स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 May 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय जीवनदर्शन
प्रकाशक - आविष्कार प्रकाशन, पुणे (९२२६४२८७९५) / पृष्ठं - १२८ / मूल्य - १५० रुपये
डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या जीवनातले अनेक दुर्मिळ क्षण टिपणाऱ्या छायाचित्रांचा हा संग्रह. डॉ. आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्यानं जाणीवपूर्वक निवडक सव्वाशे छायाचित्रांचा समावेश त्यात करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय जीवनदर्शन
प्रकाशक - आविष्कार प्रकाशन, पुणे (९२२६४२८७९५) / पृष्ठं - १२८ / मूल्य - १५० रुपये
डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या जीवनातले अनेक दुर्मिळ क्षण टिपणाऱ्या छायाचित्रांचा हा संग्रह. डॉ. आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्यानं जाणीवपूर्वक निवडक सव्वाशे छायाचित्रांचा समावेश त्यात करण्यात आला आहे.

भारतीय निवडणूक प्रणाली - स्थित्यंतर व आव्हाने
प्रकाशक - हरिती पब्लिकेशन्स, पुणे (८६२४०२१९६७) / पृष्ठं - १७६ / मूल्य - १८० रुपये

भारतातल्या निवडणूक प्रणालीविषयी सखोल माहिती देणारं आणि विविध विषयांची चर्चा करणारं हे पुस्तक. डॉ. तुषार निकाळजे यांनी ते लिहिलं आहे. निवडणुकांचा इतिहास, निवडणूक आयोगाची रचना आणि त्याचं कामकाज, आतापर्यंतच्या सार्वत्रिक निवडणुकांची वैशिष्ट्यं, निवडणुकीसाठी होणारा प्रशासकीय खर्च, निवडणूक पद्धतीतली स्थित्यंतरं आणि दिशा अशा अनेक गोष्टींचा आढावा त्यांनी घेतला आहे. जगभरातल्या निवडणूक पद्धतींचाही वेध त्यांनी घेतला आहे. वेगवेगळे नियम, आकडेवारी, उदाहरणं, तौलनिक अभ्यास आदी गोष्टींचा समावेश असल्यामुळं या विषयाच्या अभ्यासकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

एका सत्यकथनाचे ७ दिवस ते ७ वर्षं
प्रकाशक - उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२०-२५५३७९५८) / पृष्ठं - २३६ / मूल्य - २०० रुपये

वसंत आपटे यांनी लिहिलेलं हे वेगळ्या प्रकारचं आत्मचरित्र. आपटे यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांत, वेगवेगळ्या देशांत आणि वैविध्यपूर्ण काम केलं. या सगळ्या नोकऱ्यांत आलेले अनुभव त्यांनी या चरित्रात मांडले आहेत. त्यांच्या या प्रवासात त्यांना अनेक प्रयोग करता आले, अनेक गोष्टी शिकता आल्या, अनेक व्यक्तींबरोबर काम करता आलं, काही लढायाही लढाव्या लागल्या. या सर्व गोष्टींवर त्यांनी प्रांजळपणे लिहिलं आहे. भारत आणि अरब राष्ट्रांतल्या नोकऱ्या आणि इंडोनेशियांतलं वास्तव्य अशा दोन भागांत त्यांनी पुस्तकाची मांडणी केली आहे. त्यांचा हा आलेख सकारात्मक, दिशादर्शक आणि रंजकही आहे.

ते एकशे साठ दिवस
प्रकाशक - बहुजन साहित्य प्रसार केंद्र, नागपूर (९४२०३५७०९५) / पृष्ठं - १९२ / मूल्य - १२५ रुपये

इसादास भटके यांना कामाच्या निमित्तानं राष्ट्रीय सेवा योजना विभागासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा योग आला. सुमारे सोळा वर्षांच्या कालावधीत त्यांनी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर अठरा शिबिरं आयोजित केली. या शिबिरांसाठी विविध गावांत एकशे साठ दिवस त्यांना राहावं लागलं. या शिबिरांच्या निमित्तानं आलेले वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव, सामाजिक निरीक्षणं, भेटलेल्या व्यक्ती, उपक्रम, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अशा सगळ्या गोष्टी त्यांनी या पुस्तकात
मांडल्या आहेत.

फास्टर फेणे
प्रकाशक - उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२०-२५५३२४७९) / पृष्ठं - १३४, १६८, १५०, १२६ (अनुक्रमे)/ मूल्य - ८० रुपये (प्रत्येकी)

फास्टर फेणे ही भा. रा. भागवत यांनी तयार केलेली व्यक्तिरेखा. या भन्नाट साहसवीराच्या साहसकथा किशोरवयीन मुलांमध्ये एके काळी खूप लोकप्रिय झाल्या. त्याचे एकेक प्रताप उलगडून दाखवणारी चार पुस्तकं पुन्हा एकदा भेटीला आली आहेत. ‘फुरसुंगीचा फास्टर फेणे’, ‘जंगलपटात फास्टर फेणे’, ‘आगे बढो फास्टर फेणे’ आणि ‘बालबहादूर फास्टर फेणे’ या चार पुस्तकांतून फास्टर फेणेच्या करामती उलगडतात. अनेक कथांमधले संदर्भ जुने झाले असले, तरीही भागवत यांनी चितारलेलं किशोरवयीन मुलांचं भावविश्‍व, विचारविश्‍व; वेगवेगळी रहस्यं आणि थरारक प्रसंग, विनोदाचा शिडकावा, सहज संवाद अशा गोष्टींमुळं आजही ही पुस्तकं वाचनीय ठरतात.

यहां के हम सिकंदर-मजरूह सुलतानपुरी
प्रकाशक - प्रतीक प्रकाशन, पुणे (९४२२३१८२४९) / पृष्ठं - १२२/ मूल्य - १२५ रुपये

बहुपैलू गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या कारकिर्दीचा वेध घेणारं हे पुस्तक सुभाषचंद्र जाधव यांनी लिहिलं आहे. मजरूह सुलतानपुरी यांनी अनेक वर्षं हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली, अनेक गीतशिल्पं तयार केली. त्या सर्वांचा वेध घेण्याचा प्रयत्न जाधव यांनी केला आहे. मांडणीच्या सोयीसाठी त्यांनी एकेक संगीतकाराबरोबर मजरूहसाहेबांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला आहे. नौशाद, हुस्नलाल भगतराम, अनिल विश्‍वास, रोशन, एस. डी. बर्मन यांच्यापासून आर. डी. बर्मन, राजेश रोशन, आनंद-मिलिंद, जतीन-ललित अशा अनेक संगीतकारांबरोबरच्या कामाचा आढावा या पुस्तकात समाविष्ट आहे. जाधव यांनी केवळ जंत्री न देता वेगवेगळी वैशिष्ट्यं सांगणं, निरीक्षणं नोंदवणं, एखादा किस्सा सांगणं अशा गोष्टी करत मजरूह यांची कामगिरी रंजक पद्धतीनं मांडली आहे.

दान
प्रकाशक - विश्‍वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे (०२०-२०२६११५७) / पृष्ठं - १६४ / मूल्य - २२५ रुपये

डॉ. अनघा केसकर यांनी लिहिलेल्या कथांचा हा संग्रह. बदलत चाललेल्या आणि गुंतागुंतीच्या होत चाललेल्या सामाजिक, कौटुंबिक वास्तवाचा आणि समस्यांचा वेध घेणाऱ्या या कथा. आधुनिक तंत्रज्ञानामुळं, स्थलांतरामुळं नात्यांवर होणारे परिणाम त्यांनी ठळकपणे मांडले आहेत. अमेरिकेत गेलेल्यांच्या, मुलं दत्तक घेतलेल्यांच्या, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अशा वेगवेगळ्या वर्गांतल्या समस्या त्यांच्या कथांतून समोर येतात. वेगळे विषय आणि सोपी मांडणी हे त्यांच्या कथांचं वैशिष्ट्य.

नेल्सन मंडेला
प्रकाशक - मनोविकास प्रकाशन, पुणे (०२०-६५२६२९५०) / पृष्ठं - २२२ / मूल्य - १९९ रुपये

दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषाविरुद्ध लढणारे आणि जगभरातल्या अशा लढ्यांना प्रेरणा देणारे नेल्सन मंडेला यांचं हे चरित्र. अतुल कहाते यांनी ते लिहिलं आहे. मंडेलांचं बालपण, त्यांचा लढा, चळवळीतले चढ-उतार, विनी मंडेला यांच्याबरोबरचं त्यांचं नातं, त्यातली दु-खं, तुरुंगवास, आंतरराष्ट्रीय संबंध, निवडणुकीनंतर मिळालेलं अध्यक्षपद, या अध्यक्षपदाच्या काळात आलेलं यश-अपयश अशा अनेक गोष्टींविषयी कहाते यांनी लिहिलं आहे. मंडेला यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू त्यातून उलगडत जातात.

ओबीसी, मराठा, बहुजन मोर्चे-प्रतिमोर्चे व पुरोगामी महाराष्ट्राची फरफट
प्रकाशक - महाराष्ट्र ओबीसी संघटना, फुले आंबेडकर तत्त्वज्ञान संस्था (९४२२७८८५४६) / पृष्ठं - १६० / मूल्य - १५० रुपये

काही महिन्यांपूर्वी राज्यात वेगवेगळ्या समूहांचे मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघाले आणि सामाजिक-राजकीय वातावरण ढवळून निघालं. या सर्व गोष्टींचा वेध घेणारं, वेगवेगळ्या बाजूंचे विचार मांडणारं हे पुस्तक. विविध मोर्चांच्या निमित्तानं जे प्रश्‍न मांडले गेले, वाद झाले, चर्चा झाल्या, त्या सर्व गोष्टींविषयी विविध तज्ज्ञांनी विविध लेखांतून भूमिका, विचार मांडले आहेत. प्रा. श्रावण देवरे यांनी त्याचं संपादन केलं आहे. ‘मोर्चे-प्रतिमोर्चे - भ्रम, वास्तव व विश्‍लेषण’ आणि ‘वाद, प्रतिवाद-संवाद’ असे दोन भाग करण्यात
आले आहेत.

जनक्रांतीच्या पाऊलवाटा
प्रकाशक - नाथे पब्लिकेशन लिमिटेड, नागपूर (०७१२-२७४५७२७) / पृष्ठं - २५० / मूल्य - २०० रुपये

राष्ट्रसंत अशी उपाधी मिळालेले तुकडोजी महाराज यांचे वेगवेगळे पैलू मांडणारं हे पुस्तक. ज्ञानेश्‍वर रक्षक यांनी तुकडोजी महाराजांचे वेगवेगळे पैलू मांडणारे पैलू मांडणारे लेख वेगवेगळ्या माध्यमांत लिहिले. त्यांचंच संकलन त्यांनी या पुस्तकात केलं आहे. तुकडोजी महाराजांचे पर्यावरणविषयक विचार, त्यांची साहित्यदृष्टी, त्यांची ग्रामकुटुंबाची, ग्रामस्वराज्याची संकल्पना, त्यांचं कार्य, स्वच्छतेचा मंत्र अशा अनेक गोष्टींवर रक्षक यांनी लिहिलं आहे. अनेक विषयांवर केलेलं चिंतनही त्यांनी पुस्तकात मांडलं आहे.

कबीरायन
प्रकाशक - अनुबंध प्रकाशन, पुणे (०२०-४२३७२८७१) / पृष्ठं - ३०४/ मूल्य - ३२५ रुपये

मध्ययुगीन काळातले महान संत कबीर यांच्या जीवनाचा वेध घेणारी ही कादंबरी. डॉ. भारती सुदामे यांनी ती लिहिली आहे. कबीरांशी संबंधित विविध ठिकाणांना भेटी देऊन, विविध संदर्भसाहित्य गोळा करून, अनेकांशी चर्चा करून डॉ. सुदामे यांनी ही कादंबरी लिहिली आहे. कबीरांचे विविध पैलू उलगडत असतानाच संत रविदास, अनंतदास, शंकरदेव यांचंही दर्शन घडवणारी ही कादंबरी. ओघवती भाषा, परिणामकारक संवाद, चिंतन, योग्य जीवनभाष्य आणि कलात्मक मांडणी अशा गोष्टींमुळं कादंबरी परिणामकारक ठरते. तिची कथनशैलीही वेगळी आहे.

इस्लाम सर्वांसाठी
प्रकाशक - सलाम सेंटर, बंगळूर (०८०-२६६३९००७) / पृष्ठं - २२२/ मूल्य - २५० रुपये

इस्लाम धर्माशी संबंधित अनेक संकल्पना स्पष्ट करणारं, माहिती देणारं हे पुस्तक. सय्यद हमीद मोहसीन यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद सय्यद इफ्तेकार अहमद यांनी केला आहे. अल्ला, पवित्र कुराण, इस्लामचे पाच स्तंभ, हज यात्रा, रमजान आणि रोजे, जकात, अजान आदी संकल्पना या पुस्तकात स्पष्ट करण्यात आल्या आहेत. शरिया, शांततेची संकल्पना, जिहाद आदींविषयीही ऊहापोह करण्यात आला आहे. समाजजीवन, वैयक्तिक जीवन, मूल्यं, दैनंदिन जीवनातलं आचरण आदींबाबतही माहिती देण्यात आली आहे.  

स्मार्ट मोबाईल साहित्यिकांसाठी
प्रकाशक - उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२०-२५५३२४७९) / पृष्ठं - १०८ / मूल्य - १५० रुपये

सध्याच्या डिजिटल युगात साहित्यिकांनी ‘स्मार्ट’ कसं बनावं याचे कानमंत्र देणारं हे पुस्तक डॉ. दीपक शिकारपूर यांनी लिहिलं आहे. मोबाईल, लॅपटॉपसारख्या साधनांपासून ई-मेल, ई-वाचन, ब्लॉगिंग, सोशल मीडिया टूल्स अशा विविध गोष्टींची माहिती त्यांनी दिली आहे. इंटरनेटवर मराठीत कसं लिहावं, नेटवरून ई-व्यवहार कसे करावेत, ऑनलाइन अर्थव्यवस्थापन कसं करावं अशा गोष्टींबाबतही त्यांनी कानमंत्र
दिले आहेत.

साभार पोच

  •  रिमझिमता एकांत /कवितासंग्रह / कवयित्री - मंजिरी पाटील (७३५०३९८९३४)/ संवेदना प्रकाशन, पुणे (९७६५५५९३२२) / पृष्ठं - ९६ / मूल्य - १२५ रुपये
  •  श्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध / अध्यात्मिक / लेखक - प्रा. डॉ. यशवंतराव पाटील / अनुबंध प्रकाशन, पुणे (०२०-२४३७२८७१) / पृष्ठं - ३८२ / मूल्य - २५० रुपये

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: welcome new books