साप्ताहिक राशिभविष्य (२७ जून २०२१ ते ३ जुलै २०२१)

माणसं आणि माणसांचं प्रारब्ध हा एक मोठा गूढ विषय आहे. ‘ गहना कर्मणो गति:’ असंच गीता म्हणते.
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal

कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका...

माणसं आणि माणसांचं प्रारब्ध हा एक मोठा गूढ विषय आहे. ‘ गहना कर्मणो गति:’ असंच गीता म्हणते. प्रकृतीचा एक महासंगणक आहे आणि या महासंगणकात प्रारब्ध संचिताची एक रिझर्व्ह बँक सांभाळली जाते. या प्रकृतीच्या रिझर्व्ह बँकेतून विशिष्ट प्रारब्ध संचिताचे ट्रॅव्हलर चेक्‍स, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड घेऊन माणूस आपल्या जीवनयात्रेस आरंभ करत असतो. माणसाच्या जीवनयात्रेत विशिष्ट थांबे किंवा स्थानकं लागत असतात. या विशिष्ट स्थानकांवर माणसाला विशिष्ट माणसं भेटत असतात, विशिष्ट प्रसंग घडत असतात, किंवा या स्थानकांवर माणूस विशिष्ट प्रलोभनांच्या जाळ्यात अडकून आपली वरील कार्डं किंवा ट्रॅव्हलर चेक्‍स वटवत असतो.

माणसाचं जीवन एक प्रसंगांची मालिका आहे, माणसाचं जीवन एक प्रलोभनांचं फलित आहे. माणसाचं जीवन ही एक चिथावणी आहे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, माणूस हा एक परिस्थितीचा बळी आहे. माणसावर परिस्थिती येते किंवा माणूस परिस्थिती ओढवून घेतो, या दोनच गोष्टी माणसाच्या जीवनावर अंमल करत असतात. ओघानं येणाऱ्या परिस्थितीचा कारक ग्रह शनी आहे, तर मंगळ हा एक ओढवून घेतलेल्या परिस्थितीचे विचित्र पडसाद ठरू शकतो. शनी आणि मंगळ या ग्रहांच्या प्रवृत्ती भिन्न आहेत. उदा. जीवनप्रवासात एखाद्या व्यक्‍तीचा सहवास होणं किंवा जीवनप्रवासात एखाद्या व्यक्‍तीच्या जाळ्यात अडकणं किंवा एखाद्या व्यक्‍तीला आपल्या जाळ्यात ओढून घेणं, या गोष्टींमध्ये निश्‍चितच फरक आहे. तसंच, शनी-मंगळाचे प्रवृत्ती गुणधर्म भिन्न आहेत आणि त्यांच्या प्रवृत्तीनुसार जीवनप्रवासातील प्रसंग घडवून आणण्याच्या त्यांच्या पद्धती भिन्न आहेत.

मित्र हो, सप्ताहात शनी-मंगळाच्या प्रतियुतीतून ग्रहांचं फिल्ड मोठं मजेदार राहणार आहे. त्यात हर्षलचाही सहभाग राहील. सप्ताहात कोणाच्या चिथावणीला किंवा कोणाच्या प्रलोभनांना बळी पडू नका. आपल्या जीवनप्रवासात आपले ट्रॅव्हलर चेक्‍स, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड नीट सांभाळा. वक्री होणाऱ्या नेपच्यून स्वभावात कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका; आणि टीव्हीवर विचित्र अशा फ्लॅश न्यूजमध्ये येऊ नका.

मित्रांचं सहकार्य लाभेल

मेष : सप्ताह शनी-मंगळाच्या सत्तास्पर्धेचा राहील. वाहनं सांभाळा. भरणी नक्षत्राच्या व्यक्‍तींनी सप्ताहात सार्वजनिक जीवनात जपावं. सप्ताहाची सुरुवात आणि शेवट ग्रहयुद्धाचा. बाकी अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाच्या सुगंधित झुळकांचा अनुभव येईल. ता.२८ ते ३० या कालावधीत त्या प्रकर्षानं जाणवतील. घरात सुवार्ता. तरुणांना हे दिवस छानच. मित्रांचं सहकार्य.

नोकरीत अनपेक्षित भाग्योदय

वृषभ : उद्याचा सोमवार कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींच्या भाग्याची चाहूल घेऊन येणारा. तरुणांचं नैराश्‍य जाईल. ता. १ च्या कालाष्टमीच्या प्रभावक्षेत्रात स्पर्धात्मक यश. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताह नोकरीत अनपेक्षित भाग्योदय करणारा. उद्याचा सोमवार रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना धनवर्षावाचा. सप्ताहात भाजण्या-कापण्याचे प्रसंग टाळा.

शुभग्रहांमुळं प्रसन्नता राहील

मिथुन : आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांची पार्श्‍वभूमी राहीलच. ता. २८ ते ३० हे दिवस मोठे प्रसन्न राहतील; मात्र प्रवासात जपा. चोरी-नुकसानी सांभाळा. वादळी वाऱ्यात जाऊ नका. कालाष्टमीचं (ता. १ जुलै) प्रभावक्षेत्र शनी-मंगळ योगातून हाय व्होल्टेजचं, एकूणच आपल्या राशीस दक्षता घेण्याचं.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

कर्क : सप्ताहात शनी-मंगळाच्या सत्तासंघर्षातून टार्गेट होणारी आपली रास राहील. नैसर्गिक घात-अपघातापासून जपा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्‍तींनी मानसिक समतोल सांभाळावा. जीवनाला स्पर्धा बनवू नका. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मोठी सुवार्ता घेऊन येणारा. जुन्या गुंतवणुकीतून लाभ. वादग्रस्त येणं येईल; मात्र श्‍वानदंश जपा.

विशिष्ट सन्मानाचे मानकरी व्हाल

सिंह : सप्ताहात युद्धखोर वृत्ती टाळा. सहवासातील हट्टी स्त्री सांभाळा. बाकी पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी उद्याची संध्याकाळ दैवी प्रचितीची. पुत्रचिंता जाईल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २८ व २९ हे दिवस मोठे प्रसन्न. विशिष्ट सन्मानाचे मानकरी व्हाल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तूविषयक प्रश्‍न सतावतील. नातेवाइकांशी गैरसमज. त्रास करून घेऊ नका.

नोकरीच्या संधी येतील

कन्या : सप्ताहातील ग्रहांच्या सत्तासंघर्षातून त्रास होऊ शकतो. सप्ताहात गॉसिपिंग टाळा. सोशल मीडिया सांभाळा. बाकी घरात आम खानेसे मतलब आहे. अर्थातच, घरातील भावनिक कोष जपत प्रसन्न राहा. उत्तरा नक्षत्राच्या तरुणांना उत्तम विवाहस्थळं येतील, पाठपुरावा कराच. हस्त नक्षत्रास उद्याचा सोमवार व्यावसायिक लाभाचा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीची संधी.

व्यावसायिक लाभ व परदेशात भाग्योदय

तूळ : शनी-मंगळाचा सत्तासंघर्ष हर्षलच्या हस्तक्षेपातून जास्त उग्ररूप धारण करू शकतो. आपली रास लक्ष्य होऊ शकते. स्वाती नक्षत्र व्यक्‍तींनी आपला भावनिक कोष जपावाच. शुभग्रहांची सात्त्विक स्पंदनं खेचून घेण्यासाठी मौनात राहा. ता. २८ ते ३० हे दिवस शुभस्पंदनांचे. चित्रा नक्षत्रास उद्याचा सोमवार व्यावसायिक लाभाचा. परदेशात भाग्योदय.

तरुणांना मोठ्या संधी मिळतील

वृश्चिक : सप्ताहात जुनाट व्याधी जपा. हवेतील संसर्गातून सावधान. मास्क लावाच. अनुराधा व्यक्‍तींनी भाजण्या-कापण्यापासून जपा. बाकी सप्ताहात ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीचा फायदा होईल. ता. २ जुलैचा दिवस मोठ्या चमत्काराचा. तरुणांचे मोठे भाग्योदय. शनिवारी प्रवास टाळा.

नोकरीत प्रशंसा होईल

धनू : सप्ताह एक अवघड वळण राहील. कोणतीही अरेरावी नकोच. पूर्वाषाढा व्यक्‍तींनी भावनिक शॉर्टसर्किट टाळावेच. बाकी सप्ताह व्यावसायिक प्राप्तीत वाढच ठेवेल. मूळ नक्षत्रास ता. २८ व २९ हे दिवस अतिशय शुभसंबंधित, सर्व प्रकारांतून कनेक्‍टिव्हिटीचे. नोकरीत प्रशंसा. विवाहयोग.

व्यावसायिक कोंडी फुटेल

मकर : सप्ताहातील शनी-मंगळाच्या सत्तासंघर्षाच्या झळा आपणास चांगल्याच जाणवू शकतात. अपवादात्मक परिस्थितीतून नेणारा सप्ताह वाटतो. मात्र, धनिष्ठा नक्षत्रास शुभग्रहांचे अंडरकरंट साथ देतीलच. ता. २८ व २९ हे दिवस शुभस्पंदनांचे. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक कोंडी फुटेल. उत्तराषाढा नक्षत्रास आजचा रविवार गृहकलहाचा, शनिवार वाहनभयाचा.

वादग्रस्त घटनांचा कालखंड

कुंभ : वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर ठिणग्या उडवणारा सप्ताह. शततारका नक्षत्राच्या व्यक्‍तींनी नोकरी-व्यावसायिक पार्श्‍वभूमीवर आचारसंहिता पाळावी. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट सांभाळावाच. बाकी ता. २८ ते २९ हे दिवस तरुणांना परदेशात भाग्योदयाची संधी देतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी वक्री नेपच्यूनच्या स्थितीत काळजी घ्यावी. १ जुलैच्या अष्टमीच्या प्रभावक्षेत्रात विचित्र जागरणाचा काळ.

भाजण्या-कापण्यापासून काळजी घ्या.

मीन : सप्ताहातील ग्रहांच्या सत्तासंघर्षातही लाभ घेणारी रास. कलावंतांचे भाग्योदय होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट मोठा भाग्यक्षणी. उद्याचा सोमवार उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या वैयक्‍तिक सुवार्तांचा. १ जुलैची कालाष्टमी स्त्रीवर्गास विचित्र मनोव्यथेची ठरू शकते. काहींना विचित्र शारीरिक वेदना. भाजण्या-कापण्यापासून जपा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com