असं बदललं ‘फेसबुक’ (योगेश बनकर)

रविवार, 4 फेब्रुवारी 2018

 

चौदा वर्षांपूर्वी एका महाविद्यालयापुरतं मर्यादित असलेलं फेसबुक आज जगभरातल्या अनेकांना जोडण्याचं साधन बनलं आहे. या प्रवासात फेसबुकमध्ये झालेल्या बदलांवर, वेगवेगळ्या फीचर्सवर एक नजर.

 

 

चौदा वर्षांपूर्वी एका महाविद्यालयापुरतं मर्यादित असलेलं फेसबुक आज जगभरातल्या अनेकांना जोडण्याचं साधन बनलं आहे. या प्रवासात फेसबुकमध्ये झालेल्या बदलांवर, वेगवेगळ्या फीचर्सवर एक नजर.

 

अन्न, वस्त्र, निवारा आणि ‘फेसबुक’ या मानवाच्या चार मुलभूत गरजा आहेत, असा नवा धडा आता शिकवला जाईल, इतका फेसबुक आपल्यासाठी अविभाज्य भाग बनला आहे. फेसबुक केवळ ‘व्यक्त होण्याचं एक माध्यम’ इतकंच आज मर्यादित राहिलेलं नसून, आपल्या आसपासचं जग त्यानं नकळत व्यापलं आहे. २००४ मध्ये एका महाविद्यालयापुरतं मर्यादित असलेलं फेसबुक आज जगभरातल्या कोट्यवधी लोकांना जोडण्याचं साधन बनलं आहे. विशेष म्हणजे १४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मार्क झुकेरबर्गनं ‘फेसबुक’ सुरू केलं होतं..

आज जगातल्या महासत्तांच्या महत्त्वाच्या निवडणूक प्रचारातदेखील फेसबुकचा मोठा वाटा आहे. जसजसा याचा वापर वाढत गेला, त्यानुसार फेसबुकनं स्वतःच्या कामात, डिझाईनमध्ये बदल केले. एखाद्याशी संवाद साधणं, स्वतःची मतं मांडणं, व्यक्त होणं या सर्वांसाठी एक माध्यम म्हणून आज फेसबुक समोर आलं आहे. आपले मित्र फेसबुकवर शोधणं, त्यांचं अपडेट्‌स बघणं, फोटो-व्हिडिओ शेअर करणं याच्याही पलीकडे आज फेसबुकवर बऱ्याच गोष्टी होतात. सुरवातीला डेस्कटॉपवर जास्तीत जास्त चालणारं फेसबुक आज ॲपमुळं प्रत्येक मोबाईलमध्ये घर करून आहे.
गेल्या १४ वर्षांच्या प्रवासात फेसबुकनं स्वतःमध्ये बरेच बदल केले. त्यांच्या या बदलांनी आपलंही आभासी जग बदलत गेलं. या बदलाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर फेसबुकनं युजर्ससाठी आणलेली नवीन फिचर्ससुद्धा या प्रवासात तितकीच महत्त्वाची ठरली.

लाइक बटन
फेसबुक सुरू झालं, तेव्हा ‘लाइक’चं बटन नव्हतं. सुरवातीला एखाद्या पोस्टवर प्रतिक्रिया द्यायची झाली, तर ’कॉमेंट’ हा एकच पर्याय होता. त्यानंतर जवळपास तीन वर्षांनी म्हणजेच २००७ मध्ये ‘फेसबुक’नं ‘लाइक’ हे फिचर आणलं. आता या ‘लाइक’ची जागा सात वेगवेगळ्या इमोजींनी घेतली आहे. याच्या साह्यानं युजर्स एखाद्या पोस्टवर रिॲक्‍ट होऊ शकतात.

न्यूज फीड
२००६ मध्ये फेसबुकने ‘मिनीफीड’ सुरू केलं. तुमच्या ‘फ्रेंडलिस्ट’मध्ये असलेल्या व्यक्तींचेच अपडेट्‌स या ‘मिनीफीड’वर पाहता येत होते. याचंच रूपांतर नंतर ‘न्यूजफीड’मध्ये झालं. आजचे ‘न्यूजफीड’ हे त्यावेळच्या ‘मिनीफीड’पेक्षा कितीतरी बदललेलं आहे. आपल्या आवडीच्या पोस्ट्‌स, न्यूज, फोटो, व्हिडिओ अशा अनेक गोष्टी या ‘न्यूजफीड’वर दिसतात. ‘न्यूजफीड’च्या ‘अल्गोरिदम’मध्ये वेळोवेळी बदल होत गेले. आपण काय पाहतो, वाचतो किंवा शेअर करतो त्यानुसार आपल्या आवडीचे अपडेट्‌स न्यूजफीडमध्ये दिसतात.

टाइमलाइन
२०११ मध्ये फेसबुकनं आपलं डिझाइन पूर्ण बदललं. प्रोफाइल फोटोसोबतच कव्हर फोटोचा नवीन ऑप्शन या डिझाइनमध्ये देण्यात आला. फेसबुक टाइमलाइनमुळे वैयक्तिक माहितीपेक्षा युजर्स काय पोस्ट करतात, शेअर करतात याला प्राधान्य दिलं गेलं.

फेसबुक लाइव्ह
स्मार्टफोनची वाढती संख्या आणि सहज उपलब्ध होत असलेलं इंटरनेट यामुळं फेसबुकवर फोटो, व्हिडिओ शेअर करण्याचं प्रमाण वाढत गेलं. मोबाईलमध्ये फेसबुकचं ॲप असेल, तर ‘काय घडतंय’ हे दाखवण्याची सुविधा फेसबुकनं या फीचरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. या फिचरला मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळाला. पारंपरिक माध्यम असलेला ‘इलेक्‍टॉनिक मीडिया’देखील या फीचरचा वापर करून फेसबुकवरच त्यांचे कार्यक्रम ‘लाइव्ह’ दाखवायला लागला.

इन्स्टंट आर्टिकल
तीन वर्षांपूर्वी फेसबुकनं हे फिचर मोबाईल ॲप युजर्ससाठी उपलब्ध करून दिलं. तोपर्यंत जगभरातले विविध माध्यमसमूह फेसबुकवर आले होते. वेगवेगळ्या स्टोरीज फेसबुकवर लिंकद्वारे शेअर केल्या जातात. एखादी लिंक ओपन करायची असल्यास पूर्वी वेगळ्या ब्राऊजरमध्ये ओपन करावी लागत असे आणि त्यासाठी लागणारा वेळसुद्धा जास्त होता. फेसबुकच्या ‘इन्स्टंट आर्टिकल’मुळं अगदी क्षणार्धात एका क्‍लिकवर एखादं आर्टिकल ओपन होतं. अल्पावधीतच हे फिचर लोकप्रिय झाले. या ‘इन्स्टंट आर्टिकल्स’मध्ये जाहिराती देऊन पैसे कमवण्याची संधीही फेसबुकनं उपलब्ध करून दिली आहे.

Web Title: yogesh bankar technodost article in saptarang