साप्ताहिक राशी भविष्य आजचे - 6 नोव्हेंबर 2022

अशाच स्वरानुसंधानात राहा!
साप्ताहिक राशी भविष्य आजचे - 6 नोव्हेंबर 2022

अशाच स्वरानुसंधानात राहा!

अंगसंगतीने सोंगंढोंगं करत आणि मनाच्या संगतीने रागरंग उधळत माणूस आपल्या स्वप्नरंजनातून एक जीवनचित्रपटच सादर करत असतो! एका त्रिगुणात्मक जीवाणूतून प्रसवलेली माणूस ही एक प्रकारची जन्मवृत्तीच म्हणावी लागेल आणि याच जन्मप्रवृत्तीचा पाठपुरावा करत माणूस आपला प्राण जपत असतो म्हणा, किंवा प्राण खर्ची घालत असतो म्हणा!

विश्‍वातील प्राणशक्ती मनाच्या संगतीने जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेली दिसते तर खरी; परंतु वस्तुतः प्राण हा प्रणवाचं स्पंदन असल्यासारखा आहे, किंवा तो त्याचं स्पंदन आहेच! हेच स्पंदन परमात्म्याशी जवळीक साधून असतं! म्हणूनच प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहे!

ज्योतिष ही जीवस्पंदनाभोवती फिरणारी आणि या जीवस्पंदनाच्या पहिल्या श्‍वासाचं गणित मांडून त्याची त्रिगुणात्मक पत्रिका मांडणारी किंवा अभ्यासणारी अध्यात्मविद्याच होय. जीव आणि परमात्म्याचा स्वर हा प्रणवाशी स्वरूपात बांधला गेला आहे आणि या प्रणवाशी जोडला गेलेला स्वर किंवा या स्वराचं अनुसंधान तुटलं की, माणूस या संसाराच्या मोहजालात अडकतो, किंवा या संसाराच्या मृगजळात तो फसतो, यालाच ग्रहण लागणं म्हणतात. परमेश्‍वराविषयी श्रद्धा जोपासणारी तीच विद्या होय आणि अविद्या ही परमेश्‍वराचं अनुसंधान न ठेवल्याने भरकटते, त्यामुळेच तिला मृगजळाचं ग्रहण लागतं. वस्तुतः परमेश्‍वराच्या जाणण्या-नेणण्यातूनच विद्या आणि अविद्या नांदत असतात. जसं की, सूर्यरश्‍मींमुळेच मृगजळाचा भास होतो!

मित्र हो, ८ नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात खग्रास चंद्रग्रहण होत आहे. या ग्रहणामुळे ग्रहयोगातून आपली अवघी ग्रहमालाच ग्रहणग्रस्त होत आहे. माणसाचं कल्पनाविश्व हे फार मोठं आहे असं म्हणतात. किंबहुना आम्ही म्हणतो की, चौऱ्यांशी लक्ष योनींतून भ्रमंती करणारं हे विश्‍व किंवा ही भ्रांती किंवा भरारी मनुष्याची कल्पनाशक्तीच जपत असते!

कलाकारांसाठी सन्मानाचा काळ

मेष : ग्रहांचं फिल्ड सप्ताहात अतिशय गुगली गोलंदाजीचं, अर्थातच फसवं राहील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी घरात गैरसमज टाळावेत. वाहन सांभाळा. चंद्रग्रहण भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर झळा पोहोचवणारं. ता. ७ व ८ हे दिवस नोकरीतील राजकारणातून खराब. बाकी कलाकारांना गुरुवार सन्मानाचा.

आरोग्याची काळजी घ्या

वृषभ : सप्ताह नैसर्गिक पाठबळ न देणारा. पर्यटकांनी सावध राहावं. प्रवासात मौल्यवान वस्तू वा रोख रक्कम जपा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींनी विशेषतः स्त्रीवर्गाने आरोग्यविषयक काळजी घ्यावी. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी जुगारसदृ‍श व्यवहार टाळावेत. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १० व ११ हे दिवस प्रेम प्रकरणातून वादग्रस्त. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना दंतव्यथा त्रासदायक ठरतील.

तरुणांचा परदेशात भाग्योदय

मिथुन : सप्ताह बचावात्मक फलंदाजीचाच. सरळमार्गी व्यावसायिकांना सप्ताहाच्या शेवटी उत्सव-प्रदर्शनातून लाभ. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी प्रसिद्धी मिळेल. तरुणांचे परदेशी भाग्योदय होतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ व ८ या दिवशी चंद्रग्रहणाजवळचे कुयोग. चोरी, फसवणुकीची शक्यता. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अग्निभय.

वसुलीतून लाभ होईल

कर्क : सप्ताहातील कुयोगातून होणारं चंद्रग्रहण ऐतिहासिकच म्हणावं लागेल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती लक्ष्य बनू शकतात. सतत सर्व बाबतीत अवधान ठेवा. नोकरी-व्यवसायात अविवेक नको. बाकी शुक्रभ्रमण सप्ताहाच्या शेवटी सुवार्तांतून जल्लोषाचं. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलीतून लाभ.

मुलाखतीत यश, लॉटरीत लाभ

सिंह : सप्ताहातील मोठ्या ग्रहांच्या कुयोगांच्या पार्श्‍वभूमीवर होणारं चंद्रग्रहण विशिष्ट गुप्तचिंता लावू शकतं. बाकी सप्ताहातील रवी-बुध-शुक्राची स्थिती चंद्रग्रहणानंतर तरुणांचं नैराश्‍य घालवणारी. सप्ताहाचा शेवट कलाकारांना छानच. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना मुलाखतीतून यश. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना लॉटरी तसंच न्यायालयीन प्रकरणात यश लाभेल.

नोकरीत सुवार्ता आणि कौतुक

कन्या : सप्ताहातील चंद्रग्रहणाच्या प्रदूषणाच्या झळा जरा जास्तच गडद राहतील. तारुण्याच्या उंबरठ्यावरील तरुणांनी जपावं. कुसंगत टाळा. गर्दीच्या ठिकाणी सांभाळा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्रग्रहणाजवळ घरगुती वादातून त्रास. भावा-बहिणींशी वाद. बाकी सप्ताहाचा शेवट चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील सुवार्तांचा. कौतुक समारंभ होतील.

घरासंबंधीच्या चिंता संपतील

तूळ : प्रदूषणात लपेटलेला सप्ताह राहील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना आजूबाजूचं मानसिक प्रदूषण राहील. नवपरिणितांनी जपावं. ग्रहणाच्या पार्श्‍वभूमीवरील रवी-शनी कुयोग, नोकरीत वरिष्ठांकडून विरोध. सप्ताहाचा शेवट विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकारणातून खराब. बाकी व्यावसायिक वसुली, वास्तुचिंता जाईल.

वैवाहिक जीवनात सुवार्ता

वृश्‍चिक : काहींना विचित्र काल्पनिक भयभीतीतून त्रास. तरुणांनो सावध रहा; सप्ताहात गावगुंडांशी हुज्जती नकोत. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातून सुवार्ता. ता. १० चा गुरुवार जल्लोषाचा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहणाजवळ घरातील वृद्धांची चिंता. बाकी सप्ताहाचा शेवट वैयक्तिक समारंभाचा.

तरुणांना नोकरी मिळेल

धनू : चंद्रग्रहण संमिश्र स्वरूपातून बोलेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात व्यावसायिक अकल्पित लाभ. तरुणांना सप्ताह उत्तम नोकरी देईल. मात्र सप्ताहात द्वाड मित्रसंगत टाळा. मूळ नक्षत्राच्या प्रेमिकांनी स्वप्नरंजन टाळावं. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठा रंजक.

शुभग्रहांचं गुप्त पाठबळ राहील

मकर : कुयोगांनी घेरलेला सप्ताह असला तरी शुभग्रहांचं गुप्त पाठबळ राहीलच. सप्ताहात सार्वजनिक जीवन सांभाळा. घरातील राजकारणातही पडू नका. बाकी सप्ताह श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक कलागुणांतून पुढे आणणारा. ग्रहणाजवळ वाहनं सांभाळा. घनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात कर्ज प्रकरणातून त्रास होऊ शकतो.

स्पर्धात्मक पातळीवर यश

कुंभ : सप्ताहात शुभग्रहांची साथसंगत राहीलच. तरुणांना ता. १० व ११ हे दिवस विशिष्ट सुवार्तांचे. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना एखादं स्पर्धात्मक यश. मात्र, सप्ताहात वैवाहिक जीवनातील गैरसमज जपा. घनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात क्रोध आवरावा. बाकी पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट प्रसिद्धियोगाचा. नोकरीचा लाभ.

थोरामोठ्यांच्या ओळखीचा फायदा

मीन : सप्ताहात चंद्रग्रहणाच्या पार्श्‍वभूमीवर भावनोद्रेक टाळा. संशयास्पद वागू नका. यंत्रं, उपकरणं जपा. गर्भवतींनी पथ्यं पाळावीत. बाकी सप्ताहात नोकरीतील पर्यावरण ठीक राहील. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० व ११ हे दिवस व्यावसायिक मोठ्या व्यवहारांचे. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com