
सातारा जिल्ह्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे.
वाघा घेवड्याचा गौरव; पोस्टाच्या तिकीटावर दिसणार
पिंपोडे बुद्रुक (सातारा): महाराष्ट्र सर्कल अंतर्गत सातारा डाक विभागाच्या पुणे क्षेत्रामार्फत वाघा घेवडावर एक विशेष कव्हर प्रकाशित करुन या पिकाला गौरविण्यात आले. देऊर (ता. कोरेगाव) येथील संभाजीराव कदम महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये पुणे विभागाच्या पोस्टमास्तर जनरल श्रीमती जी. मधुमिता दास यांचे हस्ते हा कार्यक्रम झाला.
वाघा घेवडा हा राजमाचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये गुलाबी रंग आणि पट्टे आहेत. ते वाघाच्या अंगावरील पट्ट्याप्रमाणेच दिसतात. म्हणून त्याला वाघा घेवडा असे म्हटले जाते. या व्यतिरिक्त, हे पोषक कडधान्य आहे आणि कमी कॅलरी आणि संतृप्त चरबी आणि अँटीऑक्सिडंट्सनेसुध्दा समृद्ध आहे. २०१६ मध्ये त्याला GI टॅग प्राप्त झाला आहे. उत्तर भारतात याला मोठी मागणी आहे. याचे आहारातील विशेष महत्व ओळखून भारतीय डाक विभागाने यावर स्पेशल कव्हर प्रसिद्ध केल्याने वाघा घेवड्याच्या "आंतरराष्ट्रीय स्पेशल कव्हर व तिकीटाचा जागतिक वारसा" म्हणून समावेश झाला आहे.
सातारा जिल्ह्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे. या कार्यक्रमासाठी श्रीमती दास, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जय तुळजाभवानी शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष मधुकर कदम तसेच कोरेगाव, फलटण तालुक्यातील मान्यवर आणि डाक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सातारा डाक विभागाच्या प्रवर अधिक्षका श्रीमती अपराजिता म्रिधा प्रवर यांनी हे स्पेशल कव्हर त्याच्या प्रत्यक्ष भौगोलिक उत्पादन स्थानावर प्रसिद्ध करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या उपलब्धीबद्दल शेतकरी व व्यापारी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.