Read Today's Rashi bhavishya in marathi langauge | Weekly Horoscope - 21 november 2021 to 27 November 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope
साप्ताहिक राशिभविष्य (२१ नोव्हेंबर २०२१ ते २७ नोव्हेंबर २०२१)

साप्ताहिक राशिभविष्य (२१ नोव्हेंबर २०२१ ते २७ नोव्हेंबर २०२१)

sakal_logo
By
श्रीराम भट saptrang@esakal.com

काशीचा कोतवाल जपा!

काळ ही एक क्रिया आहे. किंबहुना क्रिया ही काळावर आरूढ होते. काळ हा अनंत आहे आणि या काळाच्या अनंत महासागरात असंख्य असे क्रियांचे तरंग उठत असतात. प्रकृतीची एक प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्तीच काळावर आरूढ होऊन कार्य करीत असते. क्रिया आणि त्या क्रियेला करवून घेणारी एक क्रिया, अशा दोन क्रिया काल आणि महाकाल अशा स्वरूपात नांदत असतात.

या विश्वात सत् ची सत्ता आहे आणि या सत् च्या सत्तेचा श्‍वास कोण घेतंय याचा शोध घ्यायला लागल्यावर माणूस अनंत सत्ताधारी अशा परमशिवाच्या कक्षेत किंवा दरबारात ‘हरी ओम तत् सत्'' म्हणत प्रवेश करतो.

उत्पत्ती, स्थिती आणि लय या काळाच्या अवस्था आहेत. आकाशात दिवस-रात्रीचा खेळ अनुभवणारा माणूस काळाचं पंचांग हातात धरून आपल्या तथाकथित जीवनाच्या (काळ आणि त्याला उपभोगणारी प्रवृत्ती शरीर धारण जुगारच खेळत असते.) अर्थातच हे शरीररूपी भांडवल माणूस नावाच्या प्रवृत्तीला काळानेच दिलेलं असतं. या मनुष्यरूपी किंवा जीवरूपी भांडवलावर काळभैरवांचं पूर्ण लक्ष असतं. शिवाच्या दरबारातील किंवा शिवाच्या प्रशासनातील काळभैरव हे अधिकारी समजले जातात. त्रिलोकांना उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थांतून नेणारा हा महाकाल या काळभैरवांना चोख असं काळाचं प्रशासन राबवण्यासाठी नेमत असतो. माणूस नावाच्या जीवरूपी पक्ष्यांवर तर काळभैरवांची कडक नजर असते.

मित्रहो, शंकर भगवानांनी साक्षात ब्रह्मदेवांनाही काळभैरवाच्या सत्तेची जाणीव करून दिली, तिथं माणसाचं काय घेऊन बसलात! काळभैरवाला काशीचा कोतवाल म्हणतात; आणि या कोतवालाच्या अनुमतीनेच काशी विश्वेश्वराच्या देवळात प्रवेश मिळत असतो. म्हणूनच २७ नोव्हेंबरला काळभैरव जयंतीच्या दिवशी, म्हणजे शनिवारी काळभैरवांचं स्मरण करत, काशी विश्वेश्वराच्या देवळात प्रवेश करत ‘कालाय तस्मै नमः’ म्हणत महापातकापासून मुक्ती मिळवू या!

तरुणांना नोकरीच्या संधी

मेष : सप्ताहात आरोग्यविषयक पथ्यं पाळाच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता.२२ व २३ हे दिवस शुभग्रहांच्या अखत्यारीतील. तरुणांना नोकरीविषयक उत्तम संधी. ता. २३ ची अंगारिका स्पर्धात्मक यश देणारी. व्हिसा मिळेल. ता. २४ चा बुधवार कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रचिंतेतून मुक्त करणारा.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

वृषभ : सप्ताह कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत छानच. काहींना ओळखी/ मध्यस्थीतून मोठे लाभ. एखादं सरकारी काम फत्ते होईल. मंत्र्यांच्या ओळखीतून लाभ. ता. २३ व २४ हे दिवस मोठे प्रवाही. व्यावसायिक वसुली. रोहिणी नक्षत्रास ता. २७ ची अष्टमी घरात मोठ्या सुवार्तांची. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून लाभ.

व्यावसायिक लाभ होतील

मिथुन : शुक्रभ्रमणातून सप्ताह पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना अद्वितीय अशी फळं देईल. नोकरीत मनासारख्या घडामोडी होतील. ता. २२ व २३ हे दिवस आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक मोठे लाभ देतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी खरेदी-विक्रीत सावधानता बाळगावी. संशयास्पद आर्थिक व्यवहार करू नयेत. बाकी नोकरीत प्रशंसा होईल.

वादग्रस्त येणं वसूल होईल नाकासमोरच चला.

कर्क : मंगळाचं फील्ड राहीलच. नाकासमोरच चला. भावाबहिणींची मनं जपा. आजचा रविवार व्यावसायिक उत्तम उलाढालीचा. वादग्रस्त येणं येईल. ता. २४ चा दिवस पुनर्वसू नक्षत्रास पुत्रोत्कर्षातून धन्यता देईल. ता. २७ चा शनिवार पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात गाठीभेटींतून चमत्कार घडवेल. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात स्त्रीची दहशत!

मोठे विक्रम नोंदवाल

सिंह : सप्ताहात मघा नक्षत्राच्या व्यक्तींचे जीवनातील प्युअर सीक्वेन्स लागतील. अर्थातच हुकमी कामं होतील. ता. २१ ते २३ हे दिवस मोठे विक्रम नोंदवतील. पूर्वा नक्षत्रास ता. २३ ची अंगारकी विशिष्ट यशातून परदेशाची द्वारं उघडून देईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मोठ्या व्यावसायिक प्राप्तीचा.

अपेक्षापूर्तीचा कालखंड

कन्या : सप्ताह तरुणांना अपेक्षापूर्तीचाच राहील. सप्ताहात आळस झटकाच. ता. २१ ते २३ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. मारा चौकार, षटकार. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सतत मागणी राहील. उत्तम सहली, करमणुकीचे योग. उत्तरा नक्षत्र व्यक्ती नोकरीत भाव खाऊन जातील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार प्रेमात पडण्याचा.

थोरामोठ्यांच्या सहकार्यातून मोठे लाभ

तूळ : गुरू आणि शुक्र यांची स्थिती कलंदर व्यक्तींना मोठी छानच राहील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांच्या सहकार्यातून मोठे लाभ. स्वाती नक्षत्रास नोकरीच्या मुलाखतींतून यश. ता. २२ व २३ हे दिवस मोठे ऊर्जासंपन्न राहतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी टीका-टिप्पणी करताना सावध. ता. २५ चा दिवस वादग्रस्त होऊ शकतो.

नोकरीत प्रशंसा होईल

वृश्चिक : सज्जन व्यावसायिकांना सप्ताह छानच. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाचा शेवट मोठा प्रसन्न राहील. नोकरीत प्रशंसा होईल. विशिष्ट वादग्रस्त येणं येईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ चा बुधवार महत्त्वाच्या गाठीभेटींचा. मोठे खरेदी- विक्रीचे व्यवहार. मात्र, सप्ताहात उष्णताजन्य विकारांपासून त्रास.

आर्थिक संकट दूर होईल

धनू : सप्ताहात शुभग्रहांची लॉबी ॲक्टिव्ह राहीलच. सप्ताहात स्वतंत्र व्यावसायिकांना मोठा बूस्टर डोस मिळेल. ता. २२ ते २४ हे दिवस मोठे अजब राहतील. पूर्वाषाढा व्यक्तींना वास्तुयोग. परदेशातील तरुणांचं नैराश्य जाईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट आर्थिक संकट घालवेल. घरातील तरुणांची चिंता जाईल.

नोकरीच्या मुलाखतीमध्ये यश

मकर : सप्ताह उत्तराषाढा नक्षत्रास सुसंगतच राहील. तरुणांचे विशिष्ट प्रश्न सुटतील. ता. २४ चा बुधवार भाग्य घेऊन येणारा. नोकरीच्या मुलाखतींतून यश. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ चा दिवस नातेवाइकांच्या कटकटीचा. नका पडू घरगुती राजकारणात. धनिष्ठा नक्षत्रास ता. २६ चा शुक्रवार मोठ्या मौजमजेचा. सखीचा सहवास.

कला, प्रदर्शनात यश

कुंभ : सप्ताहात आपल्या राशीचा शेअर वधारणार आहे. वैयक्तिक उत्सव, समारंभ होतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत गाजवतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट प्रत्येक गोष्टीत यशस्वी राहील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २३ ची अंगारकी कला, प्रदर्शनातून यश देणारी.

तरुणांना उत्तम कालखंड

मीन : सप्ताहात दशमस्थ शुक्रभ्रमणाचा एक अंडरकरंट राहीलच. अर्थातच तरुणांना त्याचा उत्तम लाभ मिळेल. नव्या नोकरीत स्थिर व्हाल. व्यावसायिकांना ता. २२ ते २४ हे दिवस अप्रतिम राहतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींच्या मनातील कोरोना जाईलच. आजचा रविवार रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम गाठीभेटीचा.

loading image
go to top