esakal | जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य; मेष राशीचा वाढेल उत्साह 
sakal

बोलून बातमी शोधा

weekly horoscope 8 to 14 march 2020 marathi

राशिभविष्य  (०८ ते १४ मार्च) 

जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य; मेष राशीचा वाढेल उत्साह 

sakal_logo
By
लेखक : श्रीराम भट

मन सब का आधार! 
माणसाचं दैनंदिन जीवन हा एक जाणिवेचा प्रवास असतो. दिवसभर माणूस काही काळ जागा असतो, काही काळ झोपेत, स्वप्नात जागा असतो, तर काही काळ स्वप्नाव्यतिरिक्त गाढ झोपेत असतो. माणसाचं एकच मन जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती (गाढ झोप) अशा तिन्ही अवस्थांतून फुलत असतं, फळत असतं, गहिवरत असतं, विव्हळत असतं किंवा अनेकदा ‘मेलो, मेलो’ म्हणून स्वप्नातून खडबडून जागं होत असतं. 
माणूस आणि माणसाचं मनोविश्र्व हा एकूणच अजब प्रकार आहे. त्यातूनही कलियुगातील माणसाचं मन इतकं विचित्र आहे, की आनंदी असतानासुद्धा ‘आज आपण एवढे आनंदी कसे,’ असा स्वतःलाच प्रश्‍न करून आनंदाला तत्काळ विरजण लावण्यात ते पटाईत आहे! असं स्वतःची स्वतःलाच दृष्ट लावणारं कलियुगातील माणसाचं मन माणसाला भयंकर नरकवास किंवा यातना भोगायला लावतं. शरीराच्या ओझ्यापेक्षा मनाचं भयंकर ओझं घेऊन वावरणारा सध्याचा माणूस दिसायला किडकिडीत दिसला तरी मनाचं मणाचं ओझं वाहून न्यायला कमी पडत नाही! असा हा ओझ्याखाली वावरणारा कलियुगातील माणूस स्वप्नातही सुखाची कल्पना करू शकत नाही. फलज्योतिषात नेपच्यून हा ग्रह स्वप्नाशी संबंधित आहे. शिवाय, हा ग्रह मनाचंही मन असलेला आणि मनावर झालेला सुप्त संस्कार आहे. कलियुगात माणसाच्या मनावर कळत-नकळत अतिशय वाईट संस्कार होत असतात आणि हे दबा धरून बसलेले सुप्त संस्कार संधी मिळताच मोठे प्रमाद करत असतात.  मित्र हो, ता. नऊ मार्चची, सोमवारची अर्थातच चंद्राच्या वारी येणारी हुताशनी पौर्णिमा रवी-नेपच्यून युतीच्या पार्श्‍वभूमीवर येत आहे. हुताशनी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शुक्र-हर्षल युतियोगही होत आहे. श्रद्धा जोपासणारं माणसाचं संस्कारक्षम मनच उन्मन होत ईश्‍वरी चैतन्याशी तादात्म्य पावू शकतं, त्यामुळेच या हुताशनी पौर्णिमेला मनाला श्रद्धावत्‌ बनवत तुकारामबीजेची उन्मनी अवस्था गाठू या आणि रंगपंचमीच्या दिवशी आत्मरंगी रंगू या! 
= = = = = = = = = = = = = = = = = = = = 
नोकरीत अनपेक्षित बढती 
मेष : या सप्ताहात भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या प्रभावात विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीचा लाभ होईल. नोकरीत अनपेक्षित बढती. अश्र्विनी नक्षत्राच्या तरुणांना पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात नोकरीच्या मुलाखतींना यश. सखीबरोबरची रंगपंचमी जास्तच रंगतदार होईल! प्रेमात पडाल. 
= = = = = = = = = = = = = = = = = = = = 
स्त्रीवर्गाशी थट्टामस्करी नको 
वृषभ : पौर्णिमेजवळची शुक्रभ्रमणाची स्थिती तरुणांना उत्तमच. कलाकारांचा मोठा भाग्योदय. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपास सुवार्ता कळतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी स्त्रीवर्गाशी थट्टा-मस्करी टाळावी. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींनी भाजण्या-कापण्यापासून काळजी घ्यावी. मात्र, सप्ताहाचा शेवट घरात सुवार्तांचा. 
= = = = = = = = = = = = = = = = = = = = 
प्रेमाचे गुप्त संकेत ओळखा! 
मिथुन : पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र शुभग्रहांचंच. काहींना गॉडफादर भेटेल. रंगपंचमीच्या आसपास प्रेमाच्या गुप्त संकेतांकडे लक्ष द्या. बाकी, पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनात नवकल्पनांनी जान येईल! या सप्ताहात आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग. एकूणच ता. १२ व १३ हे दिवस तुमच्यासाठी अप्रतिमच! पुत्रोत्कर्ष होईल. 
= = = = = = = = = = = = = = = = = = = = 
भावंडांशी भांडणं नकोत 
कर्क : ता. नऊ मार्चची पौर्णिमा सप्ताहाचं बजेट घोषित करेल! 
अन्न-पाण्यातल्या संसर्गापासून जपा. रंगाचा बेरंग होऊ देऊ नका. बाकी, पौर्णिमेच्या आसपासचा काळ व्यावसायिकांना तेजीतून रंग दाखवेल! पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना लाभ होईल. आश्र्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. घरातल्या तरुणांचा उत्कर्ष. गुंतवणुकीतून लाभ. मात्र, भावा-बहिणींशी भांडू नका. 
= = = = = = = = = = = = = = = = = = = = 
नव्या ओळखीतून लाभ 
सिंह : यंदाची होळी पौर्णिमा तुमचीच आहे! सप्ताहाचं एक सुंदर पॅकेज राहील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींची अपूर्वाई वाढणार आहे. जीवनात रंग भरणारे कलाकार येतील. नव्या ओळखीतून लाभ होतील. नोकरीत आनंदाचं वातावरण राहील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचा मानसन्मान. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. आई-वडिलांशी वाद घालू नका. 
= = = = = = = = = = = = = = = = = = = = 
पोलिसांशी हुज्जत नको 
कन्या : पौर्णिमेच्या आसपासची बुधाची स्थिती विचित्र प्रसंग घडवू शकते. पोलिसांशी हुज्जत नको. अतिरेकानं वागणाऱ्या मित्रांना दूर ठेवा. वाहन सावधपणे चालवा. पौर्णिमेनंतर उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक तेजीतून लाभ. रंगपंचमी धनचिंता घालवेल. घरातल्या विवाहेच्छूंचा विवाह ठरेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक उपक्रमात उत्तम यश. 
= = = = = = = = = = = = = = = = = = = = 
संधीवर लक्ष असू द्या 
तूळ : राशींच्या एक्स्चेंजमध्ये अग्रमानांकित रास राहील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभ ग्रहांचं भरगच्च पॅकेज मिळेल. तरुणांनी या सप्ताहात सर्व प्रकारच्या संधींवर लक्ष ठेवून राहावं. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाची सप्तपदी सतत भावोन्मेषात ठेवेल. सतत सर्व ठिकाणी स्वागत आणि आदर-सत्कार होईल. व्यवसायाचा शुभारंभ. 
= = = = = = = = = = = = = = = = = = = = 
असुरक्षितता दूर होईल 
वृश्र्चिक : पौर्णिमेच्या या सप्ताहात गुरुकृपा राहील. व्यावसायिक असुरक्षितता जाईल. एखादं कोर्टप्रकरण मार्गी लागेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अद्वितीय स्वरूपाची फळं मिळतील. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींची सरकारी कामं मार्गी लागतील. अचानक धनलाभाचा योग. 
= = = = = = = = = = = = = = = = = = = = 
नोकरीत प्रशंसा होईल 
धनू : हा सप्ताह तरुणांसाठी खासच. नोकरीसाठीच्या मुलाखती यशस्वी होतील. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सूर गवसेल. शिक्षण, विवाह, नोकरी आदी घटकांतून ‘प्युअर सिक्वेन्स’ लागतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपास अनेक सुवार्ता कळतील. वास्तुविषयक हालचाली करा. काहींना कर्जमंजुरी मिळेल. नोकरीत प्रशंसा होईल. 
= = = = = = = = = = = = = = = = = = = = 
नोकरीत शुभदायक काळ 
मकर : पौर्णिमेच्या या सप्ताहात कोणताही शॉर्टकट टाळा. स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताह उत्तमच. ता. १० व ११ हे दिवस श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय शुभ. विशिष्ट वास्तुविषयक व्यवहार होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १२ व १३ हे दिवस नोकरीत अतिशय शुभदायी. तरुणांना नोकरीच्या मुलाखतींना यश. अपेक्षित विवाहस्थळं येतील. 
= = = = = = = = = = = = = = = = = = = = 
नवा सूर गवसेल 
कुंभ : पौर्णिमेचा हा सप्ताह आणि शुक्रभ्रमणाची स्थिती नावीन्यपूर्ण अशीच. तुमच्यातला कलाकार जागृत होईल! तरुणांना हा सप्ताह शैक्षणिक पार्श्‍वभूमीवर चांगलाच. परदेशस्थ तरुणांचं भाग्य उलगडेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती बिग बॉस होतील! ता. १२ व १३ हे दिवस तुमच्या राशीला ‘सूर नवा, ध्यास नवा’ देणारे. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. 
= = = = = = = = = = = = = = = = = = = = 
सैरभैर होऊ नका 
मीन : पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र उगाचच सैरभैर करणारं. आजूबाजूच्या घटना मनावर परिणाम करणाऱ्या. काळजी घ्या. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना एखादं संशयपिशाच्च सतावेल. बाकी, उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट व्यावसायिक धनलाभाचा. पूर्वभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात प्रवासात काळजी घ्यावी. बॅगा सांभाळा.