esakal | सालपे घाटात लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सांगली-मिरजेचे 11 अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

crime

सालपे घाटात लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सांगली-मिरजेचे 11 अटकेत

sakal_logo
By
सकाळ टीम

सातारा : वाठार-लोणंद रस्त्यावर सालपे घाटात ट्रकचालक व त्याच्या साथीदाराला बांधून मारहाण करत ट्रक व त्यातील लोखंडी कास्टिंग असा सुमारे 14 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीतील 11 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व माल हस्तगत करण्यात आला आहे. 24 तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी या पथकातील सर्वांचे अभिनंदन केले आहे.

सतीश विष्णू माळी (वय 25), सुनील ढाकाप्पा कदम (वय 22), सौरभ सुधाकर झेंडे (वय 20), आकाश शैलेंद्र खाडे (वय 23), सुशांत रमेश कांबळे (वय 30), ज्ञानेश्‍वर दत्तात्रय पवळ (वय 19), प्रतीक कुमार नलवडे (वय 19), गुरुप्रसाद सुदाम नाईक (वय 21), किरण राजाराम माळी (वय 23, सर्व रा. कौलापूर, ता. मिरज, जि. सांगली), संग्राम राजेश माने (वय 23, रा. बोरगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), विजय संभाजी चौगुले (वय 21, रा. संजयनगर, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

काल पहाटे साडेचारच्या सुमारास सालपे घाटातून चाललेल्या एका ट्रकला या टोळीने अडविले होते. चालक व त्याच्यासोबत असलेल्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून बांधून ठेवले. त्यानंतर ट्रक व त्यातील कास्टिंगचा लोखंडी माल, तसेच मोबाईल व रोख रक्कम घेऊन ते पसार झाले होते. याबाबत भाऊसाहेब जिजाबा शिंदे (वय 32, रा. बाबूळसर खुर्द, जि. पुणे) यांच्या फिर्यादीनुसार लोणंद पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. अजयकुमार बन्सल, अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील, फलटणचे उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर बन्सल यांनी एलसीबीचे निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे, लोणंद पोलिस ठाण्याचे विशाल वायकर, उपनिरीक्षक गणेश माने, फलटण पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन राऊळ व उपनिरीक्षक उस्मान शेख यांची पाच तपास पथके तयार केली होती.

पोलिसांनी घटनास्थळापासून जवळच्या सर्व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर फिर्यादी चालकासोबत सांगली येथून बरोबर आलेल्या साथीदाराची त्यांनी कसून चौकशी केली. त्यामध्ये त्याने गावातील काही लोकांसह कट रचून दरोड्याचा कट रचल्याचे सांगितले, तसेच चोरीचा माल नगर जिल्ह्यातील नागापूर औद्योगिक वसाहतीमध्ये विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या औद्योगिक वसाहतीमधील पोलिस ठाण्याला याबाबतची माहिती दिली. त्यांना चार संशयित एका कंपनीत एक टन माल विकत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी नगर येथून चार, कवलापूर, कूपवाड, मिरज व कवठेमहांकाळ येथील सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीतील सर्व ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

कारवाईत अधिकाऱ्यांबरोबर एलसीबीचे हवालदार शरद बेबले, नितीन गोगावले, गणेश कापरे, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, विक्रम पिसाळ, रोहित निकम, लोणंद पोलिस ठाण्याचे हवालदार महेश सपकाळ, अविनाश नलवडे, संतोष नाळे, ज्ञानेश्‍वर साबळे, अभिजित घनवट, विठ्ठल काळे, श्रीनाथ कदम, अमोल पवार, सागर धेंडे, केतन लाळगे, फलटण शहर पोलिस ठाण्याचे हवालदार नितीन चतुने, सर्जेराव सूळ, सुजित मांगावडे, दिग्विजय सांडगे, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे देवा तुपे, महेश जगदाळे, सचिन पाटोळे सहभागी होते.

Edited By : Balkrishna Madhale