yashwant-thorat
yashwant-thorat

वही जहाँ है तेरा जिस को तू करे पैदा (डॉ. यशवंत थोरात)

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला होता. काही तरुण मुलं माझ्याकडं मार्गदर्शनासाठी आणि समुपदेशनासाठी अधूनमधून येत होती. स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ विशेष योग्यता श्रेणी मिळवणं नसून ते जाणिवांचं, संवेदनशीलतेचं क्षेत्र आहे, हे समजण्यास त्यांना थोडा वेळ लागला. या परीक्षा केवळ सखोल विचारांच्या आधारावर खुलासेवार लिहिणं, त्यासाठी भरपूर स्पष्टीकरणं देणं असं नसून आकलनाच्या कक्षा विस्तारणं व वेळेचं व्यवस्थापन हेसुद्धा त्यात अभिप्रेत असतं. यात तुम्ही भारंभार वाचन करण्यापेक्षा भूतकाळातलं कलविश्‍लेषण व वर्तमानकाळासाठी विश्वसनीय अंदाज वर्तवणं महत्त्वाचं ठरतं. थोडक्‍यात, स्पर्धा परीक्षांमधलं यश हे ज्ञान व तंत्र यांचा समन्वय असतो. मला स्वतःला त्याचा अनुभव आला आहे. 

जुन्या काळात प्रशासकीय सेवा परीक्षा निबंधाधारित असत. तेव्हा मी ‘सन १७८९ ते १९४५ या काळातला युरोपचा इतिहास’ हा वैकल्पिक विषय निवडला होता. मी जसजसं वाचन सुरू केलं, तसतसं माझ्या लक्षात येऊ लागलं, की फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वीच्या फ्रान्सची वैशिष्ट्यं असणारे सामाजिक व आर्थिक कल लक्षात घेतल्याखेरीज अठराव्या शतकातला युरोप समजणार नाही. त्यामुळं मी आधीच्या म्हणजे सतराव्या शतकाचा अभ्यास सुरू केला; परंतु तिथंही तीच अडचण आली. अशा रीतीनं पाठीमागच्या शतकांचा अभ्यास करत करत मी अखेर ग्रीक संस्कृतीच्या काळापर्यंत जाऊन पोचलो. यामुळं झालं असं, की परीक्षेच्या वेळी मला सॉक्रेटिस व सीझर ठाऊक होते; परंतु फ्रेंच राज्यक्रांतीबाबत पुरेशी माहितीच नव्हती! ही समस्या मी मांडली तेव्हा स्टडी सर्कलनं त्यावर पर्याय शोधला. माझ्या मार्गानं न जाता त्यानं विशिष्ट भागावर लक्ष केंद्रित करण्याचा मार्ग अनुसरला आणि लेखी परीक्षेत यशस्वी कामगिरी करून दाखवली. आता एक नवीच मागणी उमेदवारांकडून पुढं येऊ लागली आहे. मुलाखतीत यशस्वी कसं व्हावं, यात वेशभूषा हा घटक तरुणाईवर जास्त प्रभाव गाजवू लागला आहे. मुलांनी शर्ट-टाय-जाकीट हा पर्याय निवडला असला, तरी पाश्‍चिमात्य वेशभूषेचा नक्की कोणता प्रकार निवडावा आणि त्यासाठी खर्च किती करावा, याबाबत मुलींचा मात्र निर्णय झालेला नाही. माझ्याबरोबर झालेल्या संवादात याचाच ऊहापोह सुरू होता. माझ्याकडं वळून मंदा म्हणाली ः ‘‘तुमच्या कारकीर्दीत तुम्ही अनेक मुलाखत मंडळांचे अध्यक्ष होतात...तुमचा सल्ला काय आहे? मुलाखतीच्या वेळी तुम्ही उमेदवारामध्ये काय पाहता?’’

म्हणालो ः ‘‘बाह्यरूपाला महत्त्व आहे; परंतु खूप नाही. रिझर्व्ह बॅंकेचे एक उत्कृष्ट डेप्युटी गव्हर्नर जानकीरामन यांच्याविषयीची एक कथा प्रसिद्ध आहे. सन १९५० मध्ये ते मुलाखतीला गेले तेव्हा ते चक्क पारंपरिक दक्षिण भारतीय पोशाखात आणि शेंडी राखलेली अशा प्रकारे गेले होते. त्यांना पाहून परीक्षक मंडळ चकित झालं. त्यांना वैदिक काळातले नव्हे, तर आधुनिक काळातले अधिकारी हवे होते; पण हा तरुण मुलगा अत्यंत शांत आणि अविचलित होता. त्यानं एक कापडी पिशवी टेबलवर रिकामी केली. त्यातून सांडलेला सुवर्णपदकांचा ढीग पाहिल्यानंतर त्याच्या वेशभूषेपेक्षा गुणवत्तेचं महत्त्व परीक्षकांना उमगलं आणि मग जानकीरामन या तरुणाला नाकारण्याचा प्रश्नच उद्‌भवला नाही.’’

‘‘...पण आजच्या काळात हे असं चालू शकेल काय?’’ शंकरनं विचारलं. 


‘‘होय, कारण परीक्षक मंडळाला सरतेशेवटी सर्वोत्कृष्ट उमेदावर तर निवडायचा असतो; सर्वोत्कृष्ट वेशभूषा केलेला उमेदवार नव्हे! वेशभूषेचा प्रभाव तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर देईपर्यतच असतो. त्यानंतर मात्र तुमच्या बुद्धीची चमक आणि मुलाखतीतली कामगिरी याच बाबींना महत्त्व येतं आणि मित्रांनो, यात बौद्धिक तयारी, अचूक तंत्र, हजरजबाबीपणा, आत्मविश्वास, दबाव सहन करण्याची क्षमता व समयसूचकता या सगळ्या बाबींचा संगम असतो. असावा लागतो...’’ मी स्पष्ट केलं. 
‘‘ऐकायला छान वाटतंय,’’ अपर्णा म्हणाली, ‘‘पण मी खरंच धास्तावलेय. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा, की मी किती तयारी करू? परीक्षक मंडळ काहीही विचारू शकतं...अगदी काहीही.’’ ‘‘अगदी असंच काही नसतं,’’ मी म्हणालो ः ‘‘तू परीक्षक मंडळाबाबत गैरसमज करून घेऊ नकोस. साधारणपणे हे मंडळ काही संकेतांचं पालन करतं किंवा त्यानं ते करणं अपेक्षित असतं. डॉ. मनमोहनसिंग यांनी एका खासगी संभाषणात याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. ते म्हणाले होते, ‘‘मी तुम्हाला चार प्रश्न विचारू शकतो, ज्यातल्या एकाचंही उत्तर तुम्हाला ठाऊक नाही, तर त्याच न्यायानं तुम्हीही मला चार प्रश्न विचारू शकता, ज्यांची उत्तरं मला ठाऊक नसतील.’ तेव्हा याचा अर्थ असा, की मुलाखतीचा उद्देश हा उमेदवाराला काय ठाऊक नाही, हे शोधण्यापेक्षा काय ठाऊक आहे, हे जाणून घेण्याचा असतो.’’

‘‘हे ठीक आहे; पण परीक्षक मंडळ या संकेतांचं पालन करतं का?’’ किमयानं विचारलं. 
‘‘काही अपवाद वगळता मला वाटतं, की ते हा संकेत पाळतात,’’ मी म्हणालो ः ‘‘तो पाळावाच लागतो. कारण, त्यांना अयोग्य उमेदवाराची निवड करणं परवडत नाही.’’
‘‘अच्छा...’’ हायसं वाटून मंदा म्हणाली ः ‘‘आता धीर येऊ लागलाय; पण तुम्ही मघाशी म्हणालात, की मुलाखतीतलं यश म्हणजे विविध घटकांचा संगम. त्याबद्दल आणखी खुलासा करा ना.’’

‘‘ठीक आहे,’’ मी म्हणालो ः ‘‘तुला मुलाखतीची तयारी करायची आहे हे नक्की; पण तू ती कशी करतेस, यावर मुलाखतीचा परिणाम अवलंबून असतो. सर्वप्रथम तुला तुझ्या पदवी परीक्षेत घेतलेल्या विषयांबाबत व्यवस्थित माहिती असली पाहिजे. मुलाखतींमध्ये एखादा उमेदवार मला सांगतो, की महाविद्यालयात शिकलेले विषय त्याला आता आठवत नाहीत, तेव्हा मला आश्‍चर्याचा धक्का बसतो.’’

‘‘का बरं? यात आश्‍चर्याचा धक्का बसावा असं काय आहे?’’ गीता म्हणाली, ‘‘तुम्ही आजवर वाचलेलं सगळं तुम्हाला तरी आठवतं का?’’ 

‘‘नाही,’’ मी कबुली दिली, म्हणालो ः ‘‘निदान मला तरी आठवत नाही. हे खरं आहे, की तपशील पुसट होत जातो; पण मुलाखत मंडळाला त्याचीही कल्पना असते. तुम्हाला संख्या आणि समीकरणं तोंडपाठ आहेत का यापेक्षाही तुम्ही त्या विषयातली सूत्रं आत्मसात केलेली आहेत का, हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करूनही त्याबद्दल तुम्ही अज्ञानी असाल, तर त्याकडं दयाळूपणे पाहिलं जात नाही.’’

‘‘पण एखाद्याला खरोखरच काही आठवत नसेल तर मग त्याला शिक्षाच होणार का?’’ शंकरनं निरागसपणे विचारलं. 

‘‘छान प्रश्न विचारलास,’’ म्हणालो ः ‘‘काही वेळा एखाद्याला जुन्या विषयांतलं काहीच आठवत नाही; पण मंडळाला त्याचीही कल्पना असते. उमेदवार मुलाखत देताना किती दडपणाखाली असतो, हे माहीत असल्यानं, अशा स्थितीत तुम्ही घाबरून जाऊ नये म्हणून ते मदत करतात. उमेदवारानंही अशा वेळी शांत बसणं, विचारांची जुळवाजुळव करण्यासाठी थोडा वेळ मागून घेणं, घोटभर पाणी पिऊन मनात उत्तर आठवण्याचा प्रयत्न करणं असे उपाय योजावेत...’’ 

‘‘पण तुम्हाला उत्तर खरोखरच ठाऊक नसेल तर काय करणार?’’ अभिजितनं विचारलं. 
‘‘तुम्हाला उत्तर आठवत नसेल किंवा ठाऊक नसेल तर सुरक्षित मार्ग म्हणजे परीक्षकांना प्रामाणिकपणे सांगावं ः ‘‘सर! माफ करा; पण मला हे उत्तर माहीत नाही.’’
‘‘बाप रे! म्हणजे तिथंच तुमच्या भवितव्याची वाट लागली,’’ अपर्णा दचकून उद्‌गारली. ‘‘उलटपक्षी मी तर म्हणतो, की तुम्ही खोटी उत्तरं देत राहिलात तर तुमची वाट लागते. कारण, मग परीक्षक मंडळ तुम्हाला आणखी प्रश्न विचारत जातं आणि तुमचा खोटेपणा उघड होतो. तशा स्थितीत तुम्हाला उत्तर तर देता येत नाहीच; पण तुमच्यात नैतिक धैर्याची कमतरता असल्याचा शिक्काही तुमच्यावर बसतो. त्याऐवजी ‘उत्तर येत नाही,’ असं तुम्ही स्पष्टपणे सांगितलंत तर परीक्षक मंडळाला इतर क्षेत्रांबाबत प्रश्न विचारण्याखेरीज पर्याय उरत नाही. लक्षात घ्या, लाज ही अज्ञानात नसते तर अज्ञान लपविण्यात असते. सत्य हाच या दोन्ही टोकांमधला जवळचा मार्ग असतो,’’ मी स्पष्ट केलं. 

इतक्‍यात कुणीतरी विचारलं ः ‘‘पण मग तंत्राचं काय? प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी एखादं विशिष्ट तंत्र आहे का?’’ 


हा प्रश्‍न जरा मिश्‍किलीनं घ्यायचं मी ठरवलं. मी म्हणालो ः ‘‘मित्रांनो! ‘ऍलिस इन वंडरलॅंड’ या कादंबरीत हाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं, याचं उत्तर आहे ः ‘सुरवातीपासून सुरवात करा, शेवट येईपर्यंत चालत राहा आणि मग थांबा!’’

‘‘विनोद करू नका. आम्हाला कळेल अशा शब्दांत सांगा,’’ गीता थोडी वैतागली. 
‘‘बरं बाई, तुला गंभीरपणे उत्तर देतो. प्रश्नांची उत्तरं देण्याचं एक तंत्र असतं. परीक्षक मंडळानं आपल्याला ज्या विषयावरचे प्रश्‍न विचारायला हवेत, अशी उमेदवाराची अपेक्षा असते, त्याच विषयाकडं संवादाची गाडी जो उमेदवार मोठ्या खुबीनं वळवू शकतो, तो उमेदवार चांगली मुलाखत देणारा ठरतो!’’ मी म्हणालो. 

‘‘हे अशक्‍य आहे,’’ कांचन उसळली. 

‘‘यात काही अशक्‍य नाही. समजा, मुलाखतीतला पहिलाच प्रश्न’’तुमच्या पदवी परीक्षेतले विषय कोणते’, असा आहे आणि असंही समजून चाला, की हे विषय राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि इतिहास आहेत. तुम्हाला त्यापैकी इतिहासाबद्दल उत्तम माहिती असेल तर तुम्ही प्रश्नाचं उत्तर कसं द्याल?’’ विचारले. 

‘‘मी थेटच विषयांच्या वर्णनापासूनच सुरवात करीन,’’ किमया म्हणाली. 
‘‘तू एकदम वर्णनच सुरू करशील?’’ मी आश्‍चर्यानं विचारलं. 
‘‘हो. दुसरा काही मार्ग आहे का?’’ तिनं विचारलं. 

‘‘अगं! इथंच तर तंत्र येतं! जर तुझा आवडता विषय इतिहास असेल आणि तू पहिल्या प्रश्नाचं उत्तर इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र अशा क्रमानं दिलंस तर शक्‍यता अशी असते, की दुसरा प्रश्न सगळ्या शेवटी उल्लेख केलेल्या विषयाबाबत म्हणजेच अर्थशास्त्रावरचा असेल. मन याच पद्धतीनं विचार करत असतं! त्यामुळं परीक्षकांनी तुम्हाला इतिहासावर प्रश्न विचारावेत, अशी तुमची इच्छा असल्यास पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात इतिहास या विषयाचा क्रम शेवटचा असू दे ! पुढच्या टप्प्यात समजा त्यांनी विचारलं, की तुम्ही कोणते विषय दिलेत, तर त्यातही इतिहासाचा क्रमांक मुद्दाम शेवटचा ठेवा.'' 

‘‘अरे! ही छान युक्ती आहे,’’ नीरज उत्साहानं उद्गारला, ‘‘पण ही युक्ती प्रत्यक्षात उपयुक्त ठरते का?’’ -मी म्हणालो ‘‘नक्कीच! मात्र मनात येणारी पहिलीच गोष्ट लगेच बोलून दाखवायची नसते, हे तंत्र यात अवलंबावं लागतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तर देताना घाई करू नका. थांबा, विचार करा आणि मनात उत्तराची मांडणी करा. तुम्ही ज्या पद्धतीनं उत्तराचा समारोप कराल त्यावरूनच मंडळ पुढचा प्रश्न विचारतं. हा एक खेळ समजून तुमच्या मित्रांशी आधीपासूनच खेळण्याचा प्रयत्न करा. लवकरच तुम्ही त्यात पारंगत व्हाल.’’ शंकर हा आमच्या गटातील बहुधा ‘चिरंतन निराशावादी’ असावा! झ्या स्पष्टीकरणानंतरही त्यानं शंका विचारली ः ‘‘सर ! हे सगळं ठीक आहे; पण मंडळाला एखाद्या उमेदवाराला अनुत्तीर्ण करायचं असेल तर ते त्याला मुलाखतीदरम्यान जाणीवपूर्वक हैराण करतील ना?'' 

‘‘अरे! असा गैरसमज करून घेऊ नकोस. असं घडलंच तर खात्री बाळग, की तू चांगली कामगिरी करत आहेस आणि सुरवातीचे अडथळे तू पार केलेले आहेस. आश्वासक उमेदवार दडपणात असताना कशी प्रतिक्रिया देतात, हे अजमाविण्यासाठी मंडळ तुमच्या संयमशक्तीची कसोटी पाहणारे प्रश्‍न तुम्हाला जाणूनबुजून विचारू शकतं. उमेदवार दडपणामुळं शरणागती पत्करतो, आक्रमक बनतो की शांतपणे युक्तिवाद करतो, हे त्यांना बघायचं असतं. एकदा एका उमेदवारानं मला बरोबर उत्तर दिलं होतं; पण ‘ते चूक आहे’ असं मी त्याला सांगितलं. मला वाटले, की तो गोंधळून जाईल; पण आनंदाची गोष्ट ही, की तो उमेदवार त्याच्या उत्तरावर ठाम राहिला. स्वतःच्या ज्ञानाशी प्रामाणिक राहत त्यानं स्वतःचं उत्तर बरोबर असल्याची ग्वाही दिली. मात्र ‘मी पुन्हा एकदा विषयाचा अभ्यास करून कळवीन,’ अशी नम्र पुस्तीही त्यानं जोडली. हेच ते परिपूर्ण पद्धतीचं वागणं!’’ मी स्पष्ट केलं. ‘‘सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती?’’ कुणीतरी विचारलं. 

मी म्हणालो ः ‘‘तुमची चातुर्य, तुमची शहाणीव जागती ठेवणं, हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. यशाचा महत्त्वाचा घटक म्हणजे तणावाखाली असतानाही शांत राहणं आणि विवेकबुद्धी न गमावणं. एक अनुभव सांगतो, पूर्वीच्या काळात आतासारखी स्पर्धात्मक प्रणाली नव्हती, तेव्हा लेखी आणि तोंडी अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्‍यक होतं आणि तेही प्रत्येकात किमान ६० टक्के गुण मिळवून. लेखी परीक्षेत गुणवत्ता यादीत माझा पाचवा क्रमांक होता. मुलाखतीत मला मंडळाच्या अध्यक्षांनी विचारलं, ‘‘तुम्ही मेयो कॉलेजमध्ये शिकला आहात, मग तुम्हाला लॉर्ड मेयो कोण होते, हे ठाऊक आहे का?’’ उत्तर माहीत होतं. म्हणालो ः‘‘लॉर्ड मेयो हे भारताच्या गव्हर्नर जनरल्सपैकी एक होते.'' त्यावर अध्यक्षांचा पुढचा प्रश्न होता, की ‘‘ते कसे मरण पावले?’’ 

त्याची मला काही कल्पना नसल्यानं मी उत्तरावर विचार करण्यासाठी ‘‘मला एका मिनिटचा अवधी द्याल का?’’ अशी विनंती केली. ती मान्य झाली. त्यानंतर मी एक-दोन मिनिटांनी उत्तर दिलं, की लॉर्ड मेयो यांनी आत्महत्या केली होती. अध्यक्षांनी माझ्याकडं किंचित संभ्रमानं बघितलं आणि ते म्हणाले, ‘‘तुमचं उत्तर बरोबर आहे; पण विचार करण्यासाठी तुम्ही वेळ का मागून घेतलात?’’ त्यावर मी उत्तरलो ः ‘‘सर! खरं तर मला याचं उत्तर माहीत नव्हतं; पण ‘‘लॉर्ड मेयो कसे मरण पावले?’’ असं तुम्ही विचारल्यानं, ते नैसर्गिकरीत्या मरण पावले नसावेत, असा अंदाज मी बांधला. हा अंदाज बांधल्यानंतर त्या स्थितीत दोनच शक्‍यता उरतात. एकतर त्यांनी आत्मघात करून घेतला असावा किंवा कुणीतरी त्यांना मारलं असावा. ‘‘आत्महत्या की खून?’’ मी मनातल्या मनात ‘नाणेफेक’ केली आणि त्याचा कौल ‘आत्महत्या’ असा आला! यावर अध्यक्षांनी स्मित केलं आणि ते मंडळाला म्हणाले ः ‘‘अगदी असाच अधिकारी मला हवा होता.’’ अंतिम निकाल जाहीर झाले तेव्हा मी गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली होती.’’  यावर दुर्गानं विचारलं ः ‘‘सर ! तुम्ही यशस्वी झालात खरे; पण तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेता, जर तुम्ही अपयशी झाला असतात तर, तर त्यामुळं काही फरक पडला असता का?  माझे आई-वडील खूप गरीब आहेत आणि मला शिकविण्यासाठी त्यांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मोठा त्याग केला आहे. आता सर्व काही माझ्यावर अवलंबून आहे. मला कोणत्याही स्थितीत अपयश पत्करायचं नाही...'' दुर्गाचा स्वर हळवा झाला होता आणि तिच्या या मताशी गटातले इतरही सगळेजण सहमत झाले. भरून आलेल्या डोळ्यांनी दुर्गा मला म्हणाली ः ‘‘सर, मी खूपच मेहनत केली आहे. मी या परीक्षेत यशस्वी होईन ना हो?’’  तिच्याकडं पाहिलं... तिच्या प्रश्नानं माझंही हृदय द्रवलं. या मुलीला धैर्याची गरज होती. तिला कसं सांगावं, की बाळा देवही कधी कधी अशी थट्टा करतो, की दृढनिश्‍यचानंतर आणि मेहनतीनंतरही अपयश आणि निराशेचं फळ पदरात पडते. त्यातून अपयश ही यशाचीच दुसरी बाजू आहे. 

एका प्रयत्नात उद्दिष्ट साध्य झालं नाही तर खचून न जाता पुन्हा आक्रमक पवित्रा घ्यावा लागतो. पुन्हा जोमदार प्रयत्न करावे लागतात. ओणवं होत, बाह्या सरसावून पुढच्या शर्यतीसाठी सज्ज व्हावं लागतं. सध्याच्या वयात मला कळून चुकलं आहे, की जीवन हे एक ‘सातत्य’ आहे आणि यश अथवा अपयश हे त्या जीवनप्रवासातले केवळ मैलाचे दगड असतात. या प्रक्रियेत अंतिम असं काहीच नसतं. एकच गोष्ट अंतिम असते आणि ती म्हणजे सातत्य राखण्याची इच्छा! आणि त्याच्या जोडीला हवा उत्साह आणि स्वतःवरचा विश्वास न गमावता वाटचाल करण्याचं धैर्य! 

मात्र हे सगळं मी दुर्गाला समजावून सांगू शकत नव्हतो. कारण या मनःस्थितीत तिला माझे शब्द रिकामे आणि पोकळ वाटू शकले असते. कधी कधी साधा मानवी स्पर्श हा हजारो शब्दांपेक्षाही अधिक आश्वासक असतो. मी दुर्गाजवळ गेलो. तिचे हात हातात घेतले. जमलेल्या इतरांनीही एका मागोमाग एक असं माझं अनुकरण केलं. ‘‘सर! आम्हाला आशीर्वाद द्या,’’  कुणातरी म्हणाले. मान झुकव, म्हणालो ः ‘‘मित्रांनो! मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही. कारण, सगळ्यांच्याच जीवनात आकस्मिक धनलाभ नसतो! नशीब आपल्याला इतक्‍या सहजासहजी कोणतीच गोष्ट देत नाही. कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, हेच जीवन आपल्याला बजावत असतं. तुम्ही कष्ट करून जे कमावता, तेच तुम्हाला मिळतं आणि तेच तुमचं असतं. तुम्ही भरपूर आणि कठोर मेहनत केलीत तर नशीबही तुम्हाला तशीच साथ देईल. तुम्ही इथवरचा टप्पा गाठण्यासाठी अडथळ्यांचा डोंगर पार केला आहे आणि सुंदर भविष्य घडवण्यासाठी सज्ज झाला आहात. त्यामुळं मी आशीर्वादस्वरूप ही प्रार्थना म्हणतो. दुर्गाकडं बघत मी मुलांना संबोधत म्हणू लागलो. वही जहॉं है तेरा जिस को तू करे पैदा 
यह संग-ओ- खिश्‍त नही, 
जो तेरी निगाह में है । 

धैर्यानं पुढं जा आणि लक्षात ठेव, तू हे जे जग पाहत आहेस, ते तुझं जगच नाही... तू तुझ्या प्रयत्नांनी जे निर्माण करशील, तेच तुझं जग आहे! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com