जाणून घ्या तुमचा पुढचा आठवडा कसा असेल : साप्ताहिक राशिभविष्य

श्रीराम भट
रविवार, 12 मे 2019

जाणून घ्या तुमचा पुढचा आठवडा कसा असेल : साप्ताहिक राशिभविष्य 12 मे ते 18 मे

प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन पायांवर उभा राहणारा माणूस निसर्गनियमांच्या चौकटीतच वाटचाल करू शकतो. असाच काही बोध आपली ग्रहमाला आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असते. सर्व ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. या ग्रहांनी जर आपला प्रदक्षिणामार्ग सोडून दिला दर पृथ्वीवर प्रलय होईल! माणसं मात्र आपलं जीवन प्रदक्षिणारूप न करता "अप्रदक्षिण' फिरतात. याला काय म्हणावं!

राहू-केतू हे छायाग्रहसुद्धा आपली सावली टाकत प्रदक्षिणा घालत असतात. राहू हा अप्रदक्षिण फिरतो, त्याला केतूसुद्धा साथ देतो. राहू आणि केतू या ग्रहांना अकारण बदनाम करण्यात आलं आहे. खरं पाहायला गेलं तर माणसांच्या निसर्गद्रोहातून उद्भवणाऱ्या परिस्थितीतून मार्ग काढताना त्यांना अप्रदक्षिण फिरावं लागतं. आणि हा एक प्रकारचा ग्रहमालेवर पडणारा ताण म्हणजेच माणसाच्या जीवनाला लागलेली ग्रहणं होत! 

माणसाचं जीवन प्रदक्षिणारूप आहे. सूर्योदय-सूर्यास्त ही एक प्रदक्षिणा आहे. माणसं पृथ्वीवर चालत असतात आणि पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते; परंतु या प्रदक्षिणेचं भान माणसाला कुठं आहे? उफराटं वागणाऱ्या माणसाचा दिवस हल्ली रात्री उगवत असतो! आणि ही उफराटी वागणारी माणसं श्रद्धाहीन बनून अप्रदक्षिण फिरत असतात आणि मग यांच्या जीवनाला ग्रहणं लागली तर याला जबाबदार कोण बरं! 
मित्र हो, सध्या राहू हा मिथुन राशीत पुनर्वसू या गुरूच्या नक्षत्रातून भ्रमण करत आहे. मिथुन ही आद्य मनुष्यतत्त्वाची रास आहे. माणसानं आपलं जीवन प्रदक्षिणारूप करून जीवनाला साधनेचं रूप दिल्यासच राहू प्रसन्न होऊन ग्रहदेवतांचा अनुग्रह प्राप्त होईल व आपल्याला ग्रहणं लागणार नाहीत किंवा लागलेली ग्रहणं बाधणार नाहीत! 

कामं सहजगत्या होतील 
मेष : राशीतले शुक्र-हर्षल ग्रहांचा पट ताब्यात घेतील. ता. 13 व 14 
हे दिवस अतिशय मजेशीर फळं देतील. कामं सहजगत्या होतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्ती वन डे जिंकतील. व्हिसा मिळेल. नवपरिणितांचा भाग्योदय, वास्तुयोग. पौर्णिमा मौज-मजेची. चैनीवर खर्च होईल. 

प्रिय व्यक्तींचा भाग्योदय 
वृषभ : ग्रहांचं फील्ड संमिश्र स्वरूपाचंच. घाई-गर्दी टाळा. पैशाचं पाकीट जपा. बाकी, कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात घरातल्या कार्यांच्या धामधुमीची. प्रिय व्यक्तींचा भाग्योदय. व्यावसायिक तेजी येईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासचा काळ घरातल्या वृद्धांसंदर्भात चिंतेचा. तरुणांचा नोकरीत भाग्योदय. 

वास्तुविषयक व्यवहार होतील 
मिथुन : अतिशय संवेदनशील ग्रहमान. सप्ताहाची सुरवात घरात आनंदोत्सवाची. वास्तुविषयक व्यवहार होतील. शुक्र-हर्षल योगाची पार्श्‍वभूमी मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय सुंदर. नोकरीविषयक मुलाखती यशस्वी होतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासचा काळ संमिश्र अनुभवांचा. गर्भवतींनी काळजी घ्यावी. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 16 चा हा बॅड डे. काळजी घ्या. 

नव्या घरात प्रवेश कराल 
कर्क : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती हा सप्ताह गाजवतील. ता. 12 ते 14 हे दिवस ग्रहांच्या फील्डवर धावसंख्या रचणारे. नव्या घरात प्रवेश कराल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासचा काळ भाग्यप्रेरक. नोकरीत बढतीची चाहूल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 16 हा दिवस जनसंपर्कातून खराब. नकोत त्या गाठी-भेटी! 

नोकरीतला रुबाब वाढेल 
सिंह : "ऊँचे लोग, ऊँची पसंद' अशा थाटात वावराल! मघा नक्षत्राच्या व्यक्तींना चांगली झळाळी प्राप्त होईल. नोकरीतला रुबाब वाढेल. प्रेमप्रकरणं फुलतील. पौर्णिमेच्या आसपासचा काळ उत्तमच. सुवार्तांद्वारे फ्लॅश न्यूजमध्ये याल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 16 हा दिवस खट्टू करणारा. स्त्रीची दहशत राहील. 

"फाईव्ह स्टार' करमणूक होईल! 
कन्या : मंगळभ्रमणातून हळूहळू फील्डिंग टाईट होईल. जीवनप्रवासात नका डोकं बाहेर काढू. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह एकूणच संमिश्र स्वरूपाचा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 16 हा दिवस प्रतिकूल. काळजी घ्या. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात "फाईव्ह स्टार' करमणूक होईल. मौज-मजा कराल. 

रंगीबेरंगी अनुभवांचा सप्ताह 
तूळ : शुक्र-हर्षल योगाचं फील्ड महत्त्वाच्या वन डे जिंकून देईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रेम, विवाह आदी माध्यमांतून तीरंदाजीस तयारच राहावं! ता. 12 ते 14 हे दिवस सर्व प्रकारांतून रंगीबेरंगी राहतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासचा काळ पुत्रचिंतेचा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना गैरसमजातून त्रास होण्याची शक्‍यता. 

घरात बोलताना काळजी घ्या 
वृश्‍चिक : हा सप्ताह विचित्र प्रदूषणाचा. एखाद्या संशयपिशाच्चाचा त्रास होईल. एखादा परोपकार अंगाशी येईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासचा काळ काहीसा बाधकच. घरात बोलताना जपून! ज्वालाग्राही पदार्थांजवळ "नो स्मोकिंग!' अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात नोकरीत शुभलक्षणी. 

कुणाशीही स्पर्धा करू नका 
धनू : हा सप्ताह मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचा. कुणाशीही स्पर्धा करू नका. ओव्हरटेकिंग टाळाच. या सप्ताहात मंगळ फॉरवर्ड शॉर्टलेगला राहील. नका काढू चोरट्या धावा! पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार 
प्रतिकूल. वादग्रस्तता टाळा. सप्ताहाची सुरवात पुत्रोत्कर्षाची. 

वास्तुविषयक व्यवहारात यश 
मकर : उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात चांगलीच धावसंख्या रचतील. वास्तुविषयक व्यवहार कराच. नका सोडू संधी. व्यावसायिकांना हा सप्ताह सरकारी कामांतून यश देणारा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींचं पौर्णिमेचं फील्ड भन्नाट राहील. स्पर्धा परीक्षांतून नशीब काढाल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 16 हा बॅड डे. काळजी घ्या. 

नोकरीत फास्ट ट्रॅक प्रमोशन! 
कुंभ : या सप्ताहात जीवनातलं तारुण्य फुलणार आहे. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचं फील्ड खूपच अनुकूल राहील. नोकरीत फास्ट ट्रॅक प्रमोशन मिळेल. हा सप्ताह सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढवणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात आणि शेवट सुवार्तांद्वारे सतत फ्लॅश न्यूजमध्ये झळकवत राहील. 

खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील 
मीन : हा सप्ताह व्यावसायिक आर्थिक घडी सुरळीत करणारा. एखादी कर्जफेड कराल. खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठी बाजी मारतील. गुंतवणुकीतून मोठे लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 16 हा दिवस नोकरीत कटकटीचा. सांभाळून! 

पंचांग
रविवार : वैशाख शुद्ध 8, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 6.04, सूर्यास्त 7, चंद्रोदय दुपारी 12.38, चंद्रास्त रात्री 1.10, दुर्गाष्टमी, भारतीय सौर वैशाख 22, शके 1941. 

सुविचार 
आजूबाजूची सृष्टी कितीही बदलली, तरी माणूस पूर्णत: सुखी होत नाही. मात्र, दृष्टी बदलल्यास समाधानी आणि सुखी दोन्ही होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekly Horoscope and Panchang for 12 May to 18 May