esakal | साप्ताहिक राशिभविष्य (९ मे २०२१ ते १५ मे २०२१)
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope

साप्ताहिक राशिभविष्य (९ मे २०२१ ते १५ मे २०२१)

sakal_logo
By
श्रीराम भट saptrang@esakal.com

अशी ही अश्‍वत्थाची प्रदक्षिणां!

माणसाचा जीवनप्रवाह काठाकाठानं वाहत असतो. अर्थातच हा काळरूपी जीवनप्रवाह बालपण, तारुण्य आणि वार्धक्‍य यांचे काठ किंवा घाट पकडत शेवटी अनंत असलेल्या काळसमुद्रात विलीन किंवा विसर्जित होत असतो. माणसाचं जगणं किंवा माणसाच्या जगण्याची कल्पना कल्पाचा आधार घेत उदय पावत असते. अर्थातच हा कल्पादि एक संकल्पच असतो. त्यालाच आदिसंकल्प म्हणतात. माणसाची जाणीव ज्या वेळी संकल्प होते त्या वेळी ही जाणीवच जगण्याचा विषय होते. माणसाच्या जाणिवा अनेक झाल्या, की त्या संकल्परूपात तरंग होऊन उठतात आणि हे तरंगच माणसाच्या जीवनरूपी प्रवाहाची खळखळ बनत त्याच्या जीवनाचा एक विचित्र खेळ साजरा करत असतात.

क्षणोक्षणी नासणाऱ्या प्रपंचवृक्षाला गीतेत अश्‍वत्थ म्हटलेय! तसं पाहायला गेलं तर क्षणाची व्याप्ती अतिशय सूक्ष्म आहे. त्यामुळेच क्षणाक्षणाला नासत जाणारा हा अश्‍वत्थ वृक्ष क्षणैक असला, तरी शाश्‍वत असल्यासारखा भासतो.

तैसीचि यथाची स्थिती। नासत जाय क्षणक्षणाप्रती ।

म्हणौनि ययाते म्हणती। अश्‍वत्थु हा ।।

ज्ञानदेव त्यामुळेच म्हणतात, की हा अश्‍वत्थवृक्ष ‘क्षणिकत्वेचि अव्यय’ झाला आहे. मित्रहो, क्षय न पावणारी ती अक्षय्यतृतीया होय. अक्षय्यतृतीयेचा अर्थ समजून घेणे म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थात्रयातून जाणाऱ्या प्रकृतीचा अणुगर्भ समजून घेणं होय आणि हा प्रकृतीचा अणुगर्भ समजून घेतल्यावरच महाविष्णूचे विश्‍वरूपदर्शन घडून अश्‍वत्थाची प्रदक्षिणा पूर्ण होत असते ! आणि अक्षय्यतृतीया पुन्हा उगवत असते! यंदाच्या अक्षय्यतृतीयेला (१४ मे ) आळंदीचा सोनियाचा पिंपळ आठवूया ! कारण लॉकडाउनमध्ये महाविष्णूंचे स्मरणच महत्त्वाचे आहे !

आर्थिक कोंडी फुटेल

मेष : अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शुक्रांच्या विशिष्ट ग्रहयोगांतून मोठे लाभ. थोरामोठ्यांच्या ओळखींतून विशिष्ट कामे. व्यावसायिकांना ऑक्‍सिजन मिळेल. आर्थिक कोंडी फुटेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ११ चा मंगळवार अमावस्येच्या मोठ्या व्हायरसचा. कृत्तिका नक्षत्रास शत्रूपीडा. ता. १३ चा गुरुवार धनवर्षावाचा.

ग्रहांची उत्तम साथ लाभेल

वृषभ : ता. ११ मेच्या अमावस्येचे प्रभावक्षेत्र सोडल्यास ता. १३ ते १५ हे दिवस शुभ ग्रहांच्या उत्तम साथसंगतीचे. ता. १३ ची अक्षय्यतृतीया सुवार्तांची पार्श्‍वभूमी ठेवेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी मिळेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना महत्त्वाच्या कामांतून यश लाभेल. बॅंकेची कामे होतील.

नैराश्‍य दूर होईल

मिथुन : तरुणांना सप्ताह नैराश्‍य घालविणाराच. मात्र आहारविहारादी पथ्ये पाळा. स्त्रीवर्गाशी हुज्जती नकोत. अक्षय्यतृतीयेची संध्याकाळ सुवार्तांची. परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींचे आदरसत्कार होतील. ता. ११ ची अमावस्या एकूणच बेरंगाची. नको त्या व्यक्तींशी संभाषणे.

धनलाभ व वास्तुयोगाची शक्यता

कर्क : ता. ११ मे ची अमावस्या एक विचित्र ग्रहसमीकरण राहील. नोकरीत क्रिया-प्रतिक्रियांतून सावध. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचा व्हायरस राहील. वैवाहिक जीवनात गैरसमज टाळा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ व १४ हे दिवस नोकरीसाठीच्या मुलाखती यशस्वी करणारे. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. वास्तुयोग.

व्यावसायिक क्षेत्रात मोठे लाभ

सिंह : शेतकरी तरुणांना अतिशय भन्नाट ग्रहमान राहील. ता.१३ व १४ हे दिवस तरुणांना ऑनलाइन क्‍लिक होतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक मोठे लाभ. कर्जवसुली होईल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचे ऑनलाइन प्रेमप्रकरण रंगेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अमावस्या विचित्र गुप्तचिंतेची. मातृपितृचिंता.

बेकायदेशीर व्यवहार टाळा

कन्या : ता. ११ मे च्या अमावस्येचं प्रभावक्षेत्र अतिशय खराब. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना भावनोद्रेकातून त्रास. नोकरीत जपा. बेकायदेशीर व्यवहार टाळा. बाकी हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ व १४ हे दिवस घरातील प्रिय व्यक्तींच्या सुवार्तांतून जल्लोषाचे. व्यावसायिक कर्जवसुली. बॅंकांची कामे.

घात - अपघातापासून काळजी घ्या

तूळ : ता. ११ च्या अमावस्येजवळ ग्रहांचे हाय व्होल्टेज राहील. घात-अपघातापासून जपाच. घरात स्वस्थ बसा. विशाखा नक्षत्रव्यक्तींनी नोकरीतील क्रिया-प्रतिक्रियांतून सावध. सप्ताहाचा शेवट व्यावसायिकांना मोठा दिलासा देणारा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकींतून लाभ. वास्तुविषयक व्यवहार होतील. पुत्रोत्कर्ष होईल.

सुवार्ता आणि प्रसन्न वातावरण राहील

वृश्‍चिक : यंत्रं, वाहनं आणि कामगार या घटकांमुळे ता. ११ ची अमावस्या त्रासदायक. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येचे व्हायरस सांभाळावे. बाकी ता. १२ ते १४ हे दिवस अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना घरात लॉकडाउनमध्येही प्रसन्न ठेवतील. मुलाबाळांच्या सुवार्ता. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अक्षय्यतृतीया अतिशय शुभलक्षणी. मुलाखतींतून यश.

वास्तूविषयक कटकटीतून मुक्तता

धनु : अमावस्या तरुणांना ऑनलाइन शुभच. एखादी बाजी माराल. कलाकारांचे भाग्योदय. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात वास्तुविषयक कटकटी सोडवणारी. सामोपचाराने प्रश्‍न सोडवाल. पूर्वाषाढा नक्षत्रास अमावस्या वैवाहिक जीवनात वादंगाची. स्त्रीशी नमते घ्या.

मुलाखतींमध्ये यश, व्यवसायात तेजी

मकर : सप्ताहात घरातील वृद्धांची काळजी घ्या. ११ मे च्या अमावस्येचं प्रभावक्षेत्र धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा बेरंग करणारे वातावरण. ता. १३ व १४ हे दिवस श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अतिशय शुभसंबंधित. तरुणांना मार्गस्थ करणारे. नोकरीसाठीच्या मुलाखती द्याच. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह व्यावसायिक तेजीचाच!

अक्षय्यतृतीया विजयोत्सवाची !

कुंभ : विवेकी माणसांना साडेसातीच्या झळा कमीच बसत असतात. सध्या आपल्या राशीतील विवेकवंत गुरूभ्रमणाचा आधार घेत चांगलाच लाभ घेत आहेत. सप्ताहातील अमावस्या अशीच चिंतनातून लाभ देणारी. ता.१२ ते १४ हे दिवस शततारका नक्षत्रास अप्रतिम. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विशेषतः तरुणांना ता. १३ ची अक्षय्यतृतीया विजयोत्सवाची ! कलाकारांचे भाग्योदय.

चांगले व्यावसायिक प्रस्ताव येतील

मीन : ता. ११ च्या अमावस्येजवळ घरात भांडणं टाळा. तरुणांनी वाहनं सांभाळावी. रेवती नक्षत्रास अमावस्येचं क्षेत्र विचित्र नुकसानींतून बोलू शकते. बाकी ता. १२ ते १४ हे दिवस तरुणांना शिक्षण, नोकरी आणि विवाह या घटकांतून मोठे क्‍लिक होणारे. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम व्यावसायिक पर्याय येतील