सातारा : नगरपालिकांत ‘खुले राज’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Municipality

सातारा : नगरपालिकांत ‘खुले राज’

सातारा : सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमधील २११ नगरसेवकपदांच्‍या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आज पार पडली. ओबीसी आरक्षणाशिवाय लढत असल्याने यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा सर्वसाधरण व सर्वसाधरण महिला या दोन्ही प्रवर्गासाठी तब्बल १८० जागा आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच पालिकांमध्ये ‘खुले राज’ येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नेत्यांच्या प्रभावाऐवजी प्रभागात ताकद असलेला उमेदवारच बाजी मारण्याची चिन्हे आहेत. आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती महिलांसाठी १५, अनुसूचित जाती १३, अनुसूचित जमातीतील महिलांसाठी दोन व अनुसूचित जमातीसाठी एक जागा आरक्षित झाली आहे. सोडतीवर आलेल्‍या हरकती, सूचनांची सुनावणी झाल्‍यानंतर अंतिम आरक्षण आराखडा एक जुलैला प्रकाशित करण्‍यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे यंदा पहिल्यांदाच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज आरक्षण सोडत होती. त्यामध्ये अपेक्षेनुसार खुल्या गटासाठी तब्बल १८० जागा आरक्षित झाल्या आहेत. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये एखाद्या प्रभागात सक्षम ओबीसी महिला किंवा पुरुष उमेदवार नसला, तरी नेत्यांच्या प्रभावावर या आरक्षित जागा जिंकून येत होत्या, तसेच काही ठिकाणी सक्षम नेतृत्व करणारे ओबीसी प्रवर्गातील प्रतिनिधीही खुल्या प्रवर्गातून निवडून येत होते. खुल्या जागांची संख्या वाढल्याने नेमके हेच सूत्र जिल्ह्यातील नेत्यांना स्वीकारावे लागणार आहे. अन्यथा एखाद्या कार्यकर्त्याला ताकद नसताना संधी दिल्यास त्या ठिकाणी सक्षम खुल्या उमेदवाराच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पालिका निवडणुकांमध्ये ‘खुले राज’ येणार असले, तरी प्रभागात ताकद असणाऱ्याचाच शड्डू घुमण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील पालिकांमधील प्रभाग व प्रवर्गनिहाय आरक्षण ः सातारा पालिकेच्‍या २५ प्रभागांतील ५० जागांपैकी २१ जागा सर्वसाधारण महिला, अनुसूचित जाती महिला ३, अनुसूचित जाती पुरुष- ३, अनुसूचित जमाती महिला- १, सर्वसाधारणसाठी २२ राखीव झाल्‍या. कऱ्हाड पालिकेच्‍या १५ प्रभागांतील ३१ जागांपैकी सर्वसाधारण महिलांसाठी १४, अनुसूचित जाती महिला- २, अनुसूचित जाती पुरुष- २, तर सर्वसाधारणसाठी १३ जागा आरक्षित करण्‍यात आल्‍या. महाबळेश्‍‍वर येथील १० प्रभागांतील २० जागांसाठी सर्वसाधारण महिलांसाठी ९, अनुसूचित जाती महिला आणि पुरुषासाठी प्रत्‍येकी १, सर्वसाधारणसाठी ८ जागा.

Web Title: सातारा नगरपालिकांत खुले

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top