लांडग्यांना दुष्ट का म्हणतात?

'पळा! पळा!! जीव वाचवा... एक महाभयंकर प्राणी वेडापिसा झालाय... दिसेल त्याच्यावर हल्ला करत सुटलाय... तो खूप वाईट, क्रूर, भुकेला आहे...'
Why Are Wolves Considered Evil
Why Are Wolves Considered Evilsakal
Updated on

'पळा! पळा!! जीव वाचवा... एक महाभयंकर प्राणी वेडापिसा झालाय... दिसेल त्याच्यावर हल्ला करत सुटलाय... तो खूप वाईट, क्रूर, भुकेला आहे...' कोणाविषयी बोलत होती ही सगळी मंडळी? एवढा भीतीदायक असा, कोण आहे हा राक्षस? अहो हा प्राणी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून होता आपला लांडगा! आपला? हो, आपलाच की! कारण तो एक साधासुधा, आपल्या पिलांसोबत राहणारा, अजिबात दुष्ट नसलेला असा लांडगा होता, पण मग असं काय झालं की, ज्यामुळे त्याचं रूपांतर एका खतरनाक लांडग्यात झालं? सांगते!

त्या दिवशी काय झालं, एक छोटं कोकरू या आपल्या लांडग्याला भेटलं. ते बिचारं कोकरू त्याच्या कळपातून भरकटलं होतं. ते लांडग्यासमोर आलं, तेव्हा लांडगा त्या कोकराकडे पाहून सहज हसला. हसल्यावर आपल्या लांडग्याचे मोठे पांढरेशुभ्र दात चमकले. आधीच बावरलेलं ते कोकरू त्या तीक्ष्ण दातांना पाहून जाम घाबरलं.

एवढं की, ते सरळ जीव मुठीत घेऊन त्याच्या मित्रांकडे म्हणजे डुकरांकडे पळत सुटलं. डुकरांना भेटल्यावर त्याने सांगितलं की ‘कसं एका लांडग्याने त्याच्यावर हल्ला केला आणि कसं तो त्याचा लचका तोडणार होता!’ म्हणजे जरा रंगवूनच सांगितलं कोकराने.

हे सगळं ऐकून डुकरं अस्वस्थ झाली. न राहवून त्यांनी घडलेली गोष्ट लगेच शेजारच्या बदकाच्या कानावर घातली. डुकरांनी त्या बदकाला सांगितलं की, ‘कसं एका भल्या मोठ्या लांडग्याने एका लहानशा कोकरावर हल्ला केला आणि कसं तो त्याच्या धारदार दातांनी त्या पिल्लाला खाऊन टाकणार होता.’ डुकरांनी त्या गोष्टीत आणखी त्यांची स्वतःची भर घातली.

लांडग्याने केलेल्या हल्ल्याविषयी ऐकून बदकाला खूप राग आला. ही भयंकर बातमी त्याने लगेचच गाढवाला जाऊन सांगितली. त्याने गाढवाला सांगितलं की, कसं तलवारीच्या पात्यासारखे धारदार सुळे असलेल्या एका मोठ्या लांडग्याने कोकराच्या अख्ख्या कुटुंबाला मारलं आणि कसं त्याने त्यांना कच्च गिळून टाकलं.

बदकाने आता बातमीला जरा मसालेदार - चटपटीत बनवलं.

लांडग्याचं हे अमानुष कृत्य ऐकून भीतीने थरथर कापणारं गाढव क्षणभराचाही वेळ न दवडता उंदराकडे गेलं आणि त्याने उंदराला सांगितलं की, कसं भाल्यासारखे दात असलेल्या राक्षसी लांडग्यांच्या कळपाने कोकराच्या अख्ख्या कळपावर हल्ला चढवला आणि कसं एकही कोकरू यातून वाचलं नाही. आता गाढवानेही जरा अतिशयोक्ती केली.

उंदराने मग ही भयंकर घटना कोंबड्यांना जाऊन सांगितली. त्याने सांगितलं की, ‘कसं महाभयंकर लांडगे मोकाट सुटलेत, कसं आता सगळ्याच प्राण्यांना धोका निर्माण झालाय आणि कसं आता आपण आपला जीव वाचवला पाहिजे.’ कोंबड्यांच्या पिल्लांनी ही गोष्ट इतर प्राण्यांना सांगितली. अगदी जो दिसेल, जो भेटेल त्याला सांगितली. सगळ्या काना-कोपऱ्यात बातमी पसरली. झालं!

कोकराने रंगवून सांगितलेली, डुकरांनी आपली भर घालून वाढवलेली, बदकाने मीठ-मसाला लावलेली, गाढवाने अतिशयोक्ती करून तयार झालेली ही भयंकर, खमंग अशी अफवा सगळीकडे पसरली आणि सोबतच पसरत गेली भीतीसुद्धा! नुसती पसरत नाही तर वाढतसुद्धा गेली. सगळ्या प्राण्यांमध्ये एकच विषय - एकच मुद्दा - एकच चर्चा- लांडग्यांच्या दुष्टपणाची!

लांडगे भयंकर आहेत! लांडगे क्रूर आहेत! लांडगे राक्षस आहेत! पळा! पळा! जीव वाचवा... एक महाभयंकर प्राणी वेडापिसा झालाय... दिसेल त्यांच्यावर हल्ला करत सुटलाय... तो खूप वाईट, क्रूर आणि भुकेला आहे. आपापली भर घालून बातमी इकडून तिकडे करणारे हे सगळे प्राणी रेखाटलेत क्वेन्तँ ग्रेबाँ यांनी. नेमकं लांडग्यांना दुष्ट का म्हणत असावेत, हे सांगणारी ही कथासुद्धा त्यांचीच आहे.

एक साधासा सामान्य लांडगा आपल्याला पहिल्या पानावर भेटतो आणि गोष्टीच्या शेवटी दिसतो एक ‘खूँखार’ डोळ्यांचा अवाढव्य असा लांडगा. प्रत्येक प्राण्याने केलेल्या वर्णनानुसार त्याचं रूप असं भयावह होत जातं. ही लांडग्याची बदलत जाणारी रूपं दाखवणारी चित्रं अतिशय परिणामकारण आणि सूचक आहेत. या गोष्टीचा मराठी अनुवाद प्रणव सखदेव यांनी केला आहे. हे पुस्तक ज्योत्स्ना प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे.

ही अफवा फिरत फिरत लांडग्यापर्यंतसुद्धा येऊन पोहोचली. त्याने दोन चिमण्यांचं बोलणं ऐकलं. त्या एकमेकींना सांगत होत्या की, ‘कसा एक महाकाय, महाभयंकर राक्षसी प्राणी दिसेल त्याला खात सुटलाय.’ हे ऐकताच लांडगा प्रचंड घाबरला. तेवढ्यात एकाएकी आभाळ भरून आलं, सोसाट्याचा वारा सुटला, ढगांचा गडगडाट झाला.

तेव्हा लांडग्याला वाटलं - नव्हे त्याची खात्रीच पटली की, त्या चिमण्या ज्याच्या विषयी बोलत होत्या तो राक्षस इथे खरंच आलाय आणि आज रात्री त्याला खायला लांडगाच हवाय! बापरे! हा विचार मनात येताच लांडगा एवढा घाबरला, एवढा घाबरला की, त्याने आपल्या पिल्लांसोबत सुसाट धूम ठोकली! तो परत कधीच त्या भागात दिसला नाही. अं! लांडग्यानेही जरा अतिच केलं बरं का!

मला सांगा, तुम्हाला तो कानगोष्टींचा खेळ माहितीय ना? गोलात बसायचं. पहिल्यानं दुसऱ्याच्या कानात एक वाक्य सांगायचं आणि दुसऱ्याने त्याला ते जसं ऐकू आलं, समजलं, तसं तिसऱ्याच्या कानात सांगायचं. तिसऱ्याने चौथ्याच्या, चौथ्याने पाचव्याच्या. असं करता करता जेव्हा शेवटचा त्याचं वाक्य सांगतो तेव्हा ते पहिल्याच्या मूळ वाक्यापेक्षा खूप वेगळं असतं! असंच काहीसं इथेही झालं.

नाही, कानगोष्टीसारख्या खेळात ठीके हो, पण इथे आपल्या सरळ साध्या लांडग्याला त्याचं राहतं घर सोडून पळून जावं लागलं नं! तेही त्याची काहीच चूक नसताना. तो तर फक्त हसला होता कोकराकडे बघून. कोणी तरी येऊन आपल्याला जे सांगेल त्यावर अविचारीपणाने विश्वास ठेवल्याने, आपल्याकडे आलेली बातमी बेजबाबदारपणे आपल्याला हव्या त्या वेष्टनात गुंडाळून पुढे पाठवल्याने, ‘लांडगा कोकराकडे पाहून हसला’ या सत्यापासून किती दूर आले सगळे प्राणी !

मग आता विचार करा, आपण नाही न कोकरू, डुकरं, बदक, गाढव, कोंबड्या, उंदीर यांच्याप्रमाणे कोणतीही शहानिशा न करता, फक्त ऐकीव गोष्टींवर अवलंबून एखाद्याला ‘राक्षस’ समजत? आपल्यामुळे नाही न कधी एखादा साधा लांडगा दुष्ट म्हणवला जात? आपल्यामुळे नाही न कधी कोणत्या निर्दोष लांडग्याला आपलं घर सोडून जावं लागत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com