जाणून घ्या आठवड्याचे राशिभविष्य : 19 मे ते 25 मे

श्रीराम भट
रविवार, 19 मे 2019

जाणून घ्या आठवड्याचे राशिभविष्य : 19 मे ते 25 मे

प्रत्येक वन डे खेळून बाजूला व्हा! 

माणसाचा जन्म म्हणजे नियतीच्या माध्यमातून शिंपडलेला एक 
शिंतोडाच होय! आणि हा शिंतोडा आईच्या गर्भात आकाराला येत आईच्या गर्भातून देहाकृती घेऊन बाहेर पडतो. सृष्टीसुद्धा अनेक थेंबांतून विकास पावत असते. सृष्टीत थेंबांच्या रूपानं जाणीव वाटली जात असते, असंच म्हणावं लागेल! 
 

येक जाणीव वाटली। प्राणिमात्रांस विभागली। 
जाणजाणो वाचवली। सर्वत्र काया।। 
मुळीचे जाणिवेचे विकार। पुढे झाला विस्तार। 
जैसे उदकाचे तुषार। अनंत रेणू।। 

- संत रामदास 

माणसं आपली नामरूपात्मक अभिव्यक्ती पकडून ठेवतात आणि आपणच आपला "सेल्फी' काढतात आणि या सेल्फीची फेसव्हॅल्यू वाढवण्याचा किंवा ती जपण्याचा सतत प्रयत्न करत असतात. एकाच देहात बालपण, तारुण्य आणि वार्धक्‍य अशा अवस्थांतून आपली फेसव्हॅल्यू जपणारा माणूस नावाचा प्राणी स्वत:ला सतत न्याहाळत असतो. 

सत्त्वगुण हा प्रकाश आहे, रजोगुण ही क्रिया आहे आणि स्थिती हा तमोगुण आहे. देहरूपानं केलेल्या कर्मकर्तृत्वाचा अहंकार घट्ट पकडून ठेवणारा माणूस स्थितिशील अर्थातच तमोगुणी असतो. 

जग हे परिवर्तनशील आहे. स्थितीमध्ये स्थित्यंतर होणं हा जगाचा निसर्गत:च स्वभाव आहे. विश्‍वनियंत्याच्या भ्रमणरूप फिरकी गोलंदाजीतून पृथ्वीच्या ग्राउंडवर सतत एक प्रकारची वन डे खेळली जात असते! आणि अशी ही वन डे कुणाचं तरी यश किंवा कुणाचा तरी पराजय घेऊन येत असते. अशा या एका वर्षातल्या 365 वन डे म्हणजेच माणसाचं जीवन होय. राहू आणि केतू या छायाग्रहांच्या मध्ये पृथ्वीचं नियतीचं ग्राउंड आहे. तरुणांनो, जीवनाची प्रत्येक वन डे खेळा आणि लगेचच दुसऱ्या वन डेला तयार राहा. एकाच दिवसाला (वन डेला) पकडून राहणारा माणूस जीवनाला कायमचं ग्रहण लावून घेत असतो! 

नवीन उपक्रम राबवाल 
मेष : या सप्ताहात अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचं फील्ड फलंदाजीला अनुकूल राहील. काही नवीन उपक्रम राबवाल. काही सुंदर व्यक्ती जीवनात येतील. प्रेमिकांचं स्वप्नरंजन होईल. ता. 21 व 22 हे दिवस स्वैर फलंदाजीचे. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रवारी भावरम्यता अनुभवतील. शुक्रचांदणीचा सहवास! 

व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवाल 
वृषभ : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 23 व 24 हे दिवस महत्त्वाचे. गाठी-भेटींतून भाग्यबीजं पेरली जातील. व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवाल. वादग्रस्त येणं येईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार वन डे जिंकून देणारा. प्रिय व्यक्तींबरोबर धमाल कराल. 
 
कुणालाही वचन देऊ नका 
मिथुन : फॉरवर्ड शॉर्टलेगजवळचा मंगळ तुम्हाला झेलबाद करू शकतो. कुणालाही वचन देऊ नका! बाकी, रवी-बुध सहयोगातून मृग नक्षत्राच्या व्यक्ती वैयक्तिक कौतुकसोहळे अनुभवतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 21 व 22 हे दिवस स्त्रीहट्टातून ज्वालाग्राही! पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना त्वचाविकाराची शक्‍यता. 

आर्थिक घडी बसेल 
कर्क : हा सप्ताह शुक्रभ्रमणातून गारवा देणारा. व्यवसायातली आर्थिक घडी पुन्हा बसेल. ता. 24 व 25 हे दिवस अतिशय प्रवाहित राहतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना आपला गेलेला फॉर्म गवसेल. मारा विजयी चौकार-षटकार! आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवार मोठ्या सुवार्तांचा. एखादा नवस फेडाल. 

एखादी यशोगाथा लिहाल 
सिंह : रवी-बुध सहयोगाची पार्श्‍वभूमी ग्रहांचं फील्ड फलंदाजीला अनुकूल ठेवेल. मघा नक्षत्राच्या व्यक्ती श्रीमंतांच्या यादीत जातील. जीवनाच्या रोजनिशीत एखादी यशोगाथा लिहिली जाईल. मंगळवारी नावीन्यपूर्ण शुभ फळं मिळतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी व्यावसायिक "खुल जा सिम्‌ सिम्‌'चा अनुभव येईल. नोकरीत प्रशंसा होईल. 

गुंतवणूक फलद्रूप होईल 
कन्या : उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी उभारी मिळेल. तरुणांना नोकरीच्या माध्यमातून परदेशगमनाची संधी. विशिष्ट गुंतवणुकी फलद्रूप होतील. सप्ताहाच्या शेवटी हस्त नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक, आर्थिक कोंडी फुटेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 22 व 23 हे दिवस वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता. 

प्रवासात काळजी घ्यावी 
तूळ : या सप्ताहात शुक्रभ्रमणाची तेजस्विता राहील. ता. 23 व 24 हे दिवस अतिशय ऊर्जासंपन्न राहतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मोठा सुंदर सप्ताह. सेलिब्रिटीसारखे वागाल! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. 22 च्या संध्याकाळी प्रवासात काळजी घ्यावी. चोरी-नुकसानीची शक्‍यता. 

आहारविहारादी पथ्यं पाळा 
वृश्‍चिक : थोडं परस्परविरोधी ग्रहमान राहील. आहारविहारादी पथ्यं पाळा. बाकी, अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह व्यावसायिक प्राप्तीतून लक्षणीय असाच! थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादातून मोठी कामं होतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट सन्मान मिळतील. 

वर्तनात संयम ठेवा 
धनू : हा सप्ताह मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट अपवादात्मक फळं देईल. विशिष्ट जुनाट व्याधींचा भर वाढू शकतो. ता. 21 व 22 हे दिवस अशांतता वाढवतील. वागण्या-बोलण्यात संयम असू द्या. बाकी, सप्ताहाचा शेवट सुवार्तांचा. प्रसन्न राहाल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना तीर्थाटनाचा योग. 

अपयश धुऊन काढाल 
मकर : या सप्ताहात सतत प्रकाशझोतात राहाल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती भूतकाळातलं अपयश धुऊन काढतील. सप्ताहाचा शेवट अद्वितीय स्वरूपाचा राहील. मुला-बाळांचा भाग्योदय होईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रवारी भावरम्य क्षण अनुभवतील. 

तरुणांनो, नवे छंद जोपासा 
कुंभ :
हा सप्ताह रवी-बुध युतीच्या पार्श्‍वभूमीवर एक पॅकेज बहाल करेल. तरुणांनो, सप्ताहातला प्रत्येक दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा! नवे छंद वा उपक्रम राबवाच. ता. 21 व 22 हे दिवस प्रचंड उसळी घेणारे. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींचा अश्‍वमेध यज्ञ साजरा होईल! 

वृद्धांशी वाद टाळा 
मीन : हा सप्ताह मंगळाच्या दहशतीतही काही मौजमजा करेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 24 व 25 हे दिवस मोठ्या आनंदोत्सवाचे. नवपरिणितांची विशिष्ट स्वप्नं पूर्ण होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 22 मेची संध्याकाळ घरात कटकटीची. वृद्धांशी वाद टाळा. सोमवार मानसन्मानाचा. कलाकारांचा भाग्योदय. 

पंचांग
रविवार : वैशाख कृष्ण 1, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.01, सूर्यास्त 7.03, चंद्रोदय सायंकाळी 7.34, चंद्रास्त सकाळी 6.24, भारतीय सौर वैशाख 29, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekly Horoscope and Panchang for 12 May to 18 May