esakal | सहकारातील 1317 संस्थांच्या निवडणुकांचा वाजला बिगुल; जिल्ह्यात सहा टप्प्यात प्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Election

कोरोनामुळे गेल्या १५ महिन्यांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करून संचालकांना मुदतवाढ देण्यात आली.

सहकारातील 1317 संस्थांच्या निवडणुकांचा वाजला बिगुल

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : सहकार विभागाने सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका (Co-operative Society Election) घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १३१७ सहकारी संस्थांच्या निवडणुका मुदत संपलेल्या तारखेनुसार सहा टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ‘अ’ वर्गातील गेल्या वर्षी कोरोनाच्या आधी मुदत संपलेल्या सहकारी संस्थांचा समावेश आहे. यामध्ये जिल्हा बॅंकेसह सहकारी साखर कारखान्यांचा (Sugar Factory) समावेश आहे. त्यानंतर नागरी सहकारी बॅंकांच्या निवडणुका होतील. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या निवडणुकांमुळे सहकार विभाग व इतर विभागांतील कर्मचाऱ्यांची मदत घेणार आहे.

कोरोनाच्या महामागरीमुळे गेल्या १५ महिन्यांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करून संचालकांना मुदतवाढ देण्यात आली. सहकाराच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने लॉकडाउन पूर्णपणे शिथिल करण्यात आले आहे. परिणामी सर्व व्यवहार कोरोनाची नियमावली पाळून सुरू झाले आहेत. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत दिलेली मुदतवाढ संपली. परिणामी सहकार विभागाने मुदत संपलेल्या सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २० सप्टेंबरपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. एकाच वेळी सर्व संस्थांची निवडणूक घेणे अवघड असल्याने टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातील १३१७ सहकारी संस्थांची मुदत संपलेली आहे.

हेही वाचा: आगामी निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतः लक्ष घालणार

त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी सहकार निवडणूक प्राधिकरणाला सहा टप्प्यांत कशा पद्धतीने निवडणुका घेणार, याचे वेळापत्रकही दिले आहे. यामध्ये कोरोनामुळे स्थगित झालेल्या संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होतील. त्यानंतर दुसरच्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदत संपलेल्या संस्थांचा समावेश असेल. तिसऱ्या टप्प्यात एक जानेवारी २०२० ते २१ मार्च २०२० पर्यंत मुदत संपलेल्या संस्था, चौथ्या टप्प्यात एक एप्रिल २०२० ते ३० जून २०२०, पाचव्या टप्प्यात एक जुलै २०२० ते ३० सप्टेंबर २०२०, सहाव्या टप्प्यात एक ऑक्टोबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० अशा पध्दतीने आगामी काळात मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यासंदर्भात सहकार निवडणूक प्राधिकरणास जिल्हा उपनिबंधकांनी कळविलेले आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने या निवडणुका होतील. यामध्ये वर्गवारीनुसार मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये ‘अ’ वर्गातील सहा, ‘ब’ वर्गातील ५८३, ‘क’ वर्गातील ४२०, ‘ड’ वर्गातील ३०८ संस्थांचा समावेश आहे.

हेही वाचा: पालिकांसह जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावरच : विक्रम पावसकर

जिल्हा बॅंकेची २७ तारखेला अंतिम मतदार यादी

सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे. २७ तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर म्हणजे ऑक्टोबरमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या निवडणुकीनंतर लगेचच मुदत संपलेल्या साखर कारखान्यांची निवडणूक होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नागरी सहकारी बॅंकांच्या निवडणुका होतील.

loading image
go to top