बाईपण भारी देवा!

एका कथेतील स्त्री पात्र स्वतःशीच झगडत होतं आणि त्याची फार छोटीशी आशा होती... प्रवासादरम्यान सायकलवरून न उतरता आणि तोल जाऊ न देता तिला रस्त्यावरील चढ पार करायचा असतो.
womens life
womens lifesakal

- विशाखा विश्वनाथ

एका कथेतील स्त्री पात्र स्वतःशीच झगडत होतं आणि त्याची फार छोटीशी आशा होती... प्रवासादरम्यान सायकलवरून न उतरता आणि तोल जाऊ न देता तिला रस्त्यावरील चढ पार करायचा असतो. तो चढ ती सायकलवर बसून पार करते त्या दिवशी ‘मीच ओलांडले मला’ची भावना तिच्या मनात दाटून येते.

नागपूरहून ६० वर्षें वय असणाऱ्या आणि पत्रकारितेतून निवृत्ती घेतलेल्या एका व्यक्तीचा मला अचानक फोन आला. त्या ताईंची आणि माझी काहीच ओळख नव्हती. महिला दिनाच्या निमित्ताने नागपुरात एक सन्मान सोहळा दरवर्षी पार पडतो, त्यात त्यांना निवेदनाच्या स्क्रिप्टमध्ये माझी कविता घ्यायची होती. त्या संदर्भातला तो कॉल होता.

त्यात त्या सहज; पण फार महत्त्वाचं बोलून गेल्या, ‘तुझ्या संग्रहाचं नाव फार आवडून गेलं... त्याचं कारणं असं आहे की, आधी ना स्त्रियांचा संघर्ष बाहेरच्या गोष्टींशी होता... आता तो आतला झालाय आणि तो करत असताना स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करावंच लागतं.’ माध्यम विश्वात काम करणाऱ्या अनुभवी स्त्रीकडून कवितेचं आणि कवितासंग्रहाच्या नावाचं कौतुक होणं, ते करत असतानाही विचाराला एक नवी चालना देणं हे सारं मला दूरवर घेऊन गेलं.

मी फरफटत गेले की मन पिसासारखं होऊन दूरवर तरंगत गेलं, हे मला नेमकं सांगता यायचं नाही; पण स्त्रीमनातला इंटर्नल कॉन्फ्लिक्ट अर्थात आंतरिक संघर्ष मला जिथे म्हणून दिसला किंवा स्त्रिया जिथे त्याच्याशी झगडताहेत त्या सगळ्या सिनेमा आणि सीरिजमधल्या स्त्री पात्रांच्या भावविश्वात मी चटकन फेरफटका मारून आले.

‘ॲमेझॉन प्राईम’वरील ‘मॉडर्न लव्ह’मधील ‘रातरानी’ कथेतील स्त्री पात्र स्वतःशीच झगडत होतं आणि त्याची फार छोटीशी आशा होती... कामानिमित्त प्रवास करताना सायकल वापरणाऱ्या त्या स्त्री पात्राला रस्त्यात लागणारा चढ सायकलवरून न उतरता, तिचा तोल जाऊ न देता, व्यवस्थित पेडल मारून पार करायचा असतो. रात्रीच्या वेळी सी-लिंक सायकलने पार करायचा असतो.

अर्थात या दोन्ही गोष्टी तिथे रूपक म्हणूनच असल्या तरी, चढ पार करताना आपला तोल जातो या भावनेने तिच्या मनाची घालमेल, मला हे जमलंच पाहिजे म्हणून तिचा चाललेला आटापिटा, माझ्यातच काही कमी आहे म्हणून मी स्वतःला सुधारलं पाहिजे हा तिचा अट्टहास हे सगळं तिच्या आतलं होतं. जे तिने उराशी घट्ट कवटाळून ठेवलेलं आणि म्हणूनच तिला तो चढ सायकलवर बसून पार करता येतो त्या दिवशी ‘मीच ओलांडले मला’ या भावनेने तिचं मन ओतप्रोत भरून येतं.

मला वाटतं, प्रत्येक माणसाचा हा आंतरिक संघर्ष चालूच असतो. आत धरून ठेवलेलं खूप काही माणसांना रोज कुरतडत राहतं आणि मग ते स्वतःला त्रास करून घेतात. बाह्य बंधनं तोडून टाकता येण्याच्या या काळात, स्वतःचा पाय मागे खेचणारं स्वतःच्याच आतलं काही त्यांना तोडून फेकता येत नाही, मनावेगळं करणं जमत नाही आणि म्हणून त्यांची अधिक फरफट होते.

महिला त्यात अधिक अग्रक्रमावर आहेत; कारण त्यांना अजून तरी पुरतं व्यवहारी होता आलेलं नाही. त्या भावनिक आहेत, अतिविचारी आहेत, निर्माण झालेल्या प्रत्येक अडचणीवर त्यांना तडक तोडगा काढायचाच आहे. तो काढण्याच्या अट्टहासापायी आपण नवीन अडचणी निर्माण करतोय याची त्यांना जाणीवही आहे आणि त्यातूनच जेव्हा जेव्हा त्या अतिविचार करू लागतात, तेव्हा चार पावलं मागे येतात.

ही चार पावलं मागे आल्यावर त्यांना जाणवतं, मी असं करून चालणार नाही. मी स्त्री आहे. मी काळजी घेतलीच पाहिजे. विचार केलाच पाहिजे. माझ्यामुळे कुणाला त्रास होताच कामा नये. मी सगळ्यांशी प्रेमाने वागलंच पाहिजे. माझा विचार सगळ्यांना सामावून घेणारा असायलाच हवा आणि हे सगळं स्त्रिया घट्ट स्वतःच्या आत धरून ठेवण्याचा प्रयत्न करत राहतात.

कारण असं असणं म्हणजे स्त्री असणं हा सामाजिक दबाव आणि त्यांच्या संगोपनातून त्यांच्यावर बिंबवलेलं असतं. बाईपणाच्या चौकटीत स्वतःला बसवून घेण्याचा विनाकारण अट्टहास त्या करू लागतात. त्या करत असताना गोंधळात, स्वतःशीच भांडत राहतात.

कधी कधी तर वाटतं एकीकडे स्वतःच्याच जुन्या प्रतिमांना छेद देण्यासाठी झपाटल्यासारखे प्रयत्न करणाऱ्या स्त्रिया आणि स्वतःत खोलवर रुजलेल्या आपल्या बाईपणाच्या मुळांना घट्ट धरून असलेल्या स्त्रिया हा प्रतिमांचा सतत या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणारा लोकल महिलांच्या असण्याला अधिक अर्थपूर्ण बनवतो. त्यांना कायम एकाच ध्रुवावर राहायचं नसतं. त्यांना काही तरी असाध्य साध्य करण्याचा ध्यास लागलेला असतो.

या असाध्य गोष्टी फार अवघडही नसतात किंवा ज्यात खूप अर्थकारण वगैरे असेल अशाही नसतात; पण त्यांच्या आजूबाजूच्या माणसांनी म्हणा वा त्यांनी स्वतः म्हणा करून पाहिलेल्या गोष्टी त्यांना करायच्या असतात. अगदीच जमल्या नाही तरी त्या करून तरी पाहायच्याच असतात.

मग ते ‘रातरानी’त दाखवलंय तसं सी-लिंकवरून सायकल चालवणंसुद्धा असूच शकतं किंवा त्याच संदर्भाने मला आठवते ती ‘डबल सीट’ चित्रपटात मुक्ता बर्वेने साकारलेली मंजिरी. चित्रपटात मंजिरी म्हणते तसं ‘मुद्दा उडी मारण्याचा आहे, प्रयत्न करण्याचा आहे... आपण आयुष्यात असं काही करायला पाहिजे ना ज्यामुळे आपल्याला आयुष्यभर एकदम बाप वाटलं पाहिजे.’

हे असं बाप वाटावं, भारी वाटावं म्हणून स्त्रिया स्वतः उडी मारतातच; पण त्या आधी आणि नंतर, त्यांच्या कक्षेतल्या माणसांना सगळ्यात आधी जोडीदाराला उडी मारण्यासाठी कायम प्रोत्साहन देतात, उद्युक्त करतात. हे सगळं करत असताना त्या श्रद्धाळू भासतात खऱ्या; पण त्या कमालीच्या प्रयत्नवादी असतात.

‘डबल सीट’ चित्रपटातली मंजिरी जोडीदाराला म्हणते, की प्रयत्न तर करून पाहू... नाही जमलं, फसलंच आपलं काही तर तक्रार नाही करणार... ‘हे कर आणि नाहीच जमलं तर ठीक आहे’ या मधला जो समतोल साधणं आहे ते फक्त बायकांना जमतं, असं मानलं तरी त्यांना ते फक्त इतरांच्या बाबतीत जमतं. स्वतःच्या बाबतीत मात्र त्या कायम काहीतरी सिद्ध करण्याचा अजेंडा घेऊन वावरताना दिसतात.

त्यात अगदी आम्ही बंधनं मानत नाही; पण मी माझं बाईपण कसं सोडू, मी फेमिनिस्ट आहे, मी बंडखोर आहे, मी सद्‍गुणांचा पुतळा आहे हे आणि त्यातलं काहीही सामावतं. जेव्हा बायका हा आग्रह सोडतील, त्यांच्या आत त्यांनी धरून ठेवलेलं काही, एखादी इच्छा मागून पाण्यात दिवा सोडावा तसं हलकंच, सश्रद्धपणे सोडून देतील तेव्हा अधिक मुक्त होतील.

vishakhavishwanath11@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com