उत्सुकता आता 'नायक-२' ची

समाजात घडणाऱ्या घडामोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला आवडतात. त्यातच राजकीय घडामोडी आणि त्या देखील मनोरंजनाच्या माध्यमातून मांडल्या तर त्या नक्कीच भावतात.
what will be result of lok sabha election 2024 exit poll bjp congress shiv sena ncp aap
what will be result of lok sabha election 2024 exit poll bjp congress shiv sena ncp aapSakal

- संतोष भिंगार्डे

निवडणुकीच्या निकालाबरोबरच नायक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आता लोकांना उत्सुकता लागली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल परवा जाहीर होईल. राजकीय पक्ष, त्यांचे नेते तसेच कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्सुकता वाढलेली आहे. कोणता उमेदवार जिंकणार आणि कुणाला किती मते मिळणार याची चर्चा रंगलेली आहे.

काही जणांच्या मनात चलबिचल सुरू आहे. असो. आता निकाल काय लागेल तो लागेल. परंतु एकूणच राजकारण आणि मनोरंजन क्षेत्र यांचा तसा निकटचा संबंध राहिलेला आहे. कारण चित्रपट हे माध्यम समाजाचा आरसा आहे.

समाजात घडणाऱ्या घडामोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला आवडतात. त्यातच राजकीय घडामोडी आणि त्या देखील मनोरंजनाच्या माध्यमातून मांडल्या तर त्या नक्कीच भावतात. त्यामुळे आजवर अनेक चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी राजकारणावर आधारित चित्रपटांची निर्मिती करत समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतही पूर्णपणे राजकारणावर भाष्य करणारे किंवा राजकीय उलथापालथीवर आधारित असलेले राजकीय पट आलेले आहेत. यातील काही चित्रपटांना घवघवीत यश मिळालेलं आहे तर काही चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारलंय.

परंतु राजकीय विषय घेऊन चित्रपट बनविण्याचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. दिवसेंदिवस ते वाढत चाललेलं आहे. कारण राजकारणातील विविध घडामोडी वा उलथापालथी, खुर्चीसाठी चाललेली एकमेकांमध्ये अहमहमिका, शह-काटशहाचं राजकारण अशा सगळ्याच गोष्टी मनोरंजनाच्या माध्यमातून मांडल्या जातात.

राजकीय विषयावरचे चित्रपट तिकीट खिडकीवर चांगला व्यवसाय करतात. मराठी चित्रपटांचा विचार केला तर मराठीमध्ये सामना, सिंहासन, वजीर, झेंडा तसेच अलीकडेच आलेला धुरळा असे कित्येक चित्रपट आलेले आहेत.

त्यांनी राजकारणातील हेवेदावे-मुत्सद्देगिरी, एकमेकांतील चुरस आणि डावपेच असे काही मांडले, की प्रेक्षकांनी या चित्रपटांना चांगला प्रतिसाद दिला. आजही राजकारणातील मराठी चित्रपट म्हटलं तर सर्वप्रथम या चित्रपटांचे नाव डोळ्यासमोर येते. सामनामध्ये डाॅ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा जबरदस्त अभिनय सगळ्यांनी पाहिला आहे तर सिंहासनमध्ये हे दोघे मातबर कलाकार होतेच शिवाय नाना पाटेकर, अरुण सरनाईक वगैरे कलाकार होतेच.

सामना या चित्रपटाद्वारे डाॅ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले तर सिंहासन या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेला वजीर हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला.

हा चित्रपट देखील राजकीय विषयावर बेतलेला होता. या चित्रपटात अशोक सराफ यांनी खलनायकी भूमिका साकारली. अश्विनी भावे, विक्रम गोखले आदी कलाकारांनी यामध्ये काम केले. गायक व संगीतकार अवधूत गुप्तेने झेंडा हा चित्रपट आणला. `झेंडा’ चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी तर अनेक वादविवाद झाले.

सन २०१९ मध्ये अलका कुबल, अंकुश चौधरी, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, अमेय वाघ अशी तगडी स्टारकास्ट असलेला धुरळा हा राजकीय पट आला. एकूणच मराठीमध्ये असे काही राजकारणावर बेतलेले किंबहुना राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे अनेक चित्रपट आले.

त्यांनी आपल्या परीनं व्यवसाय केला. हिंदीतही अशा चित्रपटांची काही कमतरता नाही. किस्सा कुर्सी का, सरकार, सरकारराज, गुलाल, आरक्षण, मैं आजाद हूँ, राजनीती यासारखे अनेक चित्रपट आले. खरं तर भारतीय समाजमनावर अशा चित्रपटांचा जबरदस्त पगडा आहे.

त्यामुळं राजकारणावर आधारित चित्रपटांची निर्मिती सातत्यानं होत असते. याच कालावधीत काही प्रपोगंडा चित्रपटही येत असतात. काही राजकीय नेत्यांचे ‘बायोपिक’ देखील बनत असतात आणि आताही बनत आहेत.

परंतु या सगळ्या भाऊगर्दीत एक चित्रपट महत्त्वाचा राजकीय पट मानला जातो आणि तो चित्रपट म्हणजे ‘नायक...अतक्या द रीअल हीरो’. तब्बल दोन दशकांपूर्वी आलेल्या या राजकीय पटाची क्रेझ आजही तितकीच आहे.

त्यामुळे आता त्याचा सिक्वेल येत आहे. त्याच्या सिक्वेलला किती आणि कसा प्रतिसाद मिळेल ही औत्सुक्याची बाब असली, तरी सन २००१ मध्ये आलेल्या नायक...द रीअल हीरो या चित्रपटाचे घवघवीत यश विसरता येणार नाही.

दिग्दर्शक एस. शंकर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये राजकारण आणि त्याच्या मधील भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोधात शिवाजीराव (अनिल कपूर) कसा लढतो आणि त्यांना सुधारायचा प्रयत्न करतो हे दाखविण्यात आले आहे.

यात अनिल कपूर, राणी मुखर्जी, अमरीश पुरी, परेश रावल आणि जॉनी लिव्हर यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट मुधालवान या दाक्षिणात्य चित्रपटाचा रीमेक होता. या मुधालवान चित्रपटात अर्जुन सर्जा आणि मनीषा कोईराला यांची मुख्य भूमिका आहे.

दरम्यान या चित्रपटाच्या शिवाजीराव या भूमिकेसाठी आधी शाहरुख खानची निवड करण्यात आली होती. मात्र त्यानं ही भूमिका साकारण्यास नकार दिला. त्यानंतर अनिल कपूरची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. अनिल कपूरनं आपल्या चित्रपट कारकीर्दीत अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्यातील काही भूमिका प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात आहेत. त्यापैकीच नायक या चित्रपटातील त्याची भूमिका आहे.

राजकारणावर आधारित असलेल्या चित्रपटांपैकी हा चित्रपट सगळ्यामध्ये सर्वोत्तम मानला जातो आणि आजही तो टीव्हीवर लागला की पुन्हापुन्हा पाहिला जातो. यामध्ये अनिल कपूर एका दिवसाचा मुख्यमंत्री बनतो आणि अधिकाऱ्यांची व राजकारण्यांची अनेक कृष्णकृत्ये बाहेर काढतो. एका दिवसात धडाडीचे निर्णय घेऊन संपूर्ण सिस्टिम बदलण्याचा प्रयत्न कसा करतो...

असा हा पाॅलिटिकल ड्रामा आहे. राजकारण आणि प्रशासनावर बोट ठेवणारा हा चित्रपट आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.अनिल कपूर आणि अमरीश पुरी यांच्या अभिनयाचं भरभरून कौतुक करण्यात आलं. आज इतक्या वर्षानंतर देखील नायकच्या कथेची चर्चा होते.

आता या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग यावा यासाठी प्रेक्षक कमालीचे आग्रही आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळं दुसऱ्या भागात नेमकं काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. पुन्हा अनिल कपूर, राणी मुखर्जी यांची केमिस्ट्री दिसणार का?

किंवा अन्य कोणत्या कलाकारांना घेण्यात येणार... असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. याविषयी आता ‘नायक’च्या निर्मात्यांनी मोठी माहिती दिली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच एका मुलाखतीत खुद्द अनिल कपूरनं ''नायक''चा सिक्वेल बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती व त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देखील दिली होती.

आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर एका चाहत्याला उत्तर देताना अनिल कपूरने ''नायक-२'' लवकरच येणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी इंस्टाग्रामवर बॉबी देओलसोबतची एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात बॉबी आणि अनिल दोघेही विना शर्ट दिसत होते. यावर एका चाहत्याने ''नायक-२'' करण्याची मागणी केली होती.

त्या चाहत्याला उत्तर देताना अनिल कपूरने लिहिले की, ''त्याचा सिक्वल लवकरच बनवला जाईल.'' तर निर्माते दीपक मुकुट यांनी या चित्रपटाविषयी मोठा खुलासा केला आहे. दरम्यान नायक २'' च्या चित्रीकरणाचं अंतर्गत काम सुरू झालं आहे. नुकतीच या सिनेमाची स्क्रीप्ट तयार झाली आहे. त्यामुळे लवकरच या चित्रपटाची घोषणा करण्यात येईल.

तसंच या चित्रपटाच्या पटकथेवरही काम सुरू असून या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा अनिल कपूर आणि राणी मुखर्जीला घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत असं दीपक मुकुट म्हणाले. सध्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत कोणाला घ्यावं यावर चर्चा सुरू आहे. अद्याप तरी यासाठी कोणाचं नाव अंतिम झालेलं नाही.

मात्र एवढं निश्चित, की नायक या राजकीय पटाची चर्चा आजही होताना दिसते आहे. राजकारणावरील आतापर्यंत अनेक चित्रपट आले आणि गेले. परंतु नायकमधील नायकाची कामगिरी अजूनही कुणी विसरलेले नाही. त्यामुळे अनेकांना आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागलेली आहे. कारण सध्याची राजकीय परिस्थिती निराळी आहे आणि त्यामुळे दुसऱ्या भागात काहीसं वेगळं चित्रण असेल असं अनेकांना वाटत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com