esakal | वसुधैव कुटुम्बकम्‌ ही संकल्पना प्रत्यक्षात यावी
sakal

बोलून बातमी शोधा

earth

याचा अर्थ केवळ एवढाच नाही की पृथ्वी वरच्या सर्व देशातल्या व प्रांतातल्या लोकांनी एकीने राहावं परंतु, सर्वांनी एका बृहत कुटुम्बासारखेच खेळीमेळीने राहावं. किती महान तो विचार. आधुनिक दूरसंचाराच्या उपकरणांनी आपण एकमेकांशी जोडले गेलेले आहोत पण मनाच्या लहरी कितपत जुळतात? तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपण आपला मूलभूत स्वभाव विसरत जात आहोत.

वसुधैव कुटुम्बकम्‌ ही संकल्पना प्रत्यक्षात यावी

sakal_logo
By
डॉ. अनुपमा साठे

"वसुधैव कुटुम्बकम्‌' या परिकल्पनेचा पहिला उल्लेख महा उपनिषदात येतो. वसुधा अर्थात पृथ्वी, इव म्हणजे ही, कुटुम्बकम्‌ अर्थात कुटुम्ब. सम्पूर्ण पृथ्वी ही एकच कुटुम्ब आहे. या वाक्‍यांशाचा उपयोग नारायण पंडित यांनी हितोपदेशात पण केला

अयं निज: परोवंति गणना लघुचेतसाम्‌ ।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्‌ ×

हे माझं व हे माझं नाही, किंवा हा माझा बंधू व हा माझा नाही, असा विचार केवळ संकुचित प्रवृत्ती असलेले लोक करतात. उदार हृदय असलेल्यांना सर्व पृथ्वीच कुटुम्बासमान आहे. आपल्या संसदेच्या प्रवेश कक्षासमोर पण हे वाक्‍य कोरलेलं आहे. "वसुधैव कुटुम्बकम्‌' हा विचार सनातन धर्माचे मूळ आहे. म्हणून सनातन धर्मात सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती होती. सनातनचा अर्थ आहे शाश्वत, ज्याचा न आदि आहे, न अंत. चिरंतन काळापासून अस्तित्वात असलेला. सर्व संप्रदाय नंतर अस्तित्वात आले. परंतु, त्यांचं मूळ यातंच सापडतं. ह्यालाच वैदिक धर्म असेही म्हणतात. अन्य संप्रदायांचे भारतात आगमन झाल्यावर, व प्रचुर धर्मांतरण झाल्यानंतर, जो सनातन धर्म राहिला, त्याला "हिंदू धर्म' असे वैकल्पिक नाव मिळाले. भारतात परकीयांचे आक्रमण झाल्यावर सनातन धर्म टिकवून ठेवण्याचे कार्य अनेक संतांनी केले. वेदकालीन ऋषी सर्वांना एकाच ईश्वराचा अंश मानायचे. या दृष्टिकोनातून सर्व पृथ्वीवासी, मग ते मनुष्य असो वा प्राणी किंवा वनस्पती, सर्व एकाच परिवाराचे सदस्य झाले ! म्हणून वैचारिक मतभेद असले तरी एक दुसऱ्याचा अवमान न करणे, प्रकृतीच्या प्रती आदरभाव ठेवणे, ही सनातन धर्माची शिकवण होती. जशा सागरात उठणाऱ्या लहरी, सागराचाच भाग असतात व सागरातच विलीन होतात, तसेच सर्व प्राणिमात्र एकाच जाणिवेचे भाग, एकातंच विलीन होणारे. परंतु, मानवी महत्त्वाकांक्षेने प्राकृतिक एकत्वाचे तुकडे केले. धन व सामर्थ्य, अधिकाराचा अहंभावनेमुळे जमिनीचे विभाग करून राज्य निर्माण केले. अधिकाराच्या लालसेने मानवाला एकमेकांचे शत्रू करून टाकले. या सर्व संघर्षात सनातन धर्माची शिकवण मागे पडत गेली.
ईशावास्य उपनिषदेत श्‍लोक आहे-

यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्ये वानुपश्‍यति ।
सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ×

जो सर्व प्राणिमात्रांना स्वत:मध्ये बघतो व स्वत:ला सर्व प्राण्यांमध्ये जो दुसऱ्यांप्रति कधीच द्वेष किंवा तिरस्कार आपल्या मनात ठेवत नाही.
याचा अर्थ केवळ एवढाच नाही की पृथ्वी वरच्या सर्व देशातल्या व प्रांतातल्या लोकांनी एकीने राहावं परंतु, सर्वांनी एका बृहत कुटुम्बासारखेच खेळीमेळीने राहावं. किती महान तो विचार. आधुनिक दूरसंचाराच्या उपकरणांनी आपण एकमेकांशी जोडले गेलेले आहोत पण मनाच्या लहरी कितपत जुळतात? तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपण आपला मूलभूत स्वभाव विसरत जात आहोत. आपलं आयुष्य या पृथ्वीवर किती क्षणभंगुर आहे हे विसरून आपण आपल्याच कुटुम्बीयांशी भांडणं उकरत बसतो. हे कुटुम्बीय फक्त आपले स्वकीयच नाही तर आपल्या शेजारचे, आपल्या गावातले, देशातले वा परदेशातलेसुद्धा आहेत. प्रत्येकाबरोबर जगण्याची जणू प्रतियोगिता चालू आहे व आपलं वर्चस्व सिद्ध करायला, आपली जात धर्म किंवा देश कसा सगळ्यांपेक्षा वरचढ आहे, हे दाखवण्याचा नादात आपण माणुसकी सोडत चाललो आहे.
फक्त मानव जातीच नाही तर वनस्पती पशुपक्षी हे सर्वच आपल्या बृहत परिवाराचा भाग आहेत. आपल्या सोयीसाठी किंवा आपल्या मनोरंजनासाठी मनुष्य या सर्व नैसर्गिक देणग्यांचा गैरफायदा घेतो. प्रचंड प्रमाणात निर्वनीकरण, वाढत्या जनसंख्येच्या वाढता गरजा, यासाठी प्रकृती व प्राकृतिक संपतेला वेठीवर धरल्या गेलं. प्राण्यांच्या राहण्याच्या जागेवर मानवाने अतिक्रमण केलं तर ते प्राणी जाणार तरी कुठे? प्रत्येक प्राणिजातीचा किंवा वनस्पतीचा ऱ्हास होताना आपल्याही एका सूक्ष्म भागाचा ऱ्हास होत असतो हे आपण सोयीस्करपणे विसरलो आहोत. ही सनातन धर्माची शिकवण नाही.
आज आपल्यावर जे कोरोना व्हायरसच्या रूपाने वैश्विक संकट उभं आहे, त्याने आपल्याला हाच विचार करण्यासाठी प्रवृत केलं आहे. माणसाने प्राण्यांच्या जगात अतिक्रमण केल्यामुळे असे जीवाणू जे आजपर्यंत मनुष्याचा संपर्कात कधीच आले नव्हते, ते रोग पसरवू लागले आहेत. काळजीची बाब ही आहे की हा जीवाणू माणसासाठी नवीन असल्यामुळे आपल्यामध्ये त्याचा विरोधात प्रतिकारशक्ती पण नाही व त्यावर औषधी उपायसुद्धा माहीत नाही. केवळ याच कारणास्तव आजारी पडण्याऱ्यांची संख्या व मृत्युमुखी पडण्याचे दर फार अधिक प्रमाणात आहे. परंतु, यापासून बचाव करण्याचे प्राकृतिक उपाय आपल्या पुरातन कालापासून प्रचलित असलेल्या संस्कारांमध्ये आहे. आजपर्यंत आपल्या संस्कारांचा पुरातनपंथी म्हणून उपहास करणारेच आज यांचे पुरस्कर्ते झाले आहेत.
पूर्वी घराबाहेर उंबरठ्यावर पाणी ठेवलेलं असायचं. घरात येण्या आधी बाहेरच हात पाय धुवून, मुख प्रक्षालन करून घरात शिरणे हा कायदा होता. बाहेरचे कपडे बाहेर विहीरवरच बदलले जायचे. कुणाचे अभिवादन करताना दोन्ही हात जोडून, नतमस्तक होऊन आदर दाखविण्याचा प्रघात होता. आजारी व्यक्ती मृत्युमुखी पडली की दहा दिवसांचा विटाळ पाळण्यामागे केवळ जंतू संसर्ग होऊ नये हा उद्देश होता. मितभुक्त राहणे, उपयुक्त आहार घेणे, अन्नाचा अपमान न करणे यामागे ते अन्न तयार करण्याच्या मेहनतीची कदर करणे, अन्नदात्री पृथ्वीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे ही कल्पना होती. कृत्रिमरित्या तयार केलेले किंवा शीतपेटीत ठेवलेले, शिळे अन्न माहीतच नव्हते. ऋतुकाला प्रमाणे व जिथे जे उत्पन्न होते तिथेच ते उपयोगात आणलं जायचं. या सर्वांचा गोष्टींच्या परिणामे मनुष्याचं आरोग्य चांगलं राहायचं व प्रतिकारशक्ती वाढायची. त्यावेळेला आजच्या सारख्या प्रतिजीवी औषधी व लसी उपलब्ध नव्हत्या तरी पण जीवन दर्जा ( quality of life) उत्तम होता.

पृथ्वीवरच्या सर्व जीवित प्राण्यांमध्ये केवळ माणसाला सद्‌ विवेक बुद्धीचे वरदान मिळाले आहे. याचा सदुपयोग करून जर आपल्या माणसात व बाकी सर्व प्राणी व पशुपक्षी, वन्य जीवन वा वनस्पती, सगळ्यांचा आदर करून आपसात गुण्यागोविंदाने नांदण्याची कला साध्य झाली, तर वैदिक काळातली "वसुधैव कुटुम्बकम' ही संकल्पना प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही.