साताऱ्याच्या हद्दवाढीत २३ हजार मिळकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Municipality

साताऱ्याच्या हद्दवाढीत २३ हजार मिळकती

सातारा - हद्दवाढीनंतर सातारा पालिकेत आलेल्‍या शाहूपुरी, विलासपूर, दरे खुर्द, शाहूनगरसह इतर उपनगरांतील मिळकतींची चतुर्थ वार्षिक पाहणी पूर्ण झाली आहे. पाहणीअखेर हद्दवाढ भागात २३ हजार मिळकती असल्‍याचे समोर आले आहे. हद्दवाढ, तसेच मूळ शहरातील मिळकतींची संख्या ५७ हजारांवर गेल्याची पालिकेच्‍या दप्‍तरात नोंद झाली आहे.

गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारी पालिकेची हद्दवाढ शासनाने मंजूर केली. त्यामुळे शाहूपुरी, विलासपूर या दोन ग्रामपंचायती, तसेच दरे खुर्द, शाहूनगर व अन्य उपनगरे पालिकेत समाविष्ट झाली. पालिकेत समावेश होण्‍यापूर्वी शाहूपुरी, विलासपूर येथील नागरिकांना आवश्‍‍यक सुविधा व मिळकतविषयक सेवा त्‍याठिकाणच्‍या ग्रामपंचायतींच्‍या माध्यमातून पुरविल्या जात होत्‍या.

हद्दवाढीमुळे या दोन ग्रामपंचायती बरखास्‍त झाल्‍या आणि त्‍याठिकाणचे सर्व दप्‍तर पालिकेकडे वर्ग झाले. त्या दप्‍तराची पडताळणी करत तेथील मिळकतीही पालिकेकडे वर्ग करण्‍याची प्रक्रिया सुरू करण्‍यात आली होती. ती करत असतानाच पालिकेने रखडलेली चतुर्थ वार्षिक पाहणीचे वेळापत्रक जाहीर केले. यानुसार पथके तयार करत पालिकेने हद्दवाढ भागातील मिळकतींची पाहणी केली. या पाहणीदरम्‍यान बांधकाम क्षेत्र, बांधकामाचा प्रकार, पत्रा, स्‍लॅब, शेड, अंतर्गत सोयीसुविधा, रहिवास, तसेच व्‍यावसायिक वापर, मुख्‍य, अंतर्गत रस्‍त्‍यांच्‍या नोंदी घेण्‍यात आल्‍या.

या नोंदींनुसार मिळकतीचे मूल्य निश्‍चित करत आगामी काळात घरपट्टी आकारणीबाबतची कार्यवाही पालिकेकडून मूळ शहरासह विस्तारित भागात होण्‍याची शक्‍यता आहे. हद्दवाढीपूर्वी येथील मिळकतधारकांना त्‍याठिकाणी कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायत नियमानुसार कर आकारणी होत होती. मात्र, आता त्‍यांना पालिकेच्‍या नवीन धोरणानुसार कर, घरपट्टी भरावी लागणार आहे.

हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्‍या भागातील नागरिकांवर घरपट्टी व इतर करांचा बोजा लगेच पडू नये, यासाठी त्‍याठिकाणी कमी कर आकारणी करण्‍यासाठीचा प्रस्‍ताव पालिकेच्‍या विचाराधीन आहे. पाहणीदरम्‍यान, हद्दवाढ भागात २३ हजार मिळकती असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. या २३ हजार मिळकती आणि मूळ शहरातील ३४ हजार मिळकती अशी एकूण ५७ हजार मिळकतींची नोंद पालिकेच्‍या दप्‍तरात झाली आहे.

Web Title: 23000 Propertys In Boundary Extension Of Satara City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..