आदर्श बिदालचा विधवा प्रथा बंदीचा निर्णय; एकमताने ठराव मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adarsh village Bidal decision ban widow practice Resolution passed satara

आदर्श बिदालचा विधवा प्रथा बंदीचा निर्णय; एकमताने ठराव मंजूर

दहिवडी : नेहमीच विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या बिदाल (ता. माण) या गावाने विधवा प्रथा बंदीचा ठराव एकमताने मंजुर केला. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन उपस्थित विधवांना हळदीकुंकू लावून चुडा भरुन साडीचोळी देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. आदर्श गाव किरकसालने विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतल्यानंतर बिदाला ग्रामस्थांनी सुध्दा या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पोलिस अधीक्षक प्रवीण इंगवले यांनी हा ठराव घ्यावा यासाठी वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर गावातील आर्ट ऑफ लिव्हिंगची टीम कामाला लागली. त्यांनी विधवांच्या घरी जावून त्यांची मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला चांगले यश आले.

आज सरपंच गौरी बा. जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेवून त्यात विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमास विधवा महिला स्वच्छेने मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित सर्व विधवा महिलांचे सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते हळदीकुंकू लावून, साडीचोळी देवून सन्मान करण्यात आला. यावेळी आप्पा देशमुख, धनंजय जगदाळे, प्रताप भोसले, किशोर इंगवले, अजय माने, हणुमंत फडतरे व पुष्पांजली मगर यांनी आपले मनोगत व्यक्त करुन या निर्णयाचे महत्व व आवश्यकता सांगितली. या ग्रामसभेस बिदाल ग्रामस्थ, आशा सेविका, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"विधवांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी विधवा प्रथा बंदी अतिशय आवश्यक आहे. यासोबतच विधवा पुनर्विवाहाला चालना देणे गरजेचे आहे."

-प्रवीण इंगवले, पोलिस अधीक्षक, राष्ट्रीय तपास यंत्रणा

"विधवा म्हणून जगणं लय अवघड असतंय. आमचं झालं गेलं पण आता तरण्याताट्या पोरी विधवा म्हणून बघवत नाहीत. त्यांना मानानं जगण्याचा अधिकार हाय. त्यांना लग्न करता आलं अन समद्यांनी पुढाकार घेऊन त्यांची लग्न लावली तर लय बरं हुईल."

-जगुबाई पाटील (विधवा, वय : ७० वर्षे)

Web Title: Adarsh Village Bidal Decision Ban Widow Practice Resolution Passed Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top