esakal | पृथ्वीवरील जीवसृष्टीचा तारणहार ‘ओझोन’
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वीवरील जीवसृष्टीचा तारणहार ‘ओझोन’

पृथ्वीवरील वातावरणात ओझोनचा थर असल्याने UV-A,B,C किरणे शोषली जातात. ही किरणे सजीवांसाठी अतिशय धोकादायक मानली जातात.

पृथ्वीवरील जीवसृष्टीचा तारणहार ‘ओझोन’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आज जागतिक ‘ओझोन दिवस’, अर्थात, आपल्या वातावरणात असलेल्या ओझोन वायूच्या थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिनाला ‘आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षक दिवस किंवा ‘जागतिक ओझोन दिवस’ असेही म्हणतात..!

ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा वायू आहे. त्याच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजन (प्राणवायू)चे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र ‘O३’ असे लिहितात. ओझोन हा आपल्या वातावरणाचा एक छोटासा, परंतु मानवी अस्तित्वाचा महत्त्वाचा भाग आहे. बहुतांश ओझोन वातावरणामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे १० ते ४० किलोमीटरपर्यंतच्या उंचीवर असतो. या प्रदेशास ‘स्ट्रॅटोस्फियर’ असे म्हणतात आणि त्यात वातावरणातील सर्व ओझोनपैकी ९० टक्के समाविष्ट असतो.

पृथ्वीवरील वातावरणात ओझोनचा थर असल्याने UV-A,B,C किरणे शोषली जातात. ही किरणे सजीवांसाठी अतिशय धोकादायक मानली जातात. यामुळे त्वचेचा कर्करोग आणि त्वचा जळण्याचा धोका असतो. पृथ्वीवर धडकणारी ही किरणे ओझोनच्या थरामुळे पुन्हा सूर्याकडे परतवली जातात. सूर्यावरून पृथ्वीवर तीन प्रकारची किरणे येत असतात. त्यातील UV-A ही किरणे ओझोन थरातून आरपार जातात. UV-B या किरणांना बऱ्याच प्रमाणात ओझोन थर शोषून घेतो. तर UV-C ही किरणे सजीवांना अतिशय धोकादायक असल्याने या किरणांना ओझोन थर परत पाठवत असतो. म्हणजेच ‘Re-Sending’ करीत असतो.

हेही वाचा: मोठी झेप! मस्क यांच्या SpaceX मुळे सर्वसामान्य नागरिक पोहोचले अवकाशात

सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा बचाव करणाऱ्या अशा या ओझोन वायूचा शोध १८४० मध्ये क्रिस्टियन फ्रड्रिक स्कोएनबेन या जर्मन-स्वीस रसायनशास्त्रज्ञाने लावला. १९१३ मध्ये फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हॅन्‍री बुइसन यांनी पृथ्वीवरील ओझोन थराचा शोध लावला. १९३० मध्ये भौतिकशास्त्रज्ञ सिडनी चॅपमॅन यांनी ओझोनचा थर तयार होण्याची प्रक्रिया शोधून काढली. मात्र, आत्ताच्या घडीला ओझोनचा थर दिवसेंदिवस नष्ट होत चालला आहे. काही रासायनिक संयुगांमुळे ओझोन थराचा क्षय होऊ लागला आहे. या संयुगांमध्ये नायट्रिक ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लोरो कार्बन (CFC), ब्रोमो फ्लोरो कार्बन यांचा समावेश आहे. उत्तर अर्धगोलातील ओझोन थराचे प्रमाण दर दशकाला चार टक्क्यांनी कमी होत आहे. यामुळे अंटार्क्टिका येथील ओझोनच्या थराला खूप मोठा बोगदा पडल्याचे पुढे आले.

नायट्रस ऑक्साईड, क्लोरो फ्योरो कार्बन या वायूंमुळे सगळ्यात जास्त ओझोनच्या थरात घट होत असून, हे वायू मानवी कृतीतून निर्माण झाले आहेत म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने ओझोन वायूच्या संवर्धनासाठी व दुष्परिणामाच्या लोकजागृतीसाठी १९९४ मध्ये १६ सप्टेंबरला ‘ओझोन दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे १९९५ मध्ये पहिला ‘जागतिक ओझोन दिवस’ साजरा झाला. ओझोन वायूच्या थराची हानी थांबविण्यासाठी आपल्या हातात काही गोष्टी आहेत. ज्यात शक्य असेल तेव्हा ओझोनला हानिकारक अशी उत्पादने वापरू नये. उदा. स्प्रे, अग्निप्रतिबंधक उपकरणे, शीतकपाटे. उत्पादनावरील लेबल तपासून ओझोन थराचे हित जपणारी उत्पादने निवडावीत. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळणे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या जाळणे बंद करणे.

हेही वाचा: कोण आहेत ते चौघे? अंतराळवीर नसूनही पैशाच्या जोरावर झेपावले अंतराळात

पृथ्वीवरील ओझोनचे प्रमाण वाढविण्यासाठी वृक्षारोपण हाच खात्रीचा उपाय आहे. आंबा, पिंपळ, वड, निंब अशा शतकानुशतके टिकणाऱ्या वृक्षांप्रमाणेच घरोघरी तुळस लावणे हा वातावरणातील प्राणवायू व ओझोन वायू वाढविण्याचा प्रभावी उपाय आहे. शेवटी, ओझोनचे हे थर एखाद्या विशिष्ट देशाला प्रभावित करणारे घटक नसून, पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राला सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करणारे अत्यावश्यक आवरण आहे. या आवरणाला संरक्षण करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सयुक्तिकरीत्या सोबत येऊन विविध करारानुसार योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे. तेव्हाच ओझोनचा होणारा ऱ्हास आपल्याला थांबवता येईल.


-विनित पवार, सातपूर, नाशिक
(लेखक नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे कार्यवाहक आहेत.)

loading image
go to top