#MokaleVha : प्रेम म्हणजे काय असतं...?

Love
Love

फेब्रुवारी महिना आला, की तरुणाईचे गुलाबी दिवस सुरू होतात. प्रेम व्यक्त करण्याचा फेब्रुवारी महिन्यातील ७ ते १४ या आठवड्याचा कालावधी तरुणाईला वेड लावणारा असतो. ज्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेमभावना निर्माण झाल्या आहेत, त्या भावना वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी हा आठवडा जणू प्रेमवीरांसाठी वरदानच असतो. पहिला दिवस रोज डे... गुलाबाची फुले देऊन प्रेम व्यक्त करणे, दुसरा दिवस प्रपोज डे..., तिसरा दिवस ‘चॉकलेट डे’, चौथा दिवस ‘टेडी डे’, ‘पाचवा दिवस ‘प्रॉमिस डे’, सहावा दिवस ‘हग डे’, सातवा दिवस ‘किस डे’ आणि आठवा दिवस व्हॅलेंटाइन डे अशा पद्धतीने हा संपूर्ण आठवडा साजरा केला जातो.

रोममध्ये सुमारे आठशे वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. प्रेम एक भावनिक, मानसिक गरज असते, प्रेमामध्ये एक ऊर्जा असते आणि प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असते. इतिहासात आपण अनेक प्रेमकथा ऐकल्या आहेत. राधाकृष्णाच्या प्रेमापासून, नल-दमयंती, हिर-रांझा अशा कितीतरी कथा आपण ऐकल्या आहेत. निरागस प्रेमाच्या या गोष्टींचा आदर्श ठेवून आता तरुणाईतील प्रेम खरंच निरागस राहिलंय का? का त्या प्रेमाचा बाजार झाला आहे? की प्रेमाच्या संकल्पनाच बदलत चालल्या आहेत?

मध्यंतरी माझ्याकडे एक जोडपं आलं होतं. लग्न होऊन अवघे सहा महिने झाले होते. दोघांचंही लव्ह मॅरेज. गेल्या सहा वर्षांपासून दोघेही एकमेकांना ओळखत होते, एकमेकांच्या प्रेमात होते; पण सहा महिन्यांतच त्यांच्यातील वाद वाढले आणि आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे, या निर्णयावर ते आले होते. कारण अगदीच क्षुल्लक होतं, माझा नवरा आता माझ्यावर प्रेम करीत नाही असं तिचं म्हणणं होतं. तिला असं का वाटतंय हे विचारल्यानंतर तिने सांगितलं, ‘‘माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाचं त्याने सेलिब्रेशन केलं नाही. माझ्यासाठी तो स्पेशल डे असायला हवा होता. लग्नापूर्वी तो मला ‘आय लव्ह यू’ असं म्हणून ग्रीटिंग पाठवायचा. रात्री बारा वाजता केक घेऊन यायचा आणि आता लग्न झाल्यानंतर घरातील सर्वांना घेऊन तो हॉटेलमध्ये गेला आणि सर्व फॅमिलीसोबत वाढदिवसाच्या निमित्ताने डीनरचं आयोजन केले. म्हणजेच त्याने मला स्पेशल ट्रीटमेंट दिली नाही. मला ‘आय लव्ह यू’सुद्धा म्हणाला नाही. तो प्रियकराचा टिपिकल ‘नवरा’ झाला आहे. त्याचं आता माझ्यावर प्रेमच राहिलेलं नाही.’’ आणि त्याचं म्हणणं असं होतं, की लग्नापूर्वी ती मला समजून घ्यायची; पण आता प्रत्येक गोष्टीत चुका काढते. टिपिकल ‘बायकी’ भांडणं करते. तिचंही माझ्यावर प्रेम राहिलेलं नाही.

लग्नाआधीचं एकमेकांवर केलेलं प्रेम नक्की जातं कुठं? लग्न झाल्यानंतर असं नक्की काय होतं? का खरंच दोघांचं एकमेकांवरील प्रेम संपलं होतं? खरंतर अनेक प्रेमविवाहांत अशा गोष्टी घडतात. प्रेमविवाहातच काय, पण नियोजित विवाहातही घडतात.

लग्नापूर्वीचे आणि लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळातील काही दिवस एकमेकांशिवाय अजिबात चैन पडत नाही; पण एकमेकांचा सहवास वाढला, की एकमेकांच्या स्वभावाचे कंगोरे एकमेकांना टोचायला लागतात. आपल्या जोडीदाराकडून अपेक्षांची पूर्तता झाली नाही, की याचं आपल्यावर प्रेमच राहिलं नाही असं वाटतं. 

खरं प्रेम आणि आकर्षण यांतील फरक न समजल्यामुळे ‘तू नही तो और सही’ असं म्हणून ब्रेकअप करणं आणि पुन्हा नवीन प्रेमाचा शोध घेणं हे आजच्या पिढीमध्ये जास्त दिसतं आहे. आज प्रेमाची परिभाषाच बदलली की काय, असा प्रश्‍न पडतो. कपडे बदलावेत इतक्‍या सहजपणे जोडीदार बदलला जातो. फक्त असणं, राहणं, फिरणं म्हणजे प्रेम नसतं, तर एकमेकांबद्दलचा विश्‍वास आणि त्याचं अस्तित्व हेही महत्त्वाचं असतं. 

आधुनिक काळात प्रेमाच्या संकल्पनाही बदलत चालल्या आहेत. ‘आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत’ हे आजच्या तरुणपिढीत खूप ऐकायला मिळतं. टिंडर, वू डेटिंग ॲप, ओके क्‍यूपिड अशा डेटिंग ॲप्समधून एकमेकांना मॅच होणारा जोडीदार शोधला जातो. मग एकमेकांना चॅटिंग करून, एकमेकांबद्दल माहिती घेतली जाते. सुरुवातीला व्हर्च्युअल डेटिंग होतं. मग हळूहळू एकत्र भेटण्याचं ठरतं. एकमेकांबरोबर फिरणं आणि मग ‘वन नाइट स्टॅंड’पर्यंत ही रिलेशनशिप जाते. मुळात ही रिलेशनशिप की केवळ एक मजा, त्या क्षणाला एखाद्या व्यक्तीची साथ आणि त्या आनंदापुरतीच मर्यादित असते. दीर्घकाळ टिकणारं... आयुष्यभर सोबत करणारं हे नातं नसतंच; पण मजामस्करीत एखाद्याचं आयुष्य पणाला लागतं. टिंडरवर मिळालेला एक जोडीदार एका मुलीच्या आयुष्यात आला होता. माझ्याकडे समुपदेशनासाठी ती आली होती.

टिंडरवर त्याने दिलेली माहिती, व्हर्च्युअल डेटिंग... यामधून ती त्याच्यामध्ये अडकत गेली. घरापासून लांब हॉस्टेलवर राहणारी ‘ती’ तिला एक सोबत आणि साथीदार मिळाला होता; पण नंतर अचानक त्याने भेटणं बंद केलं, फोन नंबर ब्लॉक केलं. त्याने सांगितलेली सर्वच माहिती खोटी निघाली आणि ती पूर्णपणे नैराश्‍यात गेली होती.

स्वतःचं आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न तिने केला होता. आयुष्यात पुन्हा नव्याने उभं राहणं तिला खूप अवघड झालं होतं. तिला वाटणारं प्रेम... हे त्याच्यासाठी प्रेम नव्हतंच.
सोशल मीडियाच्या या काळात नात्यातील फसवणूक खूप वाढली आहे. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, त्या व्यक्तीलाच ऑनलाइन फसवणं, अश्‍लील एमएमएस बनवून ब्लॅकमेलिंग करणं अशा गंभीर गुन्ह्यांचं प्रमाणही वाढतं आहे. म्हणूनच आजच्या पिढीला प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगणं गरजेचं आहे. प्रेम आणि आकर्षण या दोन्हीतील फरक समजावून घेणं गरजेचं आहे. प्रेम ही मिळवण्याची नाही तर देण्याची गोष्ट आहे. ‘त्याग’ ही प्रेमाची सर्वोच्च पातळी आहे. स्वतःसाठी नाही, तर दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे प्रेम. कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रेम हा व्हॅलेंटाइनचा खरा अर्थ आहे. हे प्रेम खऱ्या अर्थाने समजेल तेव्हा वेगळा व्हॅलेंटाइन साजरा करण्याची वेळ येणार नाही, तर त्या जोडप्याचा प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाइन डे इतकाच खास असेल. यासाठी कवी कुसुमाग्रजांच्या ओळी लक्षात ठेवायला हव्यात,
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com