दिशा परिवर्तनाची (२०११ ते २०२२) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Bomb Blast

देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, जैविक, क्रीडा, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रांत २०११ ते २०२२ या अकरा वर्षांत परिवर्तनाची मोठी लाट आली.

दिशा परिवर्तनाची (२०११ ते २०२२)

देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, जैविक, क्रीडा, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रांत २०११ ते २०२२ या अकरा वर्षांत परिवर्तनाची मोठी लाट आली. या लाटेत पारंपरिक राजकीय प्रक्रियेची जशी उलथापालथ झाली, तशीच वर्चस्वशाली जातींनीही आरक्षणासाठी उठवलेल्या आवाजातून सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला गती मिळाली. कोरोना उद्रेकामुळे अर्थव्यवस्थेला न भूतो न भविष्यती असे भयंकर हादरे बदले. त्यातून तंत्रज्ञानाने सावरले आणि आपल्याला क्रिकेटचा विश्वकरंडकही याच दरम्यान मिळाला.

‘कोणतीही व्यवस्था एका रात्रीत बदलत नाही. ती बदलण्याची प्रक्रिया खूप आधीपासून सुरू झालेली असते. प्रत्यक्षात बदल होतो, त्या वेळी ही प्रक्रिया दृश्‍यस्वरूपात पुढे येते,’ हा समाजशास्त्रीय सिद्धांत या दशकाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला जाणवतो. मुंबईवर झालेला हल्ल्याच्या कंगोऱ्याने या दशकाची सुरुवात झाली. देश, देशातील महानगरे आणि तेथील नागरिक खरेच सुरक्षित आहेत का, हा प्रश्न प्रत्येकाला पडू लागला होता. नेमकी त्याच वेळी ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’ (यूपीए २) सरकारच्या काळातील एक-एक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली. भ्रष्टाचार रोखण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे उपोषण दिल्लीमध्ये सुरू झाले व त्याला जनआंदोलनाचे स्वरूप मिळाले. काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’च्या विरोधात एकाच वेळी राजकीय आणि सामाजिक ताकद एकवटली जात होती. याची सुरवात २०११मध्ये झाली. त्यातून काँग्रेस पक्षाने गेली साठ वर्षे (अपवाद सहा वर्षांच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारचा) देशाच्या सत्तेवर मजबूत ठेवलेली पकड सैल झाली. हा या दशकातील पहिला टप्पा ठरतो.

भारतीय राजकारणाला कलाटणी करणारी २०१४ची लोकसभा निवडणूक. त्यातील २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरही भारतीय जनता पक्षाचा (भाजप) सुरू असलेला झंझावात हा दुसरा टप्पा मानावा लागतो. या अकरा वर्षांतील तिसरा भाग, हा कोरोना उद्रेकाचा आहे. संपूर्ण जगात अभूतपूर्व अशी कोरोना विषाणूंची साथ पसरली होती. ही साथनियंत्रित करण्यासाठी दोन लॉकडाउन करावे लागले. त्यात मोठा आर्थिक फटका बसला. देशाने १९९१मध्ये मुक्त अर्थव्यवस्था, जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे धोरण स्वीकारले होते. त्याला बरोबर ३० वर्षे होत असताना कोरोना उद्रेकामुळे भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा नाजूक वळणावर येऊन थांबली. याचा ऊहापोह या भागात करता येतो. कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे साथीचा प्रभाव कमी झाला. पुन्हा ‘न्यू नॉर्मल’ होऊ लागले. मात्र, राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत आणि उद्योगांपासून ते तंत्रज्ञापर्यंत प्रत्येक घटकावर याचा दूरगामी परिणाम झालेला दिसतो. या ‘पोस्ट कोव्हिड’ प्रभावाबद्दलची चर्चा चौथा टप्प्यात केली आहे.

काँग्रेसची सत्तेची पकड सैल (२०११ ते २०१४)

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ‘टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा भूखंड, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा गैरव्यवहार अशा भ्रष्टाचाराची प्रकरणे २०१०मध्ये बाहेर येऊ लागली. या गैरव्यवहारांना रोखण्यासाठी सशक्त लोकपाल असावे, त्यासाठी संसदेने कायदा करावा, अशी मागणी करत अण्णा हजारे यांनी लाक्षणिक उपोषण केले. मात्र, केंद्राने केलेल्या विधेयकाची व्याप्ती वाढविण्याच्या मागणीसाठी दीर्घ उपोषण केले. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. ही २०१४च्या राजकीय बदलाची सुरवात होती. त्या वेळी संसद विरुद्ध भ्रष्टाचारात होरपळली जाणारी सामान्य जनता असे चित्र निर्माण झाले होते. अर्थात, त्यासाठी आतासारखा स्मार्ट फोन आणि सोशल मीडिया नव्हता. पण, तरीही आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद वाढत होता. मात्र, या आंदोलनातील प्रमुख नेत्यांमध्ये एकवाक्यता नव्हती. त्याचे दृष्टिकोन वेगवेगळे होते. या आणि अशा काही कारणांनी हे आंदोलन पुढे शांत झाले. पण, त्यातून २ ऑक्टोबर २०१२ रोजी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी या नवीन राजकीय पक्षाचा जन्म झाला.

या आंदोलनामुळे काँग्रेस नेतृत्वाकडे बोट दाखविले जाऊ लागले होते. त्याच वेळी मुंबई पुन्हा (२०११) बॉम्बस्फोटांनी हादरली. त्यामुळे भ्रष्टाचाराबरोबरच राष्ट्रीय सुरक्षितता हा मुद्दा विरोधकांना मिळाला. या टप्प्याच्या शेवटच्या वर्षांमध्ये गॅस दरवाढ झाली. डाळी महागल्या. पेट्रोलच्या किमती वाढू लागल्या. सामान्यांच्या स्वप्नातील घर त्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले. या सर्वांचा परिणाम मध्यमवर्गीयांची मानसिकता काँग्रेसप्रणीत सरकारच्या विरोधात गेली.

भाजपचा झंझावात (२०१४ ते २०१९) :

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे वर्ष म्हणजे २०१४. या निवडणुकीमध्ये भाजपला प्रथमच स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळविता आले. बरोबर ३० वर्षांनंतर देशातील एकाच राजकीय पक्षाला निर्विवादपणे बहुमताचा आकडा ओलांडला आला होता. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची मोठी लाट देशभरात उसळली. त्यातून पुढील काळातील राजकारणाचे स्वरूप बदलले. त्यामुळे राजकीय प्रक्रियेला कलाटणी देणारी ही निवडणूक ठरली.

महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे पंधरा वर्षे सलग असलेली सत्ता भाजपकडे गेली. युती किंवा आघाडी न करता स्वतंत्र निवडणुका लढल्या. मात्र, निवडणुकीनंतर युती करून भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. या निवडणुकीने महाराष्ट्राला नवे वळण मिळाले.

सर्जिकल स्ट्राइक

१८ सप्टेंबर २०१६ रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारत-पाकिस्तान ताबा रेषेजवळील उरी येथे तैनात जवानांच्या तुकडीवर आत्मघातकी हल्ला केला. त्यात १९ जवान शहीद झाले. भारतात सत्ता बदल झाल्यानंतरचा हा पहिला मोठा हल्ला होता. त्यामुळे त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी २८-२९ सप्टेंबरला भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केला. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करून हे तळ उद्‌ध्वस्त केले.

बालाकोट एअरस्ट्राइक

भारतात लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. याच दरम्यान १४ फेब्रुवारी २०१९ रोजी काश्मीरच्या पुलवामाजवळ केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनांच्या ताफ्यावर हल्ला झाला. त्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर दोनच आठवड्यात भारतीय हवाई दलाने रात्री नियंत्रण रेषा ओलांडून बालाकोट शहरातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला केला. त्यासाठी ‘मिराज २०००’ या लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला.

कॅशलेस सोसायटीची सुरुवात

पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६च्या रात्री आठ वाजता पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्या. काळा पैसा, दहशतवाद्यांना पुरविण्यात येणारा पैसा, अमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारात हे पैसे वापरले जात असल्याने हा निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले. चलनातील ८६ टक्के रकमेचे चलन अचानक बंद झाले. शहरात बँकांच्या एटीएम समोर रांगा लागल्या. ग्रामीण भागातील बी-बियाणे, खते, दूध, फळभाज्या, मजुरी हे सर्व व्यवहार रोख रकमेतून होत असल्याने ते ठप्प झाले. मात्र, त्यामुळे भारत हा कॅशलेस सोसायटीच्या दिशेने एक घर पुढे सरकला. त्याचा फायदा २०२०मध्ये कोरोना उद्रेकात झाला.

मोदी २.०

‘अब की बार तीन सौ पार’ म्हणत २०१९ मध्ये १७व्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजपने ३०३ जागांवर निर्विवाद विजय मिळविला. सलग दुसऱ्या वेळी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारपुढे बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, अर्थव्यवस्थेला बसणारे धक्के ही आव्हाने होतीच. पण, ६० वर्षांत बिघडलेले गणित ६० महिन्यांत सुधारू शकत नाही. त्यासाठी पुढील ६० महिने द्या, याला मतदारांनी पुन्हा प्रतिसाद दिला.

महाराष्ट्रात राजकारणाचा नवा प्रयोग

विधानसभा निवडणूक निकालातून बहुपक्षीय व सत्तास्पर्धा पुन्हा पुढे आली. यावेळी भाजप-सेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली. त्यात भाजपला १६४ पैकी १०५ जागा मिळाल्या. तो सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, निवडणूक निकालानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. मात्र, हे सरकार स्थिरस्थावर होत असतानाच कोरोना उद्रेक झाला.

कोरोना २०२० ते २०२१

चीनमध्ये कोरोना या फॅमिलीतील कोव्हिड-१९ या नव्या विषाणूंचा उद्रेक २०१९च्या शेवटी सुरू झाला. चीनमधील वुहान शहरात या आजाराचे रुग्ण आढळले. त्यानंतर ही साथ वाढली. जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोना उद्रेक सुरू झाला होता. त्यात भारताला स्वतःला यापासून वेगळे ठेवणं अवघड होऊ लागले होते. जानेवारी २०२०मध्ये देशातील पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. महाराष्ट्रात ९ मार्चला कोरोनाच्या पहिल्या दोन रुग्णांचे निदान झाले. त्यानंतर राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आजाराचे रुग्ण सापडू लागले.

जनता कर्फ्यू आणि लॉकडाउन

मोदी सरकारने २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून पहिले लॉकडाउन केले. २१ दिवसांचे हे लॉकडाउन होते. पहिले लॉकडाऊन १४ एप्रिल २०२० रोजी संपणार होते. पण, त्या वेळी रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला. तीनशेच्यावर मृत्यू झाले. त्यामुळे लॉकडाउनचा दुसरा टप्पा १५ एप्रिल ते ३ मे असा १९ दिवसांचा जाहीर करण्यात आला. मात्र रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नव्हती. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या, आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण, रुग्णालयाबाहेर रांगा लागल्या, उपचारासाठी खाट मिळत नव्हती, ऑक्सिजन, जीवनावश्यक औषधे, मास्क, सॅनिटाझर याचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा १४-१४ दिवसांचे दोन वेळा लॉकडाऊन करण्यात आले. अशा प्रकारे ८६ दिवसांचे लॉकडाउन देशात झाले. ही कोरोनाची पहिली लाट ठरली.

दुसऱ्या लाटेचे तांडव

मार्च-एप्रिल २०२१पासून पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढू लागली. या वेळी एकेका कुटुंबातील पाच-सहा जणांना कोरोना होऊ लागला. हे त्याचं वेगळेपण होते. त्यामुळे पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वेगाने वाढत होती. पहिल्या लाटेपेक्षा या लाटेत रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण वाढले होते. या लाटेत कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट होता. रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी वाढली होती. उत्पादित होणारा ऑक्सिजन आणि मागणी यांची सांगड घालताना प्रशासनाची मोठी दमछाक होत होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिसने धुमाकूळ घातला.

ओमिक्रॉनची तिसरी लाट

दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाप्रतिबंधक लस उपलब्ध झाली होती. सुरवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असणारे रुग्ण, अशा पद्धतीने टप्प्या-टप्प्याने लहान मुलांपर्यंत लसी पुरवठा करण्यात येत होता. याच दरम्यान या वर्षी जानेवारीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली. त्यावेळी ओमिक्रॉन हा व्हेरियंट होता. मात्र, त्याचा संसर्ग वेगाने होत असला तरीही त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत कमी होती. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आला नाही.

कोरोनानंतरचे वेगवान राजकीय बदल (२०२२)

कोरोनानंतर पुन्हा नव्याने जग खुले झाले. संसर्ग कमी झाला. लसीकरण वाढले. मास्कची सक्ती काढून टाकण्यात आली. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. त्याची सुरुवात राज्यसभा निवडणुकीपासून झाली. राज्यातून सहा जागांसाठी निवडणूक झाली. भाजपचे दोन, शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एक उमेदवार विजयी होणार हे निश्चित होते. मात्र, भाजपला तीन जागा मिळाल्या. सहाव्या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूरचे संजय पवार यांनी उमेदवारी दिली. तर, भाजपने कोल्हापूरच्याच धनंजय महाडीक यांनी तिकीट दिले. यात महाडिक विजयी झाले. महाविकास आघाडीला भाजपने दिलेला हा पहिला धक्का होता. राज्यसभेप्रमाणेच संख्याबळ नसतानाही भाजपने विधान परिषदेवर बाजी मारली. दहा जागांसाठी ही निवडणूक झाली. निकालात अनपेक्षित कलाटणी मिळाली. सुरक्षित मानले जाणारे चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले. पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपने विजय खेचून आणला.

सरकार अंतर्विरोधानेच पडेल...

‘आम्ही सरकार पाडणार नाही. हे सरकार त्यांच्या अंतर्विरोधामुळेच पडेल,’ असे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर रात्री माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर त्याच रात्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले.’ शिंदे यांनी त्यांनी शिवसेनेविरोधात बंड केले. ते ४० आमदार घेऊन सुरुवातीला सुरत आणि नंतर गुवाहटीला गेले. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला. ते परत मातोश्रीवर आले. मात्र, बंडखोर आमदार शिवसेनेकडे परत फिरकले नाहीत. त्यामुळे अल्पमतात आलेल्या ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला. त्यानंतर तातडीने फडणवीस यांनी सत्तेवर दावा सांगितला. शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेवरचा दावा, धनुष्यबाणावर हक्क, अपात्रते बद्दल युक्तिवाद आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. एकच प्रकरणात विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, मुख्यमंत्री, पक्षांतर्गत कुरघोड्या याचा पेच गेल्या ७५वर्षांच्या देशाच्या इतिहासात प्रथमच निर्माण झाला.

घटनाक्रम

२०११

 • ७ जानेवारी : संयुक्त पुरोगामी आघाडीतील (यूपीए) घटक पक्षांकडून ‘२ जी स्कॅम’ आणि ‘बोफोर्स’ प्रकरणात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना निवेदन.

 • १२ जानेवारी : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (सीडब्ल्यूजी) घोटाळा प्रकरणातील भ्रष्टाचार शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची प्राथमिक माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दिली.

 • २४ जानेवारी : प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित भीमसेन जोशी यांचे निधन.

 • ३ फेब्रुवारी : माजी दळणवळण मंत्री ए. राजा यांना ‘२ जी स्पेक्ट्रम’ प्रकरणात अटक

 • २१ फेब्रुवारी : मुंबईवरील हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानमधील दहशतवादी अजमल आमीर कसाब याच्या फाशीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम.

 • १ मार्च : गोध्रा हत्याकांडात दोषी ठरलेल्या अकरा आरोपींना अहमदाबाद विशेष न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली.

 • २ एप्रिल : भारताने २८ वर्षांनी एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.

 • ५ एप्रिल : लोकपाल विधेयकासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषण केले. केंद्राने त्यानंतर लोकपाल विधेयकात सुधारणा केल्या. मात्र, त्याची व्याप्ती आणि कठोरता वाढविण्याच्या मागणीसाठी १६ ऑगस्टपासून दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावर उपोषणाला सुरवात केली. २८ ऑगस्टला आंदोलन मागे.

 • १३ मे : पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे सरकार ३४ वर्षांनंतर गडगडले.

 • १३ जुलै : मुंबई पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरली. ओपेरा हाऊस, झवेरी बझार आणि दादर येथे हे स्फोट झाले.

२०१२

 • २ फेब्रुवारी : देशात गाजलेल्या ‘टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील १२२ परवाने रद्द.

 • १६ फेब्रुवारी : सचिन तेंडुलकरचे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील ४९वे शतक पूर्ण केले. हा क्रिकेटच्या इतिहासातील विक्रम ठरला.

 • ४ जुलै : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श प्रकरणात गुन्हा दाखल.

 • २७ ऑगस्ट : कोळसा खाण गैरव्यवहारमुळे केंद्र सरकार कोंडीत अडकले.

 • २९ ऑगस्ट : सर्वोच्च न्यायालयाकडून कसाबच्या फाशीची शिक्षा कायम.

 • २ ऑक्टोबर : अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष स्थापन.

 • २१ नोव्हेंबर : पुण्याच्या कारागृहात कसाबला फाशी देण्यात आली.

२०१३

 • ऑगस्ट : सुरक्षाविषयक भारताचा पहिला जी-सॅट उपग्रह प्रक्षेपित

 • १३ सप्टेंबर : भारतीय जनता पक्षातर्फे नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली.

 • १३ : निर्भया प्रकरणातील आरोपींना दिल्ली उच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा.

 • ५ नोव्हेंबर : भारतीय अवकाश संशोधन संघटनेतर्फे (इस्रो) मंगळयान ही मंगळवरील भारताची पहिली मोहीम सुरू झाली. श्रीहरिकोटा येथून हे यान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले.

 • १४ नोव्हेंबर : सचिन तेंडुलकर क्रिकेकटमधून निवृत्त.

२०१४

 • १ जानेवारी : लोकपाल विधेयकास राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाले.

 • ७ एप्रिल ते १२ मे : देशातील १६वी सार्वत्रिक निवडणूक नऊ टप्प्यांमध्ये या दरम्यान झाली. या निवडणुकीत भाजपचा अभूतपूर्व विजय.

 • १५ ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची १५ वर्षांपासूनची आघाडी संपली तर, भाजप आणि शिवसेना यांचीही २५ वर्षांची युती या निवडणुकीत तुटली.

२०१५

 • १ जानेवारी : नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना.

 • ७ फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा विजय.

२०१६

 • १३ जुलै : मराठा क्रांती मूक मोर्चांची सुरुवात.

 • १८ सप्टेंबर : काश्मीरमधील उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर झालेला हा मोठा हल्ला होता. यात यात १९ जवान शहीद झाले.

 • २८ सप्टेंबर : उरी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

 • ८ नोव्हेंबर : या दिवशी मध्यरात्रीपासून चलनातून ५०० व १००० रुपयांचा नोटा बंद करण्यात आल्या.

 • २५ नोव्हेंबर : वस्तू व सेवा कर (जीएसटी) २०१६ मध्ये लागू करण्याचा निर्णय

२०१७

 • १५ फेब्रुवारी : श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून ‘पीएसएलव्ही-सी ३७’ प्रक्षेपणयान प्रज्वलित. त्याच्या साहाय्याने १०४ उपग्रह नियोजित कक्षेत अचूकपणे सोडले.

 • २२ सप्टेंबर : देशातील पहिल्या इलेक्ट्रिक बस सेवेची हिमाचल प्रदेशमध्ये सुरवात. ही बस सेवा कुलू-मनाली-रोहतांग खिंड या मार्गावर सुरू करण्यात आली.

२०१८

 • २८ नोव्हेंबर : बहुप्रतीक्षित मराठा आरक्षणाला विधानसभा व विधान परिषदेत मंजुरी.

२०१९

 • मे : भारताच्या १७व्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ३०३ जागा मिळाल्या.

 • ५ ऑगस्ट : जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द.

 • २८ नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. ते राज्याचे २९वे मुख्यमंत्री ठरले.

 • ३१ डिसेंबर : चीनमध्ये वुहान शहरात नवीन कोरोना विषाणूचा उद्रेक घोषित.

२०२०

 • २१ जानेवारी : चीनमध्ये नव्याने आलेल्या कोरोना विषाणूंबद्दल राज्यात सतर्कतेचा इशारा. जीन, जपान, थायलंड, दक्षिण कोरिया येथून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरू.

 • २७ : देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला.

 • ९ मार्च : राज्यात कोरोनाचे पहिले दोन रुग्ण पुण्यात आढळले.

 • २५ मार्च : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर.

 • ५ ऑगस्ट : अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते.

 • सप्टेंबर : लॉकडाउननंतर टप्प्या-टप्प्याने व्यवहार पूर्ववत करण्यास सुरुवात.

२०२१

 • जानेवारी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरवात. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिचे डोस आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर यांना देण्यात येऊ लागले.

 • फेब्रुवारी : उत्तराखंडमध्ये महापूर

 • मार्च-एप्रिल : कोरोनाचा डेल्टा व्हेरियंटचा उद्रेकाला राज्यात सुरवात. ही कोरोनाची दुसरी लाट ठरली.

 • मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बऱ्या होणाऱ्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग.

 • ऑक्टोबर : एअर इंडियाचा हिस्सा टाटांकडून खरेदी.

२०२२

 • ८ जानेवारी : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर.

 • २१ जानेवारी : दिल्ली येथील इंडिया गेट गेल्या ५० वर्षांपासून सतत प्रज्वलित असणारी ज्योत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा भाग असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलीन.

 • २१ जून : महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे पक्षाविरोधात बंड.

 • २९ जून : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा.

 • ३० जून : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची शपथ.

Web Title: Yogiraj Prabhune Change Of Direction Social Politics Economics Corona Bjp Wave Lockdown Omicron Surgical Strike Mumbai Bomb Blast

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..