Read Weekly Rashi bhavishya in marathi langauge | Horoscope - 9 January 2022 to 15 January 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope
साप्ताहिक राशिभविष्य - (०९ जानेवारी २०२२ ते १५ जानेवारी २०२२)

साप्ताहिक राशिभविष्य - (०९ जानेवारी २०२२ ते १५ जानेवारी २०२२)

डायबेटिस विसरा!

मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, तसंच पंचमहाभूतांना स्पर्श करत ज्योतिषशास्त्र माणसांतील स्त्री-पुरुष तत्त्वांच्या मनोधर्मांनाही स्पर्श करत असतं. असं हे सर्व शास्त्रांना स्पर्श करणारं ज्योतिषशास्त्र वेदांग आहे, हे सांगण्याची गरज नाही! सप्ताहात मकरसंक्रांत येत आहे. मकर हे एक पृथ्वीतत्त्व आहे. पृथ्वी हे स्त्रीतत्त्व आहे हे सांगण्याचीसुद्धा गरज नाही. पृथ्वीला अनेक नावांनी संबोधतात. त्यातूनच पृथ्वीतत्त्वाचा चांगला बोध होतो. उदा. धात्री, विधात्री, मही, ऊर्वी किंवा क्षिती. अशा या संबोधनांतून पृथ्वीचा वेदांशी आणि विधात्याशीही संबंध जोडण्यात आला आहे.

पृथ्वी हे निरपेक्ष प्रेम आहे. पृथ्वी ही धात्री आहे. पृथ्वी ही एक श्रद्धा आहे. पृथ्वी हे एक श्रद्धेचा ओलावा पकडणारं संवेदन आहे, त्यामुळेच ते एक सृजन आहे. तो एक जीवनयज्ञ आहे, त्यामुळेच पृथ्वीच्या पाच कुंडांतून चक्क देव प्रकटतो, त्यामुळेच ती विधात्याचीही धात्री आहे! गाय, गायत्री आणि धात्री यांचा एक अतूट संबंध आहे. अशा या व्रतस्थ पृथ्वीचा सत्यनारायण पतिव्रता स्त्रिया, सत्यप्रिय आणि दानशूर माणसांची सतत पाठराखण करत असतो!

अव्यक्तांमध्ये एक गोड आणि मधुर प्रेमतत्त्व नांदत असतं. सत्यज्ञानानंद हा हाच असतो. पृथ्वी हा एक सत्यज्ञानानंदाचा संकल्पच होय! आणि या ब्रह्मवाणीचा संकल्प किंवा उद्‌गार म्हणजेच पृथ्वी होय! आणि या ब्रह्मवाणीचं संक्रमण म्हणजेच ‘तीळगूळ घ्या, गोड बोला.’

मित्र हो, यंदाची १४ जानेवारीची शुक्रवारी येणारी मकरसंक्रांत देवांनाही प्रिय असलेल्या रोहिणी नक्षत्रावर अतिशय गोड, मृदू हसत पाय ठेवत आहे! तिचं हे पदार्पण शुक्र गुरूच्या राशीत सूर्योदयी बलवान असताना होत आहे. ज्ञानदेव म्हणतात, ‘साखरच औषध होईल, तर ही साखरच नाना प्रकारांतून खाल्ली तर बिघडतं कोठे!’’ त्यामुळेच यंदाच्या संक्रांतीला डायबेटिस विसरा ! अहो, गोड बोलून किंवा गोड ऐकून डायबेटिस होत नसतोच. आता तर भरपूर साखर खायलाही ना नाही!

गृहिणींसाठी सप्ताह छानच

मेष : गृहिणींना हा सप्ताह छानच राहील. भरणी नक्षत्राच्या गृहिणींना घरातील तरुणांच्या उत्कर्षातून धन्यता. ता. १४चा शुक्रवार मोठाच शुभलक्षणी. मात्र, ता. ११ला नोकरी-व्यावसायिक हितशत्रूंच्या पीडेची शक्यता. यंत्रं, वाहनं आणि नोकर इत्यादी घटकांतून त्रास.

गाठीभेटी घ्या, गोड बोला

वृषभ : सप्ताहातील ग्रहमान नैसर्गिक साथ न देणारं. प्रकृतीविषयक पथ्यं पाळाच. मकरसंक्रांतीच्या योगाचा सप्ताहाच्या शेवटी व्हायरस राहील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी जपावं. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ व १४ हे दिवस शुभ ग्रहांच्या स्पंदनांचे. मस्त गाठीभेटी आणि तिळगूळ घ्या, गोड बोला.

कुपथ्यं टाळा, देणीघेणी सांभाळा

मिथुन : सप्ताहात शुभग्रहांचा अंडरकरंट राहीलच. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यावसायिक पार्श्‍वभूमीवर अतिशय छान वातावरण राहील. आर्द्रा नक्षत्रास ता. ११ आणि १५ चा शनिवार विरोधी. कुपथ्यं टाळा. व्यसनं, जुगार व वाहनं सांभाळा. देणीघेणी सांभाळा.

व्यावसायिक उलाढालीत यश

कर्क : ग्रहांचं विशिष्ट सेन्सॉर राहीलच. काळजी घ्या. बाकी ता. १३ व १४ हे दिवस व्यावसायिक उलाढालींतून यश देणारे. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लॉटरी. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट गुप्तचिंता घालवणारा. मात्र, आगीपासून जपा.

मोठे सांपत्तिक लाभ होतील

सिंह : स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताह छानच. शुक्रभ्रमणाचं स्त्रीराज्य चांगलंच उपयोगी पडेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १२ ते १४ हे दिवस आत्यंतिक प्रवाही. मोठे सांपत्तिक लाभ. सरकारी कामं. पुत्रोत्कर्ष. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. १५चा करीदिन जपणं. रस्त्यावर जपा.

मोठ्या सुवार्तांची शक्यता

कन्या : सप्ताहात हातापायाच्या दुखापती जपाच. ता. ११चा मंगळवार मोठे उपद्रवमूल्य असलेला. संक्रांतयोगाचा मोठा भर. बाकी ता. १३ व १४ हे दिवस एकूणच शुभग्रहांच्या स्पंदनांचे. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना अर्थपुरवठा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना घरात मोठ्या सुवार्तांची मकरसंक्रांत. मात्र थट्टामस्करी नको!

नाजूक प्रेमस्पंदनं उमटतील

तूळ : सप्ताहात विशिष्ट ज्वालाग्राही ग्रहमान आहे. सप्ताहात हर्षल आणि नेपच्यूनचं हाय व्होल्टेज राहील. तरुणांनो व्रात्यपणा टाळाच. बाकी शुक्रभ्रमणाची नाजूक प्रेमस्पंदनं खेचून घ्यायला हरकत नसावी! ता. ११चा मंगळवार हाय व्होल्टेजचा राहील! बाकी स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींचं या मकरसंक्रांतीच्या सप्ताहात गोडच होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार बेरंगाचा.

नोकरीत मस्त वातावरण

वृश्‍चिक : सप्ताहात मंगळाच्या लष्करी राजवटीचा अंतिम अध्याय राहील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी घरी व दारी दादागिरी टाळावी. ता. ११ व १२ हे दिवस सर्वतोपरी हाय व्होल्टेजचे. बाकी ता. १३ व १४ हे दिवस शुभग्रहांच्या झुळुकीचे! अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती अगदी गोड हसत राहतील. नोकरीत मस्त वातावरण!

सर्व बाबतीत अवधान बाळगा

धनू : शुक्रभ्रमणातून आपली बॅटरी सतत चार्ज राहील. तरुणांचं ऑनलाइन भाग्य छान उलगडेल. ता. १२चा बुधवार पूर्वाषाढा व्यक्तींना मोठ्या जल्लोषाचा राहील. छान नोकरी मिळेल. बाकी ता. ११चा मंगळवार आणि ता. १५चा शनिवार ग्रहयोगांतून हाय व्होल्टेजचा! सर्व बाबतीत अवधान ठेवा.

स्त्रीकडून सहकार्य लाभेल

मकर : हर्षल, नेपच्यून आणि मंगळ हे ग्रह सप्ताहात आपली सत्तास्पर्धा चालूच ठेवतील. सर्वांना गोंजारत मार्गक्रमणा करा. बाकी श्रवण नक्षत्रास ता. १२ ते १४ हे दिवस मोठी कामं करून देणारे. धनिष्ठा नक्षत्रास एखाद्या स्त्रीकडून छान सहकार्य! उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी!

मानसिक व शारीरिक आघातापासून जपा

कुंभ : सध्याच्या शुक्रभ्रमणाच्या स्त्रीराज्यात गोड बोलून कामं करून घ्या. छान मैत्री संपादन करा. ता. १२ ते १४ हे दिवस गोड बोलून कामं करून देणारे. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट परिस्थितीचा छानच लाभ उठवतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. ११ व १५ या दिवसांत मंगळाच्या हाय व्होल्टेजपासून जपावं! मानसिक व शारीरिकही अपघात जपा!

प्रेमाचे चौकार-षटकार ठोका

मीन : सप्ताहातील शुक्रभ्रमणाच्या स्त्रीराज्यात सर्वाधिक लाभ घेणारी रास! आजचा रविवार हीच लक्षणं दाखवेल. रेवती नक्षत्रास ता. १२ ते १४ हे दिवस खऱ्या अर्थानं साखरपेरणीचे. ठोका प्रेमाचे चौकार-षटकार! मात्र, ता. ११च्या मंगळवारी खरेदीचं संमोहन टाळा. अर्थातच स्त्रीचं संमोहन टाळा. शनिवार स्त्रीमुळे जागरणाचा!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top