esakal | बेड मिळाला नाही, म्हणून खचून न जाता कोरोनाशी लढणार; काटेवाडीच्या कोरोनाग्रस्तांचा निर्धार

बोलून बातमी शोधा

Corona
बेड मिळाला नाही, म्हणून खचून न जाता कोरोनाशी लढणार; काटेवाडीच्या कोरोनाग्रस्तांचा निर्धार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुध : बेड मिळाला नाही, म्हणून खचून न जाता कोरोनाशी लढणार आणि जिंकणार असा सकारात्मक विचार करून घरीच उपचार घेत काटेवाडीतील 13 जणांनी कोरोनावर मात केली. काटेवाडीत एक बाधित झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यात 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आरोग्य विभाग जागे झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा 80 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात पाच व्यक्ती बाधित निघाल्या.

400-450 लोकसंख्या असलेल्या काटेवाडीत 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली. ज्यांना शक्‍य होते. त्यांनी खासगी रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, पहिल्या 13 बाधितांना धडपड करूनही कोरोना सेंटरला बेड मिळाला नाही. खासगी रुग्णालयात जाण्यासारखी आर्थिक स्थिती नसल्याने अखेर त्यांनी घरीच राहून औषधोपचाराचा निर्णय घेतला. 55 ते 65 वयोगटातील या रुग्णांना इतरही आजार असल्याने घरी उपचार घेताना या रुग्णांच्या मनामध्ये भीती होती. त्यातच गावातील दोन रुग्ण दगावल्यामुळे घरीच उपचार घेणारे रुग्ण तणावाखाली होते.

सरपंच बाळासाहेब जगदाळे, गणेश कचरे, पृथ्वीराज पांडेकर, आरोग्य सेविका एस. एस. सस्ते, अंगणवाडी सेविका मनीषा काटकर, आशा जगदाळे, शुभांगी कर्णे आदींनी तुम्हाला काहीही होणार नाही, आम्ही आहोत, असा धीर देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करत होते. डिस्कळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी माधुरी मोरे परिस्थितीवर लक्ष ठेऊन होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भीमाशंकर कांबळे, आरोग्यसेविका सस्ते व वेटणे उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी भेटी देऊन रुग्णांच्या तपासण्या करून औषधोपचार करत होते. या रुग्णांना इतरही आजार असताना आणि एचआरसीटी स्कोर 5 पर्यंत असताना सकारात्मक विचार आणि योग्य औषधोपचार घेऊन मोठ्या धीराने कोरोनाशी दोन हात केले. आत्मविश्वासाच्या बळावर घरीच राहून सर्व उपचार घेतले, तर शंभर टक्के बरे होता येते, हे त्यांनी सिद्ध केले. आज डॉ. भीमाशंकर कांबळे यांनी तपासणी करून कोरोनामुक्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.