कुस्तीचा ‘पंच’नामा

महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेने सुमारे पन्नास क्रीडा प्रकारांना मान्यता दिली आहे. संघटना पातळीवर तो आकडा शेकड्याच्या घरात आहे.
Mahashtra Kesari Competition
Mahashtra Kesari Competitionsakal
Updated on

महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेने सुमारे पन्नास क्रीडा प्रकारांना मान्यता दिली आहे. संघटना पातळीवर तो आकडा शेकड्याच्या घरात आहे. दरवर्षी त्या खेळांची संख्याही हनुमंताच्या शेपटासारखी लांबतच चाललीय. अगदी लंगडीसारखे खेळही त्यात सामील झालेत. आता त्या प्रकाराला खेळ म्हणायचे की नाही, इथपासून मतभेद आहेत. एकंदर खेळांच्या प्रकारांची संख्या वाढणं क्रीडा संस्कृतीची कक्षा रुंदावल्याचं लक्षण आहे. दुसरीकडे खेळांचे प्रकार वाढल्याचे दिसत असले तरी खेळाडू घडताना दिसत नाहीत. केवळ क्रीडागुणांसाठी खेळाडू आणि त्यांच्या पालकांचीही केविलवाणी धडपड उबग आणणारी आहे.

आता हे सतराशे साठ क्रीडा प्रकारही एकवेळ मान्य, पण त्यांच्यासाठी मैदाने वाढताहेत का? पूरक सुविधांचे काय झालं? प्रशिक्षक आणि पंच किती? त्यांच्या नियमावलीचे काय? सरकारी पातळीवर तर सगळाच आनंदी आनंद. क्रीडा विभाग अजून खो-खो, कबड्डी, कुस्तीसारख्या प्रचलित खेळांना जिल्हा पातळीवर मार्गदर्शक देऊ शकलेला नाही. तेव्हा इतर क्रीडा प्रकारांची काय कथा. क्रीडा प्रशिक्षक दिला तरी त्याला कार्यालयातले काम मान वर करू देत नाही, मग तो खेळाडूंसाठी घाम गाळणार कधी? पंच घडविणे, त्यांचे उजळणी वर्ग होतात का, हा संशोधनाचा विषय.

क्रीडा संस्कृतीचा हा लसावी-मसावी काढण्याचे कारण एकच. अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील निकाल. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेला पृथ्वीराज मोहोळ आणि डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्यातील लढत मैदानात सुमारे पन्नास एक हजार कुस्तीप्रेमींनी पाहिली. खरे तर किताबानंतरच ही कुस्ती अवघ्या महाराष्ट्राने आणि देशाने पुन्हा पाहिली. त्यानंतर वादाचे मोहोळ उठले. मीडियात, सोशल मीडियात निकालावर चर्चा झडल्या आणि अद्याप टीकेची झोड थांबलेली नाही.

जो तो आपापल्या परीने अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करीत आहे. निकाल वादग्रस्त ठरल्याने सोशल मीडियातून का होईना शिवराजच्या बाजूने लोकचळवळ उभी राहिली. तशी ही बाब सुखावणारी. मात्र यात पृथ्वीराजचे क्रीडागुण झाकोळले, हे मात्र खरे. त्याने शिवराजला ढाक मारून डेंजर पोजिशनमध्ये नेले. त्याआधीही त्याने ताबा मिळवला होता. यावरून त्याचे कुस्ती कौशल्य दिसून येते. परंतु काही जणांनी त्याला अनावधानाने का होईना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, ही एका क्रीडापटूचे मनोधैर्य खच्ची करणारी घटना आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जरी जागतिक कुस्ती संघाच्या नियमानुसार चालत असली तरी तिला इथल्या लाल मातीचा फ्लेवर आहे. मात्र अलीकडे त्या मृदगंधाला वशिलेबाजीचा दुर्गंध येऊ लागलाय. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे हे विधान व वस्ताद काका पवार यांचे महाराष्ट्र केसरी आधीच ठरवला जातो, हे विधान खूप काही सांगून जाते. काहींना या विधानामागे अगतिकता, आगपाखड, आकांडतांडव दिसत असलं तरी त्याला वास्तवतेची किनार आहेच. हे सर्व चीड आणणारं आहे. क्रीडाप्रेमींना ते कदापि रुचत नाही.

खेळातील फिक्सिंग काही नवे नाही. कमी-अधिक प्रमाणात सर्वच क्रीडा प्रकारांना त्याने ग्रहण लावलेय. सर्वाधिक क्रिकेट काळवंडलं गेलं. कुस्तीतला नुरा नावाचा शब्द याच फिक्सिंगच्या जातकुळीचा (दोन मल्लांनी विजयासाठी आपसात केलेली तडजोड). इतिहासात पंचांनी ठरवून काही पैलवान बाद केल्याच्या घटना शेकड्याने सापडतील (अगदी गावच्या आखाड्यातही नुरा कुस्ती किंवा फिक्सिंग होते). परंतु पुढे त्याचे काहीच झालं नाही. ना दाद ना फिर्याद.

महाराष्ट्र केसरीला जागतिक नियमांचा आधार घेतला गेला, परंतु त्याला आखाड्यातील कुस्तीचे नियम डकवले. नियमानुसार चीतपट कुस्तीला चॅलेंज देता येत नाही. हे खरं असलं तरी धूळफेक करणारं घडलं असेल तर रिप्ले का पाहायचा नाही?

महाराष्ट्रात अवघे अडीचशे पंच

कुस्तीगीर संघाकडे दीडशे, तर परिषदेकडे शंभर पंच आहेत. कुस्तीगीर संघ किंवा परिषदेकडून वर्षातून पंच प्रशिक्षणाची चार ते पाच शिबिरे घेतली जातात. त्यात जागतिक स्तरावरील नवीन नियमांची माहिती दिली जाते. काही प्रॅक्टिकल करून घेतले जातात. त्यानंतर त्यांची वर्गवारी केली जाते. राज्य अजिंक्यपद स्पर्धा सुरू होण्यापूर्वी शिबिर घेण्याची प्रथा आहे. आताच्या स्पर्धेपूर्वीही पंचांचा उजळणी वर्ग झाला होता.

महाराष्ट्रात अवघे पाच ते सहा पंच ए कॅटेगरीतील आहेत. एकमेव आंतरराष्ट्रीय पंच म्हणून दिनेश गुंड यांची ख्याती आहे. त्यांना तब्बल ६६ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. महाराष्ट्रात ते एकमेव जागतिक पंच आहेत. हाताच्या बोटावर मोजता येईल एवढी पंचांची संख्या बरेच काही सांगून जाते. पंचगिरीसाठी मिळणारं तुटपुंजे मानधनही त्याला कारणीभूत असावं. त्यामुळे कोणी करिअर म्हणून पंचगिरीकडे वळत नसल्याचे एका नवख्या पंचाने सांगितले.

राजकीय पंच

पुढाऱ्यांच्या पाठबळाने काही पंच पुढे येतात. ते कधी तरीच उजळणी वर्गाला हजर राहतात. बहुतांश वेळा दांडी मारतात. त्यांना सर्टिफिकेटही मिळते. त्यावर ते पंच म्हणून मिरवायला मोकळे, असेही कुस्तीतील सूत्रांचे म्हणणे आहे. मग ते मर्जीतील मल्लांचे निकाल फिक्स करतात. हे अनेक जण उघड्या डोळ्यांनी पाहतात, पण त्याविरोधात बोलणार कोण आणि सिद्ध करणार कसे, असा सगळा मामला.

तंत्रज्ञानाचा फायदा काय...

महाराष्ट्र केसरीला निकाली कुस्त्यांची परंपरा आहे. त्यामुळे लोकांना पैलवानाची पाठ टेकलेली, त्याला लोळवलेला पाहायची सवय आहे. नव्या नियमात नुसती ढकलाढकली करून गुण घेतले तरी विजयी होता येते. त्यामुळे क्रीडारसिकांना या कुस्तीत मजा येत नाही. अहिल्यानगरमध्ये अशा प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. चीतपट नियमांना चॅलेंज देता येत नाही, हे खरे आहे. परंतु ती चीतपट झालीच नसेल आणि ती चीत दिली तर काय करणार? मग तंत्रज्ञानाचा फायदा काय? या नियमात दुरुस्तीची गरज आहे. नुसत्याच झालेल्या स्पर्धेने ते अधोरेखित केलं. ऑलिंपिकमध्ये फोगाटचे वाढलेले शंभर ग्रॅम वजनही नियमात बसत नाही, हेही भारतीय कुस्तीप्रेमींसाठी निराश करणारं असतं. परंतु नियम सर्वांना सारखेच.

व्यथित अन् भयभीत

अहिल्यानगरमध्ये झालेल्या प्रकाराने पंचमंडळ व्यथित आणि भयभीत झाल्याचं कळतंय. हे साहजिकच आहे. कोणत्याही खेळातील रेफ्री त्या खेळाची गरिमा उंचावत असतात. न्याय देणाराच अन्याय करू लागला तर त्या व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहत नाही. पंचांना जर अशी मारहाण होत राहिली तर एकही पंच उभा राहायचा नाही, हे जितकं खरं तेवढंच खेळाडूंनी पंचाच्या वशिलेबाजीला कंटाळून दुसरा खेळ निवडला तर ती कुस्तीची हार होईल, हेही खरं आहे. कारण घरात पैलवान पोसणं म्हणजे हत्ती पोसल्यासारखं आहे. त्यामागे प्रचंड मेहनत आणि यातना असतात. त्यांच्या कष्टाची अशी कोणा वशिलेबाज पंचामुळे धूळधाण व्हायला नको.

पंचावर बंदी का नको?

कोणत्याही स्पर्धेत खेळाडू चुकला असेल तर खेळाडूवर बंदी घातली जाते. बंदी घातल्यावर त्याचे करिअरही बरबाद होण्याचा धोका असतो. तशी अनेक उदाहरणं आहेत. पंच चुकू शकतो आणि या चुकलेल्या पंचाला शासन व्हायलाच हवे. त्याच्यावरही बंदी घातली पाहिजे. तशी तरतूद आहे, पण कुस्तीत असं झालेलं पाहायला अन् ऐकायलाही मिळालं नाही. मग या प्रकाराला पाठीशी घालणं म्हणायचं का?

मागे सिकंदर जात्यात होता तेव्हा शिवराज सुपात होता. आज शिवराज जात्यात तर पृथ्वीराज सुपात. न्याय देणारी व्यवस्था बटीक झाल्यावर हे आक्रीत घडणारच; फक्त वर्तुळ लवकर पूर्ण झालं ह्याचं समाधान मानावं की न्यायव्यवस्था रसातळाला चालल्याचा खेद बाळगावा? ही व्यवस्था कोणी एकाने लाथाडल्याशिवाय सरळ होणारच नाही काय? नियमात अन् पंचगिरीत अंशिक बदल झाला तरच कुस्तीचा विजय होईल अन्यथा हा पंचनामाही निरर्थक ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com