मराठमोळा खेळाडू झाला अमेरिकेत हीरो...

टीम इंडियाचा जगद्विख्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा बाजूला राहिला. सर्वत्र चर्चा, अगदी मुंबईपासून ते टाइम स्क्वेअरपर्यंत होत राहिली ती सौरभचीच.
who is saurabh netravalkar who performed brilliantly against pakistan viral video social media
who is saurabh netravalkar who performed brilliantly against pakistan viral video social mediaSakal

- शैलेश नागवेकर

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते... हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते... सावरते बावरते घडते अडखळते का पडते ? मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते...गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं आणि शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गीत याचा अचानक आणि कोणताही संदर्भ नसताना उल्लेख करण्याचं कारण काय, असा साधा सोपा प्रश्न कोणाच्याही मनात तरंगाप्रमाणं उठणं स्वाभाविक आहे...

पण कोणताही संदर्भ कारणाशिवाय येत नसतो... शुक्रवारी हे गीत सोशल मीडियावरून सर्वांच्या कानावर पडत होतं. गायक मात्र नवा होता सौरभ नैत्रावलकर हे त्याचे नाव... हा कोणी नवा गायक तयार झालेला नाही तो आहे मुंबईचा मराठमोठा क्रिकेटपटू जो अमेरिकेतून खेळतोय आणि सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत त्यानं मातबर पाकिस्तानी संघाला सुपर ओव्हरमध्ये धूळ चारली आणि क्रिकेटविश्वात कमालच झाली.

टीम इंडियाचा जगद्विख्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा बाजूला राहिला. सर्वत्र चर्चा, अगदी मुंबईपासून ते टाइम स्क्वेअरपर्यंत होत राहिली ती सौरभचीच. क्रिकेट हा खेळ अमेरिकेसाठी शतकापूर्वीचा असला, तरी आता बास्केटबॉल ( एनबीए ) आणि त्यांच्या फुटबॉलच्या तुलनेत नवाच. त्यांच्या देशात ही ट्वेन्टी-२० स्पर्धा होत असल्यामुळे काहीशी होत असलेली चर्चा.

पण बहुतांशी अमेरिकी लोकांनी दखल घ्यावी इतकाही नाही. पण जे काही क्रिकेटप्रेमी आहेत त्यांच्यासाठी सौरभ हीरोच ठरला. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अशीच काहीशी स्वप्नवर कामगिरी त्यानं केली. सुपर ओव्हर म्हणजे जिथं सर्वाधिक टेंशन असतं.

तिथं त्यानं पाकिस्तानी फलंदाजांना रोखलं आणि मग कोण हा सौरभ नेत्रावलकर अशी चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेला सौरभचा ‘ मन उधाण वाऱ्याचे ’ हे गीत गात असलेला व्हिडियोही व्हायरल झाला.

कसं दैव असतं बघा... सौरभ नैत्रावलकर २०१० मध्ये १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत भारताकडून खेळलाय. न्यूझीलंडमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत तो भारताकडून सर्वाधिक विकेट मिळवणारा डावखुरा गोलंदाज ठरला होता.

या प्रगतीनुसार तो आता भारताच्या मुख्य संघात असायला हवा होता. पण तसं घडलं नाही, तरीही तो ट्वेन्टी-२० विश्वकरंडक खेळणारा खेळाडू ठरला, अर्थात देश बदलला. अजित आगरकर, झहीर खान असे गोलंदाज असल्यामुळं सौरभला भारतीय संघाचे दरवाजे उघडलं जाणं कठीण होतं.

पुढं काय व्हायचं ते होईल या अपेक्षेनं मुंबईच्या रणजी संघातूनही त्यानं आपलं नशीब अजमावलं. पण तिथंही जम बसवता आला नाही. कारण असं म्हणतात एकवेळ भारतीय संघात स्थान मिळेल पण मुंबई संघात संधी मिळणं कठीणच !

पण सौरभसाठी दैवानं वेगळंच काही लिहून ठेवलं होतं. क्रिकेटमध्ये चांगली गुणवत्ता असलेला सौरभ शिक्षणातही तरबेज होता. या दरम्यान त्यानं संगणक अभियांत्रिकी पदवी मिळवली. क्रिकेटपासून तो जवळपास दूरच गेला होता.

किमान चांगल्या नोकरीसाठी पुढचं शिक्षण घेण्यासाठी म्हणजेच संगणक अभियांत्रिकीची मास्टर्स ही पदवी मिळवण्यासाठी २०१५ मध्ये त्यानं अमेरिकेचा रस्ता धरला आणि न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेतला. एका गार्डनमध्ये काही मुल टेनिस क्रिकेट खेळताना त्याला दिसली... मग काय मूळ पिंड क्रिकेटचा असल्यामुळे तिथं त्याची पावले वळली जाणार हे स्वाभाविकच.

त्या मुलांबरोबर टाइमपास म्हणून तो खेळला आणि येथे क्रिकेट खेळणारे क्लब आहेत त्यांचे शनिवारी-रविवारी सामने होतात हे त्याला उमगलं. सौरभ तिथं एका क्लबमध्ये दाखल झाला आणि तिथूनच पुन्हा एकदा क्रिकेटसाठी मन तरंग होऊन फिरू लागलं.

आपण पुन्हा क्रिकेट अशा प्रकारे खेळू शकू असा विचारही न्यूयॉर्कला जाताना केला नव्हता म्हणून क्रिकेटचे बूट आणि इतर साहित्य मी सोबत घेतलंच नव्हतं, अशी आठवण सौरभ काढतो. सौरभ आता न्यूयॉर्कमधील ऑर्कल या सुप्रसिद्ध कंपनीत मुख्य अभियंता म्हणून काम करतो आणि ते करत असताना नागरिकत्व मिळालेल्या अमेरिका या देशाचं विश्वकरंडक स्पर्धेत प्रतिनिधित्वही करतो.

गुणवत्ता, प्रबळ इच्छाशक्ती, ध्येय आणि चिकाटी असली तर आपल्या सर्व इच्छा तर पूर्ण करता येतातच पण मोठी भरारीही घेता येते हे सौरभनं दाखवून दिलं. हेच पाहा सौरभ प्रमाणे १९ वर्षांखालील विश्वकंडक स्पर्धा भारताला जिंकून देणारा कर्णधार दिल्लीच्या उन्मुक्त चंदला भारतात संधी मिळत नाही म्हणून त्यानं अमेरिकेचा रस्ता धरला, प्रयत्नही केले, पण या विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्याला संघात स्थान मिळालं नाही, पण सौरभ मात्र यशस्वी ठरला हे केवळ दैव म्हणून नव्हे तर नोकरीबरोबर क्रिकेटसाठी घेतलेली अथक मेहनत.

२०२२ मध्ये झिम्बाब्वेत झालेल्या टी-२० विश्वकरंडक पात्रता ब स्पर्धेत सौरभ एकाच सामन्यात पाच विकेट मिळवणारा पहिला गोलंदाज ठरला. त्या अगोदर २०१९ मध्ये तो अमेरिका क्रिकेट संघाचा कर्णधारही होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या संघाचं मग अमेरिका असला, तरी देशाचं कर्णधारपद भूषवणे हा सर्वांत मोठा सन्मान असतो. आपल्या एका मराठी मुलाला हे भाग्य लाभलं याची दखल निश्चितच भारतीय क्रिकेटमध्ये नव्हती. पण गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात पाकिस्तानला हादरा दिला, तेव्हा मात्र भारतीय आणि विशेषकरून मराठी सकल जनांचा ऊर भरून आला.

आयसीसीला आता अमेरिकेचे मार्केट खुणावत आहे. या ट्वेन्टी-२० स्पर्धेचं त्यांना सहयजमान करणं आणि त्यांच्या मेजर लीग क्रिकेटला अधिकृत ठरवणं हे पुढचं पाऊल आहे. एकूणच जागतिक क्रिकेटमध्ये अमेरिका संघाचं भवितव्य उज्ज्वल आहे पर्यायाने सौरभसाठीही. भले तो आता ३२ वर्षांचा आहे.

पण आपण लंबी रेस का घोडा आहे हे त्यानं केवळ एका सामन्यातून सिद्ध केलेय. आता १२ जून रोजी भारत-अमेरिका यांच्यात सामना होत आहे. भारतीय संघात एकही मराठी खेळाडू नाही पण अमेरिका संघातला हा मराठमोळा कशी कामगिरी करतो याकडं तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार, हे निश्चितच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com