जागतिक पुस्तक दिन : एकाएकी आता वाचावेसे वाटे 

जागतिक पुस्तक दिन : एकाएकी आता वाचावेसे वाटे 

Published on

लॉकडाउनचा हा काळ पुस्तकांपासून दूर जाण्याच्या आपल्या सवयीला कमी करून पुन्हा पुस्तकांशी जोडून घेण्यासाठी अगदी योग्य आहे. आपण ठरवलं तर आजही ते करू शकतो. अनेक पुस्तकं जुन्या आणि नव्या स्वरूपात आपल्याला खुणावत आहेत. आजच्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त... 

विजय बेंद्रे नावाच्या आमच्या पुस्तकप्रेमी तरुण मित्रानं काल एक बातमी पाठवली होती. सध्या "कोरोना'मुळे जगभर सगळे जीवनव्यवहार ठप्प आहेत. दैनंदिन गरजेच्या वस्तूही मिळणं मुश्‍कील झालं आहे. या महामारीमुळे फारच बिकट अवस्था झालेल्या इटलीसारख्या देशात परिस्थिती थोडी आटोक्‍यात आल्यासारखी वाटताच मूलभूत गरजेच्या जीवनावश्‍यक गोष्टी लोकांना मिळाव्यात म्हणून सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्या जीवनावश्‍यक गोष्टींमध्ये तिथं पुस्तकं आहेत. योग्य ती काळजी घेऊन लोकांना पुस्तकांच्या दुकानातून पुस्तकं खरेदी करता येतील, असं जाहीर करण्यात आलं आहे. त्याचवेळी सरकार दारूची दुकानं का सुरू करत नाही, म्हणून लोक आक्रोश करत असल्याच्या, दारूच्या दुकानांत चोऱ्या करत असल्याच्या बातम्या आपल्याकडे टीव्हीवरून दाखवल्या जात होत्या. 

खरंच काही लोकांसाठी वाचन ही अशी जीवनमरणाशी जोडलेली गोष्ट असू शकते? या "कोरोना' काळात अनेक जण समाजमाध्यमांतून पुस्तकांच्या पीडीएफ प्रती एकमेकांना पाठवीत आहेत. काही लोक कुठली कुठली पुस्तकं वाचतोय, त्याचे वर्णन करीत फोटो वगैरे टाकत आहेत. वृत्तपत्रे घरोघर टाकली जाणार नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करताच लोक तावातावानं प्रतिक्रिया देत आहेत. काही जण ऑनलाईन पुस्तकविक्री तरी सुरू केली पाहिजे, म्हणून आग्रह धरत आहेत. हे चित्र पाहता आपल्याकडेही लोक वाचनाचे भुकेले आहेत, असंच एकूण चित्र समोर येतंय. पण खरंच तसं आहे का? महात्मा फुलेंनी एका अखंडामध्ये म्हटलं आहे, "थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा, तोच पैसा भरा ग्रंथांसाठी'. आपल्या जनतेची नाडी या द्रष्ट्‌या महापुरुषानं नेमकी ओळखली होती. पण महात्मा फुलेंच्या काळात साक्षरतेचं प्रमाण कमी होतं; लोकांना विद्येचं, ज्ञानाचं महत्त्व कळलं नव्हतं. तेव्हा ग्रंथांपेक्षा मद्याचं आकर्षण अधिक वाटणं समजता येईल. पण आज तरी ती परिस्थिती पालटली आहे का? इटली किंवा जर्मन वगैरे देशांप्रमाणे आपल्या लोकांना वाचन ही जीवनावश्‍यक गोष्ट वाटते आहे का? की उगाचच इतर अनेक गोष्टींप्रमाणे आपण ग्रंथप्रेमी, वाचनप्रेमी असल्याची दाखवेगिरी सुरू आहे? 

खरंच वाचनसंस्कृती रुजली आहे ? 
काल -परवाची गोष्ट. "फेसबुक'वर मराठीतल्या एका ज्येष्ठ लेखकावर आडवीतिडवी चर्चा सुरू होती. मराठी साहित्याला मौलिक योगदान देणारा हा लेखक कसा जागतिक वा किमान भारतीय पातळीवर दखल घेण्याइतपत महत्त्वाचा आहे, इथपासून ते त्याचं एकही पुस्तक न वाचताच तो कसा सामान्य लेखक आहे, अशी शेरेबाजी करण्यापर्यंत जोरदार टिपाटिपण्ण्या सुरू होत्या. दोन्ही बाजूंचे गट हिरीरीनं किल्ला लढवत होते. सामाजमाध्यमांतून अधूनमधून मराठी भाषा, साहित्य आणि एकूणच वाचन-संस्कृतीच्या अनुषंगानं होणाऱ्या अशा विस्फोटक चर्चा वाचताना अस्सल वाचनप्रेमींचा ऊर नेहमीच भरून येतो. अमुक भाषातज्ज्ञ, तमुक विचारवंत, गावगन्ना साहित्य संमेलनांचे अलाणे फलाणे अध्यक्ष असे सगळे कानीकपाळी ओरडून सांगत असतात, ते किती अडाणीपणाचं आहे असे वाटून मनाला धास्तावलेल्या मनाला जरा हायसं वाटतं. 

नाही तर काय? स्वत:ला मायमराठीचा कैवारी म्हणवणारे सगळेच शहाणे एकाच सुरात ओरडत राहिले आहेत : मराठी भाषा मरते आहे, मराठी साहित्याला घरघर लागली आहे, मराठी वाचन-संस्कृती लोप पावते आहे. हे आणि ते. पण आजकाल कोण मान्य करेल हे? "फेसबुक,' "व्हॉट्‌सऍप' वगैरे समाजमाध्यमांत जरा डोकावून पाहावं या काळजीवाहू शहाण्यांनी. साधी साधी माणसंसुद्धा किती संदर्भसंपन्न बोलत असतात. कुठलाही लहानथोर लेखक असू दे. या समाजमाध्यमरूपी आधुनिक चव्हाट्यावरच्या विद्वानांना त्याची सगळी अंडीपिल्ली ठाऊक असतात. 

"मी मराठी' म्हणत आपण कितीही मोठेपणा मिरविला, तरी आपल्याकडे खरंच वाचनसंस्कृती रुजली आहे का? बंगालमध्ये जसं घरोघर रवींद्रनाथ टागोरांचं एक तरी पुस्तक आढळतं, तसं आपल्याकडे कुठल्याच लेखकाबाबत का होत नसावं? खेड्यापाड्यांमध्ये काल परवापर्यंत तुकोबांची गाथा, माउलींची ज्ञानेश्वरी किमान देवघरात भक्तीभावानं वाचण्यासाठी, एकानं वाचलेली घरातल्या बाकीच्यानी ऐकण्यासाठी म्हणून तरी ठेवलेली पाहायला मिळत असे. अलीकडे गावगाड्याच्या बदलत चाललेल्या जीवनशैलीमध्ये अशी पुस्तकंही लोकांना अडगळ वाटू लागलीय. वाचनसंस्कृती आपण रुजू दिली नाही आणि श्रवण संस्कृतीची परंपरा मोडून काढली. 

"किंडल' चा उत्तम पर्याय 
बरं, ही स्थिती सगळीकडं सारखीच आहे, असंही म्हणता येत नाही. लाखालाखाच्या आवृत्त्या खपणाऱ्या विदेशी भाषा सोडून देऊ, पण आपल्याकडेही हिंदी, मल्याळी, बंगाली, कन्नड, तेलुगू, आसामी अशा काही भारतीय भाषांमध्ये बऱ्यापैकी पुस्तकं विकली जातात, वाचली जातात. कुणी तरी सांगतं, की आता लोकांना छापील माध्यमातलं काही नकोसं झालंय. स्क्रीनवरच पाहायची, वाचायची, लिहायची सवय लागलीय. छापील पुस्तकं वगैरे आता आउट डेटेड झालीत. कोण ती सांभाळत बसणार? आमची मुलंही अलीकडं ऑनलाईनच अभ्यास करतात. ठीक आहे, आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याला विरोध असायचं काहीच कारण नाही. पण मग याचा अर्थ, इ- बुक्‍स, इ -जर्नल्स, इ- न्यूज पेपर्स वगैरे मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत का? अलीकडे स्क्रीनचा डोळ्यांना त्रास होऊ न देता वाचायचं असेल, तर "किंडल' हा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. अनेक ई-पुस्तके, वर्तमानपत्रे वगैरे "किंडल'वर डाउनलोड करून घेऊन छापील पुस्तकांच्या किमतीपेक्षा कमी किमतीत वाचता येऊ शकतात. पण किती लोक अशा बदललेल्या नव्या स्वरूपातलं तरी वाचतायत? 

खरं तर, लॉकडाउनचा हा काळ पुस्तकांपासून दूर जाण्याच्या आपल्या सवयीला कमी करून पुन्हा पुस्तकांशी जोडून घेण्यासाठी अगदी योग्य आहे. आपण ठरवलं तर आजही ते करू शकतो. अनेक पुस्तकं जुन्या आणि नव्या स्वरूपात आपल्याला खुणावत आहेत. गरज आहे ती "एकाएकी आता असावेसे वाटे' असं तुकोबासारखं म्हणत स्वत:चा शोध घेण्याची. 

(लेखक प्रसिद्ध कादंबरीकार आहेत.) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com