जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 28 जुलै ते 3 ऑगस्ट

श्रीराम भट
Sunday, 28 July 2019

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 28 जुलै ते 3 ऑगस्ट

माणसाचं आयुष्य म्हणजे एक कालगतीचं सूत्र आहे आणि या सूत्रात क्षणांचे मणी ओवले जातात. काळ आणि काळाला धरून असणारे क्षण क्षणार्धात निघून जात असतात. असा हा क्षणोक्षणी विचार करणारा माणूस क्षणोक्षणी प्रपंचाची माळ ओढत असतो. पौर्णिमा आणि अमावास्या ही एक कालगती आहे. क्षणोक्षणी क्षय पावणारा हा मानवी मनोरूपी चंद्र पौर्णिमेच्या आसपासच्या काळात मेरुमण्यासारखा शोभतो आणि परत क्षणांची माळ जपत क्षीण होत अमावास्येच्या कलेमध्ये लय पावतो. परत एक क्षण धरून क्षणैकतेकडं वाटचाल करतो. 

‘क्ष’ हे अक्षर मोठं अजब आहे. क्षणांचा साक्षी असलेला माणूस आपल्या जीवनमंदिरातल्या गवाक्षातून डोकावणाऱ्या क्षणरूपी क्षकिरणांची ज्या वेळी अक्षराशी गाठ घालून देतो त्या वेळीच माणसाचं जीवन कालगतीतून बाहेर पडून आत्मगतीकडं वाटचाल करतं आणि यासाठीच माणसाचा जन्म आहे. असा हा आत्मोद्धार करून अक्षय्य सुखाचा लाभ माणसाच्या जीवनातच घडू शकतो, असं भगवद्गीता सांगते. मनुष्यप्राण्याव्यतिरिक्त इतर प्राण्यांमध्ये कालगतीचा विचारच नसल्यानं त्यांना अनेक जन्म खितपत पडावं लागतं. किती भयानक आहे हे! माणूस ही एक अशी अवस्था आहे की तीच स्वस्थ होऊ शकते, म्हणजेच मुक्त होऊ शकते. हा मुक्तीचा क्षण अनुभवणारी माणसाची अनुभूती प्रकाश होऊन राहते आणि हा प्रकाश परेच्या प्रकाशात नांदतो! 

मानवी जीवन हा एक मोठा क्षण आहे. तो ज्या वेळी जन्मतो त्या वेळी तो क्षण म्हणजे चैतन्याचा साक्षात्कार असतो आणि या साक्षात्काराचा साक्षी हे चैतन्य असतं! समर्थ रामदास स्वामी म्हणतात : 

हे चैतन्याचं साक्षीरूप म्हणजे आपलं सस्वरूप असतं आणि हे आपलं रूप अरूपाशी संबंधित असतं. असा हा आपलं रूप ओळखणारा परमार्थ माणूसच जाणू शकतो! 

जेणे परमार्थ वोळखिला। तेणे जन्म सार्थक केला। 
येर तो पापी जन्मला। कुलक्षया कारणे।। 

- समर्थ रामदास स्वामी 

मित्र हो, मानवी मनाच्या घरट्यात, म्हणजेच कर्क राशीत, गुरुपुष्यामृतावर होणारी आषाढी अमावास्या माणूस म्हणवणाऱ्यांना परमार्थबोध देणारीच वाटत असते! 
 
तरुणांनो, अतिरेक टाळा 
मेष : रवी-हर्षल योगामुळे भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचं ‘फील्ड’ काही चमत्कारिक फळं देऊ शकतं. जुगार टाळा. घरातल्या मौल्यवान वस्तूंची निगा राखा. अमावास्येच्या आसपासच्या काळात तरुणांनी कोणताही अतिरेक टाळावा. बाकी, अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात आपल्या कलागुणांमुळे प्रकाशात येतील. परदेशगमनाची संधी. ता. १ ऑगस्ट हा तुमच्यासाठी ‘क्रांतिदिन’ ठरेल! 

घाईगर्दीचा प्रवास टाळा 
वृषभ : सप्ताहातल्या ग्रहमानातून मोठे लाभ उठवाल! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना आकाशस्थ देवता प्रसन्न राहतील. सूर्योदयी शिवोपासना करा. आजचा रविवार मोठे शुभसंकेत देणारा. मात्र, अमावास्येच्या आसपासच्या काळात घाईगर्दीचा प्रवास टाळा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात दंतव्यथा सतावेल. श्‍वानदंशापासून सावध राहा. 
 
मित्रांशी वाद घालू नका 
मिथुन : सप्ताहात आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती मोठी मजेशीर फळं अनुभवतील. काहींचे आदर-सत्कार होतील. घरातल्या तरुणवर्गाचा उत्कर्ष होईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात अन्न-पाण्यातून संसर्गाची शक्यता. काळजी घ्या. मित्रांशी वाद टाळा. शनिवारी सुवार्ता कळतील. 
 
आचारसंहिता पाळा! 
कर्क : सप्ताहात तुमची रास ग्रहयोगाचं ‘फील्ड’ बनणार आहे. 
सप्ताह संमिश्र स्वरूपाचा राहील. अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात सर्व प्रकारची आचारसंहिता पाळा. नका होऊ वादाचा विषय. बाकी, पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल. शुक्रवारी मोठ्या फ्लॅश न्यूज कळतील. सन्मानित व्हाल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ज्वरपीडा. 
 
मित्रांच्या आहारी जाऊ नका 
सिंह : ग्रहांचं ‘फील्ड’ गुगली स्वरूपाचं राहील. नका जाऊ मित्रांच्या आहारी! अमावास्येच्या आसपासच्या काळात नियती काही ट्रॅप लावेल. नका धावू मृगजळामागं. स्त्रीचं संमोहन टाळा. मात्र, सप्ताहाची सुरवात आणि शेवट मघा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तमच. नोकरीत अपवादात्मक संधी येतील. स्पर्धात्मक यश मिळेल. 
 
नोकरीचा कॉल येईल! 
कन्या : अमावास्येचं ‘फील्ड’ तुमच्याबाबतीत बऱ्याच गोष्टींत ‘ऑउट ऑफ कव्हरेज एरिया’ दाखवेल! अपवादात्मक घडू पाहणाऱ्या गोष्टींचं भान ठेवा. बाकी, उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २८ व २९ हे दिवस प्रचंड प्रवाही. तरुणांना नोकरीचे कॉल्स येतील. हृदयात प्रीती जागेल. अर्थात प्रेमात पडाल! हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना भागीदारीतून त्रास शक्य. 
 
प्रेमाचे चाळे नकोत! 
तूळ : रवी-हर्षल योगातून अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात नियतीचे ट्रॅप्स लावले जातील. सर्व प्रकारे आचारसंहिता पाळा. कोणतेही प्रेमाचे चाळे नकोत! स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात व्याकुळ होतील. मात्र, प्रॅक्‍टिकल व्हायला शिका! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात आणि शेवट कायदेशीर गोष्टींमुळे त्रासदायक ठरण्याची शक्यता. 
 
नकारात्मक विचार नकोत! 
वृश्‍चिक : आजचा रविवार सप्ताहाचे उत्तम संकेत देईल. तरुणांना सप्ताह उत्तमच. फक्त ध्येयाकडंच लक्ष ठेवा. नोकरीत अलौकिक संधी मिळतील! अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी गोड अनुभव येतील! ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या गुप्त चिंतेची. नकारात्मक विचार सोडाच. 
 
गैरसमज होऊ देऊ नका 
धनू : साडेसातीच्या पार्श्‍वभूमीवर अमावास्येच्या आसपासचा काळ ढगाळ वातावरणाचा! तुमच्याबद्दल गैरसमज होऊ देऊ नका. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना एकाकीपणा ग्रासेल. बाकी, मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. दोन आणि तीन ऑगस्ट हे दिवस दिलासादायक. गुप्त चिंता जाईल. पुत्रोत्कर्ष. पगारवाढ. 
 
स्त्रीवर्गाशी जपून वागा 
मकर : सप्ताहातला अमावास्येच्या आसपासचा काळ निश्‍चितच दखलपात्र राहील. घरातल्या स्त्रीवर्गाशी जपूनच वागा. नियती ही स्त्रीलिंगी आहे हे लक्षात ठेवा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचं ग्रहमान. मात्र, सप्ताहाची सुरवात शुभ राहील. नोकरीतल्या विशिष्ट शुभघटना समाधान देतील. कलावंतांना मोठे लाभ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. 
 
ज्येष्ठांशी वाद नकोत 
कुंभ : या सप्ताहात स्त्रीवर्गाला ग्रहमान प्रतिकूल राहील. घरातल्या ज्येष्ठांशी वाद होण्याची शक्यता. संयमानं घ्या. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सांभाळून वागावं. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात भाजण्या-कापण्याची शक्यता. प्रवासात विचित्र माणसं भेटतील. आजचा रविवार घरगुती सुवार्तांचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लाभ. 
 
नोकरीत अचानक बढती! 
मीन : सप्ताहातली शुभसंबंधित रास! उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती अनेक बाबतींत ‘मॅन ऑफ द मॅच’ होतील. नोकरीत अपवादात्मक परिस्थितीतून लाभ होतील. अचानक बढती! कलावंतांना मानांकन मिळेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार दिव्य प्रचीतीचा. ज्ञानबोध होईल!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekly Horoscope and Panchang for 28 July to 3 August 2019