esakal | आठवड्याच्या भविष्यात काय लिहिलंय? जाणून घ्या : 7 ते 13 जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

bhavishya

मित्र हो, या सप्ताहात आषाढी एकादशी आहे. आदिसंकल्पाशी तादात्म्य पावणारी तीच एकादशी होय. अशा एकादशीचं व्रत करणाऱ्या माणसाला ज्योतिष पाहावं लागत नाही! तर तो व्रत करणारा माणूस आपल्यातल्या दिव्य ज्योतीचा प्रकाशच होऊन आपल्या जीवनातल्या स्वांगभूत दिव्य शोभेची अनुभूती घेतो. 

आठवड्याच्या भविष्यात काय लिहिलंय? जाणून घ्या : 7 ते 13 जुलै

sakal_logo
By
श्रीराम भट

या विश्वात विस्तीर्ण व्यासाचं एकच एक महावर्तुळ प्रचंड गतीनं कालातीत होऊन फिरत आहे. ज्याच्याभोवती हे फिरतं तोच या सर्वांमध्ये विलसत असतो. "युगे अठ्ठाविसी विटेवरी उभा।' असा आदिसंकल्परूप अनंतकोटी ब्रह्मांडनायक हा स्वतः भूत-वर्तमान-भविष्य होऊन राहिला आहे आणि तोसुद्धा एकाच वेळी! 

"पृथ्वी' हासुद्धा जीवन जगणारा जीवत्वाचा एक संकल्प आहे आणि या संकल्पात तथाकथित माणसाचा संकल्प अंतर्भूत आहे. हा भवसागर म्हणजे एक दिव्य गतीचा निसर्ग होय आणि ही दिव्य गती आदिमहासंकल्पाभोवतीच किंवा त्याच्या महावर्तुळाभोवतीच गतिमान असते. तथाकथित माणसाचं नेटवर्क म्हणा, सर्कल म्हणा किंवा शुद्ध मराठी भाषेत त्याची प्रगतिवर्तुळे म्हणा ही इच्छा-वासनांनी प्रेरित होऊन त्या महावर्तुळातच त्रिज्यांनी कक्षित किंवा मर्यादित होत असतात किंवा व्हॉट्‌सऍपच्या भाषेत ग्रुप निर्माण करत असतात! 

माणूस हे एक गतीचं छोटंसं समीकरण आहे. अर्थात हे समीकरण एकाच महाप्रमेयावर आधारित असतं. पृथ्वीवर राहणाऱ्या माणसाच्या गतीची परिसीमा भूमध्य पद्धतीवर आधारलेल्या ज्योतिषाद्वारे ठरवली जाते; परंतु "पृथ्वी' हाच कुणीएक जीव सूर्याभोवती फिरतो आणि हा सूर्य अर्थातच महासंकल्परूप असलेल्या महासूर्याभोवती फिरतो असं असताना माणूस म्हणजे पृथ्वीच्या अंगावरची एक मुंगीच म्हणावी लागेल! अर्थात या मुंगीचंही मनोगत हा महासंकल्प जाणत असतो! 

ज्योतीची ज्योती असलेली एक महाज्योती आहे आणि ती पराशक्तीरूप असलेल्या आदिसंकल्पातून अभिव्यक्‍त होते आणि हा आदिसंकल्पच "युगे अठ्ठाविसी विटेवरी उभा' अर्थातच कमरेवर हात ठेवून आहे. अध्यात्म आदिपुरुषी दडी मारायला शिकवतं. आदिपुरुष हा दुसरा-तिसरा कुणी नसून आत्माराम आहे आणि म्हणूनच या आत्मारामाला मिठी मारण्यासाठीच श्रीमद्‌हनुमान आत्मगतीनं अणूपासून ब्रह्मांडाएवढे होत, पृथ्वीवरचं जडत्व टाकून देत, सीताशक्तीच्या आधारे आदिसंकल्पाशी जाऊन भिडले आणि चिरंजीव झाले. 

मित्र हो, या सप्ताहात आषाढी एकादशी आहे. आदिसंकल्पाशी तादात्म्य पावणारी तीच एकादशी होय. अशा एकादशीचं व्रत करणाऱ्या माणसाला ज्योतिष पाहावं लागत नाही! तर तो व्रत करणारा माणूस आपल्यातल्या दिव्य ज्योतीचा प्रकाशच होऊन आपल्या जीवनातल्या स्वांगभूत दिव्य शोभेची अनुभूती घेतो. 

प्रेमाच्या जाळ्यात अडकू नका 
मेष ः
या सप्ताहात राशीचा हर्षल मंगळाच्या कुयोगात राहील. तरुणांच्या मानसिकतेला बिघडवणारा सप्ताह. ता. 10 व 11 हे दिवस विचित्र मानसिक आवर्तात घेऊन जाणारे. प्रेमाच्या जाळ्यात अडकू नका. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नियतीचे ट्रॅप लावले जातील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना मातृ-पितृचिंता सतावेल. 
================== 
आर्थिक व्यवहारात दक्षता घ्या 
वृषभ ः
या सप्ताहात व्यावसायिकांना विचित्र आर्थिक कोंडीला तोंड द्यावं लागेल. कोणतंही ओव्हरट्रेडिंग नको. आर्थिक व्यवहारात दक्षता घ्याच. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचं घट्ट फील्डिंग धावच देणार नाही. प्रवास बारगळतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना प्रेमभंगाला सामोरं जावं लागण्याची शक्‍यता. 
================== 
कुणाचीही बाजू घेऊ नका 
मिथुन ः
सध्या तुमची रास ग्रहयोगांच्या विचित्र जाळ्यात अडकली आहे. सप्ताहात बहिर्ग्रहांचं शक्तिप्रदर्शन होईल. कुणाचीही बाजू घेऊ नका. तटस्थ राहा. आत्मनिरीक्षण करा. मगच सप्ताहातली षटकं खेळून काढू शकाल! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. नोकरी मिळेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना दिलासा देणाऱ्या घटना शनिवारी घडतील. 
================== 
वरिष्ठांची मर्जी सांभाळा 
कर्क ः
राशीचा मंगळ प्रचंड आक्रमक राहील. काही पराक्रम गाजवालसुद्धा; परंतु भावनिक विश्‍वात सावधच राहा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळत राहा. तेच हितकारक! पुष्य नक्षत्राच्या तरुणांना मुलाखतींतून यश. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींच्या चिंता सप्ताहाच्या शेवटी दूर होतील. 
================== 
वागण्यात ढिसाळपणा नको 
सिंह ः
सप्ताहातले बहिर्ग्रहांचे शह-काटशह तुम्हाला सतावतील. वागण्यात ढिसाळपणा नको. नियमांचं पालन काटेकोरपणे करा. मघा नक्षत्राच्या तरुणांनी 
नोकरीसाठीच्या मुलाखती द्याव्यात. नोकरीच्या उत्तमोत्तम संधी येतील. सप्ताहाचा शेवट पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोगाचा. 
================== 
कोर्टप्रकरणात यश मिळेल 
कन्या ः
तुमची रास ग्रहांच्या केंद्रप्रतियोगांत अडकणार आहे. अर्थात फील्डिंग टाईटच राहील. सप्ताहाच्या सुरवातीला शुक्राची षटकं धावा काढून देतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीचा लाभ. एखादं कोर्टप्रकरण जिंकाल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय जाचाची शक्‍यता. 
================== 
प्रेमवीरांनी दक्षता बाळगावी 
तूळ ः
कौटुंबिक, सामाजिक किंवा राजकीय सीमांवर गडबडी होऊ शकतात. नियतीची तुमच्यावर पाळत राहील. स्वाती नक्षत्राच्या नवपरिणितांना त्रास होऊ शकतो. चित्रा नक्षत्राच्या प्रेमवीरांनी दक्षता बाळगावी. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचा मोठा मानसिक गोंधळ उडण्याची शक्‍यता. 
================== 
घरातल्या वृद्धांची काळजी घ्यावी 
वृश्‍चिक ः
साडेसातीच्या पार्श्‍वभूमीवर ग्रहमान प्रतिकूल राहील. घरातल्या वृद्धांची काळजी घ्या. त्यांची मनं जपा. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यवसायातली आर्थिक कोंडी फुटेल. तरुणांना शैक्षणिक दिलासा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी मानसिक दिलासा मिळेल. जखमेवर फुंकर घातली जाईल. 
================== 
गैरसमज होऊ देऊ नका 
धनू ः
ग्रहांचा चक्रव्यूह राहीलच. सप्ताहाची सुरवात शुक्रभ्रमाणातून सुवार्तांच्या सुगंधाची झुळुक देणारी! कलाकारांना लाभ. पगारवाढ. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या वास्तुविषयक कटकटी वाढण्याची शक्‍यता. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीच्या ठिकाणी गैरसमज होऊ देऊ नयेत. विनाकारण होणारी बदनामी टाळा. 
================== 
महिलावर्गानं संयमानं राहावं 
मकर ः
सप्ताहातला मंगल-हर्षलचा योग मोठा विचित्र राहील. शिवाय रवी-शनीचा योग जुने वाद उकरून काढेल. महिलावर्गानं या सप्ताहात अतिशय काळजीपूर्वक वागावं. संयम बाळगावा. नवपरिणितांनी वागताना दक्षता घ्यावी. बाकी, श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची कर्जवसुली होईल. बुधवार सर्वार्थानं प्रतिकूल ठरण्याची शक्‍यता. 
================== 
वाद-विवादांपासून दूर राहा 
कुंभ ः
उत्सव-समारंभातून बेरंग करणारा सप्ताह. तरुणांना मित्रमंडळींकडून दगाफटका होण्याची शक्‍यता. रवी-शनी प्रतियोगाच्या पार्श्‍वभूमीवरचं मंगळभ्रमण एखाद्या उग्र व्हायरससारखं राहील. ता. 9 व 10 हे दिवस पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वादग्रस्त स्वरूपाचे. सांभाळून राहा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना चोरीचा फटका बसण्याची शक्‍यता. 
================== 
चोरांपासून सावधान! 
मीन ः
हा सप्ताह संमिश्र स्वरूपाची फळं देईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 8 व 9 हे दिवस शुभग्रहांच्या पॅकेजचे! शिक्षण, विवाह आणि नोकरी आदींसंदर्भात उत्तम भाग्यसंकेत. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी पुत्रोत्कर्षाचा आनंद मिळेल. चोरी-नुकसान होण्याची शक्‍यता. काळजी घ्या.