आठवड्याच्या भविष्यात काय लिहिलंय? जाणून घ्या : 9 ते 15 जून

श्रीराम भट
रविवार, 9 जून 2019

माणसांना वटवृक्षाखाली विश्रांती तरी कशी लाभणार! 
वटवृक्ष ही ब्रह्मांडातली एक जागती जाणीव आहे. ते महत्प्राणाचं स्पंदन आहे. कल्पवृक्षही या वटवृक्षाखाली विसावतो असं म्हणता येईल! 
संत ज्ञानेश्‍वरमहाराज एके ठिकाणी म्हणतात ः 
कृष्णार्जुन संगमी। प्रयागवटु जाहलो।। 

चिंता-काळज्यांच्या घनदाट झाडा-झुडपांनी व्यापलेल्या या भवरूपी अरण्यात माणूस भय-भीतीच्या दडपणाचं ओझं बाळगत, धापा टाकत वाटचाल करत असतो. अशा वेळी वाटेत एखादा वटवृक्ष दिसतो आणि त्या वटवृक्षाखाली तो विसावतो. वटवृक्ष ही एक समाधी आहे. वटवृक्ष हे एक साक्षित्व आहे. वटवृक्ष हा चिंता-काळज्या संपवणारा कल्पवृक्ष आहे. वटवृक्ष हा जीव-शिवाच्या संगमावर उभा असलेला निवृत्तीचा तट आहे. प्रपंचाच्या झाडा-झुडपात सतत काहीतरी शोधणारी सध्याची कलियुगातली माणसं कल्पवृक्षाखालीही झोळी जवळ बाळगून अक्षरशः भिकारी होऊन बसतात! अशा या माणसांना वटवृक्षाखाली विश्रांती तरी कशी लाभणार! 
वटवृक्ष ही ब्रह्मांडातली एक जागती जाणीव आहे. ते महत्प्राणाचं स्पंदन आहे. कल्पवृक्षही या वटवृक्षाखाली विसावतो असं म्हणता येईल! 
संत ज्ञानेश्‍वरमहाराज एके ठिकाणी म्हणतात ः 
कृष्णार्जुन संगमी। प्रयागवटु जाहलो।। 

अर्थातच ज्ञानेश्वरमहाराजांनी पूर्ण गुरुकृपा झाल्यावर विचारांच्या किंवा 
संकल्प-विकल्पांच्या घनदाट झाडीतून बाहेर येऊन प्रयागवटवृक्षाखाली आत्मचिंतनातून समाधीच्या विश्रांतीचे क्षण अनुभवले. त्यामुळेच गीतामृतातून प्रोक्षिलेला संसार हा शेवटी मोक्षमयच होतो, असंच ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात. 
ज्येष्ठ महिना सुरू झाला आहे. ज्येष्ठ महिन्यातच गंगावतरण झालं. ज्येष्ठा आणि मूळ या नक्षत्रांचा वटवृक्षाशी संबंध येतोच येतो. माणसाच्या अनंत जन्मांची पाळं-मुळं ज्या वटवृक्षाला माहीत असतात त्या वटवृक्षाचं पूजन सूत्ररूपानं सावित्रीनं केलं यात मोठा आध्यात्मिक अर्थ आहे. सरस्वती, गायत्री आणि सावित्री या त्रिशक्तींचा खेळ सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असं एक कालसूत्र जपत असतो आणि या काळाचं साक्षित्व अनुभवणारा वटवृक्ष विश्वेश्वर होऊन गंगातटाकी प्रयागवट होऊन राहिला आहे. या विश्वेश्वराचं वटवृक्षाखाली अनुसंधान राखून सावित्रीनं आपल्या आत्मराज पतीचं नित्यत्व किंवा अमरत्व जाणून घेतलं. हेच वटपौर्णिमेचं गुह्य आहे. मित्र हो, सध्या गुरू ज्येष्ठा नक्षत्रातून भ्रमण करत आहे. यंदाचा ज्येष्ठ महिना या गुरूच्या भ्रमणातून परमपावन होईल. असे योग दुर्मिळ असतात. अर्थातच आत्मोद्धारासाठी वडाचं मूळ घट्ट पकडून ठेवावं लागतं किंवा वटवृक्षाखाली समाधी लावून बसावं लागतं आणि "श्रीस्वामी समर्थ' मंत्र जपावा लागतो! 

कोणताही भावनोद्रेक नको! 
मेष ः शनी-मंगळ प्रतियुतीचं फील्ड सप्ताहाच्या शेवटी मोठ्या उच्च दाबाचं. हाता-पायाच्या दुखापतींची काळजी घ्या. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती शनी-मंगळाच्या "हाय टेन्शन वायर'खाली येत आहेत. कोणत्याही प्रकारचा भावनोद्रेक नको. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक धनलाभ. परदेशी नोकरीची संधी. 

व्यवसायात मोठा आर्थिक ओघ 
वृषभ ः कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहातली शुक्राची सप्तपदी मोठी साथ देईल. व्यवसायात मोठा आर्थिक ओघ राहील. मुला-बाळांचे अवघड प्रश्‍न सुटतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना शनी-मंगळ योगाचं फील्ड अपवादात्मक परिस्थितीतून गोंधळात टाकणारं. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार दंतव्यथेचा. 

गैरसमज होऊ देऊ नका 
मिथुन ः हा सप्ताह शनी-मंगळ योगातून युद्धभूमीसारखाच. काहींना 144 कलमच लागू होईल! पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सहवासातली एखादी हट्टाग्रही व्यक्ती वेठीला धरेल. सप्ताहाचा शेवट वेदनायुक्त व्याधींचा. 
आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रवासात मोठे अडथळे येण्याची शक्‍यता. वैवाहिक जीवनात गैरसमज होऊ देऊ नका. 

प्रवासात काळजी घ्या 
कर्क ः या सप्ताहात प्रवास करताना काळजी घ्या. नैसर्गिक दुर्घटनांची शक्‍यता. वादळी पावसात घराबाहेर पडू नका. बाकी, शुभ ग्रहांचा अंडरकरंट पुष्य आणि आश्‍लेषा या नक्षत्राच्या व्यक्तींना गुप्तपणे मदत करतच राहील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी कुसंगती टाळावी. ता. 12 व 13 हे तुमच्या राशीला एकूणच "बॅड डेज्‌'! 

विवाहप्रस्ताव जपून हाताळा 
सिंह ः शनी-मंगळाच्या "युद्धभूमी'वरही शुभ ग्रहांची मोठी साथ राहील. मघा नक्षत्राच्या व्यक्ती फॉर्ममध्ये असतील. सप्ताहाची सुरवात शुभ घटनांची. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी हा सप्ताह विवाहविषयक प्रस्तावांतून गोंधळाचा. विचित्र गैरसमज होतील. परिस्थिती जपून हाताळा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मित्रविरोधाचा. 

नोकरीत संयमपूर्ण वागा 
कन्या ः या सप्ताहात शनी-मंगळाच्या "युद्धभूमी'वर तुमची रास सतत दबावग्रस्त राहील. नोकरीत वरिष्ठांचं विचित्र दडपण असेल. परिस्थिती संयमानं हाताळा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना एखाद्या राजकीय दहशतीला सामोरं जावं लागण्याची शक्‍यता. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 11 व 12 हे दिवस मोठ्या व्यावसायिक लाभाचे. सासरी तणावाचं वातावरण निर्माण झालं तरी चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी मनावरचा संयम ढळू देऊ नये. 

असंगाशी संग नको! 
तूळ ः हा सप्ताह तरुणांना विचित्र फळं देऊ शकतो. असंगाशी संग नको! गिर्यारोहकांनी काळजी घ्यावी. बाकी, स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार मोठ्या व्यावसायिक लाभाचा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनी-मंगळाची "युद्धभूमी' कायदेशीर गोष्टींतून वाद-प्रतिवाद निर्माण करणारी. स्त्रीवर्गाशी जपूनच. 

उत्तम नोकरीच्या संधी 
वृश्‍चिक ः राशीचा गुरू आणि शुक्रभ्रमणाची साथ निभावून नेणारी. तरुणांना उत्तम नोकरीच्या संधी येतील. ता. 10 व 11 या दिवसांत शुभग्रह उत्तम फील्ड ऍरेंजमेंट करतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना बुधवार मानवी उपद्रवातून उद्वेगाचा. जुगार, व्यसनं टाळा. 

घरात शांततेचं धोरण ठेवा 
धनू ः शनी-मंगळ योगातून धुराळा उडवणारा सप्ताह. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना मानवी, तसेच नैसर्गिक प्रदूषणाला सामोरं जावं लागेल. वादळी पावसात बाहेर पडू नका. भांडणात मध्यस्थी केलीच तर जपून करा. उत्तराषाढा व्यक्तींसाठी बुधवार मोठा वादळी. घरात शांततेचं धोरण बाळगा. 

वास्तूचे व्यवहार जपून करा 
मकर ः हा सप्ताह श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना शुभ ग्रहांच्या फील्ड ऍरेंजमेंटमधून शुभच. नोकरीच्या संधींवर लक्ष ठेवा. विवाहस्थळांचा पाठपुरावा करा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहातलं शनी-मंगळाचं युद्धपर्व झळा पोचवणारं. वास्तुविषयक व्यवहार जपून करा. आजार-व्याधींच्या पार्श्‍वभूमीवर पथ्यं पाळा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं परदेशगमन. 

परदेशगमनाची चाहूल 
कुंभ ः वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर हा सप्ताह तुमच्यासाठी प्रतिकूल राहील. तरुणांबाबत शनी-मंगळाची युद्ध-पार्श्‍वभूमी प्रेमप्रकरणांतून नाट्ये घडवणारी! पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी एखाद्या सरकारी ससेमिऱ्याला सामोरं जावं लागेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींबाबत सप्ताहाच्या सुरवातीला शुभघटना घडतील. परदेशगमनाची चाहूल. 

सरकारी नियम मोडू नका 
मीन ः सप्ताहात अतिशय अपवादात्मक ग्रहमान राहील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी सरकारी नियमांचं भान बाळगावं. बाकी, सप्ताहातल्या शुभ ग्रहांची फील्ड ऍरेंजमेंट तुम्हाला साथ देणारीच. ता. 10 व 11 या दिवशी उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती चौकार-षटकारांद्वारे विजय नोंदवतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weekly horoscope and Panchang for 9th June to 15th June