bhavishya
bhavishya

आठवड्याच्या भविष्यात काय लिहिलंय? जाणून घ्या : 23 ते 29 जून

मन, बुद्धी आणि शरीर यांना बारा राशींत आणि बारा भावांत वाटून ज्योतिष्यशास्त्र जीवनखाद्याचा, अर्थातच एक प्रकारे उदरभरणाचाच, विचार करत असतं! शरीर सतत काही खात असतं, मन सतत दृश्‍याभासावर भिरभिरत असतं आणि माणसाची तथाकथित बुद्धी सतत काही तरी पोखरत असते. असं सतत जिभल्या चाटणारं, भिरभिरणारं आणि सतत स्वतःचंच डोकं खात भुगा करणारं माणसाचं शरीर म्हणजे एक वारुळ आहे. या वारुळात सर्प होऊन जगायचं की योगी होऊन जगायचं हे ठरवणं शेवटी माणसाच्याच हातात आहे. 

जीवन हे एक खाद्य आहे, जीवन हे एक पेय आहे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जीवन हा एक श्‍वास आहे आणि हा श्‍वास जर माणसाच्या जीवनात विश्‍वासानं नांदला तर माणसाचं जीवन हे प्रसादरूप होत असतं. सध्या माणूस विषारी होतोय आणि या विषानं त्याचं मन, बुद्धी आणि शरीर पोखरलं जात आहे. माणसाच्या जीवनातला सत्संग तुटत चाललाय, विश्‍वास हरवत चाललाय आणि माणूस हा भक्तीचं मर्म विसरून अवडंबरातून अंतरंगातल्या खऱ्या चंद्रभागेच्या स्नानाला मुकला आहे. ज्ञान आणि विज्ञान हे दोन किनारे आहेत. या किनाऱ्यांमधून चंद्रभागा वाहत असते. विज्ञान हा एक प्रकारचा भोगच आहे आणि हा भोग ज्ञाननिष्ठ भूमिकेतून घेतल्यावरच माणूस एकादशी साजरी करून चंद्रभागेत स्नान करू शकतो. चंद्र ही एक प्रभा आहे. ही प्रभा भक्तीचा प्रपंच मांडून वेगवेगळ्या उत्कट भावांत अर्थातच जीवनाच्या सोळा कला उपभोगून एकादशी साजरी करत असते. 

माणसाच्या मनाशी खेळणारं वेदांग असलेलं ज्योतिष शेवटी "नेति नेति' म्हणतच एकादशीचं मौन धरतं आणि हेच ज्योतिष बारा ज्योतिर्लिंगांचं गुह्य जाणून, अर्थातच जीवात्मा आणि परमात्मा यांचा अतूट संबंध जाणून जीव-परमात्मा संगमावरच्या चंद्रभागेच्या स्नानाचं महत्त्व जाणू शकतं! 

सध्या राहू मनुष्यतत्त्वाच्या मिथुन राशीतून भ्रमण करत आहे. त्यासमोरील धनू राशीत शनी हा केतूसमवेत आहे. माणसाच्या आपादमस्तकाशी अर्थातच डोकं आणि पाय यांच्याशी संबंधित राहू-केतू माणसाच्या कर्मगतीचा तोल सांभाळत, गर्भपात न करता, जीव जन्माला घालतात आणि मग माणूस जन्म-मरणरूपी संसार उपभोगतो. सप्ताहात उत्पत्ती एकादशी आहे. त्यानंतर पुढं आषाढी एकादशीची शयनी एकादशी येते. चंद्रभागेतलं स्नान मनोदोष आणि चित्तदोष घालवतं. अर्थातच मन मौनी होणं आणि चित्त चैतन्याशी समरस होणं असाच "उत्पत्ती एकादशी ते शयनी एकादशी' असा जीवाचा साधनप्रवास असतो. 
================== 
आर्थिक कोंडी दूर होईल 
मेष ः शुक्रभ्रमणाचा टप्पा कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींची व्यवसायातली आर्थिक कोंडी हटवेल. कर्जमंजुरीतून लाभ. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 27 चा दिवस वाहनविरोधी. गृहिणींनी भाजण्या-कापण्यापासून काळजी घ्यावी. बाकी, संध्याकाळ सुवार्तेची. विवाहयोग. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी संध्याकाळी सखीचा सहवास. 
================== 
करिअरची फास्ट ट्रेन पकडाल! 
वृषभ ः मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अतिशय सुंदर ग्रहमान. तरुणांना मोठा ब्रेक थ्रू मिळेल, अर्थातच करिअरची फास्ट ट्रेन मिळेल! ता. 25 व 26 हे दिवस अजब पॅकेजचे राहतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती अतिशय खुलतील. विवाहमेळाव्याला उपस्थित राहा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना कामगारपीडा. 
================== 
कौतुकानं भारावून जाल 
मिथुन ः हा सप्ताह संमिश्र स्वरूपाचाच. सप्ताहाची सुरवात नोकरीत रिलॅक्‍स करणारी. कौतुकानं भारावून जाल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या संधी. ता. 25 व 26 या दिवशी मुलाखती यशस्वी होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती पुत्रोत्कर्षांनं धन्य होतील. उद्याचा सोमवार प्रसन्न राहील. 
================== 
बढतीतून बदलीचा योग 
कर्क ः राशीला आलेला मंगळ आत्मिक बळ वाढवणारा. सप्ताहात काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताह गाजवतील. तरुणवर्ग मोठा लाभ उठवेल. नोकरीच्या संधीचा लाभ घ्याच. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना बढतीतून बदलीचा योग. 
================== 
शॉर्टकट मारू नका! 
सिंह ः सप्ताहात उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना दिव्य ऊर्जा मिळणार आहे! हा सप्ताह कलाकारांना ग्लॅमर देणारा. बड्या हस्तींचा सहवास मिळेल. फेसबुकमध्ये नवा चेहरा दाखवाल! पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकींतून लाभ. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी कोणताही शॉर्टकट मारू नये. गैरव्यवहार टाळावेत. 
================== 
नोकरीत बढतीची चाहूल 
कन्या ः सप्ताहात शुक्रभ्रमणाची एक "फेज' राहील. तरुणांनो, चातुर्यानं लाभ घ्या. नोकरीतल्या अपवादात्मक परिस्थितीचा लाभ घ्या. बढतीची चाहूल! चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शुक्र योगाचं एक सुंदर पॅकेज राहील. वैवाहिक जीवनात उत्तम सुसंवाद राहील. मंगळवारची अष्टमी हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सुवार्तांची. 
================== 
सरकारी काम फत्ते होईल 
तूळ ः हा सप्ताह गतिशील राहील. व्यवसायात उत्तम घडामोडी घडतील. 
आर्थिक कोंडी फुटेल. एखादं मोठं सरकारी काम फत्ते होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शुक्र योगाचं पॅकेज लाभेल. लावा फील्डिंग! चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत फॉर्म गवसेल. 
================== 
नोकरी व सहचरी लाभेल 
वृश्‍चिक ः सप्ताहात गुरू-शुक्र योगातून काही प्युअर सिक्वेन्स लागणार आहेत. प्रयत्नशील राहा. ज्येष्ठा नक्षत्राच्या तरुणांमध्ये जान येईल! नोकरी लाभेल, सहचरीही लाभेल. विवाहयोग आहेतच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 25 ची अष्टमी अतिशय यशदायी. 
================== 
जुनाट व्याधींची काळजी घ्या 
धनू ः सप्ताहातली ग्रहांची चौकट घट्टच राहील. नवे उद्योग नकोतच! बुध आणि मंगळ यांची स्थिती आरोग्यविषयक कुरापती काढणारी! जुनाट व्याधी सांभाळा. बाकी गुरू-शुक्र योगातून विशिष्ट रसद पुरवली जाऊन पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना तग धरता येईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार लॉटरीचा. 
================== 
स्पर्धात्मक यश दिशा देईल 
मकर ः मंगळाचं झालेलं राश्‍यांतर एक टप्पा सुरू करेल. स्वतंत्र व्यावसायिकांना विशिष्ट लाभ अपेक्षित आहेत. विशिष्ट सरकारी कामं होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या तरुणांना एखादं स्पर्धात्मक यश दिशा देईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट शुभ ग्रहांच्या पॅकेजसंदर्भात उत्तमच. 
================== 
नवपरिणितांना स्थैर्य लाभेल 
कुंभ ः पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह विशिष्ट फायनल्स जिंकून देईल. तरुणांनो, लाभ घ्याच. हा सप्ताह नवपरिणितांना जीवनात स्थैर्य देईल. सप्ताहाचा शेवट अनेक सुवार्तांचा. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती चांगलाच भाव खाऊन जातील...अर्थातच सेलिब्रिटी होतील! 
================== 
नियोजित कामं मार्गी लागतील 
मीन ः या सप्ताहात सूर गवसेल, फॉर्म गवसेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 25 व 26 हे दिवस अतिशय प्रवाही राहतील. नियोजित कामं फत्ते होतील. नोकरीविषयक मुलाखती यशस्वी होतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं नैराश्‍य दूर होईल. नवपरिणितांचा भाग्योदय. पर्यटनाला जाल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com