चोरलेल्या जीपमधून नेदरलॅंडच्या पॉली जेस्सीचा थरार; निसरे फाट्यावर एकाला धडक, कारलाही ठोकरले

चोरलेल्या जीपमधून नेदरलॅंडच्या पॉली जेस्सीचा थरार; निसरे फाट्यावर एकाला धडक, कारलाही ठोकरले
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : परदेशी महिलेने पाटण ते विजयनगरपर्यंत काल दुपारी तासभर गदारोळ घातला. ही महिला पाटणमधून दुचाकीने सुसाट कऱ्हाडच्या दिशेने आली. पेट्रोल संपल्याने तिने ही दुचाकी नवारस्ता येथेच सोडली. तेथून पुन्हा दुसरी जीप चोरून ती सुसाट कऱ्हाडच्या दिशेने पुन्हा आली. निसरे फाट्यावर एकाला धडक देत ती तशीच पुढे आली. मात्र, विजयनगरला तिच्या जीपला अपघात झाला. वाहनाला ठोकर देत रस्त्याचे दुभाजक तोडल्याने ही जीप पलटी झाली. त्यामुळे पुढचा थरार थांबला. या अपघातात परदेशी महिलेसह कारचालक जखमी झाला आहे. 

पॉली जेस्सी (रा. नेदरलॅंड) असे त्या विदेशी महिलेचे नाव आहे. ती पर्यटक असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, ती पाटण येथे कोठून आली, ती नक्की कशासाठी आली होती, ती नशेत आहे का, याची चौकशी पोलिस करत आहेत. पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पाटणहून विदेशी महिला दुचाकी घेऊन रस्त्याने सुसाट निघाली होती. भरधाव वेगात असतानाच निसरे नवारस्ता येथे दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तेथेच तिने दुचाकी सोडली. त्यानंतर सुमारे 100 फुटांवर पळत जात असतानाच रस्त्याकडेला जीप उभी असल्याची तिला दिसली. ती जीप ज्ञानदेव नलवडे (रा. नावडी) यांची होती. ते दुकानात साहित्य ठेवत असल्याने जीपला चाव्या तशाच होत्या. 

चाव्यांसह जीप दिसताच स्टार्टर मारून पॉली कऱ्हाडच्या दिशेने आली. तेथे पट्रोलिंग करणारे गृहरक्षक दलाचे जवान आकाश चव्हाण व अमन गुजर यांना ही माहिती कळताच त्यांनी दुचाकीवरूनच त्या जीपचा पाठलाग केला. त्याचवेळी ती फिल्मी स्टाइलने रस्त्यावरील वाहनांना चुकवत, तर कधी चकवा देत तिने सुसाट वेगात जीप पुढे नेली. विजयनगरला आरटीओ कार्यालयासमोरील उताराला पॉलीने जीपचा वेग अधिकच वाढवल्याने जीपवरील ताबा सुटला. कऱ्हाडकडे निघालेल्या नानासाहेब पवार (रा. नवारस्ता-निसरे) यांच्या कारला जीपने मागून जोरदार धडक दिली. ही जीप जोरात दुभाजकाला धडकून रस्त्यावर पलटी झाली. अपघातात नानासाहेब पवार यांच्यासह पॉली किरकोळ जखमी झाली आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पॉलीला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com