येणके गावात होणार 75 विधवा माता- भगिनींच्या हस्ते 75 ध्वजांचं ध्वजारोहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Har Ghar Tiranga national flag

येणके गावात होणार 75 विधवा माता- भगिनींच्या हस्ते 75 ध्वजांचं ध्वजारोहण

कराड - सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येणके या गावात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अर्थात 75 वा स्वातंत्र्य दिन गावातील 75 विधवा महिलांच्या हस्ते 75 ध्वज फडकवुन साजरा करण्यात येणार आहे.

विधवा प्रथा ही भारतीय समाजाला लागलेली कीड अर्थात कलंक आहे. हा कलंक पुसण्यासाठी महाराष्ट्रातील मोजकयाच गावांनी एक पाऊल पुढे टाकत विधवा प्रता बंदीचा ठराव सहमत केला आहे. आजपर्यंत भारत देशामध्ये विशेषतः सामान्य विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र येणके गावाने केवळ एकाच विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोह न करता भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातीलच 75 विधवा माता भगिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

संपूर्ण देशभर या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी येणके गावातील ग्रामस्थांनी भारत देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अर्थात या अमृत महोत्सवानिमित्त गावातील विधवा परितक्त्या स्त्रियांच्या हस्तेच 75 ध्वज फडकवण्याचा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. यासाठी गावांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा, सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामसेवा प्रतिष्ठान येणके यांच्या वतीने गावात सर्वे करण्यात आला. या सर्वे नंतर गावात तब्बल 137 महिला विधवा असल्याचे निदर्शनास आले.

3000 लोकसंख्येच्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विधवा असणाऱ्या या महिला भगिनींना मानसन्मान द्यायचाच व त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले विधवा प्रता बंद झालीच पाहिजे व या सर्व महिलांना इतर महिलांच्या प्रमाणे अधिकार व हक्क प्राप्त झाला पाहिजे , विविध सण समारंभामध्ये त्यांना हळदीकुंकू समारंभाला बोलवून त्यांचाही मानसन्मान झाला पाहिजे यासाठी सर्व ग्रामस्थ या विचाराने एकवटलेले आहेत .15 ऑगस्ट रोजी येणके गावातील जिल्हा परिषद शाळेच्या भव्य प्रांगणात गावातील 75 विधवा माता भगिनींच्या शुभहस्ते 75 ध्वजांचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे हा कार्यक्रम 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी संपन्न होणार आहे या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते ही शालेय विद्यार्थी सादर करणार आहेत. त्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामपंचायत व ग्रामसेवा सार्वजनिक प्रतिष्ठान येणकेच्यावतीने करण्यात आलेले आहे.