पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात युवती ठार; मुंढेत शाेककळा

सचिन शिंदे
Tuesday, 19 January 2021

अपघाताची नोंद शहर पोलिसात झाली. हवालदार खलील इनामदार, प्रशांत जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

कऱ्हाड : सहलीहून घरी परतण्यासाठी महामार्ग ओलांडणाऱ्या महाविद्यालयीन युवतीला भरधाव आलेल्या कारने ठोकर दिल्याने युवती जागीच ठार झाली. पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापूर लेनवर गोटे (ता. कऱ्हाड) येथे मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास अपघात झाला. निकिता दत्तात्रय जमाले (वय 18, रा. मुंढे, ता. कऱ्हाड) असे संबंधित युवतीचे नाव आहे.
 
सहलीवरून परतलेल्या निकिताला नेण्यासाठी तिचा भाऊ आला होता. त्याच्याकडे जाण्यासाठी ती रस्ता ओलांडून जात असताना त्याच्यासमोर हृदयद्रावक अपघात झाला. युवतीच्या मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी धडक दिलेल्या वाहनाचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी अपघात झाला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिस शोधत आहेत.

Gram Panchayat Results : उदयनराजे, महेश शिंदे, मनाेज घाेरपडेंच्या पॅनेलचा उडाला धुव्वा

पोलिसांनी सांगितल्यानुसार निकिता जमाले सहलीला गेली होती. ती रविवारी रात्री सहलीवरून आली. रविवारी रात्री तिला घरी नेण्यासाठी तिचा भाऊ आला होता. पुणे ते कोल्हापूर लेन ती ओलांडून जाण्याच्या प्रयत्नात होती. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने निकिताला धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिच्या भावासमोरच अपघात झाला. त्याने तत्काळ निकिताकडे धाव घेत तिला उचलले.

निकिताला सह्याद्री रुग्णालयात नेले. मात्र, दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. निकिता पोलिस होण्यासाठी प्रशिक्षण घेत होती. त्यासाठी तिची तयारी सुरू होती. अपघाताची नोंद शहर पोलिसात झाली. हवालदार खलील इनामदार, प्रशांत जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

तशी वेळ आली, तर मेडिकल कॉलेजचं पण उद्घाटन करणार; उदयनराजेंचा प्रशासनाला इशारा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident On Pune Bangalore National Highway Satara Marathi News