esakal | यश नक्की काय असते..!
sakal

बोलून बातमी शोधा

Saptarang

यश नक्की काय असते..!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यश नक्की काय असते..!

- प्रा. डॉ. सविता गिरे पाटील

आताशा कनेक्ट होणं शिकलेय मी, नव्हे फारच enjoy करतेय म्हणा ना हवं तर...!! आणि हो, या कनेक्ट होण्याच्या खेळात सुरेख 'रिटर्न गिफ्ट' पण मिळते ते वेगळेच...

आता म्हणाल हे काय नविन..? खूप सोप्पं आहे हो हे सगळं....

सकाळी मॉर्निंग वॉकला जातांना प्राजक्ताच्या झाडाखाली पडलेल्या फुलांच्या गालिच्यातील दोन शुभ्र नारंगी देठ असलेली फुले हलकेच हातावर घेऊन नाकाजवळ नेली, त्यांचा सुवास थेट मनाला भिडला आणि कनेक्ट झाले मी त्यांच्याशी, माहित नाही कश्या कोण जाणे मस्तिष्कातून मनापर्यंत चेतातंतूनी संवेदना वाहिल्या आणि पुढचे चार पाच तास त्या परीमलाने दरवळून टाकले... मिळाले नं मला रिटर्न गिफ्ट......

अशा शेकडो गोष्टी होत असतात - चांगल्या वाईट, आपल्या सभोवताली, फक्त आपल्याला कनेक्ट होता आलं पाहिजे, बस..!!

.. बरं या कनेक्ट होण्याला जात, पात, धर्म, वर्ण, शिक्षण, सुबत्ता, सुंदरता या कशाचीही गरज नसते... फक्त लागते ती मनाची थोडी वेगळी मांडणी.....

खेड्यातून शहरात आलेली मी, रमते थोडी गावाकडच्या वातावरणात! मग आठवडी बाजाराच्या दिवशी कधी मावशी, कधी मामा, तर कधी दादा भेटतो त्या अनोळखी माणसांच्या गर्दीत... "कश्या आहात मावशी..?" एवढे दोनच शब्द पुरतात कनेक्ट व्हायला. मग त्या गर्दीतून कुठूनतरी आवाज येतो, "ताई, मेथीच्या ताज्या जुड्या ठेवल्यात गं. घेऊन जा..." बळेच कढीपत्त्याच्या चार काड्या, भरलेल्या भाज्यांच्या पिशवीत खोचतात - कोपऱ्यात बसलेले आजोबा! तर माप झाल्यावरही एक पेरू हलकेच सरकवत "ठिवा ओ ताई लेकरांना" म्हणणारा मामा सापडतो. घरी परततांना पिशवीसारखं मनही भरून जातं..!!

आयुष्य तेवढं रटाळ नक्कीच नाही, थोडंसं हरवून बघा, काढून टाका हा "शहाणपणाचा मुखवटा".. थोडे वेडेच व्हा कधीतरी... म्हणजे बघा.... ऑफिसमधून घरी परततांना पार्किंगमध्ये खेळणाऱ्या मुलांसोबत फुटबॉलला किक मारून बघा आणि उडवून टाका सगळ्या चिंतांना... कधीतरी चाखून बघा थंडगार आइसगोळा.. लागू द्या तो नारंगी, लाल, पिवळा, हिरवा रंग ओठांना....!!

नकाच राहू एक दिवस टापटीप... होऊ द्या केसांना अस्ताव्यस्त, घाला तोच घळघळीत पण मनाला relax करणारा जुना ड्रेस, वाचत पडा एखादं सुंदर पुस्तकं आणि भिडू द्या मनाला बॅकग्राऊंडमधील लतादीदींचे सुरेल सूर...नाटक पाहताना आवडलेल्या एखाद्या डायलॉगला उठून दाद देऊन पाहा... जगून पाहा एखादा उनाड दिवस आपल्या स्वतःसाठीच...!!

मित्रांनो, आवडली का कल्पना कनेक्ट होण्याची??... तर सुरू करा मनाचा 'योग'! मग बघा किती सुंदर 'रिटर्न गिफ्ट' मिळतात ते...!!

loading image
go to top