खंडेरायाच्या नावानं...

बऱ्याच स्त्रियांना देवदासी म्हणून संपूर्ण गावाच्या वेगवेगळ्या अपेक्षांना सामोरे जावे लागते. त्याचाच एक भाग म्हणजे जेजुरी गडावरील मुरळी स्त्रिया.
women have to face the different expectations of the entire village as Devadasi
women have to face the different expectations of the entire village as DevadasiSakal

- डॉ. नीलम गोऱ्हे

बऱ्याच स्त्रियांना देवदासी म्हणून संपूर्ण गावाच्या वेगवेगळ्या अपेक्षांना सामोरे जावे लागते. त्याचाच एक भाग म्हणजे जेजुरी गडावरील मुरळी स्त्रिया. मुरळींसाठी काय काम करता येईल याचा विचार आला तेव्हा त्यांची पायरीवर बसून भिक्षा मागण्याची प्रथा कुठेतरी बंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अखेर मुलींना मुरळी बनवण्याची प्रथा जेजुरीत थांबली.

जेजुरी आणि खंडोबा यांच्या संदर्भातील एक मोठी मालिका मध्यंतरी प्रकाशित झाली. खंडोबा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत. कर्नाटक किंवा इतर राज्यांमधूनही तिथे लोक येतात. जेजुरीच्या जवळच खंडोबा क्षेत्र पुणे शहरातील स्त्री आधार केंद्राच्या कार्यक्षेत्रात होते.

काही सामाजिक प्रश्‍नांच्या निमित्ताने निपाणीच्या कार्यकर्त्यांनी मला बोलावले. देवदासींच्या प्रश्‍नावर मी वाचन केले होते; परंतु निपाणीच्या भेटीत लक्षात आले, की देवदासी प्रथा म्हणजे एखाद्या महिलेला देवासाठी कायमचे सोडून देणे, एवढ्यापुरते ते मर्यादित नाही.

तर बऱ्याच स्त्रियांना देवदासी म्हणून संपूर्ण गावाच्या वेगवेगळ्या अपेक्षांना सामोरे जावे लागते. काही ठिकाणी त्या घरोघरी जाऊन भिक्षा मागतात, नृत्य करतात, कलावंतीण म्हणून जीवन जगतात... कुठे देवदासी; तर कुठे भावीण अशा स्वरूपाचे त्यांचे जीवन बघायला मिळते. त्याचाच एक भाग म्हणजे पुण्याच्या जवळ जेजुरी गडावरील मुरळी स्त्रिया.

१९९० च्या सुमाराला मुरळींचा प्रश्‍न सत्यशोधक महिला परिषदेच्या माध्यमातून आमच्यासमोर आला. केवळ तो प्रश्‍न समजणे पुरेसे नाही तर इतर मुलींना मुरळी म्हणून जीवन जगायला लागू नये या दृष्टिकोनातून जे काम करायला पाहिजे होते, त्याची आम्हालाही गरज भासायला लागली.

विशेषतः ज्यांची मुले-मुली शाळेमध्ये जात होती, त्यांचे शिक्षण खंडित होत असे. त्यातील ज्या मुली आहेत त्यादेखील आईबरोबर हळूहळू पीठ मागण्यासाठी, पायऱ्यांवर बसायला लागतात, असे आमच्या निदर्शनाला आले. त्याबाबत आम्ही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांशी बोललो.

जेजुरीमध्येच आम्ही एक महिला परिषद घेतली. त्यात बऱ्याचशा मुरळी आल्या होत्या. जेजुरीचा एक भाग आहे तो म्हणजे चिंचेची बाग. आता ती चिंचेची बाग काही कारणांमुळे कागदोपत्री असली तरीसुद्धा तेथील धर्मशाळा, पाण्याचा स्रोत हे सगळे अनेक कारणांमुळे विलीन झालेले आहे.

असे जरी असले तरी त्या चिंचेच्या बागेमध्ये तेव्हा आमची नियमित मीटिंग व्‍हायला लागली. त्या मीटिंगमध्ये येऊन मुरळी स्त्रिया अनेक प्रश्‍न मांडायला लागल्या. आम्ही त्यांची शिबिरे घेतली. त्यात प्रथम आरोग्य शिबिरे घेतली. त्यांची कैफियत समजून घेतली.

काही जणींनी सांगितले, की मुरळी झाल्याशिवाय गोंधळ होत नाही. हा देवाचा गोंधळ झाल्याशिवाय लग्नाला पूर्णपणे मान्यता मिळत नाही. मग या गोंधळाच्या मध्ये ज्या मुरळी येतात त्यापैकी काही मुरळी खऱ्या अर्थाने देवाला सोडलेल्या असतात, पण अनेक जणी रोजगारासाठीसुद्धा मुरळी होतात.

मुरळी आणि वाघ्याच्या प्रश्‍नावर मराठी नाट्यकृतींमध्ये, चित्रपटांमध्ये, साहित्यामध्ये लिहिले गेले आहे; परंतु वाघ्याचे जे जीवन आहे त्यातही फार गंभीर स्वरूपाचे प्रश्‍न आहेत. वाघ्याने लग्न करायचे नाही असे गृहीत असते.

जसे मुरळीच्या संदर्भात लग्न त्याज्य आहे, तसेच वाघ्याच्या बाबतीतही लग्न त्याज्य मानले जाते. मग प्रत्यक्षात वाघ्यांचा संसार असायचा; पण त्यात महिलेला पत्नीचे स्थान नसे. हे वाघ्या आणि मुरळी मग अशा वेळेला एकेका बाजूला अविवाहित असले तरीसुद्धा ते एकमेकांच्या बरोबर

धार्मिक समारंभात सहभागी झालेले दिसतात असे आम्हाला लक्षात यायला लागले. त्यात मग मुरळींसोबत वाघ्यांच्या मुलांबाबतही योजनेचा विचार करू लागलो.

आम्हाला काही उदार सामाजिक संस्थांनी विचारले, की तुम्हाला स्त्री आधार केंद्राला या वाघ्या-मुरळीसाठी, खासकरून मुरळींसाठी काय काम करता येईल ते सांगा. त्या वेळेला आम्ही विचार केला की, यांची पायरीवर बसून भिक्षा मागण्याची प्रथा कुठेतरी बंद झाली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना रोजगार दिला पाहिजे. हा रोजगार मिळण्यासाठी त्यांचे प्रशिक्षण होईपर्यंत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काही व्यवस्था केली पाहिजे.

म्हणून मग आम्ही विचार केला, की या मुलांच्या शाळेच्या खर्चासाठी म्हणून काही निधी जमा करावा. त्याप्रमाणे आम्ही एक प्रकल्प हाती घेतला आणि त्यातून जवळजवळ शाळेमध्ये जाणाऱ्या शंभर मुला-मुलींच्या तिसरी ते सातवीपर्यंतच्या शिक्षणाला लागणारा सगळा खर्च आम्ही दिला.

हे आमचे काम १९९०, १९९१ आणि १९९२ असे तीन वर्षे चालले होते. संस्थेच्या कार्यकर्त्या मृणालिनी कोठारी आणि अन्य काही जणी सातत्याने तिथे जात असत. त्या मुलांचे प्रगतिपुस्तक बघणे, शाळेच्या शिक्षकांना भेटणे, गणवेश, पुस्तके, बूट, छत्र्या, रेनकोट, वही, पेन इत्यादी सगळे शैक्षणिक साहित्य त्यांना देणे हे काम आम्ही करत होतो.

तेवढेच पुरेसे नव्हते. ही मुले इतरांमध्ये मिसळायची नाहीत. बाकीची मुले-मुली त्यांना थोड्याशा वेगळ्या नजरेने पाहत असत. त्याच्यामुळे ती थोडी दबल्यासारखी किंवा जीवनातील डोळ्यातील उत्साह विझल्यासारखी दिसत असत.

त्यानंतर आम्ही मुला-मुलींशी बोलायला लागलो. एक वर्ष झाले आणि मुलांना चांगले मार्क मिळाले. मुलींनाही चांगले गुण मिळाले. त्याबरोबर मातांची उमेद वाढली, असे आम्हाला दिसून आले. त्याखेरीज महिलांच्या मनामध्ये फार मोठा दबाव होता,

की आपण गळ्यामध्ये खंडोबाच्या नावाने ताईत घातलेला आहे, तर हे जे मंगळसूत्र घातलेले आहे त्याचे काय करायचे? त्यामुळे मग त्या उतारवयात गेल्या की, वय हळूहळू वाढत गेले की मग नात्यातल्या कोणी मुली, वेळप्रसंगी स्वतःच्याच मुलीला मुरळी करावी का? असा विचार करायच्या.

मुलगी १३-१४ वर्षांची झाली की ते डोरले मुलीच्या गळ्यात बांधून मोकळे होत असत. मग ती म्हणायची, की मी आता मरायला मोकळी झाले, पण या पद्धतीमुळे एक मुरळी समाजातून नष्ट होत असताना, तिचे जीवनकार्य संपत असताना दुसरी मुलगी मुरळी बनून ही प्रथा अव्याहतपणे चालू ठेवत होती.

मनात एक विचारांचे फार मोठे वादळ चालू होते, की आपण त्याला कशा पद्धतीने सांगायचे की या भूमिकेत तुम्ही अडकू नका. बरेच लोक आम्हाला सल्ला देत की, त्यांच्यासमोर तुम्ही डोरले तोडून फोडून टाका; पण त्यामुळे फक्त ते आमच्यापासून दूर झाले असते आणि त्यांनी सगळे आहे तसे चालू ठेवले असते.

म्हणून आम्ही सारखे त्यांच्याशी गटचर्चा करायचो. एखाद्या मुरळीने मुरळीचा धंदा सोडून दिलाय का, हे बघत होतो. मग त्यांनाच विचारले, काय करायचे आपण. या डोरल्या परत दुसऱ्या मुलीला घालायच्या का? त्याच्यासाठी स्वतःच्या भाचीला किंवा मुलीला आपण मुरळी केले तर जे तुमच्या वाट्याला आले तेच तिच्याही येईल.

ज्यामध्ये कुठेही कुटुंबाच्या प्रगतीची संधी नसेल आणि कुणाच्या तरी मर्जीवर तुमचे आयुष्य तुम्हाला घालवावे लागेल. तेव्हा त्यांनी आम्हाला दोन वाक्ये म्हणून दाखवली. ती म्हणजे, ‘देवा खंडेरायानं बानू घातली खिशात, दोन बायकांची चाल पडली देशात’ ही म्हण. एक म्हणजे दोन लग्ने करायला काय कारण असते किंवा त्याची पुरुषाला गरज का भासते?

त्यात पूर्वानुपार चालत आलेल्या भूमिकेचे समर्थन त्याच्यात होतेच, पण त्याच्यामध्ये कुठलाही कावा नव्हता, त्यात स्पर्धा नव्हती, त्याच्यात ईर्षा नव्हती, त्याच्यामध्ये सवतीच्या संदर्भातली कुठली वेदना नव्हती. तिने तिचे कुठे तरी आयुष्याचा ईप्सित म्हणून हे स्वीकारलेले होते.

त्या दृष्टिकोनातून या सर्व महिलांना असे खंडोबाची पत्नी म्हणून राहणे चुकीचे वाटत नव्हते. समाजाने त्यांचा दर्जा नाकारला किंवा समाजामध्ये त्यांची जी अवहेलना होते, त्याच्यातून होणारे त्यांचे शोषण हा सगळा नशिबाचा भाग म्हणून त्यांनी स्वीकारले होते;

परंतु आम्ही त्यांच्या मुलांचे शिक्षण, समाजामध्ये असणाऱ्या कुप्रथा व ज्या समाजात त्या जगताहेत त्या समाजापासून एकट्या पडतील अशा प्रकारे आम्ही त्यांच्याशी कठोर भूमिका घेतली नाही. आम्ही त्यांच्या मानसिक प्रवासाबाबत हळूवारपणे सोबत करत होतो.

जसजसा त्यांच्याशी आमचा संवाद वाढत गेला तेव्हा तुमच्यावर खंडोबा रागवत नाही का? असे आम्ही त्यांना विचारत होतो. आमची विचारपूस असायची, की ‘तुम्ही स्त्री आधार केंद्रात येता आणि त्यात आपण त्या डोरल्याबद्दल चर्चा करतो की, बाबा आम्हाला परत हेच, असे आयुष्य नको आहे. तुम्हाला तुमची मुलगी मुरळी व्हावी वाटते का?

तुमचे जीवन चांगले आहे, तर मुलीला तुम्ही मुरळी का करत नाही? असे म्हटल्यावर अक्षरशः स्त्रियांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागे. त्यातील दोघी-तिघी म्हणाल्या, ‘‘असे आमच्यासारखे आयुष्य जगण्यापेक्षा मेलेले बरे असे आम्हाला वाटते.

त्यामुळे आमच्या मुलीला मुरळी करायचे नाही.’’ मग आम्ही सांगितले की, ‘मुलीला जर का मुरळी करायचे नाही तर तिच्या जीवनामध्ये तिची जी आई मुरळी आहे, तिच्यावर समाजाने कुठेतरी वेगळा दृष्टिकोन लादलेला आहे.

तो बदलण्यासाठी तुम्हालाच हालचाल केली पाहिजे. यासाठीसुद्धा तुम्हाला शक्ती, बुद्धी, विचारांची दिशा आणि कामाची दिशा ही खंडोबा देतील. खंडोबाच्या या मार्गावरून काम करत असताना आपल्याला आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मिळालेली आहे.

त्या घटनेत अशा प्रकाराने स्त्रीला सुरक्षित, सामान्य स्त्रीप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार नाकारणे, यासंदर्भात तिला कुठेही वंचित ठेवणे किंवा तिला डावलले जाणे याला घटनेची मान्यता नाही. त्यातून तुमच्या मुला-मुलींच्यासुद्धा कपाळावर मुरळीची मुले, देवदासींची मुले हा जो शिक्का बसतोय तो योग्य नाही. म्हणून तुम्हाला तुमचे जीवन बदलले पाहिजे.’

विशेष म्हणजे, आठ ते दहा दिवसांतच एक अगदी मध्यम वयाच्या बाई यमुनाबाई आल्या आणि म्हणाल्या, ‘ताई मला आज स्वप्न पडले.’ मी म्हटले ‘काय स्वप्न पडले?’ ‘ताई, माझ्या स्वप्नामध्ये फार भयंकर घडले!’

मी म्हणाले, ‘स्वप्नांना एवढे काय घाबरता? सांगा बरे काय झाले?’ यमुनाबाई म्हणाल्या, ‘‘ताई, मी जेजुरीचा गड चढून गेले आणि देवाच्या पायाशी माझ्या गळ्यातले ते डोरले ठेवले. खंडोबाला म्हटले की बाबा हेच डोरले मला आता माझ्या मुलीच्या किंवा भाचीच्या गळ्यात बांधायची वेळ आणू नकोस. तुझे डोरले आणि तुझी भक्ती माझ्याबरोबर आहे, पण ती मनामध्ये आहे.

आता ती डोरल्याच्या, त्या ताईताच्या रूपाने समोर सगळ्यांना दिसावी असे मला काही वाटत नाही. म्हणून मला माफ कर.’’ हे सांगितल्यावर मी तिची समजूत घातली; पण मला त्या स्वप्नाचा फार आनंद झाला होता!

यमुनेचे ते स्वप्न नसून सत्यामध्ये तिच्यात बदल होऊन उमललेली एक परिपक्व भूमिका होती, जागृती होती. एक मुरळी किंवा देवदासी या ओळखीच्या ऐवजी ती एका अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलेला राज्यघटनेचा अधिकार दिलाय, अशा पद्धतीची ती नागरिक झाली होती. अशी एक प्रचंड अनुभूती तिच्या सगळ्या विचारांतून आली.

यमुनेचे स्वप्न खरे आहे व खंडोबानेच ताईत परत मागितला अशी भावना बऱ्याच स्त्रियांना पटली व शेकडो महिलांनी हे डोरले किंवा ताईत हा खंडोबाला अर्पण केला. त्यामुळे लक्षणीयरीत्या मुलींना मुरळी बनवण्याची प्रथा जेजुरीत थांबली. हे आमच्या आयुष्यातले फार मोठे योगदान आमच्या हातून समाजाने आणि या मुरळी महिलांनी करून घेतले, असे मी कायम मानते.

neeilamgorhe@gmail.com(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com