील
वृश्र्चिक :
सप्ताहाची सुरुवातीला अनेक प्रकारच्या सुवार्तांचा ओघ राहील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातील सुवार्ता मिळतील. वातावरण प्रसन्न राहील. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात महत्त्वाच्या गाठी-भेटी होतील. ता. ३१ च्या गुरुपुष्यामृत योगामुळे अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती श्रीमंतांच्या यादीत जातील! राजकीय व्यक्तींकडून लाभ. काहींना पुत्रयोग. 

नोकरीत स्थैर्य लाभेल
धनू :
पौर्णिमेच्या आसपासच्या काळात मूळ नक्षत्राच्या व्यक्ती शुभ घटनांद्वारे फ्लॅश न्यूजमध्ये येतील. मंगळाची स्थिती विशिष्ट फोटोफिनिश यश देईल. नोकरीतील आसन बळकट होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात स्त्रीमुळे लाभ. घरातील मुला-बाळांच्या उत्कर्षानं थक्क व्हाल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम प्रवासाचा योग. 

संमोहनांपासून दूर राहा
मकर :
पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात शुक्र कलांचा प्रभाव राहीलच. मात्र, संमोहनं किंवा जुगार टाळा. सप्ताहाच्या शेवटी धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायात विक्रमी अर्थप्राप्ती होईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासच्या काळात उत्तम नोकरीचा लाभ. ता. ३१ चा गुरुपुष्यामृतयोग वैवाहिक जीवनात शुभदायी. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. 

वास्तूचा व्यवहार होईल
कुंभ :
ता. ३० व ३१ हे पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र अतिशय संवेदनशील. सुवार्तांच्या फ्लॅशन्यूजमध्ये राहाल. वास्तूविषयक व्यवहार होतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींचे जीवनातील प्युअर सिक्वेन्स लागतील. अर्थातच शिक्षण, नोकरी आणि विवाह या माध्यमांद्वारे पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा मानसन्मान होईल. 

जीवनाचा दृष्टिकोन बदलेल!
मीन :
ता. ३१ डिसेंबरचा गुरुपुष्यामृतयोग अद्वितीय स्वरूपाचाच. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. यंदाची दत्तजयंती पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना घरात सुवार्तांची. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादा गॉडफादर भेटेल व नोकरी मिळवून देईल! रेवती नक्षत्राच्या व्यक्तींचं छानसं प्रेमप्रकरण सुरू होईल. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekly horoscope 27th December to 02nd January 2021