पुढचा आठवडा कसा असेल? जाणून घ्या तुमचं भविष्य : 26 मे-1 जून

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

वर्ल्ड कपचं एव्हरेस्ट गाठा! 
 

देव, मनुष्य आणि राक्षस हे तिन्ही या पृथ्वीवर एक प्रकारचा वर्ल्ड कपच खेळण्यासाठी अवतरत असतात! पृथ्वी ही प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण या स्वरूपातली एक धावपट्टीच म्हणावी लागेल. दहा इंद्रिये आणि अकरावं मन अशा 11 खेळाडूंना घेऊन आपला देहरूपी संघ घेऊन या पृथ्वीरूपी धर्मक्षेत्रावर म्हणा किंवा कुरुक्षेत्रावर म्हणा देव, दानव व मनुष्य यांचाही वर्ल्ड कपच खेळला जात असतो! "जागतिक कीर्ती' या स्वरूपात असलेला हा वर्ल्ड कप एक प्रकारच्या काळाचाच इतिहास घडवत असतो. कर्तृत्वाचा आलेख दाखवणारा किंवा या तिघांच्या गुणांचं मोजमाप करणारा हा वर्ल्ड कप मिळवण्यासाठी हे तिघं आपला फॉर्म टिकवत, शर्थीची झुंज देत या पृथ्वीनामक खेळपट्टीला घट्ट पकडून ठेवत आपल्या स्वत:ला धावबाद, झेलबाद किंवा यष्टिबाद होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. 

पृथ्वी हा एक मोठा भोग आहे. विद्या, धन आणि कीर्ती यांच्या जोरावर त्रिखंडातले भोग भोगण्यासाठी किंवा ऐश्‍वर्य उपभोगण्यासाठी धडपड करणारे हे वरील तिन्ही जीवप्रकार अनवधानातून पृथ्वीनामक धावपट्टीवर मार्गभ्रष्ट होत असतात आणि पुन:पुन्हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी अनेक जन्म घेत असतात. धावबाद, झेलबाद किंवा यष्टिबाद होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या दोषांवर नियंत्रण ठेवल्यास माणूस पृथ्वीच्या धावपट्टीवर धावसंख्या वाढवत अर्थातच षड्रिपुंवर विजय मिळवत, मोठे विजयी षटकार ठोकू शकतो आणि तथाकथित वर्ल्ड कप जिंकून परमगतीला प्राप्त होऊ शकतो. 

हल्ली माणसाचा प्रत्येक दिवसच मुळी वर्ल्ड कपसारखा होऊ लागला आहे! "उद्या नाही, आजच' अशी ईर्ष्या बाळगून दिवस आणि रात्र एक करणारा माणूस कृत्रिम सूर्यप्रकाशात प्रत्येक वन डे ही वर्ल्ड कप स्पर्धा समजून जिवाचं रान करत असतो! वर्ल्ड कप म्हणजे हल्लीच्या स्पर्धात्मक जगाचं एक सिम्बॉल (प्रतीक) होऊ पाहत आहे. वर्ल्ड कपवर हल्ली सट्टेबाजीसुद्धा होते. धनिकांचा शेअरबाजार खाली-वर करणारा हा वर्ल्ड कप माणसांचे "हार्टबीट्‌'स चांगलेच वाढवत असतो. 

मित्र हो, जीवन ही एक कला आहे आणि ही कला सद्विद्येच्या आधारावर जगत असते किंवा ती कला तशी जगवली गेली पाहिजे. पंचमहाभूतांची अभिव्यक्ती पृथ्वीवर एक प्रकारच्या कलेचा उन्मेष सादर करत असते आणि हा उन्मेष म्हणजेच एक वर्ल्ड कप होय. असा हा उन्मेषाचा वर्ल्ड कप उंचावण्यासाठी या पृथ्वीच्या धावपट्टीवर यष्टिबाद न होता धावसंख्या उभारली पाहिजे आणि या एक प्रकारच्या अलौकिक कीर्तिशिखराचं एव्हरेस्ट गाठून तिथं विश्रांतीचे क्षण अनुभवले पाहिजेत! 

पुत्रोत्कर्षामुळे धन्य व्हाल 
मेष : अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती अनेक माध्यमांद्वारे लोकांचं लक्ष वेधून घेतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह जनसंपर्कातून एकूणच प्रवाही. काही महत्त्वाच्या गुंतवणुकी कराल. ता. 28 व 31 या दिवसांच्या वन डे शुक्रभ्रमण जिंकून देईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचे डोळे एकादशीला पुत्रोत्कर्षामुळे आनंदाश्रूंनी भरून येतील. धन्यता अनुभवाल. 

वेगवेगळे विक्रम नोंदवाल! 
वृषभ : राशीतलं बुधभ्रमण विलक्षण राहील. तरुणांना मुलाखतींतून यश. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 26 ते 28 मे हे दिवस अतिशय दिलखुलास राहतील. काव्य स्फुरेल! मृग नक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच सप्ताह सुंदर पॅकेजचा राहील. ता. 29 व 30 या दिवशी वेगवेगळे विक्रम नोंदवाल! 

नका जाऊ मीडियासमोर! 
मिथुन : सप्ताहातील प्रत्येक वन डे फक्त खेळून काढा. नका होऊ निराश. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट कोर्टप्रकरणात यश येईल. वास्तुविषयक प्रश्‍न सोडवाल. ता. 31 मे व एक जून हे दिवस तुमच्या राशीला शुभलक्षणी. मात्र, आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना लोकापवादातून त्रास. नका जाऊ मीडियासमोर! 

"अनुष्का'च्या उपस्थितीत षटकार! 
कर्क : आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती शुभ ग्रहांच्या ओव्हर्सच्या माध्यमातून धावसंख्येचा विक्रम नोंदवतील! पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत वरिष्ठांचं लक्ष वेधून घेतील. ता. 30 मे ते एक जून या कालावधीत प्रेमप्रकरणाचा अध्याय सुरू होईल. एखाद्या "अनुष्का'च्या उपस्थितीत चौकार व षटकार ठोकाल! 

प्रेमाच्या वन डे जिंकाल! 
सिंह : हा सप्ताह मोठी अजब फळं देईल. पूर्वा नक्षत्र ग्रहांच्या लूज फील्डिंगचा फायदा घेईल. शुक्रभ्रमणाची तेजस्विता कौतुकाचे काही क्षण देईल. ता. 30 मे ते एक जून हा कालावधी "शुक्र तारा, मंद वारा' असा अनुभव देईल. काहींना परिचयोत्तर विवाहाच्या संधी. अर्थातच प्रेमाच्या वन डे जिंकाल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय लाभ. 

वास्तुविषयक वाद मिटतील 
कन्या : सप्ताहातली बुधाची स्थिती मोठी अनुकूल राहील. हस्त आणि चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 29 व 30 हे दिवस आर्थिक व्यवहारांतून लाभदायी. वास्तुविषयक वाद मिटतील. काहींना राजकीय व्यक्तींकडून लाभ होतील. ता. 29 मेचा बुधवार प्रेमिकांना खलनायकाकडून त्रासाचा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार संध्याकाळ व्यावसायिक लॉटरीची. 

शेवटच्या बॉलवर विजयप्राप्ती 
तूळ : हा सप्ताह शेवटच्या बॉलला वन डे जिंकून देणारा. सप्ताहात स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती फोटोफिनिश यश संपादन करतील. सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी अतिशय सुंदर फळं मिळतील. प्रेमाची एखादी वन डे जिंकाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींच्या राजकारणाला यश येईल, अर्थात फील्डिंग यशस्वी होईल! 

फील्ड ऍरेंजमेंट उत्तम कराल 
वृश्‍चिक : सप्ताहातल्या वन डे गुरूच्या कप्तानपदांतर्गत होतील. बुधाची स्थिती तुमचं मार्केटिंग यशस्वी करेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींची फील्ड अँरेंजमेंट स्पर्धकांना निष्प्रभ करेल. फील्डवर धावताना पडू नका. हाता-पायाला इजा होण्यापासून सांभाळा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 30 मेच्या वन डेमध्ये भन्नाट यश. सूर्योपासना करा! 

धावबाद होऊ नका! 
धनू : या सप्ताहात मंगळ यष्टिरक्षकाचं काम करणार आहे. स्वत:च्या कक्षेत राहून वन डे खेळा. धावबाद होऊ नका. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट अत्यंत सुखकारक राहील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती ता. 30 मे ते एक जून या कालावधीत शुक्राच्या ओव्हर्सद्वारे मोठी धावसंख्या उभारतील. 

मोठी धावसंख्या उभाराल! 
मकर : सप्ताहातली ग्रहांची फील्ड ऍरेंजमेंट तुम्हाला अनुकूल राहील. फुलटॉस गोलंदाजीतूनच मोठी धावसंख्या उभाराल! सप्ताहातली शुभ ग्रहांची आघाडी तुमचं संख्याबळ वाढवेल! श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना चांगलंच बाळसं येईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती "मॅन ऑफ द मॅच' होतील. नोकरीत बढती! 

वेगवान धावा काढाल 
कुंभ : वर्ल्ड कपच्या या सप्ताहात ग्रहांच्या फील्डवर लक्ष वेधून घेणारी रास! माणसांनाच तुम्ही खेळवणार आहात! शततारका नक्षत्राच्या तरुणांना जबरदस्त क्‍लिक होणारा सप्ताह. ता. 29 मे ते एक जून या कालावधीत वेगवान धावा काढाल. अर्थातच तुमच्या सर्व प्रयत्नांना यश येईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा "राज्याभिषेक' सोहळा साजरा होईल! 

मीन : गुरूच्या कप्तानपदांतर्गत या सप्ताहातल्या वन डे खेळल्या जातील. रेवती नक्षत्राच्या व्यक्ती बाजी मारणार आहेत. ता. 28 ते 30 या कालावधीत शुभ ग्रहांच्या गोलंदाजीतून विक्रमी धावसंख्या उभाराल, अर्थात स्वीकारलेल्या कामात यश येईल. नोकरीसाठीच्या मुलाखती द्याच. विवाहस्थळांचा गांभीर्यानं विचार करा. ज्योतिषाचा घोळ नको. अंतर्मनानं निर्णय घ्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com