आनंददायी जीवनासाठी मनाचे व्यायाम

नयना निर्गुण
रविवार, 22 जानेवारी 2017

सध्याच्या स्पर्धेच्या जगात संवाद हरवलाय, असं आपण सतत ऐकतो आणि अनुभवतोही. कुटुंबात, नोकरी-व्यवसायात, समाजात सगळीकडंच ही स्थिती आहे. प्रत्येक जण कशाच्या तरी मागं धावतो आहे...पण एकटाच. त्यातून जगण्यातला आनंद हिरावला जातोय, छोटे-छोटे प्रश्न जटिल होताना दिसताहेत. या साऱ्यावर संवाद हा उपाय आहे, हे प्रत्येकालाच जाणवतं आणि पटतंही; पण संवादाला सुरवात कोणी करायची हा प्रश्न असतो. ही सुरवात आपणही करू शकतो, हे धावपळीत कोणाच्या लक्षात येत नाही. मात्र, हीच जाणीव होऊन चिकित्सक मानसशास्त्रज्ञ ऊर्मिला सुधीर सावंत यांनी मुंबईतल्या नायर रुग्णालयात भित्तिपत्राच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधायला सुरवात केली.

सध्याच्या स्पर्धेच्या जगात संवाद हरवलाय, असं आपण सतत ऐकतो आणि अनुभवतोही. कुटुंबात, नोकरी-व्यवसायात, समाजात सगळीकडंच ही स्थिती आहे. प्रत्येक जण कशाच्या तरी मागं धावतो आहे...पण एकटाच. त्यातून जगण्यातला आनंद हिरावला जातोय, छोटे-छोटे प्रश्न जटिल होताना दिसताहेत. या साऱ्यावर संवाद हा उपाय आहे, हे प्रत्येकालाच जाणवतं आणि पटतंही; पण संवादाला सुरवात कोणी करायची हा प्रश्न असतो. ही सुरवात आपणही करू शकतो, हे धावपळीत कोणाच्या लक्षात येत नाही. मात्र, हीच जाणीव होऊन चिकित्सक मानसशास्त्रज्ञ ऊर्मिला सुधीर सावंत यांनी मुंबईतल्या नायर रुग्णालयात भित्तिपत्राच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधायला सुरवात केली. हळूहळू त्यात लोकांचा सहभाग वाढला आणि सतत नऊ वर्षं झालेल्या या संवाद चळवळीचं ‘मन-पूर्वक’ या पुस्तकात रूपांतर झालं.

‘मन’ हा या भित्तिपत्राचा विषय असल्याने स्वाभाविकच त्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मनातल्या सुप्त भावना, विचार व्यक्त करण्यासाठी माध्यम मिळालं. त्याचबरोबर प्रबोधनाची नवी वाटही सापडली. कोणी मनोगत मांडलं, कोणी कवितेतून व्यक्त झालं, तर कोणी चित्रातून आपल्या विचारांना वाट करून दिली. हे सारं सहज सोपं, रोजच्या अनुभवातून मांडलं गेलं. कुठं उदात्तता, दांभिकता किंवा अतिगंभीर, बोजड विचार नाही. त्यामुळंच अनेक जण त्याच्याशी सहजपणे जोडले गेले आणि ‘लोग आते गये, काँरवा बन गया,’ अशी स्थिती झाली.

ही भित्तिपत्रं असली, तरी एकसुरी नाहीत. लेखिका स्वत- मानसशास्त्रज्ञ असल्यानं मनाचं आरोग्य जपण्याच्या दृष्टीनं अनेक सदरांद्वारे छोटे-छोटे विषय मांडत तिनं लोकांना व्यक्त होण्यास प्रवृत्त केलं आहे. दैनंदिन जीवनात अनेक प्रसंग घडतात, जे आपल्याबरोबर इतरांनाही आनंद देऊन जातात; पण रोजच्या धावपळीत आपण ते जगतच नाही. लेखिकेनं असे छोटे-छोटे प्रसंग सांगत, त्याची जाणीव करून दिली आहे. काही प्रश्न विचारले आहेत, जे अंतर्मुख होऊन स्वत-लाच विचारले, तर आपल्यात सकारात्मक बदल नक्कीच घडू शकेल. प्रसंग किंवा बातमी एकच; पण त्याकडं पाहण्याचा, विचार करण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा भिन्न असतो, हे एका सदरातून पाहायला मिळतं. तुम्हाला कोणी मूर्ख म्हणालं, मूल पडलं... अशा प्रसंगांमध्ये तुम्ही कसे व्यक्त व्हाल, या प्रश्नाच्या उत्तरांतून वेगवेगळ्या मनोवृत्तींचं दर्शन घडतं. एखादं वाचलेलं, ऐकलेलं किंवा ऐकवलेलं वाक्‍य एखाद्याच्या आयुष्याला कसं कलाटणी देतं, हेही वाचायला मिळतं.

लहानपणापासून आपण काही गोष्टी वाचत, ऐकत असतो. अशा गोष्टी आधुनिक संदर्भ घेत नव्यानं लिहायला सांगितल्या आहेत. नकारात्मक गोष्टींकडंही सकारात्मक दृष्टीनं कसं पाहावं, याचा मूलमंत्र यातून लेखिकेनं दिला आहे. काम चांगल्या रितीनं करण्यासाठी टिप्स दिल्या आहेत, त्याचबरोबर कवितेची ओळ पूर्ण करा, विनोदी किस्सा लिहा, चित्रावरून चारोळी लिहा, अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेत वाचकांना व्यक्त होण्याची, मन मोकळं करण्याची संधीही दिली आहे.
मुलांचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी काय करावं, हे सांगतानाच मुलांविषयी भेडसावणारे प्रश्न विचारून त्याला तज्ज्ञांकडून उत्तरं दिली आहेत. त्याचबरोबर बुद्‌ध्यांक, अध्ययन अक्षमता, मतिमंदत्व, स्वमग्नता, पीडीएसडी यांसारख्या विषयांवरही चर्चा केली आहे. मुलांना दिला जाणारा वेळ, छंद, सहजीवन, मैत्री, महिलांची स्थिती अशा दैनंदिन जीवनाशी निगडित विषयांवर प्रश्नावल्या दिल्या आहेत. त्यांची उत्तरं देत स्वत-च स्वत-चा शोध घेऊन, काय बोध घेता येईल याचं विवेचन आहे. कुटुंबात, समाजात वावरताना आपल्या मनाला मुरड घालावी लागते, मनाविरुद्ध वागावं लागतं, असं अनेकांना वाटतं; पण ते किती खरं आणि किती काल्पनिक, हे तपासून पाहण्यासाठीही काही प्रयोग दिले आहेत.

मनाच्या वेगवेगळ्या पैलूंचं दर्शन या पुस्तकातून घडतं. प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मकतेनं पाहिलं, तर आयुष्य आनंददायी होतं, हे सांगताना कोणतेही उपदेशाचे डोस न देता, लेखिकेनं ते भित्तिपत्रांच्या माध्यमातून वाचकांकडूनच वदवून घेतलं आहे. त्यामुळं पुस्तक वाचत असताना भिन्न स्वभावाच्या, प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या मनोविचारांचं दर्शन तर घडतंच, शिवाय नकळत आपणही मनाच्या व्यायामाच्या या प्रक्रियेत सहभागी होऊन, स्वत-चा शोध घेऊ लागतो. लेखिकेच्या शब्दांत, ‘आपल्या सर्वांमध्ये शिवम्‌, सुंदरम्‌ असे जे आहे, ते हळुवारपणे जपण्याचं काम ‘मन-पूर्वक’ करतं.’

पुस्तकाचं नाव - मन-पूर्वक
लेखिका - ऊर्मिला सुधीर सावंत
प्रकाशन - ग्रंथाली प्रकाशन, मुंबई (०२२-२४२१६०५०)
पृष्ठं - २७२/
मूल्य - ३०० रुपये

Web Title: welcome new books