
पाटण (जि. सातारा) : तहसील कार्यालयातील रिक्तपदांचा वाढलेला आकडा, कोरोनामुळे ठप्प असलेला कारभार, काही कर्मचारी बदली करून गेले, काही जाण्याच्या मार्गावर, पाटणला येणाऱ्यांची नकारघंटा व आहे त्यांना सुचेना, अशी एकूण परिस्थिती आहे. मंजूर पदांपैकी 41 पदे म्हणजे 40 टक्के पदे रिक्त आहेत. तहसीलदारांसह चार नायब तहसीलदारांचा कारभार एका नायब तहसीलदारांवर आला असल्याने पाटणच्या विकासाची चाके कशी मार्गावर येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाढलेली महसुली गावे व सजे, मंजूर पदे जुन्या निकषांवर, नवीन वाढलेल्या 16 सजांना आर्थिक तरतूद नाही, त्यामुळे दैनंदिन कामकाजाचा व्याप वाढला असून, त्याचा एकंदरीत परिणाम कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडणे व जनतेच्या कामावर होत आहे. जुन्या निकषाप्रमाणे एकूण 67 सजे आहेत. त्यासाठी एकूण 109 पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी फक्त 71 पदे कार्यरत, तर 41 रिक्त आहेत. 16 सप्टेंबर 2019 रोजी वादग्रस्त तहसीलदार रामहरी भोसले यांची बदली झाली. त्याअगोदर दीड वर्षे अधिकार नसणारे तहसीलदार कार्यालयात बसून असायचे. त्यांची बदली झाल्यानंतर रवींद्र माने यांनी पदभार स्वीकारला. मात्र, चार महिन्यांत त्यांनी मंत्री सुनील केदार यांच्याकडे मंत्रालयात प्रस्थान केले.
रवींद्र माने यांच्या जागी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असणारे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी समीर यादव यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याने ते 16 जानेवारीपासून दोन ऑक्टोबरपर्यंत त्यांनी सातारा व पाटणचा कारभार तारेवरील कसरत करून पार पाडला. त्यांची फलटणला तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. मात्र, पाटणला बदल्यांच्या सत्रात कोणीही आलेले नाही. नायब तहसीलदारांची चार पदे मंजूर आहेत. मात्र, महसूल, संजय गांधी निराधार योजना व निवडणूक शाखेला नायब तहसीलदार नाहीत. निवासी नायब तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यावर तहसीलदारपदासह आता चार नायब तहसीलदारांची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. जमेची बाब म्हणजे अव्वल कारकुनांची तीन पदे मंजूर असून, सध्या सहा कार्यरत आहेत.
11 मंडलाधिकारी मंजूर असले तरी फक्त सात कार्यरत तर चार रिक्त, लिपिकांची सहा, तलाठी 23 आणि शिपायांची सातपैकी चार पदे रिक्त आहेत. तीन शिपाई अशी 33 पदे रिक्त आहेत. जुन्या 67 सजाप्रमाणे एकूण 109 पदे मंजूर असून 71 कार्यरत आणि 41 रिक्त आहेत. नवीन 16 सजांना शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, त्या सजांसाठी आर्थिक तरतूद न केल्याने सदर पदे भरलेली नाहीत. रिक्त पदे व 16 सजांचा भार असा अतिरिक्त कारभार मंजूर पदांना सोसेना झाला आहे. काही कर्मचाऱ्यांचे त्यामुळे मानसिक संतुलन बिघडत चालले असून, जनतेला मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे हेलपाटे मारावे लागत आहेत. तहसीलदार समीर यादव यांची बदली झाली असून, पाटणला कोणीही बदलून अधिकारी आलेला नाही. सलग चार वर्षे हा प्रकार चालला असून, जिल्हाधिकारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटणला आले होते. त्यावेळी पत्रकारांनी रिक्त पदांबाबत वस्तुस्थिती कानावर घातली होती. मात्र, त्यामध्ये कोणताही बदल झालेला नसून अधिकारीच येत नसेल तर पाटणचा कारभार कसा चालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाटणला बदली म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षा!
पाटण तालुक्यात महसूल नव्हे तर सर्वच शासकीय, निमशासकीय विभागांत नवीन अधिकारी किंवा कर्मचारी येत नाहीत. राजकीय वजन वापरून अन्य तालुक्यांत जातात. आलेले पाटणला बदली म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षा, अशी मानसिकता घेऊन येतात. त्यामुळे पाटणची जनता चुकतेय की पाटणचे लोकप्रतिनिधी, याबाबत विचार होणे गरजेचे आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.